‘समाजातहिताला विरोध निर्माण होतात तेव्हा शोषण होते. वास्तविक समाजात परस्पर-विरोध नाहीतच. हितसाम्य हा सर्वोदयाचा सिद्धांत आहे. हित-विरोध नष्ट करून आम्हाला साम्ययोगाच्या दिशेने जायचे आहे..’

– विनोबा (संदर्भ – साम्यवाद की साम्ययोग?)

‘सर्वोदय विचारातील साम्य हाताच्या बोटांसारखे आहे. हाताची सर्व बोटे अगदी समान नसतात हे खरेच, पण त्यांच्यात टोकाची विषमताही नसते. तेवढी असमानता समाजात राहील. शिवाय यातील एक बोट नसेल तर काम होणार नाही.’ विनोबांना अभिप्रेत साम्याचा हा आरंभ म्हणता येईल.

विनोबांना या रचनेत असमानता दिसत असली तरी वस्तुत: ती व्यवस्था आहे. विषमता हा तिचा पाया असेल तर मग साम्ययोगासमोर प्रश्नचिन्ह उभे राहाते.

या रचनेमधे संपत्तीचे स्थान काय असेल यावरही विनोबांनी भूमिका घेतली आहे. कांचनमुक्तीचा त्यांचा आग्रह सर्वाना ठाऊक असल्याने संपत्तीच्या मुद्दय़ाचा विचार ते कसे करतात, हे जाणून घेणे गरजेचे आहे.

‘साम्ययोगप्रणीत अर्थरचनेमध्ये सर्वाचे पोट भरले. तो सर्वाचा अधिकार आहे. परंतु पेटी भरण्याचा अधिकार नाही. याचा अर्थ असा नाही की आम्हाला संपत्ती नको. संपत्ती अवश्य असावी पण ती समाजात असावी.’

ही संकल्पना स्पष्ट करताना विनोबांनी कबीरांचा आधार घेतला आहे.

‘पानी बाढो नाव में घर में बाढो दाम।

दोनों हात उलीचिये यही सयानो काम।।’

घरात धनाचा आणि नावेत पाण्याचा साठा वाढू लागला की तो बाहेर टाकणे यातच हित आहे. आणि त्याशिवाय तरणोपायही नाही.

या विचाराचे दर्शन भूदान यज्ञात होते. भूदान हा संपत्तीची व्यवस्था लावण्याचा मोठा प्रयत्न होता. संसाधनांवर प्रेमाने हक्क सांगायचा. ठरावीक वर्गाकडे आणि अनावश्यक प्रमाणात संसाधनांचा साठा असेल तर त्यांच्याच हितासाठी तो मागायचा. ज्या वर्गाकडे संसाधनांची वानवा आहे, त्यांच्यामध्ये त्यांचे समान वाटप करायचे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यासाठी समाजाची मानसिकता तयार करायची. कबीर महाराजांच्या शिकवणीचा विनोबांनी असा अर्थ लावला.

दान, यज्ञ, यात्रा हे शब्द इथल्या सामान्यजनांचे आहेत. ते वापरले की काम पुढे जाणार, हे उघडच होते. हितसाम्य प्रत्यक्षात कसे आणले गेले, याचे हे उत्तम उदाहरण आहे.

हितविरोध नष्ट करून हितसाम्य स्थापित करायचे तर असेच मार्ग अवलंबावे लागणार. या खंडप्राय देशात मूलगामी आर्थिक बदल करायचे असतील तर दंड शक्तीला मोठी मर्यादा आहे. हिंसा आणि संघर्ष तर फक्त नुकसान करणारे आहेत. अशावेळी हितसाम्य साधायचे तर सत्य, प्रेम आणि करुणेचा मार्गच तारक आहे. मग त्याला कोणतेही नाव दिले तरी चालेल.

समाज परिवर्तनाच्या या मार्गाला विनोबा ‘सं-क्रांती’ म्हणतात. समग्र परिवर्तन आणि त्याचा मार्ग या दोहोंमधे नवा आशय ओतणे असा संक्रांतीचा अर्थ आहे. ‘क्रांती संक्रांती झाली पाहिजे,’ हे त्यांचे वचन पुरेसे बोलके आहे. भौतिक हिताला परम साम्याच्या संदर्भात पाहणे ही संक्रांती आहे.

– अतुल सुलाखे

  jayjagat24@gmail.com