नदीच्या काठी करुणा असते. तिथे राहणाऱ्या लोकांची मनेही तशीच असतात, अशा आशयाचे विनोबांचे एक वचन आहे. नदीची स्थिती काय यावर ही करुणा अवलंबून असते, असे कुणी म्हटले तर त्यावर आक्षेप घेणे कठीण आहे. मात्र इथे नदीची उपमा थोडी वेगळय़ा अंगाने पहायची आहे.

विनोबांना दिसलेला साम्ययोग नदीप्रमाणे आहे. त्याची वळणे मनोहारी आहेत आणि विनोबांपर्यंत येईपर्यंत त्या नदीचा ‘नद’ झाला आहे असे दिसते. या पातळीवर ब्रह्मपुत्रेशी त्याची तुलना होऊ शकेल. खरा साम्ययोग ब्रह्मपुत्रच तर असतो. तर परंपरेमधे साम्ययोग शब्दाचे दोन अर्थ आहेत. जुना आणि नवा. जुन्या अर्थाच्याही दोन छटा आहेत. पहिली छटा, शीत-उष्ण, सुख-दु:ख, मान-अपमान, स्तुती-निंदा यापैकी कशालाही सामोरे जावे लागले तरी आपल्या चित्ताची शांती आणि समत्व बिघडू न देणे, अशी आहे. मनाच्या या अवस्थेलाही ‘साम्ययोग’ म्हटले जाते. साधकाच्या पातळीवर ही समत्व बुद्धी आवश्यकच असते. गीताईत अशा समत्व बुद्धीचे महत्त्व सांगितले आहे.

शीतोष्ण विषय-स्पर्श

सुख-दु:खांत घालिती

करीं सहन तूं सारे येती

जाती अनित्य ते (अ. २- १४)

‘मात्रास्पर्शास्तु कौन्तेय’ या श्लोकाचे हे मराठी रूप. अनुकूल-प्रतिकूल वेदना सुख-दु:खात लोटतात. तथापि कर्तव्य करताना, इंद्रियांच्या निर्णयाच्या आधारे अनुकूल आणि प्रतिकूलतेचा विचार करू नये. कारण या भावना तेवढय़ापुरत्याच असतात. दुसरा अर्थ सर्वाभूती भगवद्भाव राखणे असा आहे. गीतेत त्याचाही उल्लेख आहे.

अनेक जन्म घेऊनि पावला शरणागति

विश्व देखे वासुदेव संत तो बहु दुर्लभ।।

(गीताई अ. ७- १९)

गीतेच्या सर्व भाष्यकारांची या दोन्ही अर्थाबाबत सहमती आहे. लोकमान्यांनी या भूमिकेसाठी ‘साम्ययोग वर्णन’ आणि ‘समत्व बुद्धी’ असे दोन्ही शब्द वापरले आहेत, हे आवर्जून लक्षात घ्यावे लागते. वेदोपनिषदांमधून आलेला हा साम्ययोग केवळ तात्त्विक पातळीवर राहिला नाही किंवा तो केवळ व्यक्तिगत साधने इतकाच सीमित राहिला नाही. व्यक्तिगत साधना आणि परमोच्च तत्त्व म्हणून साम्ययोगाला महत्त्वाचे स्थान मिळाल्याचे दिसते. वर दिलेले गीताईमधील दोन्ही श्लोक याची पुष्टी करतात.

संत परंपरेने या समत्व बुद्धीचा सामाजिक आशय विस्तारित केला. तसे करताना त्यांनी तत्त्वाला अडथळा मानले नाही. उलट तत्त्वाचा विस्तार केला. भागवत आणि भाष्यकार अशा दोहोंची कामगिरी या दृष्टीने फार महत्त्वाची आहे. उदाहरणार्थ ज्या पसायदानाचा आपल्याला सार्थ अभिमान वाटतो त्याची बीजे भागवताच्या पाचव्या स्कंधात आढळतात आणि गांधीजींच्या आश्रमव्रतातील अस्पर्श भावनेचा निषेध, आचार्य रामानुजांपर्यंत जातो. विनोबांना साम्ययोगाला नवा अर्थ देता आला कारण ही ‘सरिता’ त्यांच्यापर्यंत अक्षुण्ण पोहोचली होती. तिच्या तीरी वावरणाऱ्या भागवतांनी तिची करुणा धारण केली होती. अध्ययन, मनन, चिंतन आणि स्वत:च्या जीवनात तंतोतंत आचरण यातून हे दर्शन त्यांनी विकसित केले. विनोबांना गीतेमधे साम्ययोग दिसला तो निव्वळ योगायोग नव्हे.

– अतुल सुलाखे

jayjagat24@gmail.com