संजय बनसोडे
फार वर्षे झालेली नाहीत- १९५६ साली संत गाडगेबाबांचे निधन झाले. म्हणजे गाडगेबाबांना प्रत्यक्ष पाहिलेली बरीच माणसे आजही हयात असतील. जे हयात नसतील त्यांनी गाडगेबाबा जिवंत असतानाच प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिलेले गाडगेबाबांचे चरित्र तरी नक्कीच वाचले असेल.

ज्यांनी तेही वाचले नसेल, तरी त्यांना ‘गाडगेबाबा’ हे नाव माहीत असेल; त्यांचा विचार माहीत असेल; त्यांची कीर्तने माहीत असतील. त्यांचे शेवटचे कीर्तन आजही ध्वनी-चित्रफितीच्या स्वरूपात उपलब्ध आहे. संत कसा असतो याचे मूर्तिमंत उदाहरण महाराष्ट्राने पाहिले आहे.

खरंतर संतांची फार मोठी मांदियाळी या महाराष्ट्राला लाभलेली आहे. बाराव्या शतकातील संत चक्रधर आणि संत ज्ञानेश्वर यांच्यापासून ते गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांपर्यंत अशी दीर्घ, प्रभावी आणि थोर संतपरंपरा महाराष्ट्राने अनुभवली आहे. महाराष्ट्राच्या धार्मिक जडणघडणीत या संतपरंपरेचा सिंहाचा वाटा आहे.

या सर्व संतांनी धर्मांधतेचा विरोध केला, कर्मकांडाचा विरोध केला, विषमतेला, चमत्काराला नाकारले. विधायक देवकल्पनेचा पुरस्कार करत अखंड मानवकल्याणाचा मार्ग ‘मानवता’च आहे, असे ठासून सांगितले. अशा या महाराष्ट्रात आज भोंदू बुवा-बाबांचा झालेला सुळसुळाट मन विषण्ण करणारा आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे मी स्वतः जाऊन आलो. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीवर आणि पोलिसांवरही खंडणी घेण्याचा खोटा आरोप करणाऱ्या या भोंदू राजेंद्र बापू गडगेबाबाला अखेरीस अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्यांच्याच तक्रारीवरून अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे लोकसंत गाडगेबाबा यांच्यापासून ो या भोंदू राजेंद्र गडगेबाबा पर्यंतच संत परंपरेचं अधःपतन आज महाराष्ट्राला बघावं लागत आहे—ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे.

मंत्राने कॅन्सर बरा करण्याचा दावा करणाऱ्या या भोंदूचे यथावकाश अनेक फसवणुकीचे प्रकार पुढे नक्कीच उघड होतील. खरात प्रकरणाने महाराष्ट्रातील बुवाबाजीच्या विकृत, भल्यामोठ्या गाठोड्याची गाठ सोडलेली आहे. आणि या गाठोड्यातून दररोज नवे-नवे बुवाबाजीचे प्रकार महाराष्ट्रभर उघडकीस येत आहेत. उठसूट ‘फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र’ म्हणणाऱ्यांसाठी ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे.

राजकीय अध:पतनही आहेच…

नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाने महाराष्ट्राला केवळ हादरवले नाही, तर आपल्या धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि नैतिक आरशात डोकावण्यास भाग पाडले आहे. हा प्रश्न एका भोंदू व्यक्तीपुरता मर्यादित नाही; हा प्रश्न आहे—महाराष्ट्राच्या वैचारिक परंपरेचा, राजकीय अधःपतनाचा आणि समाजातील विवेकशून्यतेचा.

महाराष्ट्राची ओळख ही संत परंपरा आणि समाजसुधारकांच्या विचारांनी घडलेली आहे. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांनी भक्तीला विवेकाची जोड दिली. संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी भक्तीत माणसाला केंद्रस्थानी ठेवले. गोपाळ गणेश आगरकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विधायक धर्मचिकित्सा करत समता, शिक्षण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांची पायाभरणी केली.

तरीही याच भूमीत अशोक खरातसारखी, भोंदू राजेंद्र गडगे याच्यासारखी बुवाबाजी वाढते, हे समाजासाठी निश्चितच आत्मचिंतन करण्यासारखे आहे. यातून काही मूलभूत धडे शिकण्याची महाराष्ट्राला गरज आहे.

पहिला धडा म्हणजे – पुरोगामी परंपरेचा अभिमान पुरेसा नाही; मूल्यांचे पालन आवश्यक आहे. आपण फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घेतो, पण त्यांच्या विचारांचा प्रत्यक्ष आचरणात किती अंगीकार करतो, हा मूलभूत प्रश्न आहे. केवळ घोषणांमधील प्रगतिशीलता आणि प्रत्यक्षातील अंधश्रद्धा यातील दरीच अशा घटनांना जन्म देते. वैज्ञानिक दृष्टिकोन शिक्षणात आहे, संविधानात कर्तव्य म्हणून नमूद आहे; परंतु समाजाच्या आचरणात तो दिसत नाही. ही दरी भरून काढण्यासाठी समाजानेच पुढाकार घ्यायला हवा.

दुसरा महत्त्वाचा धडा म्हणजे – राजकारणाचे अधःपतन आणि बुवाबाजीचा संगम. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रात स्वच्छ, प्रगतिशील आणि विचाराधिष्ठित राजकारणाची पायाभरणी केली. परंतु आज अनेक ठिकाणी राजकारणच भोंदूगिरीला खतपाणी घालताना दिसते. मुहूर्तावर निवडणूक अर्ज भरले जातात, ज्योतिषावर निर्णय घेतले जातात—हे वास्तव लपून राहिलेले नाही. लाखोंची गर्दी खेचणाऱ्या बुवा-बाबांच्या प्रवचनांचे आयोजन येथील राजकीय व्यवस्थेच्या पाठिंब्याशिवाय शक्य नसते, हे सर्वश्रुत आहे.

जेव्हा राजकारण केवळ सत्ताकारणात रूपांतरित होते, तेव्हा ते जात, धर्म, पैसा आणि अंधश्रद्धेच्या आधारावर उभे राहते. अशोक खरातसारख्या भोंदूंना संरक्षण, प्रसिद्धी आणि वैधता देणारे, तसेच त्यांचे उदात्तीकरण करणारे राजकारण लोकशाहीसाठी धोकादायक आहे. इतकेच नव्हे, तर अशा व्यवस्थेत काही जण लाभार्थी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राजकीय नैतिकतेचे पुनर्मूल्यांकन करणे अत्यावश्यक आहे.

तिसरा धडा म्हणजे – स्त्रीसुरक्षेचा आणि सन्मानाचा प्रश्न. या प्रकरणात समोर आलेले लैंगिक शोषण अत्यंत गंभीर आहे. समाजात आधीच असुरक्षित स्थितीत असलेल्या महिला अशा बुवाबाजीच्या जाळ्यात अडकतात. सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची परंपरा असलेल्या महाराष्ट्रात महिलांवर अशा प्रकारचे अत्याचार होणे ही मोठी शोकांतिका आहे.

‘वृक्ष तेथे छाया आणि बुवा तेथे बाया,’ हे आचार्य अत्रे यांचे वाक्य काही खोटे नाही. अनेक प्रकारच्या अनिष्ट रूढी, प्रथा आणि परंपरांच्या आधारे स्त्रीला कोंडून ठेवण्याचे काम पुरुषप्रधान व्यवस्थेने केले. स्त्री जोपर्यंत विषमता, पारतंत्र्य, अन्याय, कौटुंबिक हिंसाचार यांची बळी राहील, तोपर्यंत ती अशा भोंदूंचे सहज लक्ष्य ठरेल.

चौथा धडा प्रशासन आणि जबाबदारी. अशा प्रकारचा गुन्हेगारी कारभार वर्षानुवर्षे सुरू राहतो आणि तो कुणाच्याही लक्षात येत नाही, असे मानणे कठीण आहे. त्यामुळे प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि संबंधित संस्थांची जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे. निष्क्रियता असो किंवा संगनमत—दोन्हीही तितकेच घातक आहेत.

अशी प्रकरणे प्रचंड संवेदनशील असतात. पीडित महिलांच्या समोर ‘इकडे आड आणि तिकडे विहीर’ अशी परिस्थिती असते. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी आत्मवंचना असते. आपला संसार तुटेल, सामाजिक अब्रू धोक्यात येईल या विवंचनेत ती अनेकदा पुढे येत नाही. म्हणून अत्यंत संवेदनशीलपणे या प्रकरणाचा तपास करावा लागेल.

या पार्श्वभूमीवर तपास यंत्रणांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता निष्पक्षपणे काम करणे गरजेचे आहे. महिला अधिकाऱ्याकडे तपास सोपविण्यात आला आहे, ही बाब स्वागतार्ह असली तरी त्याचा परिणामकारक शेवट होणे अधिक महत्त्वाचे आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या क्षेत्रात गेली ३६ वर्षे कृतीशील आहे. अशोक खरातवर जो जादूटोणाविरोधी कायदा लावला गेला, त्या कायद्यामागे संघटनेचे दीर्घकालीन प्रयत्न आहेत. शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे बलिदान आहे. सातत्याने विविध अंगांनी प्रयत्न करूनदेखील अशोक खरातसारखे प्रकार महाराष्ट्रात राजरोसपणे सुरू राहतात, ही गोष्ट विचार करायला भाग पाडणारी आहे.

आम्हालादेखील समाजात संवादाच्या नव्या पद्धती शोधाव्या लागतील. याच महाराष्ट्रातल्या मातीतला पुरोगामी विचार अधिक परिणामकारकपणे पुढे न्यावा लागेल. संघटना लवकरच फलज्योतिष, मंत्र-तंत्र आणि जादूटोणा विरोधात नवी आघाडी उभी करेल.

समाज, माध्यमे आणि समाजमाध्यमे याबद्दलची सध्याची स्थितीही निराशाजनक आहे. फलज्योतिष आणि जादूटोणा यांना खतपाणी घालणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. या तिघांनीही आत्मचिंतन करून स्वतःच्या जबाबदारीचे भान ठेवणे आवश्यक आहे. नाहीतर अशोक खरातसारखे जाळे थेट आपल्या घरापर्यंत येईल, तेव्हा मात्र उशीर झालेला असेल.

शेवटी, सर्वात महत्त्वाचा धडा म्हणजे; वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव. भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचे कर्तव्य दिले आहे. तरीही समाज मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धेकडे झुकताना दिसतो. “अभ्यास न करता पास व्हा,” अशा हास्यास्पद दाव्यांनाही लाखोंची गर्दी होते, ही वस्तुस्थिती आहे.

जोपर्यंत लोक प्रश्न विचारत नाहीत, शंका घेत नाहीत, तोपर्यंत अशा भोंदूगिरीला खतपाणी मिळत राहील. त्यामुळे शिक्षण, जनजागृती आणि विवेकवाद यांना केंद्रस्थानी ठेवणे अत्यावश्यक आहे.

अशोक खरात प्रकरण महाराष्ट्रासाठी एक इशारा आहे. ही केवळ एका व्यक्तीची चूक नाही, तर आपल्या सामूहिक अपयशाचे लक्षण आहे. संत परंपरा, समाजसुधारकांचे विचार, प्रयोगशील शिक्षण आणि प्रगतिशील राजकारण यांचा अभिमान बाळगणाऱ्या महाराष्ट्राने आता आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे.

जर आपण या प्रकरणातून योग्य धडा घेतला, तरच भविष्यात अशा घटना टाळता येतील. अन्यथा इतिहास पुन्हा पुन्हा स्वतःची पुनरावृत्ती करत राहील आणि त्याची किंमत समाजातील सर्वात कमजोर घटकांना, विशेषतः महिलांना, चुकवावी लागेल.

लेखक ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’चे राज्य कार्याध्यक्ष आहेत.

sanjaybansode.anis@gmail.com