विरोधांची एकात्मता

जिवंत कलाकाराच्या कलाकृतीसाठी एवढे मानधन मिळवण्याचा हा विक्रमच ठरला

डेमियन हर्स्ट या ब्रिटिश समकालीन कलाकाराने बनवलेले ‘फॉर द लव्ह ऑफ गॉड’ हे शिल्प

नितीन अरुण कुलकर्णी  nitindrak@gmail.com

आपल्या रोजच्या अनुभवांमध्ये किती तरी गोष्टींचे विरोधाभास आपल्याला नजरेस येत असतात. यात प्रामुख्याने निसर्ग, मानवनिर्मित कल्पक वस्तू व मानसिक व्यवहार दिसतात. कसे ते पाहू या..

‘‘मी समुद्रकिनाऱ्यावर बसले आहे. समुद्राची अव्याहत गाज मला ऐकू येते, एकामागून एक फेसाळत्या समुद्राच्या लाटा पाहता पाहता मी हरवून जाते. एक लाट आली, मागून दुसरी आली व पहिली कधी फेसाळत फुटून गेली ते ध्यानातच आलं नाही. आता माझं मन एका वेगळ्याच असीम शांततेत जाऊ लागले आहे. आता माझं लक्ष उडालं आणि कदाचित बारावी लाट परत पहिली झाली. आता लाटा मोजणं मी सोडून दिलं. मी आता दूर नजर भिरकावली आणि लाटांची वरखाली होणारी सरळ प्रतलातली उलघाल बघितली. हे बघणे जरा जास्त बरे होते, कारण लाटा इथे एकात्म पावलेल्या होत्या; एकाच समुद्राच्या एकाच तळखोल पाण्याच्या प्रतलाकडे आकर्षति होऊन मी आता समुद्राकडे चालायला लागते. माझी चाल जलद होते. तळपायावर होणारा मऊ वाळूचा स्पर्श, गडद होत जाणाऱ्या लाटांच्या प्रखरतेबरोबरच मवाळ वाटू लागतो. पायघोळ कपडे वर करून आता मी ओल्या वाळूवर स्थिर उभी राहते. पायाचे तळवे आता वाळूत माझ्या वजनाला तोलून ठेवतात; वाळूवरचा दाब मला आवडतो. आली, आली, लाट जवळ आली, माझी नजर फिरली, आजूबाजूचे अवकाश फिरले, मी जणू काही समुद्रात ओढली गेले, बाप रे आता मी बुडणार? डोक्यात थोडय़ा झिणझिण्या आल्या; आता वेगाने माझ्यावरून माझ्या मागे गेलेले फेसाळते पाणी परत माझ्या मागून पुढे ओसरत चालले आहे. आता जशी मी समुद्रात ओढली गेले होते आणि तोल जाऊन भय वाटले होते, त्याविरुद्ध आता मी परत मागे ओढले गेल्यासारखे झाले. आता लक्षात आले की, माझे पाय वाळूत रुतले आहेत व खाली खाली जात आहेत. परत लाट येते व पुन्हा तेच.. अशा अनुभवात मी स्वत:ला विसरते!’’

‘ज्या ज्या क्षणी आपण स्वत:ला हरवतो (विसरतो) त्या त्या क्षणी आपण स्वत:ला नव्याने सापडण्याची शक्यता निर्माण होते’

या, किंवा अशासारख्या अनेक अनुभवांत विरुद्धाच्या किती जोडय़ा आपण एकाच वेळी अनुभवत असतो! असा विरोधाभास काळाचा परिणाम असतो. आपण आपल्या आकलनात झपाटय़ाने ‘अ’पासून ‘ज्ञ’पर्यंत गेलेले असतो, विरुद्धांचे मीलन होते. जसे की जमिनीचा टणकपणा ७ भुसभुशीतपणा, लाटेचे उंच आवर्तन ७ सपाट वहन, समुद्राचे सरळ ओबडधोबड प्रतल ७ असीम खोलीची जाणीव, पाण्यात उभे राहण्याचा आनंद ७ त्यात ओढले जाऊन गटांगळ्या खाण्याची भीती इत्यादी. मुळात आनंद व भीती या विरुद्ध जोडीचेच हे दिव्य दर्शन असते. ‘भीती आनंदाची भूमी असते’ यासारख्या उक्तीची महती पटते.

‘द्वंद्ववादाचा सिद्धांत’ (डायलेक्टिक्स) या पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या शाखेत वास्तवाला बदलाच्या रूपात बघितले जाते, त्यामुळेच परस्परविरोधी तत्त्वे व घटनांचा मेळ वा सहअस्तित्व इथे ग्राह्य़ मानले जाते. भारतीय अद्वैतवाद व बुद्धांचे तत्त्वज्ञान यांतदेखील अशा विरोधी तत्त्वांचा मेळ दिसतोच. हेराक्लिटस या सॉक्रेटिसच्याही आधीच्या तत्त्वज्ञाने विरोधी तत्त्वांच्या एकात्मतेचा विचार केलेला होता. निसर्गाशी संवाद करताना आपल्याला असे अनुभव नेहमी येतात.

‘चढाचा रस्ता व उताराचा रस्ता हे दोन्ही एकाच गोष्टीशी संलग्न आहेत’ – हिपोलीटस.

पुढे आधुनिक तत्त्वज्ञानात कांट व हेगेल या तत्त्वज्ञांनी याच संकल्पनेचा पाठपुरावा केला. ‘आधिभौतिक तत्त्वज्ञान’ शाखेचा हा विस्तार होता.

हेगेलच्या मते भौतिक वस्तू (मॅटर) आणि मन (माइंड) असे द्वैत दिसत असले तरी ते एकात्म आहेत. तत्त्वज्ञान त्यांची एकता प्रस्थापित करते. सर्व मनोव्यापारच आत्मिक (स्पिरिच्युअल) आहेत. जे अस्तित्वात आहे त्याच्याकडून जे अस्तित्वात नाही त्याच्याकडे जाण्याची मानवाची प्रवृत्ती असते. मानवाचे कल्पक, क्रियाशील सर्जक मनच याला कारणीभूत असते. हे मन म्हणजे विश्वचेतनेचा आविष्कार असते. माणसाची वाटचाल प्रगतीच्या दिशेने स्वत:च्या जाणिवेने व इच्छाशक्तीने होत असते. त्यामुळे ‘विरोधात्मकता’देखील याचा भाग होणारच. तसेही या विश्वाच्या निर्मितीमागे धन व ऋण या विरुद्ध तत्त्वांचे मीलन कारणीभूत आहेच.

संकल्पनांच्या व सर्जनाच्या क्षेत्रात परस्परविरोधी घटकांच्या एकात्मतेचे अनेक दाखले मिळतात. खरं तर या विषयाची प्रेरणा मिळाली सिनेमागृहात, ‘डंबो’ हा सिनेमा बघताना. वॉल्ट डिस्नेकृत १९४१च्या चित्रपटात ‘टू-डी अ‍ॅनिमेशन’द्वारे उडणाऱ्या हत्तीच्या पिल्लाचे हे पात्र साकारते, पण या वर्षी आलेला डिस्ने प्रॉडक्शन्सचाच ‘थ्री-डी डंबो’ याच पात्रावर बेतलेला आहे (मूळ कथा हेलेन अेबर्सन व हॅरॉल्ड पर्ल यांची). या पात्राच्या संकल्पनेचे विश्लेषण बघू. हत्ती हा बोजड प्राणी, जमिनीवरच वावरणार, म्हणजे डोंगरावरही नाही. याविरुद्ध कुठलाही पक्षी, उडणारा; कसा? कारण असतो हलका! आता या दोहोंचा काय संबंध? दोघांचे अस्तित्वच मुळी एकमेकांचे ‘उणे’! आता या दोहोंच्या एकीची कल्पना करायची म्हणजे महाकठीण; पण सारखेपणाचा शोध घेण्याची माणसाची वृत्ती काम करते. पक्ष्याचे पंख व हत्तीचे कान सारखे दिसतात म्हणून मोठय़ा कानांचा हत्ती कल्पिला व कल्पना अधिक ठसावी म्हणून पिल्लू घेतले. आणखी एक : याला उडण्यासाठी पक्ष्याचे एक पीस सोंडेने शोषून घ्यावे लागते, तरच तो उडू शकतो. मूळ गोष्टीत अजून विरोधी कल्पना वापरल्या. हा लांबकान्या जन्मला म्हणून त्याला मुलं हिणवतात, त्यातून ‘डंबो’ (बुद्धू या अर्थी) हे नाव या विरुद्ध त्याला उडण्याची अतींद्रिय शक्ती. दुसरा कथाविस्तार म्हणजे, याची आहे उंदराशी मत्री- पुन्हा एक विरुद्ध जोडी. या सगळ्याशी आपल्या गणपतीच्या संकल्पनेशी साधर्म्य दिसते आणि यातून संस्कृती किती सर्जनशील असते हेही अधोरेखित होते.

डेमियन हर्स्ट या ब्रिटिश समकालीन कलाकाराने एक शिल्प बनवले- ‘देवाच्या प्रेमासाठी’ (फॉर द लव्ह ऑफ गॉड) हे २००७ मध्ये तयार केलेले एक शिल्प आहे. अठराव्या शतकातील एका खऱ्या माणसाची कवटी हर्स्टने विकत घेतली आणि तिच्याच आकाराबरहुकूम प्लॅटिनम धातूची कवटी बनवून घेऊन त्यावर ८६०१ इतके खरे हिरे मढवले. यात मधोमध कपाळावर मोठय़ा पदकाच्या आकाराचा गुलाबी हिरा समाविष्ट आहे. या शिल्पातले दात मूळच्या कवटीचे आहेत. हे शिल्प तयार करण्याचा खर्च १४० लाख ब्रिटिश पौंड एवढा होता, तर त्याची विक्री-किंमत पाच कोटी पौंड एवढी होती. जिवंत कलाकाराच्या कलाकृतीसाठी एवढे मानधन मिळवण्याचा हा विक्रमच ठरला. तपशील अलाहिदा, यांतील परस्परविरोधी कल्पनांकडे बघणे रंजक आहे. मृत्यू व जीवनाच्या शाश्वततेची मानवाची आस व उपभोगाची लालसा सरमिसळ होऊन या ‘दिव्य’ कवटीच्या रूपाने सामोरे येतात व दुसरीकडे देवत्वाशी जोडलेला याचा संबंध दिङ्मूढ करून जातो.

अशा प्रकारच्या संकल्पनांचे पूर्ण मूर्तरूप पाहिल्यानंतर अचंबा वाटतो, की परस्परविरोधी गोष्टींची सरमिसळ किती बेमालूम पद्धतीने झाली आहे. आपल्या जगण्यातदेखील किती तरी विरोधात्मक गोष्टींची सरमिसळ झाली आहे! नाही का?

डेमियन हर्स्ट या ब्रिटिश समकालीन कलाकाराने बनवलेले ‘फॉर द लव्ह ऑफ गॉड’ हे शिल्प लेखक दृश्य कला व क्रयवस्तू विश्लेषक असून ‘नीफ्ट’ येथे अध्यापन करतात.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Human creations psychology of human behavior and nature