साम्ययोग पैशाला पिशाच्च मानतो. परंतु संपत्ती आणि लक्ष्मीचा आदर करतो. आता पैसा आणि संपत्ती यात काय फरक आहे? छापखान्यात छापल्या जाणाऱ्या नोटा म्हणजे संपत्ती नव्हे. ती वस्तू लफंगेपणाचे उत्तम उदाहरण आहे. हा पैसा आज एक बोलतो तर उद्या दुसरेच बोलतो. ज्याची मदत घेऊन आज भौतिक सुखे मिळतात पण उद्या तोच कागदाचा कपटा होतो. लक्ष्मीचे मात्र तसे नाही. एक किलो ज्वारी आज जेवढे पोषण करते तेवढेच भविष्यातही करते. रुपयाचे मूल्य मात्र कमी होत जाते.

विनोबांनी श्री आणि द्रव्य या दोन्ही संकल्पना नेमकेपणाने सांगितल्या आहेत. श्रमाद्वारे प्रकट होते ती ‘श्री’. जिथे श्रम तिथे श्री म्हणजे लक्ष्मी. आपली श्री शेतातून प्रकट होते. वित्ताचे दुसरे नाव द्रव्य. द्रव्य म्हणजे वाहणारे. वित्त, द्रव्य बनले तरच ते निर्मळ आणि शुद्ध राहते. सामाजिक दु:खाच्या निवारणासारखी वित्त द्रव्य बनायला हवे आणि शेतीमधून श्री निर्माण व्हायला हवी.

Gajlaxmi Rajyog
येत्या ७ दिवसांनी ‘या’ राशींचे येणार चांगले दिवस? ‘शुभ योग’ बनल्याने लक्ष्मी कृपेने बँक बँलेन्समध्ये झपाट्याने होऊ शकते वाढ
Shani Maharaj & Budh Made Panchgrahi Yog On Hanuman Jayanti
हनुमान जयंतीला शनी- बुधाचा पंचग्रही योग बनल्याने ‘या’ राशींचे नशीब घेईल कलाटणी; चहूबाजूंनी बरसणार अपार श्रीमंती
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…

विनोबांच्या प्रतिपादनाला परंपरेचाही आधार आहे. लक्ष्मी कशी प्राप्त होते याचे काही निकष आहेत. उत्साहसंपन्न, वेळच्या वेळी कृती करणारा, भल्याबुऱ्याची जाण असणारा, शूर, कृतज्ञ आदी गुणांनी युक्त अशा समाजात लक्ष्मीचे सदैव वास्तव्य असते. आधुनिक परिभाषेत सांगायचे तर पैसा ही मोठी अंधश्रद्धा आहे. आपल्या मनापलीकडे पैशाला अस्तित्व नाही. पैसा आणि संपत्ती यातील भेद दुर्लक्षित करावा असा नाही.

साम्ययोगी समाजात संग्रहाचेही एक शास्त्र असेल. तिथे परिग्रहालादेखील कातर लावली जाईल. विविध पिके, फळे, दूध-दुभते यांच्या संग्रहाला प्राधान्य असेल. कारण ते लक्ष्मीचे रूप आहे. आपण ज्याला पैसा म्हणतो त्याचे अस्तित्व अगदी कमी असेल. विनोबा पैशाचा दुष्परिणाम अगदी वेगळय़ा रीतीने समजावून सांगतात. एखाद्या व्यक्तीच्या नरडय़ावर सुरा ठेवून वस्तू घेणे आणि त्याच्याकडून ती पैसे देऊन घेणे यात मुळीच फरक नाही. विचार पोथीमध्ये या आशयाचे त्यांचे वचन आहे.

पैसा फेकला की कोणतीही वस्तू विकत घ्यावी, कोणत्याही संसाधनाची लूट करण्याचा परवाना मिळाला आहे असे मानावे ही सर्व लक्षणे चोर मनोवृत्तीची आहेत. भरपूर पैसा मिळवणे आणि तो मिळत नाही म्हणून त्रस्त होणे हे दोन्ही उपाय कुचकामी आहेत. त्यासाठी ही पैशाची भाषा संपवावी लागेल. पोषण, आरोग्य, शिक्षण आदी जीवनावश्यक गोष्टींचा आणि पैशाचा संबंध जाणीवपूर्वक तोडावा लागेल. लक्ष्मी आणि श्री यांच्या आधारे होऊ शकते.

साम्ययोगाच्या या अर्थकारणाला सामान्यजनांनी कसा प्रतिसाद दिला ते भूदानातून दिसते. ‘तुमच्या दारिद्र्यावर उपाय म्हणजे जमीन आहे. ती जमीन मिळाली तर कसाल का?’ ज्या हरिजन बांधवांना विनोबांनी हा प्रश्न विचारला त्यांनी या प्रस्तावाला होकार दिला. कारण डोके ठिकाणावर असणारा समूह पैसा नाकारतो आणि श्रम स्वीकारतो.

– अतुल सुलाखे

 jayjagat24@gmail.com