गुरूने शिकवल्याखेरीज विद्या प्राप्त होत नाही, असा संकेत आहे. इथे गुरू म्हणजे शिक्षक, आचार्य. विनोबांना, मार्गदर्शक, शिक्षक, आचार्य, एवढेच नव्हे तर साधू आदी भूमिकांमधून पाहणारे अनेक जण होते. विनोबांमधील या सर्व विशेषांचा समुच्चय तो आपल्या सहकाऱ्यांना गीताई शिकवताना आला. हे सगळे अत्यंत सहजपणे घडले. वाचकांनी मागणी केली म्हणून ‘गीताई शब्दार्थ कोश’ तयार झाला. परंतु तोही गीताईप्रेमींना अवघड वाटत असे. या कोशात सुलभता यावी म्हणून ‘गीताई चिंतनिका’ तयार झाली. त्याच वेळी गीताईस पूरक ठरेल असे अन्य साहित्यही प्रकाशित झाले होते. गीताईच्या प्रसारासाठी पदयात्राही झाली. तरीही जिज्ञासू समाधानी नव्हते. त्यांना गीताईवर सोपे तरीही सखोल भाष्य हवे असणार. आपल्या अवाढव्य व्यापातून विनोबा यासाठी वेळ काढतील ही शक्यता अत्यंत कमी होती. अशा स्थितीत एक प्रसंग घडला.

विनोबा, कार्यकर्त्यांसह रोज सकाळी ‘श्रीविष्णुसहस्रनामा’चा पाठ करत. त्या दिवशी पाठ संपल्यावर विनोबांनी, जयदेवभाईंना (विनोबांचे अंतेवासी) चिंतनिकेतील काही टिपा समजावण्याच्या निमित्ताने बोलायला सुरुवात केली. तिथे असणाऱ्या आठ-दहा साथींना याचा लाभ झाला. यातूनच गीताईचा अनौपचारिक वर्ग सुरू झाला.

विनोबांच्या साहित्यात दोन चिंतनिका महत्त्वाच्या आहेत. पहिली गीताई चिंतनिका. भाष्य म्हणून ती महत्त्वपूर्ण आहे. दुसरी आहे ज्ञानदेवांच्या निवडक भजनांवरील ‘चिंतनिक’. त्यातील भजनांवर विनोबांनी जे विवेचन केले ते वाचताना त्यांच्या समोर प्रत्यक्ष ज्ञानदेव असावेत असेच वाटते. गीता प्रवचनांच्या तोडीचे हे चिंतन असले तरी ते तितके प्रसिद्ध नाही.

याच गटातील तिसरे चिंतन तुकोबांच्या निवडक अभंगांचे आहे. अवघ्या ३२ अभंगांवर विनोबांनी केलेले विवरण संतांचा प्रसादह्ण या नावाने प्रसिद्ध आहे. विनोबांच्या प्रत्येक कृतींमधे एक तादात्म्य भाव दिसतो तरीही गीताई आणि हे दोन्ही संत यांचे चिंतन करणारे विनोबा वेगळेच वाटतात. इथे ‘गीताई चिंतनिके’ची रचना लक्षात घ्यायला हवी. गीताईमधील श्लोक, त्यावरची चिंतनिका आणि त्या चिंतनिकेवरील सहज संवादरूपी विवरण असा हा ग्रंथ आहे. या वर्गामध्ये मोजके, अभ्यासू आणि नित्य सहवासातले असे श्रोते होते म्हणून विनोबांचे बोलणे सहज आणि मित्रांशी गप्पा मारत असल्यासारखे होत असे.

श्रोत्यांमधे काही अमराठी होते त्यांना अडचण होऊ नये यासाठी विनोबांची भाषा आणखी सोपी झाली. हे सर्व चिंतन म्हणजे व्याख्याने नाहीत एवढेच नव्हे प्रवचनेही नाहीत. हे मित्रांना गीताईचे दर्शन घडवणे आहे. हा वर्ग सहा महिने सुरू होता. जवळपास सहा दशके विनोबा गीतेच्या सहवासात होते. या प्रदीर्घ कालावधीतील त्यांचे गीतात्मक जीवन या ग्रंथात दिसते. त्याखेरीज गीतेच्या अनुषंगाने सहज संवाद साधताना विनोबा किती ज्ञान शाखांमध्ये पारंगत होते याचीही कल्पना येते. या चिंतनिकेनंतर विनोबांनी क्षेत्रसंन्यास घेतला. सोबत लेखन मुक्ती, ग्रंथमुक्ती, अशा सूक्ष्म पातळय़ांवर ते गेले. त्यामुळे गीताईवरच्या या चिंतनाचे मोठेपण ध्यानात घ्यावे लागते. साम्ययोग जाणून घेण्यासाठी ही सविवरण चिंतनिका एखाद्या पाठय़पुस्तकासारखी आहे, यातच सर्व आले.

– अतुल सुलाखे

jayjagat24@gmail.com