सर्व प्रकारच्या शुचितेत अर्थशुचिता श्रेष्ठ म्हटली आहे. जो अर्थशुचि आहे तोच खरा शुद्ध होय, माती वा पाण्याने शुद्ध तो शुद्धच नव्हे.

– मनुशासनम् (सं. विनोबा)

साम्ययोगप्रणीत अर्थ-रचनेमध्ये अर्थ-शुद्धीला अग्रक्रम आहे. भारतीय परंपरेमध्ये विविध प्रकारच्या शुद्धी सांगितल्या आहेत. त्यात अर्थ-शुद्धीही येते. वर दिलेल्या ‘मनुशासनम्’मधील संदर्भामध्ये ही गोष्ट स्पष्ट दिसते.

पाश्चात्त्य परंपरेचा आधार घेत विनोबांनी जगाच्या त्या भागाला अर्थशुद्धीचे महत्त्व सांगितले आहे. ‘संपत्ती’ला इंग्रजीत प्रॉपर्टी म्हणतात. याचा अर्थ जी ‘प्रॉपर’ आहे किंवा योग्य मार्गाने मिळवली आहे तीच प्रॉपर्टी आहे. विनोबांचे हे आकलन विलक्षण आहे. शिवाय त्यांच्या शब्द-शक्तीची जाणीव त्यामुळे होते. परंपरा कोणतीही असो अर्थसंचय नीतिपूर्ण मार्गाने झालेला असावा या दृष्टीने गवसणारा प्रत्येक संदर्भ विनोबा त्यांच्या शैलीत मांडतात.

अर्थशुद्धीची आवश्यकता विनोबांनी केवळ समाजशास्त्र, नीतिमत्ता यांच्यापुरतीच ठेवली नाही तर तिचा संबंध त्यांनी आध्यात्मिक उन्नतीशीही जोडल्याचे दिसते.

‘जोंपर्यंत व्यवहारशुद्धि होत नाही, तोंपर्यंत आध्यात्मिकता अपूर्णच राहते.’

विनोबांच्या या उक्तीवर कोणत्याही टिप्पणीची गरज नाही. त्यांच्या व्यवहारात संपूर्ण समाजशास्त्र सामावले आहे. आज धर्म आणि अध्यात्म यांच्या नावाखाली जो ‘व्यवहार’ सुरू आहे त्याचा खऱ्या आध्यात्मिकतेशी आणि धर्माशी किती संबंध आहे हे यावरून स्पष्ट होते.

विनोबांनी सांगितलेला अर्थशुद्धीचा कार्यक्रम दोन बिंदूंवर उभा आहे. अस्तेय आणि अपरिग्रह. अस्तेय म्हणजे चोरी न करणे. अर्थात ही संकल्पना किती तरी मोठी आहे. या अस्तेयाला अपरिग्रहाची जोड मिळाली की अर्थशुद्धी होते.

अपरिग्रह म्हणजे दारिद्रय़ नव्हे तर क्रमयुक्त संग्रह. जनता बेरोजगार आहे. जगणे कठीण झाले आहे, अशा स्थितीत अन्य कोणताही कार्यक्रम हाती घेणे म्हणजे परिग्रह. आणि लोकांचे जगणे जाणीवपूर्वक दुरापास्त करणे म्हणजे ‘स्तेय’.

ही अर्थशुद्धी सत्य आणि अिहसेच्या माध्यमातून साधायची आहे. अर्थव्यवस्था सत्य आणि अिहसा यावर आधारित हवी असे वाटत असेल तर अस्तेय आणि अपरिग्रह यांना सोडचिठ्ठी देणे अटळ आहे. विनोबांना ते साधले होते. ते आध्यात्मिक क्षेत्रातील अधिकारी होते.

कारण त्यांचा व्यवहार शुद्ध होता. अपरिग्रह, अस्तेय, सत्य आणि अिहसा यानंतरची अर्थशुद्धी त्यांनी प्राप्त केली होती. हा प्रयत्न त्यांनी सामूहिक पातळीवर नेला. गीताईची प्रस्थानत्रयी, भूदान यज्ञ हे दोन्ही प्रयत्न व्यापक पातळीवरचे होते.

प्रत्येक घरात ‘भूदान-पात्र’ असावे, ही अपेक्षाही त्यांनी ठेवली. अर्थशुद्धीचे महत्त्व सांगणारे मनु-वचन त्यांनी सदाचाराचा महिमा सांगण्यासाठी निवडले. मनुस्मृतीमध्ये ते व्यक्तीला समोर ठेवून आले आहे. विनोबांनी त्या वचनाचा सामूहिक पातळीवर विकास केला. व्यष्टी-समष्टी, अर्थशास्त्र आणि अध्यात्म, परंपरा आणि आधुनिकता यांचा असा मेळ परिपूर्ण अध्यात्मासाठी आवश्यक आहे.

– अतुल सुलाखे

jayjagat24@gmail.com