भक्तातें प्रतिबोधिलीस

 समरीं नारायणें श्रीवरें

मुक्तें! संग्रथिलीस मान्य

मुनिनें वेदांत-विद्याकरें।

माते! षष्टय़धिकारिणी

सतशती अष्टादशाध्यायिनी

तूतें मी अनुसंधितों निशिदिनीं

गीते! भय-द्वेषिणी।।

हा गीताईच्या ध्यानाचा श्लोक आहे. उत्तर प्रदेशात भूदान-यात्रा सुरू होती. पहाटे पाच वाजता कोटा ते सहारनपूर असा प्रवास सुरू झाला. रस्त्यात विनोबांना हे गीताईचे ध्यान डोक्यात आले. ते याची दोन कारणे सांगतात. पहिले, ‘चिंतनासी नलगे वेळ सर्वकाळ करावे’ आणि भूदान यज्ञाचे कार्य म्हणजे गीतेची सेवाच होय. चिंतनासाठी वेगळा वेळ काढण्याची गरजच नसते. चिंतन करण्याची वृत्ती निर्माण होणे म्हणजेच चिंतन करणे, असे ते मानत. त्यामुळेच रस्त्यात जनसमुदाय स्वागत करत असतानाही ते ध्यानमग्न राहून ही रचना तयार करत होते. ‘गीता-गीताई’च्या प्रस्तावनेत हा संदर्भ आहे.

सद्ग्रंथ, सत्-वाङ्मयाच्या इतकेच कशाला अगदी नित्यपठणातील स्तोत्राच्या आरंभीही ध्यानाचा श्लोक दिसतो. यानिमित्ताने आणखी एक ध्यानात घ्यायला हवे. गीताई म्हणजे गीतेचा अनुवाद आहे, असे विधान बरेचजण अगदी सहजपणे करतात. गीताई ही गीतेची समश्लोकी आहे. बरेचदा ती गीतेच्या पलीकडे असणाऱ्या गोष्टीही आपल्या समोर ठेवते. अगदी ध्यानाच्या श्लोकापासून याचे प्रत्यंतर येते. ज्या मूळ श्लोकावरून विनोबांना मराठी श्लोक स्फुरला तो श्लोक असा –

ॐ पार्थाय प्रतिबोधितां

भगवता नारायणेन स्वयं।

व्यासेन ग्रथितां

पुराणमुनिना

मध्ये महाभारतं॥

अद्वैतामृतवर्षिणीं

भगवतीमष्टादशाध्यायिनी

मम्बत्वामनुसंदधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्॥

भावार्थ –

भगवान् श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेश केलेल्या, महर्षी व्यासांनी ग्रथित केलेल्या, महाभारताच्या मध्यभागी असणाऱ्या आणि अद्वैतरूपी अमृताचा वर्षांव करणाऱ्या, अठरा अध्यायांत सामावलेल्या आणि भवाचा द्वेष करणाऱ्या (निरास या अर्थाने) हे गीता माते, मी सदैव तुझ्या अनुसंधानात राहतो. मूळ श्लोक अनुवादाची प्रक्रिया या दोहोंबद्दल संपूर्ण आदर राखला तरी, विनोबांच्या श्लोकाला केवळ अनुवाद म्हणता येणार नाही. गाभा कायम ठेवून विनोबांनी केलेले हे स्वतंत्र चिंतन आहे.

भक्त, समरांगण, नारायण, मुक्ता, मान्य-मुनी, आदींना रूढ अर्थापलीकडेही विविध छटा आहेत. वेदांत विद्याकर, भय द्वेषिणी, साठ अधिकरणे ही विनोबांची भर आहे. वृत्तरचना तशीच ठेवल्याने श्लोकाचा बाह्याकार तसाच राहतो. शब्द कायम ठेवत त्यांच्यात नवा अर्थ ओतणे याला विनोबा, ‘क्रांतीची अहिंसक प्रक्रिया’ म्हणतात. ती त्यांना गीतेच्या सहवासातच गवसली. या ध्यानाच्या श्लोकातही ती दिसते. एरवी गीता आणि भूदान, यांचे ऐक्य विनोबांना दिसले नसते. त्यांचे साम्ययोगाचे दर्शनही याच परंपरेतील आहे. क्रांतीची ही प्रक्रिया आणखी पहायला हवी.

– अतुल सुलाखे

 jayjagat24@gmail.com