‘.. मी प्राय: गीतेच्याच वातावरणात असतो. गीता म्हणजे माझे प्राण-तत्त्व. मी गीतेविषयी इतरांशी कधी बोलतो तेव्हा गीतेच्या समुद्रावर तरंगत असतो, आणि एकटा असतो त्या वेळेस त्या अमृतसमुद्रात खोल बुडी मारून बसतो..’

    – विनोबा, गीता प्रवचने अ. १

विनोबांच्या जीवनसाधनेत, गीतेला अनन्यसाधारण स्थान होते. गीता हीच त्यांची अभिव्यक्ती होती. आश्रमात १९१६ ते दाखल झाले तेव्हा ते मुके तर नाहीत ना अशी शंका यावी इतका त्यांचा वावर शांततापूर्ण होता. विनोबा आश्रमात दाखल झाल्यानंतर एक दिवस गांधीजी गीतेतील एका श्लोकावर बोलत होते. ज्ञान श्रेष्ठ की कर्म असा त्या श्लोकातील पेच होता. श्रोत्यांमधील एका व्यक्तीने, बापूंचे मत विचारले. गांधीजी म्हणाले, ‘कर्म श्रेष्ठ ही भाषा गौण आहे. आणि कर्माहून ज्ञान श्रेष्ठ या भाषेचा दर्जा उंच आहे.’

विनोबा ही चर्चा ऐकत होते. ते म्हणाले, ‘यात श्रेष्ठ- कनिष्ठ असे काही नाही. कर्म श्रेष्ठ ही भक्तीची तर ज्ञान श्रेष्ठ ही ज्ञानाची भाषा आहे. वस्तुत: ज्ञानही श्रेष्ठ आणि कर्मही.’ बापूंनी विनोबांचे हे मत चटकन स्वीकारले. विनोबांची आश्रमातील अभिव्यक्तीही गीतेद्वारेच सुरू झाली. हा प्रवास निरंतर राहिला. व्यक्त आणि अव्यक्त अशा दोन्ही पातळय़ांवर तो दिसत असे. विनोबा जेव्हा गीतेविषयी बोलत तेव्हा कुणी तरी हमखास टिपणे घेत असे. अगदी आरंभी आश्रमामध्ये विनोबांनी गीतेवर गुजरातीमध्ये प्रवचने दिली होती. त्यांचे संकलन मात्र राहून गेले.

गीतेवरचे आपले चिंतन पुस्तकरूपात यावे अशी विनोबांची इच्छा नव्हती. विचार चित्तावर ठसले म्हणजे ते आपोआप बाहेर पोचतात अशी त्यांची धारणा होती. तथापि श्रोत्यांपैकी कुणी तरी टिपणे घेत असे आणि त्यांनाच पुढे पुस्तकाचे रूप मिळे. गीताई, गीताई-शब्दार्थ-कोश, गीताई चिंतनिका यावर मात्र विनोबांनी मोठे काम केले. एरवी साने गुरुजी नसते तर विख्यात गीता प्रवचने आज आपल्यापर्यंत कदाचितच आली असती. विनोबांच्या गीता प्रवचनांचे आणखी एक संकलन ‘वेल्लोर प्रवचने’ या नावाने प्रसिद्ध आहे. वेल्लोर (तमिळनाडू ) तुरुंगात १९४४ मध्ये रोज अर्धा तास याप्रमाणे विनोबांनी सलग १२८ दिवस गीतेवर प्रवचने दिली. त्यांचे हे पुस्तक रूप.

हे संकलन प्रकाशित व्हावे अशी विनोबांची इच्छा नव्हती कारण हे सर्व विवेचन गीताई चिंतनिका, गीता प्रवचने, स्थितप्रज्ञ दर्शन या ग्रंथत्रयीमध्ये येऊन गेले आहे ते पुन्हा कशासाठी द्यायचे, असा त्यांचा सवाल होता. तथापि या प्रवचनांमध्येही स्वतंत्र आणि मौलिक चिंतन होते. त्यामुळे या संपादनाचे महत्त्व आहेच.

या प्रवचनांची मांडणी उपशीर्षकांमध्ये आहे. त्यामुळे विषय चटकन उकलतो. सूत्र, वृत्ती, भाष्य अशी रचना तिथे दिसत नाही. गीतेपूर्वीच्या विचारधारा सांगताना अगदी सोप्या भाषेत विनोबांनी वेद ते दर्शनशास्त्र असा प्रवास घडवला आहे. गीता प्रवचनांमध्ये अशी मांडणी दिसत नाही.

यापेक्षाही या विवेचनाचा विशेष असा की ते कालानुरूप बदलत जाणार याची विनोबांना जाणीव होती. ही प्रवचने विनोबांचे भारतीय संस्कृतीचे आकलन दाखवतात आणि एका उदार भूमिकेचे दर्शन होते.

– अतुल सुलाखे

jayjagat24@gmail.com