मुक्ते संग्रथिलीस मान्य मुनिने वेदांत विद्याकरे।

मुक्त – शब्दांत न सापडणारी. गीतेत सांगितलेली वस्तू शब्दात मावणारी नाही.

संग्रथन – शब्दांनी सम्यक् कथन. नीट शब्दात मांडणे.

मान्य – ज्याचे म्हणणे प्रमाण मानणे योग्य, असा आप्त पुरुष.

मुनि – मननशील, संयमी, वेदव्यास.

वेदांत-विद्या – वेदरहस्यभूत वेदसाररूप ब्रह्मविद्या, तिचा आकार, तिची खाण. सबंध वेदांचे सार गीतेत साठवलेले आहे, असे शंकराचार्यानी योग्यच म्हटले आहे.

– ‘गीताईचे ध्यान’, विनोबा.

श्रीमद्भगवद्गीतेच्या ध्यानातील एक श्लोक प्रसिद्ध आहे. ‘ॐ पार्थाय: प्रतिबोधितां..’ अशी त्याची सुरुवात आहे. गीतामाहात्म्य सांगणारे इतरही काही श्लोक आहेत. गीतेचे प्रत्यक्ष पठण करण्यापूर्वी ते म्हटले जातात. त्यांचे सार सांगणारा आणि त्यात भर घालणारा श्लोक विनोबांनी रचला. त्यातील एक चरण वर आला आहे. या ग्रंथाचे नाव ‘गीताई-शब्दार्थ-कोश’.

 ‘गीताई चिंतनिका’ आणि ‘गीताई चिंतनिका- विवरणासह’ यांचा उगम या शब्दार्थ कोशात आहे.  गीताई प्रकाशित झाल्यानंतर कोशाची मागणीही होऊ लागली, परंतु विनोबांना प्रत्यक्ष कोश तयार करण्याएवढी सवड मिळत नव्हती. कोश तयार करता येत नसला तरी त्यांचे गीताईवर चिंतन-मनन सुरूच होते. अंतिमत: व्यक्तिगत सत्याग्रहाच्या निमित्ताने झालेल्या कारावासात त्यांना पाच वर्षे हवी तशी उसंत मिळाली. कोणताही कोश तयार करायचा तर पाठनिश्चिती गरजेची असते. विनोबांना मूळ गीताईच्या पाठात काही बदल होऊ शकतील असे वाटत होते, परंतु बदल करायचे तर त्यासाठी संशोधन हवे आणि नेमक्या याच गोष्टीला विनोबा काहीसे भीत होते. कारण ज्या ध्यानावस्थेत गीताईची रचना झाली तशी अवस्था पुन्हा साधेल का, अशी त्यांना शंका होती. शिवाय गीताईच्या रचनेनंतर आश्रमातील लहान मुले त्यांचे पठण कसे करतात हे पाहून विनोबांनी गीताईमध्ये ९०० ठिकाणी बदल केले होते.

या पाच वर्षांमध्ये काही महिने त्यांनी मौन पाळले. सुमारे तीन वर्षे पत्रव्यवहारही केला नाही. या अवस्थेत त्यांनी गीताईच्या पाठात २० ते २५ थोडेफार बदल केले. अखेरीस तुरुंगबाहेर पडताना त्यांच्या मनात कोशाचे चित्र तयार झाले होते. बाहेर शिवाजीराव भावे यांनी कोशासाठी आवश्यक  तयारी केली होती. काही शब्दांचे अर्थही सिद्ध केले होते. त्यांच्यासह विनोबा या कोशाच्या सिद्धतेस लागले. अंतिम रूपात हा कोश तयार करण्यासाठी या दोहोंना सात महिने लागले. अंतिम अर्थ निर्णय होऊन कोशाचे काम पूर्ण झाले होते, परंतु विनोबांनी पुन्हा विश्रांती घेतली. तब्बल चार वर्षे. काळ गेला की नवे आकलन होते ही त्यांची धारणा होती. या दरम्यान विनोबा आजारी पडले आणि विश्रांतीचा हा काळ त्यांनी शिवबांसह या कोशाच्या कामी लावला. पाच महिन्यांच्या संशोधनानंतर गीताई शब्दार्थ कोश सिद्ध झाला. १९५० मध्ये तो प्रकाशित झाला. ‘गीताई’, ‘गीता प्रवचने’ आणि ‘स्थितप्रज्ञ दर्शन’ यांच्या पुढचा टप्पा म्हणून या कोशाकडे पाहायला हवे.  व्यासांनी गीता-तत्त्वाला योग्य आकार दिला. माउलींनी विस्तार केला. विनोबांनी गीताईच्या अनुषंगाने या दोहोंचा मेळ घातला. कोश या संकल्पनेच्या कितीतरी पल्याड असे हे कार्य आहे.

– अतुल सुलाखे

 jayjagat24 @gmail.com