scorecardresearch

‘एकांता’चे हितगुज..

एकांत ही आपण निवडलेली मानसिक अवस्था असू शकते

|| नितीन अरुण कुलकर्णी

एकांत ही आपण निवडलेली मानसिक अवस्था असू शकते, विशेषत: कलावंतांसाठी; पण एकटेपणा आणि एकांत यांमध्ये फरक नेमका काय? एकांत साधला असल्याची खूण अनेक कलाकृतींमधून पटते, ती कशी?

‘लोनलीनेस’ (१९९३) (एकटेपण) या नावाचे प्रभाकर बरवे यांचे एक चित्र आहे. हे एक छोटेखानी घट्ट जलरंगातले कागदावरील चित्र, त्यांच्या शेवटच्या अमूर्तवादी टप्प्यातले; सॅफरॉनआर्ट या कंपनीच्या लिलावाच्या संकेतस्थळावर पाहायला मिळते. ज्यांनी बरवेंची चित्रे पाहिली आहेत त्यांना प्रथम दर्शनात बरवेंचे आकार दिसणार नाहीत, तर दिसतील वेगवेगळे गडद पोतांचे उभे पट्टे; नंतर दिसतील काही सरळ रेषा व त्यांच्यातून तयार होणारा रिकाम्या खुर्चीचा पाठमोरा आकार आणि लगेचच मागच्या बाजूला दिसेल तशाच खुर्चीचा छोटा आकार, पण प्रतिबिंब नव्हे, कारण पुन्हा पाठमोरी खुर्ची, ही आहे एका लांबट करकरीत खोक्याच्या आत. जणू काही ती खुर्ची आपले स्वत:चेच, (इतरांना मागच्या बाजूने जे दिसेल असे) दृश्य समोर परावर्तित झालेले पाहत आहे आणि या दोन खुच्र्याच्या प्रतिमांमध्ये आहे एक गडद रंगाची पोत-पोकळी.

एकटेपणाचे अनेक क्षण आपण सर्वानीच अनुभवले आहेत आणि रोजच्या तात्त्विक भाषेत अनेक जण असेही म्हणाले असतील की, ‘आपण आयुष्यभर एकटेच असतो’ वगैरे वगैरे!

‘एकाकीपण मानसिक असते’

आपण गच्च भरलेल्या लोकलच्या डब्यात अशा स्थितीत असतो जेथे तसूभरही हलायला जागा नाही, आठ ते दहा लोकांच्या देहांनी आपण वेढलेले असतो; परंतु इथेही आपण एकटे असू शकतो आणि फक्त आपल्या ‘स्व’ची व्यक्तिगत ‘जागा’च आपण व्यापलेली असू शकते. हा सगळा व्यवहार मानसिक असतो आणि यात नैराश्य, अगतिकता व क्लेश असू शकतात. यातून तयार होते एक पोकळी; व्हॉइड वा अवकाश. बरवेंच्या चित्रातला दोन खुच्र्याच्या मधला करडा पोत हेच तर दाखवत नसेल?

काही संवेदनशील माणसे अशा अवस्थेत थांबतात, आपली अवघड अवस्था व्यक्त करण्यापेक्षा मनाचे अवलोकन करतात. त्यांना दिसतात एक एक विचार; त्यांचे वहन; त्यांच्यातल्या जागा! हे असते एक प्रकारचे आत्मपरीक्षणच. इथे आपली स्वत:शीच होते भेट. ‘स्व’ आणि ‘स्व’ एकमेकांसमोर उभे ठाकतात. प्रभाकर बरवेंच्या खुच्र्या हेच तर सांगत नसाव्यात?

इथेच तयार होते शक्यता एकटेपणातून एकांतात जाण्याची!  ‘एकाकीपणा’त असे असू शकते की, आपण स्वत:बरोबर झगडत आहोत व खळबळून आपण स्वत:तून मंद आचेवर उकळलेल्या दुधाप्रमाणे उतू गेलो. भांडे जर उंच असेल तर दूध उतूही न जाता कसे हळबळत राहाते; उकळीचा उकळीशी संवाद साधत राहतो शांतपणे.. तसेच काहीसे एकांताचे असते ‘स्व’ आणि ‘स्व’चा एकमेकांशी संवाद किंवा केवळ सहवास. कालांतराने आपल्याला एकटेपणाखेरीज ‘एकांताची’ स्थिती साधता येऊ शकते. सर्जनशील लोक हे करण्यात माहीर असतात.

एकांत म्हणजे?

‘आपण आपल्याबरोबर असणे आणि ही स्थिती आपण जाणीवपूर्वक निवडणे’. प्रत्येकाचा एकांताचा अर्थ थोडय़ाफार फरकाने वेगळा असू शकतो. यावर प्रकाश टाकण्याच्या उद्देशाने मी सर्जनाशी संबंधित काही निकटवर्तीयांना विचारले, ‘‘आपला स्वत:चा एकांताचा अर्थ काय?’’ आलेले प्रतिसाद असे- ‘कोणतेही काम करताना, आजूबाजूला कोणी बोलत नसावे आणि आपला आतला संवाद करता यावा अशी वेळ’; ‘स्वत:ला स्वत: अनुभवणे, स्वत:ला पाहणे’;  ‘जगाला अदृश्य करत स्वत:च्या आत डोकावण्याची व रमण्याची पर्वणी!’; ‘शहरात राहूनही अशी अवस्था मिळणे जिथे स्वत:चे स्वत:शी असलेले कायमचे नाते जाणवण्याची सुरुवात होते’ हे प्रतिसाद कलाशिक्षणतज्ज्ञ, चित्रकार, लेखक, विचारवंत, कलातज्ज्ञ- समीक्षक यांच्याकडून आले. तर एका डिझायनरने ‘एकांत म्हणजे डुडलिंग डायरी ऑफ ब्रेन, स्वत:शी मारलेल्या दिलखुलास गप्पा!’ असे वर्णन केले आणि त्याआधीच्या पायरीवर असलेली एक विद्यार्थिनी म्हणाली : ‘मर्यादित काळासाठी एकटेपणा गरजेचा असतो. यातूनच एकांतात आपण रमू शकतो.’

यातून एक अधोरेखित झाले की, प्रत्येकालाच एकांताचा अनुभव आवडतो व याचा सर्जनाशी निकटचा संबंध आहे. म्हणजे या लोकांना एकटे राहायला आवडते व त्यातून त्यांना ‘स्व’ चांगल्या प्रकारे गवसतो. यातूनच सर्जनशील विचार व कृती तयार होते.

व्हिक्टर पिव्होव्हरोव्ह (जन्म-१९३७) हा एक रशियन बोधचित्रकार (इलस्ट्रेटर) व चित्रकार यानिमित्ताने समोर आला. याचे काम पाहणे गरजेचे वाटले, कारण याने एकाकीपण व एकांताच्या सीमारेषेवर काम केले आहे, जे अध्यात्माच्या (स्पिरिच्युअल) अंगाने जाते. ७०च्या दशकातील ‘मॉस्को कॉन्सेप्च्युअल कलात्मक चळवळ’ महत्त्वाची होती, तिचा व्हिक्टर पिव्होव्हरोव्ह हा एक सभासद होता.

स्वत:च्या कामाविषयी तो लिहितो-

‘‘माझ्या कामात एकाकीपणाचे सूत्र सहजपणे आले. असे होणे माझ्यासाठी निहित कृत्यांपैकी एक होते, जे प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळे असते. मला अजूनही आश्चर्य वाटते की, १९७५ साली मी मित्रांबरोबर कार्यरत होतो व वैयक्तिक आयुष्यातही रत होतो, तरीही या एकाकीपणाच्या संकल्पनेवर (‘प्रोजेक्ट फॉर अ लोनली मॅन’) मी काम करत होतो. अजूनही मी एकटय़ा माणसाचे आयुष्य जगू शकत नसलो तरी मी आध्यात्मिकतेच्या भावनेने एकाकीपणाकडे पाहतो. दु:खद अनुभव म्हणून नव्हे. परंतु याचा अर्थ मला एकाकीपणाच्या त्रासातून कधीच जावे लागत नाही असा नाही. (नतालिया सिडलिनाने घेतलेल्या व्हिक्टर पिव्होव्हरोव्हच्या मुलाखतीतून, गॅझेटा, २००४.)

हे चित्र असेच का, हे समजून घेण्यासाठी दोन अवतरणे पाहू. (१) ‘‘पाश्चिमात्य देशांमध्ये, संकल्पनावादात एक गोष्ट दर्शविण्यासाठी दुसऱ्या गोष्टीचा वापर केला जातो – खरीखुरी गोष्ट दर्शविण्यासाठी शाब्दिक वर्णन वापरले जाते. पण रशियामध्ये, जी वस्तू  विवेचनाने बदलायची आहे ती वास्तविक अदृश्यच असते.’’- मिखाइल एप्सटाइन (२) मॉस्कोतली संकल्पवादी कला म्हणजे, ‘‘आयुष्याच्या रोजच्या वास्तविकतेच्या विरुद्ध व्यक्त केलेला विद्रोह.. मला आवडणारे दृश्य माझ्यासाठी एक व्यवस्था निर्माण करते.. व यातूनच माझ्या रोजच्या अस्तित्वाची जागा व ओळख तयार होते.’’ – एरीक बुलाटोव्ह

या रशियन कलाकारांनी प्रस्थापित, प्रचारकी भाषेविरुद्ध लढण्यासाठी एक अतिशय वास्तविक कलात्मक भाषा तयार केली. याची झलक आपल्याला व्हिक्टर पिव्होव्हरोव्हच्या कामातून मिळते. आश्चर्य म्हणजे याचा आशय जरी नाही तरी चित्रभाषा प्रभाकर बरवेंच्या संयत संवेदनशील विद्रोहाशी मेळ घेऊ बघते. ‘मेडिटेशन बाय द विंडो’ (१९७२, फायबर बोर्डवर इनॅमल) हे चित्र (‘टेट’च्या संकेतस्थळावरचे) आपले लक्ष वेधून घेते.  माणसाचे एकाकीपण व त्याची बंदिस्त जागा, यातून तयार झालेले त्याचे भावविश्व सभोवतालच्या गोष्टींमधून स्वत:शीच एक संवाद तयार करते. हा संवाद कधी कधी आपल्या अस्तित्वाला ललकारतो वा पुसू बघतो. चित्रातला डावा भाग बघितला तर आपल्याला एक रिकामा चेहरा दिसतो आणि इथपर्यंतचा प्रवास त्या एकटय़ाच्या बंद खोलीतल्या खिडकीतून सुरू होतो. एकटेपणा व एकांत एकमेकांना भेटण्याची शक्यता तयार होते, तिथेच आपल्याला आपले सच्चे अस्तित्व जाणवते.

जिआकोमेती या कलाकाराच्या शिल्पकलेवर ज्याँ पॉल सार्त् या प्रसिद्ध तत्त्ववेत्त्याने निबंध लिहिला आहे. त्यात त्याने एका ठिकाणी म्हटले आहे की, जिआकोमेती बरेच दिवस सैरभर चालत होता. या सातत्यातून त्याला आपल्यातल्या पोकळीची (व्हॉइड) जाणीव झाली. हीच होती सुरुवात त्याच्या व जगाच्या संबंधाचे अस्तित्व दर्शवण्याची. जिआकोमेतीची अतिशय लांब व बारीक मानवाकृतींची शिल्पे आपल्यात पूर्ण जगाचे अस्तित्व ओढून घेतात.

‘लॉस्ट इन ट्रान्स्लेशन’, २००३ हा सिनेमा एक अमेरिकन अभिनेता असलेले पात्र बॉबवर बेतलेला आहे, टोक्योमध्ये एका जाहिरात चित्रपटासाठी तो येतो, सुरुवातीपासून आपण त्याचा एकाकीपणा अनुभवतो. नंतर तो एका मुलीला भेटतो. तीसुद्धा एकाकी असते. चित्रपटाचा शेवट एकाकीपणाच्या जवळिकीत होतो. ‘दोघांचा एकांत म्हणजेदेखील अखेर एकेकटय़ाचे स्वत:ला शोधणे’ असा प्रतिसाद मला एका अस्तित्ववादी कलासमीक्षकाने दिला होता, त्या आशयाचा हा चित्रपट आहे.

एडवर्ड हॉपर, हा एक अमेरिकन चित्रकार अमेरिकेतल्या लोकांचा एकांत टिपतो, घरात किंवा बाहेर एकटय़ा बसलेल्या स्त्रिया हा त्याचा आवडीचा विषय आहे. ही चित्रे पाहताना बघणारा आणि चित्रातली व्यक्ती एकटे असतात. अचानकपणे आपल्याला धक्का बसतो कोपऱ्यात ‘हॉपर’ही बसलेला असतो. ही असते ‘एकांतातली प्रायव्हसी’, त्यात चित्रकारही सहभागी होतो.

एकांतात आपण विराम घेतो, काही तरी लोप पावते. यातूनच नवीन काही तरी जन्मते. आपल्या शरीरातही रोज अनेक पेशी लोप पावत असतात व नवीन तयार होत असतात. आपल्या मानसिकतेच्या संदर्भात ‘एकटेपणा’मध्ये अस्तित्वाच्या अभावाचा खेद असतो, पण ‘एकांता’त स्वत:च्या अस्तित्वाचा खरा अर्थ गवसतो!

लेखक दृश्य कला व क्रयवस्तू विश्लेषक असून ‘नीफ्ट’ येथे अध्यापन करतात.

nitindrak@gmail.com

मराठीतील सर्व संकल्पनांची संस्कृती ( Sanklpananchi-sanskruti ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: What is loneliness

ताज्या बातम्या