scorecardresearch

क्रांती-प्रतिक्रांतीचा सिद्धान्त

‘प्राचीन भारतातील क्रांती व प्रतिक्रांती’ या नावाचा एक महाग्रंथ लिहिण्याचा त्यांनी आराखडा तयार केला होता.

बुद्ध आमचाही देवच, त्यामुळे आता आपण भांडावयाचे कारण नाही, अशी लोकांची दिशाभूल करून तसेच बाहय़ात्कारी साम्यामुळे सबगोलंकारअशी स्थिती निर्माण करून ब्राह्मणीधर्माने बुद्धधर्ममुक्त हिंदुस्थानाचे उद्दिष्ट साध्य केले.. बुद्धधर्माची क्रांती आणि त्यास हटविणारी प्रतिक्रांती यांची ही मांडणी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लिखाणातून निवडलेली..

सांस्कृतिक ऐक्याच्या धोरणात आपल्या पूर्वजांनी सामाजिक समतेचे तत्त्व जर अंतर्भूत केले असते तर भारतीय संस्कृतीला किती उज्ज्वल स्वरूप प्राप्त झाले असते. या संस्कृतीचा इतिहास वाचताना सारखे वाटत असते की, एका वर्गाने वा जातीने दुसऱ्या वर्गावर वा जातीवर केलेल्या अन्यायाचाच इतिहास आपण वाचत आहोत. वैदिक धर्मातून निर्माण झालेल्या विषमतेला आव्हान देणारे बौद्धादींसारखे धर्म उदयास आले नसते तर स्वातंत्र्य मिळण्याच्या व खंडित भारतासाठी का होईना, एक राज्यघटना तयार होण्याच्या अवस्थेपर्यंत आपण कदाचित आलोही नसतो. डॉ. आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे, ‘‘इतर कोणत्याही देशात जेवढी राजकीय व सामाजिक आंदोलने झाली त्याच्या अनेक पटीने ती भारतात झाली. भारताचा सारा इतिहास राजकीय व सामाजिक क्रांतीने भरलेला आहे. ..या क्रांती हिंदुधर्म व बुद्धधर्म यांच्या झगडय़ातून निर्माण झाल्या होत्या. त्यांचा निष्कर्ष असा की, ‘भारताचा इतिहास म्हणजे दुसरेतिसरे काही नसून बुद्धधर्म व ब्राह्मणीधर्म यांच्यातील वर्चस्वाचा व नैतिक संघर्षांचा इतिहास होय.’’ या संदर्भातच त्यांनी ‘क्रांती-प्रतिक्रांतीचा सिद्धान्त’ मांडला आहे.

‘प्राचीन भारतातील क्रांती व प्रतिक्रांती’ या नावाचा एक महाग्रंथ लिहिण्याचा त्यांनी आराखडा तयार केला होता. त्यात ४१ प्रकरणे राहणार होती. त्यापैकी त्यांनी अधलीमधली लिहिलेली १३ प्रकरणे (त्यातील चार अपूर्णावस्थेत) महाराष्ट्र शासन प्रकाशित तिसऱ्या खंडात १९८७ साली पहिल्यांदा प्रसिद्ध झाली आहेत. त्या २८९ पृष्ठांवरूनही त्यांना या विषयासंबंधात काय प्रतिपादन करायचे होते ते स्पष्टपणे कळून येते. हाच सिद्धान्त त्यांनी अन्य लेखन व भाषणांतूनही मांडलेला आहे. त्यांचे प्रतिपादन असे की, बुद्धपूर्वकाळातील आर्य समाज हा सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक दृष्टीने अध:पतित झालेला होता व बौद्धधर्माने त्यात क्रांती घडवून आणली. बौद्धधर्माचा उदय ही केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक व राजकीय क्रांती होती. ‘बौद्धधर्माने चातुर्वण्र्यव्यवस्थेला आव्हान देऊन सामाजिक समता प्रस्थापित केली होती. बौद्धकाळातच मौर्य साम्राज्य स्थापन झाले होते.’ बुद्धाने केलेल्या धार्मिक व सामाजिक क्रांतीमुळेच चंद्रगुप्त मौर्याला राजकीय क्रांती करता आली. मौर्य साम्राज्याला त्यांनी ‘बौद्ध साम्राज्य’ म्हटले आहे. याच कालावधीत होऊन गेलेल्या अशोकाच्या साम्राज्यात बौद्धधर्म हा राज्यधर्म झालेला होता. बुद्धानंतर काही शतकांत भारत बौद्धधर्मीय झाला होता. या काळात चातुर्वण्र्याचे पूर्ण उच्चाटन झाले होते, असेही त्यांनी म्हटले आहे.

ब्राह्मणवर्गासाठी हा मोठा आघात होता. ब्राह्मणांचे वर्चस्व जाऊन त्यांना खालच्या वर्गाचे जीवन जगणे भाग पडले. शेवटी इ.स.पू. १८५ला पुष्यमित्र शुंग या ब्राह्मण सेनापतीने बृहद्रथ या बौद्ध राजाची हत्या करून बौद्ध राज्य नष्ट केले व स्वत:च्या नेतृत्वाखाली ब्राह्मणी राज्याची स्थापना केली. बाबासाहेबांचा निष्कर्ष असा की, ‘पुष्यमित्राच्या राज्यक्रांतीचे ध्येय बौद्धधर्माच्या जागी ब्राह्मणीधर्म राज्यधर्म म्हणून प्रस्थापित करणे व ब्राह्मणांना भारताचे सार्वभौम राज्यकर्ते बनविणे हे होते.’ राज्यावर आल्यावर पुष्यमित्राने आणखी दोन गोष्टी केल्या. त्याने बौद्धधर्मीयांचा अतोनात छळ केला. बौद्धभिक्षूच्या प्रत्येक शिरासाठी १०० सुवर्णमुद्रा देण्याचा आदेश काढला. तसेच ब्राह्मणीधर्माच्या तत्त्वज्ञानासाठी त्याने मनुस्मृती लिहून घेतली व तिची राज्याचा कायदा म्हणून घोषणा केली. मनुस्मृतीतील धर्म हा राज्याचा धर्म झाला. शुंग व त्यानंतरच्या कण्व व आंध्र या ब्राह्मणी राजवंशांचा समान उद्देश बौद्ध साम्राज्याचा व बौद्धधर्माचा नाश करणे हा होता व तो त्यांनी पार पाडला, अशी बाबासाहेबांची मीमांसा आहे. बौद्धधर्माचा उदय ही क्रांती तर पुष्यमित्राची राज्यक्रांती ही प्रतिक्रांती, असा सिद्धान्त त्यांनी मांडला आहे. याचा समग्र इतिहास त्यांना लिहायचा होता. त्यांच्या भाषेत सांगायचे म्हणजे, ‘बौद्ध भारतावरील ब्राह्मणी भारताच्या आक्रमणाच्या व बौद्धधर्मावरील ब्राह्मणीधर्माच्या राजकीय विजयाच्या इतिहासाची पुनर्माडणी करणे मला भाग पडत आहे.’ परंतु कमी आयुष्याने त्यांचे हे लेखनकार्य अपूर्ण राहिले.

भारतातून बौद्धधर्म संपविण्यासाठी ब्राह्मणांनी पुष्यमित्राच्या राज्यक्रांतीशिवाय आणखी कोणकोणते अहिंसक उद्योग केले याचीही माहिती त्यांनी दिली आहे. त्यापैकी प्रमुख उद्योग म्हणजे बौद्ध जनतेची दिशाभूल करणे होय. जाने. १९४० मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, ‘बौद्धधर्मामध्ये समानता आणि स्वातंत्र्य या दोन्ही तत्त्वांचा समावेश आहे. ही तत्त्वे ब्राह्मणांना कधीच पसंत पडणार नाहीत. जर बौद्धधर्म विजयी झाला असता तर जातिभेद शिल्लकच उरला नसता.’ बुद्धधर्माच्या नाशाविषयी ते म्हणाले, ‘हा मोठा इतिहास आहे. त्या काळी दोन धर्माचे विचारप्रवाह वाहत होते- एक वैदिकधर्म आणि दुसरा बुद्धधर्म.. बुद्धधर्माला अपयश आले याचे कारण म्हणजे त्या धर्माला काळच्या  ब्राह्मणवर्गाचा कसून विरोध होता. बुद्धधर्म जगातून शक्य तितक्या लवकर नष्ट व्हावा अशी त्यांची आत्यंतिक इच्छा होती.. समाजामध्ये समता आणि स्वातंत्र्य यांचे युग सुरू झाले तर आपले समाजातील स्थान कायम राहणार नाही अशी त्यांना भीती होती.’ यासाठी त्यांनी योजलेल्या पद्धतीविषयी ते म्हणाले, ‘क्षत्रियवर्गाला आपल्या हाताशी धरण्याचा ब्राह्मणवर्गाने कावा लढविला. त्यांच्या राम, कृष्ण या देवांना मान्यता देऊन त्यांची मने वळविली.. त्या क्षात्रवंशी देवांना भजण्यास सुरुवात केली आणि अशा रीतीने त्यांनी क्षत्रियांची मने वळवून बुद्धधर्माला मोठय़ा शिताफीने विरोध केला.’ ब्राह्मणांनी बुद्धधर्मातील चांगल्या गोष्टींचे अनुकरण केले असे सांगून ‘आजच्या हिंदुधर्मात ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यातल्या ९० टक्के बुद्धधर्मातल्या आहेत,’ असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

त्यापुढील महिन्यात दिलेल्या मुलाखतीतही ते म्हणाले की, ‘बुद्धधर्माच्या वादळी तडाख्यातून ब्राह्मणीधर्म कसा वाचला? तर त्याने सरळ साऱ्या कर्मकांडांचा व बळीप्रथांचा त्याग केला.. गोमांस खाणारे ब्राह्मण कडवे शाकाहारी बनले. त्यांनी  मद्यपान बंद केले. हिंदुधर्माने सुधारणेचे आवरण धारण केले.’ ते पुढे म्हणाले की, ‘बुद्धधर्मातील शिकवण मोठय़ा प्रमाणात हिंदुधर्मात समाविष्ट करण्यात आली. ब्राह्मणांनी क्षत्रियांना आपल्याबरोबरीचा दर्जा दिला. ब्राह्मणी देवांना बाजूला सारून त्या जागी क्षत्रिय देवांची प्रतिष्ठापना करण्यात आली. परिणामत: बुद्धधर्माकडे गेलेली जनता पुन्हा हळूहळू हिंदुधर्माकडे वळली.’

या संबंधात १९४१ मध्ये त्यांनी लिहिलेला ‘बुद्धजयंती आणि तिचे राजकीय महत्त्व’ हा लेख उल्लेखनीय ठरतो. बुद्धकालीन ब्राह्मणीधर्माचे तीन आधारस्तंभ वेदप्रामाण्य, यज्ञ-बलिदान व वर्णाश्रम.. (या तिन्ही बाबींवर) बुद्धाने फारच मोठा मारा केला.. बुद्धाची विस्मृती चीनमध्ये, जपानमध्ये, ब्रह्मदेशात झाली नाही, ती फक्त हिंदुस्थानातच झाली. याला ..बुद्धाचे शत्रू कारणीभूत आहेत, हे उघड आहे. ब्राह्मण हे एकजात बुद्धाचे शत्रू..  चातुर्वण्र्य गेले तर ब्राह्मण्य गेले.. चातुर्वण्र्याला ते आपला प्राण समजत. बुद्धाची चातुर्वण्र्यविध्वंसनाची मोहीम म्हणजे ब्राह्मणांना ‘मूले कुठार:’ होती. ती त्या काळची ब्राह्मण-ब्राह्मणेतर चळवळच होती. त्यांनी क्षत्रियांना जवळ करून बुद्धाची चळवळ कशी मारून टाकली हे बाबासाहेब दाखवून देतात. बुद्ध तुमचा खरा, पण आम्हीदेखील त्याला आमच्या विष्णूचा दहावा अवतार मानतो, असे ब्राह्मण म्हणू लागले. जनता खूश झाली.. आता ब्राह्मणांशी भांडावयाचे काय कारण? त्याचप्रमाणे, ‘बुद्धाचे अनुकरण करून ब्राह्मणीधर्म व बुद्धधर्म एकच होत अशी त्यांनी लोकांची दिशाभूल केली. बुद्धाने विहारे बांधली.. विहारांच्या शेजारीच ब्राह्मणांनी आपली विहारे बांधण्यास सुरुवात केली. या बाहय़ात्कारी साम्यामुळे सबगोलंकार झाला.’

१९४८च्या ‘अस्पृश्य मूळचे कोण?’ या ग्रंथातही त्यांनी अशीच भूमिका मांडली आहे. बौद्धधर्माला संपविण्यासाठी ब्राह्मणांनी त्या धर्माच्या काही शिकवणीचे अतिरेकी स्वरूपात अनुकरण केल्याचे ते दाखवून देतात. जनतेच्या मनावर बौद्धधर्माचा प्रभाव इतका गडद होता की, बौद्धधर्माची तत्त्वे आत्मसात करून त्याचे अतिरेकी प्रमाणात पालन केल्याशिवाय त्या धर्माला टक्कर देण्याचा दुसरा मार्ग अशक्य झाला होता. नंतर बुद्धाच्या अनुयायांनी बुद्धाच्या प्रतिमा उभारणे व स्तूप बांधणे सुरू केले. ब्राह्मणांनी त्याचे अनुकरण करून आपल्या देवदेवतांची मंदिरे बांधली व त्यात आपल्या देवतांची प्रतिष्ठापना केली. बुद्धाच्या प्रतिमेची पूजा करणाऱ्या जनतेला आपल्या दैवतांकडे वळविण्याचा त्यांचा हेतू होता. त्यांनी हेही दाखवून दिले आहे की, बुद्धपूर्वकाळात ब्राह्मण हे पक्केगोमांसभक्षक (greatest beef- eaters) होते. परंतु, ‘बौद्धभिक्षूपेक्षा श्रेष्ठ बनण्यासाठी’ व ‘बौद्धधर्माला नामोहरम करण्यासाठी त्यांनी गोमांस वज्र्य करून गाईची पूजा सुरू केली व ते शाकाहारी बनले.’ त्यांचा निष्कर्ष असा की, ‘अतिरेकाने अतिरेक ठार करण्याची ही नीती आहे. डाव्या पंथाच्या लोकांना नामोहरम करण्यासाठी उजव्या पंथाचे लोक नेहमीच या नीतीचा उपयोग करीत असतात. बौद्धांना हरवण्याचा एकच मार्ग उरला होता व तो म्हणजे एक पाऊल पुढे जाऊन शाकाहारी बनणे.’

भारतात बौद्धधर्माचा ऱ्हास का झाला, यावर आपण संशोधन करीत असल्याचे त्यांनी १९५० साली जाहीर केले होते. यासंबंधीचे निष्कर्ष यानंतरच्या काळात विविध लेखांतून व भाषणांतून प्रसिद्ध झाले आहेत. ‘क्रांती-प्रतिक्रांतीचा सिद्धान्त’ म्हणून याचा अभ्यास करताना त्याकडे ‘संस्कृतिसंवादा’च्या भूमिकेतून पाहणेही उद्बोधक ठरते.

लेखक इतिहासाचे अभ्यासक आहेत.

मराठीतील सर्व संस्कृतिसंवाद ( Sanskrutsanwad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Buddha dharma revolution

ताज्या बातम्या