गीताईच्या ध्यानाचा श्लोक श्रद्धेवर आधारित आहेच तथापि त्या श्लोकात साम्ययोगाचे तत्त्वज्ञान बीज रूपाने आले आहे. मुळात तो श्लोक सुचला तेव्हा विनोबा गीताईचे चिंतनच करत होते. फक्त हे चिंतन सामूहिक स्तरावर सुरू होते. यात्रा रामकृष्ण परमहंस यांच्या जन्मगावी म्हणजे कामारपुकूरला गेली तेव्हा विनोबांनी ते वेगळय़ा शब्दात मांडले.

‘रामकृष्णांना व्यक्तिगत समाधी अवस्था प्राप्त झाली. आपल्याला सामूहिक समाधी साधायची आहे- भूदान यज्ञ.’ नीती, धर्म, धर्मग्रंथ, तत्त्वज्ञान या गोष्टींना ते व्यापक पातळीवर नेत होते. त्यांची ही व्यापक भूमिका ध्यानाच्या श्लोकाच्या या भागात अधिक नेमकेपणाने समोर येते.

गीतेचे तत्त्वज्ञान शब्दांत सामावणारे नसले तरी महर्षी व्यासांनी ते महद्कार्य केले. यासाठी विनोबांनी ‘संग्रथन’ शब्दाची योजना केलेली दिसते. संग्रथन म्हणजे शब्दांनी सम्यक कथन. शब्दांच्या साहाय्याने एखादी गोष्ट समग्रपणे सांगणे.

मान्य आणि मुनी ही जोडी महत्त्वाची आहे. मान्य म्हणजे जिचे सांगणे मान्य होईल अशी व्यक्ती. मुनी म्हणजे मननशील, संयमी. ही विशेषणे व्यासांच्यासाठी नेमकी आहेत. दहाव्या अध्यायात ‘मुनींत मुनि मी व्यास’ हे वर्णन आले आहे. व्यास मननशील आहेत, म्हणून ते मुनी आहेत.

वेदान्त विद्या म्हणजे वेदरहस्यभूत वेदसाररूप ब्रह्मविद्या. वेदान्त गीतेत साठवलेले आहे, असे शंकराचार्यानी म्हटले आहे. ही ब्रह्मविद्या म्हणजे तुकोबांच्या शब्दात सांगायचे तर ‘नर-नारी बाळे अवघा नारायण.’ हे तर साम्ययोगाचे मूळ आहे. विनोबांनी गीताईतील तत्त्वज्ञानाचे ६० भागांत वर्गीकरण केले आहे. त्याला धरून हा ‘षष्टय़धिकारिणी’ शब्द आला आहे. गीतेचे ७०० श्लोक आणि १८ अध्याय हे विशेष सांगण्यासाठी सतशती आणि अष्टादशाध्यायिनी हे शब्द आले आहेत. आई आणि मुलाचे नाते, जिव्हाळय़ाचा संबंध, दाखवण्यासाठी ‘तूंतें मी’ आले आहे. गीताईची प्रस्तावना आणि हा ध्यानाचा श्लोक या स्वतंत्र कृती म्हणून गणल्या जाव्यात इतक्या त्या अप्रतिम आहेत. श्रवण, मनन, निदिध्यासन आणि जीवन यांचे ऐक्य म्हणजे ‘अनुसंधान’. गीताईच्या अनुसंधानात सर्वकाळ रहायचे. विनोबा तसेच जगले. अनुसंधान राखायचे म्हणजे धारधार शस्त्रावरून चालण्यासारखे आहे.

जिच्या अनुसंधानात रहायचे ती गीताई कशी आहे, तर भयाचा द्वेष करणारी आहे. संस्कृत श्लोकात ‘भव-द्वेषिणी’ आहे. गीताईत भय-द्वेषिणी आहे. विनोबांच्या दृष्टीने हे जग स्फूर्ती देते. त्यामुळे त्याचा द्वेष करण्याची गरज नाही. परंतु भयाचे तसे नाही. अिहसकांच्या सेनेचा सेनापती असे विनोबांनी अभय या गुणाचे वर्णन केले आहे. सेनापती भेकड असेल तर सर्वप्रथम त्याला निर्भय केले पाहिजे. गीता हे काम करते. ‘भिकार दुबळी वृत्ती’ हे शब्द भयाचा धिक्कार करतात. आणि तिथून गीतेचे तत्त्वज्ञान सुरू होते. आघाडीला निर्भयता आणि पिछाडीला नम्रता या दरम्यान अिहसकांचे सैन्य वावरते.

हे गीताईचे ध्यान आहे. इथून साम्ययोग सुरू होतो. तो विनोबांच्या साहित्याच्या आधारे अभ्यासायचा आहे. शुक मुनींनी परीक्षिताला ज्ञान प्राप्तीसाठी गुरूची अपरिहार्यता आणि गुरूची वैशिष्टय़े सांगितली. विनोबांनी त्यावर ‘भागवत धर्म मीमांसा’मध्ये सोपे विवेचन केले आहे. त्यातील गुरूची लक्षणे खुद्द त्यांनाही लागू होतात. ‘शाब्दे परे च निष्णातम्..’

– अतुल सुलाखे

  jayjagat24@gmail.com