‘माझ्यासाठी गीता सोप्या मराठीत तूच लिही.’ रुक्मिणीबाईंची ही मागणी म्हणजे विनोबांसाठी मराठी साहित्यनिर्मिती करण्याची आज्ञा होती. लोकांपर्यंत पोचायचे तर भाषा त्यांची हवी आणि ते स्थान मातृभाषेचे असते, याची विनोबांना जाणीव होती. ज्ञानोबांमुळे ही परंपरा प्रतिष्ठित झाली. त्यांनाही फारसी भाषेत ग्रंथरचना करता आली असती, पण त्यांनी तो मार्ग सोडला. हा प्रवाह नंतरच्या संतांनी प्रतिष्ठित केला. विनोबा तिचाच भाग होते.

विनोबांच्या प्रमुख साहित्यकृती मराठीत आहेत. गीताई आणि तदनुषंगिक साहित्य मराठीव्यतिरिक्त अन्य भाषेत निर्माण झाले असते तर विनोबांना कीर्ती मिळाली असती, पण ते लोकांच्या हृदयात उतरले नसते. ‘कै. राजवाडे’ या लेखात विनोबांनी हाच मुद्दा मांडल्याचे दिसते. कीर्तीपेक्षा लोकांपर्यंत जाणे महत्त्वाचे.

ज्या भाषणामुळे विनोबा गांधीजींकडे आकृष्ट झाले त्या बनारस हिंदू विद्यापीठातील भाषणाचा (४ फेब्रुवारी १९१६) आरंभ गांधीजींनी याच मुद्दय़ाने केला. गांधीजी म्हणाले, ‘या देशाला मोठी आध्यात्मिक परंपरा असून तिला या क्षेत्रात कुणी स्पर्धक नाही. तथापि ही परंपरा केवळ वाचाळतेतून निर्माण झाली नाही. आपल्या तरुणांनी हे लक्षात घ्यायला हवे की नुसती बडबड निष्फळ असते. मला स्वत:लाही आता या भाषणांचा कंटाळा आला आहे. आजवरच्या व्याख्यानांनी आणि चर्चानी खूप काही दिले असले तरी आता त्यांचे महत्त्व संपले आहे. यापुढे काही करायचे असेल तर कृतीला पर्याय नाही.

‘आपण इथल्या सामान्य माणसांशी जोडून घेतले पाहिजे. आपले हृदय, हात आणि पाय एक झाले पाहिजेत,’ असे आपण बोलतो तथापि ही सर्व चर्चा इंग्लिशमध्ये सुरू असते. जी इथल्या जनतेची भाषा नाही. आजची चर्चाही बहुसंख्य श्रोत्यांपर्यंत पोचली नाही हे मी खात्रीने सांगू शकतो कारण ती त्यांच्या भाषेत झाली नाही. आपल्या भाषा म्हणजे व्यक्त होण्याचे महत्त्वाचे साधन आहे. तथापि संवाद करण्यासाठी त्या तितक्या प्रभावी नाहीत असे जर तुम्हाला खरोखर वाटत असेल तर मी खात्रीने सांगतो की आपण नष्ट होऊ.

इंग्लिश ही राष्ट्रीय भाषा व्हावी असे तुमचे स्वप्न आहे का? मग इंग्लिश येणाऱ्या लोकांसोबत स्थानिक भाषा बोलणारे कसे वावरतील? इंग्लिश माध्यमातून शिक्षण घेतलेल्या काही विद्वानांनी मला सांगितले की या शिक्षणामुळे त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाची वर्षे वाया गेली. अशा रीतीने या देशाने किती तरी मोलाची  वर्षे गमावली आहेत. त्यामुळे आपण कोणत्याही क्षेत्रात नेतृत्व करू शकत नाही.

दुर्दैवाने आज आंग्लशिक्षित मूठभरांच्या हाती या देशाचे नेतृत्व आले आहे. गेली पन्नास वर्षे हेच घडले आहे. या काळात देशी भाषांमध्ये शिक्षण मिळाले असते तर कदाचित हा देश स्वतंत्र झाला असता. आज आपल्या घरातील महिलांनाही आपले विचार समजत नाही. प्रा. बोस आणि प्रा. राय यांच्या संशोधनात त्यांच्या सहचरींचा किती सहभाग आहे? आणि याची आपल्याला लाज वाटायला हवी.

विनोबांनी हे भाषण ऐकले नसले तरी जनतेच्या अंतरंगात पोचण्याची बापूंची उत्कट भावना त्यांना जाणवली असणार. कृतीतून व्यक्त होणारी आध्यात्मिक परंपरा आणि लोकांच्या हृदयापर्यंत पोचण्याची आवश्यकता गांधीजी सांगत होते. तरुण विनोबांच्या अंतरंगाला ही भाषा जाणवत होती.

– अतुल सुलाखे

jayjagat24@gmail.com