अतुल सुलाखे jayjagat24 @gmail.com
बनारस हिंदू विद्यापीठाच्या उद्घाटन सोहळय़ात (फेब्रुवारी १९१६) इंग्लिश भाषेच्या अतिरेकामुळे होणाऱ्या नुकसानीवर गांधीजी बोलले; त्याप्रमाणे केवळ कागदी घोडे नाचवून स्वराज्य मिळणार नाही यावरही त्यांनी स्पष्ट शब्दांत टीका केली. काँग्रेसने संमत केलेल्या स्व-शासनाच्या ठरावावरदेखील त्यांनी आपली भूमिका मांडली. काँग्रेस आणि मुस्लीम लीग आपले कर्तव्य कितीही निष्ठेने पार पाडत असले तरी यापुढे अशा ठरावांनी आपले काम होणार नाही. आता प्रत्यक्ष कृती करा, अशी इथल्या युवकांची आणि आम जनतेची मागणी आहे, या गोष्टीवर गांधीजींनी जोर दिला.
त्यांनी काशी विश्वनाथ मंदिर आणि परिसरातील अस्वच्छता यांचे उदाहरण दिले. आपली श्रेष्ठ मंदिरे अशा अवस्थेत असतील तर आपले ‘स्वशासन’ काय दर्जाचे असेल? आपण नगरांत राहतो, पण आपल्यावर नागरी संस्कार नाहीत. शहर आणि छावणी हे दोन्ही भाग पाहिले की चित्र स्पष्ट होते. जी शहरांची तीच रेल्वे डब्यातील स्थिती. तिथेही बेशिस्त आणि अस्वच्छता असते. आपण स्वशासनाची मागणी करतो तेव्हा ही सर्व परिस्थिती लक्षात घेतली पाहिजे. ते पुढे म्हणाले, गेले दोन दिवस आपण गरिबीच्या प्रश्नावर कळकळीने चर्चा केली, पण आपल्या भवतालचे चित्र कसे होते? उद्घाटनाचा सोहळा झगमगाटाने पुरेपूर सजला होता. दागिन्यांनी नटलेल्या स्त्री-पुरुषांकडे पाहून मला एक गोष्ट प्रकर्षांने जाणवली की हे धनाढय़ लोक जोवर आपली संपत्ती सामान्यांसाठी देत नाहीत तोवर हा देश मुक्त होणार नाही.
गांधीजी म्हणाले, ‘मी जेव्हा केव्हा असे ऐकतो की एखाद्या नगरीत एक भव्य प्रासाद उभारला जाणार आहे. तेव्हा इथल्या शेतकरी आणि शेतमजुरांची ही लूट आहे हे माझ्या लक्षात चटकन येते. भारताची ७५ टक्के लोकसंख्या शेतकरी आहे आणि जमिनीतू दुप्पट उत्पादन कसे काढावे याची त्यांना माहिती आहे, पण त्यांना स्वशासनाचा अधिकार मात्र नाकारला जातो आहे’ . यानंतर ब्रिटिशांची दहशत, तिच्याविरुद्ध उमटणारी हिंसक प्रतिक्रिया, अराज्यवाद अशा मुद्दय़ांना गांधीजींनी स्पर्श करण्यास सुरुवात केली. तेव्हाच नेमके बेझंटबाईंनी गांधीजींचे भाषण रोखले. श्रोत्यांचा एक गट भाषण सुरू ठेवा म्हणत होता तर दुसरा हे भाषण यापुढे नको, असे म्हणत होता. या गदारोळात गांधीजींचे भाषण अपुरे राहिले.
गांधीजींच्या या भाषणात स्पष्टोक्ती होती. ते कुणाचे कैवारी आहेत हेही त्यातून स्पष्ट होत होते. गरीब, शेतकरी आणि शेतमजूर यांच्याविषयीची कळकळ आणि प्रेम सहजपणे जाणवते. गांधीजींचे मूळ भाषण अगदी विस्तृत आहे, तथापि साम्ययोगाच्या सामाजिक अंगावर या भाषणाचा मोठा प्रभाव दिसतो. विनोबांनी या भाषणाचा फक्त वृत्तांत वाचला आणि त्यांनी गांधीजींशी पत्ररूपाने संवाद साधणे सुरू केले.
शांती की क्रांती, हा त्यांच्या मनातील पेच गांधीजींमुळे सुटणार होता. बापूंचे हे भाषण ही सुरुवात होती. भारताच्या इतिहासात एक नवे पर्व उदयाला येणार होते. विनोबांना, राजकारणाला अध्यात्माची जोड हवी होती. गांधीजींच्या विचारांमध्ये राजकीय स्पष्टता होती. परंतु आध्यात्मिक विकास कसा साधला जाणार होता?