‘अविद्या आणि विद्या या दोन फारच विपरीत- परस्परविरोधी- आणि भिन्न फळ देणाऱ्या आहेत. हे नचिकेता, तुला मी विद्येची आकांक्षा करणारा विद्यार्थी समजतो. कारण तुला अनेक कामनांनी लोलुप केले नाही.’

    – विनोबा (कठोपनिषद्, अष्टादशी)

गांधी आणि मार्क्‍स यांच्या विचारांचे ऐक्य होऊ शकते हा अनेकांचा समज आहे. नव्या समाजव्यवस्थेचा हा पाया ठरू शकतो, असाही विश्वास कित्येकांना वाटतो. त्यामुळे विनोबांनी गांधीजींच्या विचारांचे नुकसान केले आणि एक अिहसा सोडली तर मार्क्‍स आणि गांधी एकमेकांना पारखे नाहीत अशीही विचारसरणी दिसते. यावर विनोबांची भूमिका काय होती?

‘गांधी – जसे पाहिले जाणिले विनोबांनी’ या पुस्तकात विनोबांनी वाचकांच्या समोर ठेवलेले गांधीजींचे तत्त्वज्ञान हे गांधीवादाच्या नेहमीच्या मांडणीपेक्षा किती तरी भिन्न आहे. हीच भिन्नता गांधीजी आणि साम्यवाद यांची मांडणी करताना त्यांनी आवर्जून केली आहे. किशोरलाल मश्रूवाला यांच्या ‘गांधी अने साम्यवाद’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत विनोबांनी गांधी आणि मार्क्‍स यांच्या विचारांतील भेद स्पष्ट केला आहे.

महात्मा गांधी आणि मार्क्‍स या दोघांच्या विचारांची तुलना, याहून अधिक आकर्षक विषय आजच्या काळात कोणता होऊ शकेल, या प्रश्नाने विनोबांनी आपल्या मांडणीची सुरुवात केली आहे. ते पुढे लिहितात, ‘गेल्या शे-दीडशे वर्षांचे मनुष्य समाजाचे जीवन आटवून काढले तर बहुधा हीच दोन नावे शिल्लक राहतील. मार्क्‍सच्या पोटात लेनिन येऊन जातो. गांधींच्या पाठीशी टॉलस्टॉयची छाया गृहीत आहे. हे दोन विचारप्रवाह एकमेकांना आत्मसात करण्यासाठी समोरासमोर उभे आहेत,’ हे विनोबांचे प्रतिपादन आहे. कम्युनिस्टांसमोर भांडवलशाहीचे आव्हान नसून संघटित रूपात न दिसणाऱ्या गांधी-विचारांचे खरे आव्हान आहे, हे विनोबांचे मत आवर्जून उल्लेखावे असे आहे. या दोन विचारांचा समन्वय होऊ शकतो का, या प्रश्नाचे विनोबांचे उत्तर नकारार्थीच आहे. जगाच्या पातळीवर नाही आणि भारताच्या पातळीवरही नाही असे ते ठामपणे सांगतात. भारताचे स्वातंत्र्य आणि चीनमधील क्रांती, या आशियातील महत्त्वाच्या घटनांमुळे, असे ऐक्य करण्याचे जे प्रयत्न दिसतात ते विनोबांच्या मते व्यर्थ आहेत.

गांधीवाद आणि साम्यवादात अिहसेचाच फरक आहे असे एकदा कुणी तरी म्हणाले. त्यावर विनोबा उत्तरले, ‘‘दोन माणसे नाका-डोळय़ाने अगदी सारखी होती. इतकी हुबेहूब की एकाचा तोतया म्हणून दुसरा राजकारणाच्या कामी आला असता. फरक इतकाच की एकाच्या नाकातून श्वास वाहात होता आणि दुसऱ्याचा श्वास बंद पडला होता. परिणाम हा झाला की एकाच्या जेवणाची तयारी चालली होती आणि दुसऱ्याच्या अंत्यविधीची. अिहसा असणे आणि नसणे एवढाच. ‘किरकोळ’ फरक वजा करून उरलेली समानता आहे.’’ विनोबांच्या उत्तरावर कोणत्याही टिप्पणीची गरज नाही. कठोपनिषदातील विद्या आणि अविद्या याप्रमाणे वरील दोन्ही विचारधारा परस्परविरुद्ध असतील तर मानव कल्याणाचा सर्वोदयाचा वेगळा कोणता कार्यक्रम आहे? आणि साम्ययोगाच्या मांडणीत या चर्चेला कोणते स्थान आहे? 

– अतुल सुलाखे

  jayjagat24@gmail.com