– अतुल सुलाखे

‘‘ येथील कम्युनिस्ट बंधूंनी मला मानपत्र देऊन भूदान यज्ञाच्या यशाबद्दल शुभकामना व्यक्त केली, ही आनंदाची गोष्ट आहे. मानपत्रात त्यांनी म्हटले आहे – ‘या आंदोलनाने एका महत्त्वाच्या प्रश्नाला चालना मिळाली आहे आणि आम जनतेत भूमीचा हा संदेश पोहोचत आहे.’ त्यांनी पुढे असेही म्हटले आहे की हा प्रश्न शांततेच्या मार्गाने सुटला तर त्यांना आनंद आहे.’’

– विनोबा (साम्यवाद की साम्ययोग?)

 ०

विनोबांनी साम्यवादावर घणाघाती टीका केली. अगदी गांधीजींची साम्यवादाबद्दलची भूमिकाही स्पष्ट केली. किशोरलाल मश्रूवाला यांच्या ‘गांधीजी अने साम्यवाद’ या पुस्तकासाठी लिहिलेल्या प्रस्तावनेत सर्वोदयाची साम्यवादाबद्दलची भूमिका स्पष्टपणे दिसते. भूदान यज्ञाच्या निमित्ताने विनोबांनी साम्यवाद्यांशी प्रदीर्घ संवाद साधला. भारत आणि रशिया यांचे मैत्रीचे संबंध आकाराला येत असताना विनोबा मात्र भारतीय जनतेला साम्यवादाऐवजी सर्वोदयाचा मार्ग चोखाळण्याचा संदेश देत होते. त्या विचारसरणीचे धोके समजावून सांगत होते.

दुसरीकडे साम्यवादी विशेषत: मार्क्‍सवादी, सर्वोदय, भूदान आणि विनोबा यांचा समाचार घेत होते. काही प्रसंगी ही टीका असभ्य म्हणावी अशीही झाली. या टीकेतील मुख्य मुद्दा ‘भूदान हा जमिनीचा प्रश्न सोडवण्याचा गंभीर मार्ग नव्हे.’ असे असले तरी कम्युनिस्टांनी भूदानाच्या मार्गावर विनोबांशी चर्चा केली. ‘भूदान गंगा’च्या भागांमध्ये याचे संदर्भ आहेत.

प्रा. ए. आर. देसाई यांच्या ‘रुरल सोशिऑलॉजी इन इंडिया’ या संपादित ग्रंथामध्ये भूदान आणि सर्वोदय यांची चिकित्सक मांडणी करणारा आठ लेखांचा एक विभाग आहे. विभागाच्या आरंभी खुद्द विनोबांचा लेख आहे आणि शेवटी ‘बीटीआर’ म्हणून ओळखले जाणारे कॉम्रेड बी. टी. रणदिवे यांचा लेख आहे.

बीटीआर यांचा लेख सर्वोदय आणि भूदान यांची चिकित्सा करणारा आहे. ‘‘सर्वोदय आणि भूदान हे अवास्तव प्रयत्न आहेत, इतकेच नव्हे तर ते गांधीजींच्या विचारांच्या विरोधात आहेत,’’ असे प्रतिपादन त्यात आहे. विनोबांचे भूतकाळात रमणे, अर्थकारणाच्या बाबतीत तंत्रज्ञान नाकारणे, यासाठी विज्ञानालाही सोडचिठ्ठी देणे आदी आक्षेपही त्या लेखात आहेत.

विनोबांची ‘स्टेट’ संकल्पनेबाबतची समज चुकीची आहे हे सांगताना ‘स्टेट पाठीशी होते म्हणून भूदान आंदोलन यशस्वी झाले आणि राज्यसंस्थेच्या हस्तक्षेपामुळेच ते अयशस्वी ठरले’ – हा बीटीआर यांच्या आक्षेपांमधील प्रमुख मुद्दा आहे.  विनोबांच्या काही उद्गारांचा परामर्शही बीटीआर घेतात. ‘प्रशासनावरील अवाढव्य खर्च, सरकारच्या अन्य विभागांवरील खर्च हे पाहता तुम्ही या प्रकाराला ‘सेवा’ म्हणताच कसे? सिव्हिल सव्‍‌र्हिसेस म्हणता आणि पगार चार आकडी घेता! दुसरीकडे ज्यांच्या पैशांवर हे पोसले जातात त्यांना मात्र आठ आण्यांत जगावे लागते. ही ढोंगाची परमसीमा आहे!’ हे आणि अशा आशयाचे विनोबांचे उद्गार बीटीआर यांनी आवर्जून नोंदवताना, ‘विनोबा सामान्य माणसांच्या वतीने झुंजतात हे जाणवते.’ बीटीआर यांची ही टिप्पणी पुरेशी बोलकी आहे.

दुसरीकडे विनोबांनी साम्यवादाची दखल घेताना विस्तृत भूमिका घेऊन तिला नवा आयाम जोडल्याचे दिसते.

jayjagat24 @gmail.com