हिंदू राज्यआणि हिंदू राष्ट्रहे शब्द स्वातंत्र्यपूर्व काळात आगरकरांपासून आंबेडकरसावरकर यांच्यापर्यंत अनेकांनी वापरले; तर स्वातंत्र्योत्तर काळातही भौगोलिक वा पाश्चात्त्य राष्ट्रसंकल्पनेच्या चौकटीत हिंदू राष्ट्रीयता बसू शकत नाहीहे म्हणणे रा. स्व. संघाने कायम ठेवले. चार्वाकांचा भौतिकवाद, जैनांचा अहिंसावाद किंवा बुद्धांच्या अष्टांगिक मार्गाना या नव्या हिंदू राष्ट्रवादा स्थान काय, हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहतो..

अनेकांना वाटत असते, की फाळणी होऊन ज्या अर्थी पाकिस्तान हे इस्लामिक राष्ट्र बनले, त्या अर्थी उर्वरित भारत हिंदू राष्ट्र बनायला पाहिजे होते. असे न करून गांधी-नेहरूंनी मोठा प्रमाद व हिंदूंवर अन्याय केला, असेही त्यांना वाटत असते. एवढेच नाही, तर भारताला हिंदू राष्ट्र बनविण्याचा काही जणांनी संकल्प केला असून, एका दिवशी ते प्रत्यक्षात येणार याबद्दल त्यांना खात्री वाटते. गमतीची गोष्ट ही की, हिंदू राष्ट्र बनणे म्हणजे नेमके काय हे जनतेसाठी एक कोडे बनले आहे. देशात हिंदूंची बहुसंख्या आहे म्हणून भारताला ‘हिंदुस्थान’ म्हणण्याची पद्धत ब्रिटिशपूर्व काळापासून आहे.

BJP Politics in Tamil Nadu blending caste and faith
तमिळनाडूमध्ये जात व धर्माची मोट बांधण्याचा भाजपाचा प्रयत्न! काय आहे परिस्थिती?
after germany us reacts to arvind kejriwal s arrest
अन्वयार्थ : अस्थानी त्रागा..
india-pakistan
विश्लेषण : भारत-पाकिस्तान व्यापार पाच वर्षांनी सुरू होणार? जाणून घ्या तेव्हा व्यापार ठप्प होण्याची काय होती कारणं?
Even today Hindus are insecure in the country says Praveen Togadia
‘हिंदूंच्या विकासासाठी हनुमान चालीसा विकास यंत्रणा!’ प्रवीण तोगडिया म्हणाले…

१८८७-८८ मध्ये हिंदू व मुसलमान ही दोन राष्ट्रे आहेत, असा सिद्धांत मांडला गेल्यावर हिंदूंकडूनही ‘हिंदू राष्ट्र’ या शब्दांचा वापर सुरू झाला. हा शब्द बुद्धिवादी आगरकरांच्या लेखनातही आलेला आहे. ‘गुलामांचे राष्ट्र’ हा त्यांचा लेख हिंदू राष्ट्रासंबंधातच आहे. १९२७-२९ या काळातील ‘बहिष्कृत भारत’मध्ये डॉ. आंबेडकरांनी हा शब्द अनेकदा वापरला आहे. ‘अत्यंत प्राचीन काळी उदयास आलेल्या राष्ट्रांपैकी हिंदू राष्ट्र हे एक आहे.. हिंदू समाज अनेक वर्षे.. गुलामांचे राष्ट्र म्हणून जगला आहे.. हिंदू राष्ट्राचा अध:पात त्याच्या धर्मशास्त्रामुळे झाला आहे,’ असे त्यांनी म्हटले आहे. तसेच ‘या देशात हिंदू आणि मुसलमान हे दोन समाज नव्हे, ही दोन राष्ट्रे नांदत आहेत,’ असेही त्यांनी १९२९ च्या एका लेखात म्हटले आहे. हिंदू महासभेच्या १९३७ च्या अध्यक्षीय भाषणात, हिंदू राष्ट्रवादी मानल्या गेलेल्या सावरकरांनी म्हटले होते :  ‘आज तरी भारत सुसंवादी व एकात्म राष्ट्र बनले आहे असे गृहीत धरता येत नाही. उलट भारतात हिंदू व मुसलमान अशी मुख्य दोन राष्ट्रे विद्यमान आहेत.’ परंतु, अनेक देशांत असल्याप्रमाणेच आम्हालाही कोणालाही विशेषाधिकार नसणारे व पूर्ण समान हक्कांवर आधारलेले ‘हिंदी राज्य’ पाहिजे आहे, असे त्यांनी पुढे म्हटले होते. यावर डॉ. आंबेडकरांनी ‘पाकिस्तान’ ग्रंथात टीका केली होती की, ‘सावरकरांची ही भूमिका अतार्किक आहे. ते मान्य करतात, की मुसलमान हे स्वतंत्र राष्ट्र आहे. त्यांचा सांस्कृतिक स्वायत्ततेचा हक्कही ते मान्य करतात.. ते मुस्लीम राष्ट्राला आत्मा असणाऱ्या घटकांना स्वातंत्र्य देऊन मुस्लीम राष्ट्राचे परिपोषण करतात.. परंतु त्या दोन राष्ट्रांची दोन स्वतंत्र राज्ये करण्यास मान्यता देत नाहीत.’ यासंबंधात त्यांचा तर्कशुद्ध निष्कर्ष फाळणी मान्य करावी असा होता. तथापि, ‘हिंदू धर्म हा स्वातंत्र्य, समता व बंधुता यासाठी महान संकट व लोकशाहीविरोधी असून, कोणतीही किंमत देऊन भारत हे ‘हिंदू राज्य’ होण्यापासून वाचविले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे. येथे ‘हिंदू राज्य’ याचा अर्थ ‘हिंदू धर्मावर आधारित राज्य’ असा त्यांना अभिप्रेत आहे.

१९३७ ते ४३ या काळात सावरकर हिंदू महासभेचे अध्यक्ष होते. मुस्लीम लीग ‘मुस्लीम राष्ट्रा’ची भाषा करीत असल्यामुळे त्याची प्रतिक्रिया व उत्तर म्हणून ते ‘हिंदू राष्ट्रा’ची भाषा वापरीत होते. ‘भौगोलिक राष्ट्रवादाच्या साच्यात भारतवर्षांला ओतणे हे हिंदू महासभेचे ध्येय आहे,’ असे ते सांगत होते. त्यांनी प्रत्यक्षात भारतीय राष्ट्रवादाचाच पुरस्कार केला होता. धर्म-पंथ-वंश याचा कोणताही भेदभाव न करता सर्वाना पूर्ण समान हक्क; अल्पसंख्याकांचा धर्म, भाषा, संस्कृती यास घटनात्मक संरक्षण, त्यांना धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक संस्था स्थापण्याचे हक्क, त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात विधिमंडळांत राखीव प्रतिनिधित्व ही त्यांनी मांडलेल्या राज्यघटनेतील काही सूत्रे होती. आजच्या राज्यघटनेपेक्षाही अल्पसंख्याकांना ती अधिक हक्क (उदा. राखीव प्रतिनिधित्व) देणारी होती. राज्यघटनेत भारतीय राष्ट्राचे खरेखुरे राष्ट्रीय स्वरूप सिद्ध केल्याबद्दल त्यांनी घटना समितीच्या अध्यक्षाचे तार करून अभिनंदन केले होते. ‘राज्याची घटना कोणत्या धर्मग्रंथावर नव्हे तर अद्ययावत बुद्धिप्रामाण्यावर आधारलेली असली पाहिजे,’ अशी त्यांची घोषणाच होती. त्यांना पाहिजे असणारे ‘हिंदू राष्ट्र वा हिंदू राज्य’ म्हणजे ‘सेक्युलर राज्य’च होते. त्या काळात हिंदू व मुसलमान यांना सत्तेत समान वाटय़ाची मागणी होत होती, त्या संदर्भात हिंदूंवर अन्याय होऊ नये एवढय़ासाठीच त्यांनी हिंदूंचा पक्ष घेतला होता. धर्मनिरपेक्षपणे हिंदूंचे न्याय्य हक्क रक्षण करणारे राष्ट्र म्हणजेच त्यांचे हिंदू राष्ट्र होते. त्याचा संबंध कोणत्या धार्मिक वा सांस्कृतिक जीवनमूल्यांशी नव्हता. सर्व धर्मग्रंथ कालबाह्य़ झाले आहेत; हिंदू संस्कृती अपवादवजा जाता श्रुतिस्मृतिपुराणोक्त आहे; श्रुतिसंस्कृतिपुराणोक्ताची बेडी तोडून आपण पाश्चात्त्यांप्रमाणे बुद्धिवादी, पुरोगामी, आधुनिक व अद्ययावत बनले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. तथापि, त्यांचे बुद्धिवादी विचार पटणारे व समजावून सांगणारे अनुयायीच त्यांना मिळाले नाहीत. तेव्हा सावरकरांना अभिप्रेत असणारे हिंदू राज्य वा हिंदू राष्ट्र घटनेनुसार स्थापन झालेले असल्यामुळे त्याचा प्रत्यक्ष अंमल करण्यापलीकडे नव्याने काही स्थापन करण्याची गरज उरली नाही व त्यांच्या दृष्टीने हिंदू राष्ट्रवाद संपलेला आहे.

मात्र ज्यांच्याकडे अनुयायी व शक्ती आहे, असा रा. स्व. संघ हिंदू राष्ट्रवादाचा अद्यापही आग्रही पुरस्कर्ता आहे. हिंदू राष्ट्र ही संघाची जीवननिष्ठा आहे. त्याच्या स्थापनेसंबंधात संघनेत्यांचे म्हणणे असे की, ‘विरोधकांनी हिंदू राष्ट्र होऊ न देण्याचा विडा उचलला आहे. हा निर्धार पूर्ण करणे कोणाला शक्य आहे काय? कारण या राष्ट्राची निर्मिती तर पूर्वीच होऊन चुकलेली आहे.. इतिहासाने जेव्हा डोळे उघडले, तेव्हा त्याने आम्हाला ‘राष्ट्र’ या स्वरूपातच पाहिले. हे राष्ट्र ऋग्वेद काळापासून चालत आलेले आहे.. ‘हिंदू राष्ट्र’ हे सनातन सत्य आहे. त्याच्या स्थापनेची भाषा हास्यास्पद आहे. यावर कोणी विचारील, की ‘हिंदू राष्ट्र’ सनातन म्हणजे चिरंतन सत्य असेल त्याचा ‘वाद’ कोणता? याचे उत्तर असे, की हिंदू राष्ट्र सनातन असले, तरी त्याची हिंदूंना आत्मविस्मृती झाली होती. ते राजकीय अंधकारामुळे लोकांना दिसत नव्हते. ते प्रकाशात आणून त्याचे ज्ञान करून देण्यासाठी हिंदू राष्ट्रवादाची गरज आहे.

संघाला अभिप्रेत असणाऱ्या हिंदू राष्ट्राचा अर्थ ‘हिंदू संस्कृतीला मानणारे राष्ट्र’ असा आहे, तर हिंदू संस्कृतीचा अर्थ ‘विशिष्ट जीवनमूल्ये’ असा आहे. विशिष्ट जीवनमूल्ये धारण करणाऱ्यांचे राष्ट्र बनते; ती मूल्ये ऋषीमुनींनी सांगितलेली आहेत, अशी संघाची भूमिका आहे. स्पष्टपणेच त्यांची राष्ट्रीयत्वाची संकल्पना सांस्कृतिक आहे. त्यांच्या मते भौगोलिक वा पाश्चात्त्य राष्ट्रसंकल्पनेच्या चौकटीत हिंदू राष्ट्रीयता बसू शकत नाही. संस्कृती नेहमी एकसंध असते, संमिश्र नसते. संस्कृती गंगेच्या प्रवाहाप्रमाणे काळाबरोबर पुढे जात राहते. तिला ठिकठिकाणी अनेक लहान-मोठय़ा नद्या, ओढे-नाले मिळतात, तरी त्या नदीला गंगाच म्हणतात. तसेच हिंदू संस्कृतीच्या मूळ प्रवाहाचेही आहे. म्हणून हिंदू जीवनप्रवाह हाच या देशातील राष्ट्रस्वरूप जीवनप्रवाह आहे, अशी त्यांची भूमिका आहे.

हिंदूंचा धर्म, संस्कृती, जीवनपद्धती वा जीवनमूल्ये यांना ते समानार्थी मानतात. धर्म व संप्रदाय किंवा उपासना पद्धती (रिलिीजन) यात फरक करून इस्लाम व ख्रिश्चन धर्माला ते ‘उपासना पद्धती’ मानतात. इस्लामला ते संस्कृती वा जीवनपद्धती मानीत नाहीत. मुसलमानांनी आपली उपासना पद्धती पाळावी, मात्र या देशाची मूळ हिंदू संस्कृती आपली मानावी असा त्यांचा आग्रह असतो. ‘जो या देशाचा इतिहास, परंपरा व संस्कृती मानतो तो हिंदू’ अशी त्यांची व्याख्याच आहे. मुसलमान व ख्रिश्चन यांनी अशा प्रकारे ‘हिंदू’ बनावे. त्यासाठी उपासना पद्धती बदलण्याची गरज नाही. असे झाल्यास ते हिंदू राष्ट्राचे घटक बनतात, अशी त्यांची भूमिका आहे. मुसलमान व ख्रिश्चन यांचे पूर्वज हिंदू होते या गोष्टीची जाणीव करून दिल्यास ते या देशाला आपली मातृभूमी व हिंदू संस्कृतीला आपली संस्कृती मानू लागतील. यावर त्यांचा खूप भर असतो. ते आग्रहपूर्वक मांडीत असतात, की ‘राष्ट्र’ व ‘राज्य’ या दोन भिन्न संकल्पना आहेत. ‘राष्ट्र’ कायम राहते; ते पारतंत्र्यातही असू शकते. ‘हिंदू राष्ट्र’ मोगल राज्यकाळातही होते. राज्य, म्हणजे शासनव्यवस्था ही बदलणारी असते. त्यांचा आग्रह हिंदू राष्ट्रासाठी आहे, हिंदू राज्यासाठी नाही.

त्यांचा मूलभूत व खरा विरोध पाश्चात्त्य संस्कृतीला व विचारसरणीला आहे. तीस ते परकीय मानतात. म्हणूनच त्यांचा पाश्चात्त्य सेक्युलॅरिझमला विरोध आहे. भारताची राज्यघटना पाश्चात्त्य संकल्पनांवर आधारलेली आहे. तीत भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब पडलेले नाही, अशी त्यांची तक्रार असते.

हिंदू राष्ट्रवाद म्हणजे काय? त्याची सैद्धांतिक, सुसूत्र व तर्कशुद्ध मांडणी कोणीही केलेली नाही. इस्लाम हा धर्म वा संस्कृती नसून केवळ उपासना पद्धती आहे, हे इस्लामचे सामान्य ज्ञान असणाऱ्यासुद्धा मान्य करणार नाही. वेदकाळापासूनची ऋषीमुनींनी सांगितलेली विशिष्ट जीवनमूल्ये मानतो तो हिंदू, या व्याख्येनुसार सावरकरही ‘हिंदू’ ठरणार नाहीत. बहुसंख्य हिंदू समाज धर्मनिष्ठ व हिंदू संस्कृती पाळणारा असूनही या जीवनमूल्यांना आपल्यावरील सांस्कृतिक गुलामगिरी व संघाला सांस्कृतिक विरोधक मानतो. भारतीय राज्यघटना ज्या आधुनिक मानवी मूल्यांवर आधारित आहे, तीच जीवनमूल्ये का मानू नयेत? चार्वाकांचा भौतिकवाद, जैनांचा अहिंसावाद किंवा बुद्धांच्या अष्टांगिक मार्गाना त्यात काय स्थान आहे, असे प्रश्न त्याला पडतात. देशात हिंदूू बहुसंख्याक राहणार आहेत, तोवर तो कोणत्याही अर्थाने हिंदू राष्ट्रच राहणार आहे, त्यासाठी स्वतंत्र ‘वादा’ची काय गरज आहे, असेही त्याला वाटत असते. खरोखर हिंदू राष्ट्रवाद हे एक न उलगडणारे कोडे आहे.

लेखक इतिहासाचे अभ्यासक आहेत.