देहबुद्धीचा निरास केल्यानंतर साधू-संतांना साम्याचे दर्शन झाले. स्वधर्माचे आचरण, सर्वाभूती भगवद्भाव ठेवून परमेश्वराची उपासना या मार्गाने त्यांना परम सत्याचे दर्शन झाले. हा साक्षात्कार सर्वाना सुलभ होईल असे कार्य त्यांनी केले. संतांचा लौकिक पराक्रम हा स्वतंत्र विषय आहे.

या अनुषंगाने एक उदाहरण- संत एकनाथांचे पणजोबा संत भानुदास महाराज. त्यांनी विजयनगरला नेलेली श्रीविठ्ठलाची मूर्ती पंढरपूरला परत आणली. विनोबांनी या घटनेचे वर्णन ‘एखाद्या राज्यस्थापनेपेक्षा ही घटना मुळीच कमी नाही,’ अशा शब्दांत केले आहे. थोडक्यात परम साम्याच्या शोधात लौकिक समत्व आणि पराक्रम यांना महत्त्वाचे स्थान आहे.

चोखा, सेना, सावता, गोरा, जनाई या आणि अशा इतर माहात्म्यांचे एखादे वचनही परिपूर्ण सत्याचे दर्शन घडवते. आध्यात्मिक क्षेत्रात अलौकिक स्थानी पोहोचलेल्या कुटुंबाचे अप्रतिम उदाहरण म्हणून विनोबांनी संत चोखा मेळा यांचे कुटुंब निवडले आहे. चोखा, सोयरा, निर्मळा, बंका, कर्मा या परिवाराने लौकिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही पातळय़ांवर समत्वाचा आग्रह धरला. देहबुद्धीच्या पलीकडे विचार केल्यामुळे त्यांना सत्य उमगले, हे उघडच आहे.

ही आदर्श स्थिती साधू-संतांच्या बाबतीत शक्य आहे, असे कुणाला वाटत असेल तर तो गैरसमज आहे. विनोबांचे जे मोजके आदर्श होते, त्यात आघाडीच्या व्यक्तींमध्ये सूर्याजी मालुसरे यांचा समावेश होता. खरे तर सूर्याजी मालुसरे यांच्याविषयी फार माहिती नसते. सिंहगडावर आपला भाऊ धारातीर्थी पडल्यावर सूर्याजींनी मराठा सैनिकांची मरगळ दूर केली.

इतिहसतज्ज्ञ, वेगळे पुरावे मिळाले तर ही घटना नाकारतीलही. तथापि विनोबांनी या घटनेचा आध्यात्मिक अर्थ लावल्याचे दिसते. सूर्याजींपासून विनोबा ‘दोर कापण्याचे’ तत्त्वज्ञान शिकले आणि आयुष्यात अनेकदा या मार्गाचा त्यांनी अवलंब केला.

रामदास आणि तानाजी या माहात्म्यांची तुलना करताना त्यांनी त्यांच्यातील सेवकत्व आणि देहबुद्धीच्या पलीकडे जाऊन जगण्याची आस आवर्जून सांगितली आहे. ‘देहे दु:ख ते सूख मानीत जावे’ हे समर्थाचे वचन प्रसिद्ध आहे. त्यांच्या आध्यात्मिक अधिकारामुळे त्यांची आत्मज्ञानाची इच्छा आपण समजू शकतो. परंतु नरवीर तानाजी त्याच मार्गाचे प्रवासी होते.

‘आधी केले मग सांगितले’ ही आदर्श स्थिती मानली जाते. विनोबांच्या मते, तानाजींनी ‘आधी केले आणि मगही केलेच. त्यांच्या मौनाचे आवाज सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यांतून गाजत आहेत.’ असे सांगत विनोबा महाराष्ट्राला या मौनाचा अर्थ समजेल का, असा थेट प्रश्न विचारतात. पुढे ‘तानाजी हे शिवाजीच्या आयुष्यातील सुंदरकांड आहे,’ असेही ते म्हणतात. या एका वाक्यामुळे शिवराय रघुकुलात दाखल होतात. थोडक्यात ज्ञानदेव ते शिवराय ही देहबुद्धीला नाकारणाऱ्या पराक्रमी महापुरुषांची मालिका आपल्या समोर येते. साम्यभावनेच्या आड येणाऱ्या देहभावनेचा पराभव करणारी ही परंपरा महत्त्वाची आहे. याच परंपरेने समत्वाच्या दिशेने आपली वाटचाल सुकर करणारा मार्गही दाखवला आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे पुढच्या पिढीच्या पराक्रमाला संधी दिली आहे. म्हणूनच समत्वाचा हा प्रवास परिपूर्ण ठरतो.

– अतुल सुलाखे

 jayjagat24@gmail.com