‘हा कोश म्हणजे एक स्वतंत्र विचारसृष्टीच आहे. त्याच्या मदतीने चिंतनाचे मनाला वळण लावून ज्याने त्याने आपल्या उपयोगाची स्वतंत्र विचारसृष्टी निर्माण करावी अशी माझी अपेक्षा आहे.’ – विनोबा

‘शब्दार्थ कोश’चे आपल्यासमोर जे चित्र उभे राहाते त्यापेक्षा कितीतरी वेगळा आहे. खरे तर याला कोशापेक्षा भाष्य म्हणणे अधिक उचित होईल. एकूण एक शब्दांचे अर्थ, त्यांना स्थल निर्देशाची जोड असे या कोशाचे प्रथम दर्शन आहे. एकाच शब्दाचे संदर्भानुसार विविध अर्थही दिले आहेत. हे अर्थ खुलासेवार आहेत. विशिष्ट अर्थ, अधिकरण निर्देश अथवा अध्याय तात्पर्य सुचवणाऱ्या अलग टिप्पण्या आहेत. अशा प्रकारे एकीकडे भाष्य आणि तौलनिक अध्ययन करता यावे म्हणून कोश असे एकाच ग्रंथाचे दुहेरी रूप आहे.

गीताईत ‘मी’ नसावा असा नियम होता तर इथे फक्त मी दिसतो. गीतेच्या चिंतनाची विनोबांची रीत यामुळे ध्यानी येते. अर्थात याच पद्धतीने चिंतन करावे असा विनोबांचा आग्रह नाही. इतकेच कशाला खुद्द विनोबाही या पद्धतीने चिंतन करण्यास बांधील नव्हते. हे त्यांनी स्वत:च सांगितले. मग हा कोश कशासाठी, असा प्रश्न  साहजिक आहे. विनोबांनी याचे उत्तर दिले आहे-

‘गीतेची पदे घोळत राहण्याची सवय जडलेल्या मनाला लोकांच्या मागणीचा दुजोरा मिळून त्यातून ही लहर उठली. सहभावी कोणी असतात त्यांना थोडीफार मदत होऊन जाते. बाकी आत्मवस्तूच्या प्रकाशाला जिथे गीतेचीही गरज सिद्ध व्हावयाची नाही तिथे अशा कोशांचा काय पाड?’

गीतेवर माझी अनन्य श्रद्धा बसली आहे तीही मी गौणच समजतो. आत्मचिंतनाची कड गाठायला शब्दही बाजूस सारावा लागतो. पण हेही काम शब्दाच्या मदतीने होत असते. जसे देहाच्या साधनाने होत असते. गीता म्हणते म्हणून प्रमाण असे नव्हे. वस्तू स्वयंप्रमाण आहे. आणि तिनेच गीतेलाही प्रेरणा दिली आहे. या गोष्टीचा विसर न होता गीतेची मदत व्हावी, आणि तदर्थ अशा कोशांची. शेवटी सारेच फेकून द्यायचे आहे. ‘

( गीताई शब्दार्थ कोश प्रस्तावना )

ही भूमिका केवळ थक्क करणारी आहे. आपण करतो त्या कामाचा अंतिम मुक्काम स्पष्ट असणे आणि तो वाचकांसमोर ठेवता येणे ही तात्त्विक भूमिका एखाद्या प्रकांडपंडितालाच घेणे शक्य आहे. अशी कामे लीलया करणे हा विनोबांचा विशेष होता.

तर मुद्दा असा की कठीण शब्दांचा सोपा अर्थ असे या कोशाचे रूप नाही. काही वेळा मूळ शब्दापेक्षा अर्थ कठीण आहे असेही दिसते. उदा. अभ्यास या शब्दाचे पाच अर्थ आहेत. यातील एक अर्थ आहे असकृदावृत्ति.’ म्हणजे सतत परिशीलन, सवय करणे, शिक्षण इ. तथापि हा शब्द आपण वापरत नाही. त्यामुळे अर्थ अवघड वाटणारच. काही वेळा एकच शब्द पुन्हा दिसतो तथापि ती पुनरावृत्ती नाही. संदर्भानुसार तो अर्थ आला आहे. ‘खाल’ या सोप्या शब्दाचेही दोन अर्थ आले आहेत. या कोशाची अशी कितीतरी वैशिष्टय़े आहेत. पहिल्या आवृत्तीची प्रस्तावना वाचली की त्यांची कल्पना येते. साम्ययोगाचा आधार म्हणून ‘गीताई चिंतनिका विवरणासह’ या ग्रंथाकडे पाहिले जाते. विनोबांचे ६० वर्षांचे गीता चिंतन तिथे आढळते. त्या ग्रंथाचा बीज ग्रंथ म्हणजे गीताई शब्दार्थ कोश. त्यामुळे त्यावर तपशीलवार लिहिणे गरजेचे होते.

– अतुल सुलाखे

jayjagat24@gmail.com