‘आजन्म अजागळ’ या अग्रलेखातील (२५ एप्रिल) ‘नेहरूंचे नेतृत्व भोंगळ होते’ या विधानावर आज दुमत नसेल. ‘देशाच्या सीमा निश्चित केल्या पाहिजेत, लष्करी सामथ्र्य वाढवले पाहिजे, तरुणांना लष्करी प्रशिक्षण अनिवार्य केले पाहिजे आदी सूचना स्वा. सावरकरांनी भारत सरकारला वारंवार केल्या होत्या. ‘चीन भारतावर आक्रमण करण्याची तयारी करत आहे’ हा धोक्याचा इशारादेखील दिला होता.
 पण गांधी-नेहरूंच्या काँग्रेसने सावरकरांना नेहमीच ‘युद्धखोर’ म्हणून हिणवले, त्यांचा कायम उपहास व अपमान केला, त्याचीच परिणती लाजिरवाण्या पराभवात झाली.
 -केदार अरुण केळकर, दहिसर (प.)

हाच पिळवणुकीचा प्रतिकार का?
‘वाढत्या पिळवणुकीचा प्रतिकार का नाकारता?’ असा सवाल करणारे सुंदर नवलकर यांचे पत्र (लोकमानस २५ एप्रिल) वाचले. या पत्राचा एकूणच रोख नक्षलवाद्यांची बाजू काही प्रमाणात का होईना, लावून धरणारा होता असे वाटते. या देशाचे अगदी वाटोळे झाले आहे, असा आततयी विचार जरी क्षणभर केला तरी याच राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेतला एक घटक म्हणून मला काही प्रश्न पडतात. हे सर्व प्रश्न लोकसत्तामधील प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तांमधूनच पडले आहेत आणि मला नक्षलवाद्यांच्या कोणाही सहनुभूतीदाराकडून उत्तरे चालतील.
१) राज्यकत्रे पिळवणूक करणारे असतील तर त्यांच्या पोलिसांसारख्या शिलेदारांना नक्षलवादी लक्ष्य आणि भक्ष्य बनवितात. ही जर त्यांची विचारसरणी असेल तर मृत महिला पोलीस ही गरोदर आहे असे लक्षात आल्यावर तिच्या पोटात गोळ्या मारल्या जातात. याने अन्यायाचा प्रतिकार वाढतो का?
२) शाळा नामशेष करणे, पूल उडवणे, रस्ते उखडणे या जर अन्यायाचा प्रतिकार करण्याच्या पद्धती असतील तर शाळा, रस्ते, पूल ही अन्यायाची प्रतीके म्हणायची का?
३) मरणानंतर वैर संपत असेल तर मृत जवानांच्या शरीरात बॉम्ब लावून किंवा शरीराचे तुकडे करून अन्यायाचा अधिक चांगला प्रतिकार करता येतो का?
४) आपला मुलगा किंवा मुलगी उत्तम नक्षलवादी व्हावेत अशी प्रामाणिक इच्छा किती सहानुभूतीदारांची आहे? का तिथेही शिवाजी दुसऱ्याच्या घरात जन्माला यावा?
५) नक्षलवाद्यांची सर्व िहसा प्रकर्षांने छापली जाते, पण पोलिसी कृत्यांना मात्र जास्त प्रसिद्धी मिळत नाही असा एक लाडका आक्षेप व्यक्त केला जातो. खरं सांगायचं झालं तर पोलिसांची वेगवेगळ्या प्रकरणांत आधीच इतकी बदनामी आणि नाचक्की झाली आहे की ते प्रामाणिक आणि धुतल्या तांदळासारखे असतात यावर शेंबडे पोरही विश्वास ठेवणार नाही. पण तरीही आपला मुलगा आयपीएस अधिकारी व्हावा असे एखाद्या बापाला वाटेल की नक्षलवादी दलांचा मोठा कमांडर व्हावा असे वाटेल?
वस्तुस्थिती ही आहे की या देशासमोर नक्षलवाद हा मोठा प्रश्न आहे आणि त्यांचे सहानुभूतीदारही मोठय़ा प्रमाणात आहेत. पण या गोष्टींपेक्षाही गंभीर म्हणजे जर सरकार बीमोड करण्यासाठी आपल्या संपूर्ण ताकदीनिशी उतरले तर त्यातून महाभयंकर विनाश ओढवेल. मग ती जीवित हानी असो वा पर्यावरणाची हानी. अंतर्गत बंडाळी निपटून काढण्यासाठी याआधी सरकारने मिग विमानांचा वापर केला आहे. पण त्यातून विनाशाखेरीज हाती काहीच लागणारे नाही. प्रश्नाचे उत्तर सोडवण्याचा हा मार्ग खचितच नाही. किमान लोकशाहीत तर नाहीच नाही. म्हणूनच सरकार अजून तरी सबुरीने घेते आहे. फक्त ही वादळापूर्वीची शांतता न ठरो.
-सौरभ गणपत्ये, ठाणे</strong>

भेट दिलेली गाडी विकणारा समाजकार्य काय करणार ?
सचिन तेंडुलकर ४० वर्षांचा झाला म्हणून लोकसत्ताने त्याच्यासाठी खास पाने प्रसिद्ध केली, याबद्दल काहींना संताप आला तर बरेच जण सुखावले. ज्या वाचकांनी त्या पुरवणीचे समर्थन केले, ते प्रेमाच्या भरात तो समाजसेवा करतो असेही म्हणू लागले!
त्यांना एक छोटीशी आठवण करून द्यायची आहे. सचिन याने सर ब्रॅडमन यांच्या २९ शतकांची बरोबरी केली म्हणून फियाट कंपनीने त्याला फेरारी गाडी भेट दिली; त्यावरचा कर भरायलाही सचिनने नकार दिला. भारत सरकारलाच तो म्हणू लागला, तुम्ही त्यातून सूट द्या, शेवटी फियाटनेच हा कर भरला आणि सगळे होऊनही त्याने ती गाडी चक्क विकून टाकली. जो माणूस भेट दिलेली वस्तू विकायची नसते एवढी संस्कृती दाखवू शकत नाही तो समाजकार्य काय करणार?
सचिन हा आता व्यक्ती राहिलेली नाही, तो आता विक्रयवस्तू (कमॉडिटी) झाला आहे आणि अजूनही त्याच्या नावावर वस्तू खपतात.. आणि वर्तमानपत्रेही!
 दुर्दैवाचा भाग हा की त्याच्या वाढदिवसाला जगाने त्याला अनेक भेटी, शुभेच्छा दिल्या; पण सचिन तेंडुलकरने मात्र स्वत:ला आणि  चाहत्यांना त्या दिवशी केवळ दोन धावांची ‘रिटर्न गिफ्ट’ दिली.
– शिरीष धारवाडकर.

माहितीचा दुष्काळ सरेना, म्हणून मदत देणाऱ्यांची वणवण..
उद्योगपतींनी दुष्काळातील जनतेला मदत करण्यात हात आखडते घेतल्याबद्दलची बातमी (लोकसत्ता, २५ एप्रिल) वाचली. याबाबत मला स्वतला आलेला विदारक अनुभव आपल्यापुढे मांडणे जरूर आहे.
दुष्काळाच्या बातम्या वाचून नुसती कोरडी सहानुभूती न दाखविता प्रत्यक्ष आपला खारीचा वाटा उचलावा असे वाटणारे अनेक आहेत. मीही त्यांच्यातला एक. म्हणून महाराष्ट्र सरकारचा मुख्यमंत्री दुष्काळ निवारण निधीचा खाते क्रमांक विचारणारा
ई-मेल मुख्यमंत्री कार्यालयास पाठविला. या सुमारास विधानसभेचे अधिवेशन सुरू होते आणि सर्वजण आमदारांचे विशेषाधिकार कुरवाळण्यात गुंग होते. पण कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे काय? जनतेला काही विशेषाधिकार नसल्याने माझ्या पत्राची दाद घ्यावीशी त्यांना वाटले नसावे. अखेर माहितीच्या अधिकाराच्या यादीतून संबंधित अधिकाऱ्याचे नाव शोधून काढले व त्यांना दूरध्वनी करून सदर क्रमांक विचारला. जेव्हा त्यांनी तो मला सांगितला तेव्हा मी चकितच झालो. कारण तो क्रमांक स्टेट बँकेचा होता. मात्र स्टेट बँकेच्या धर्मादाय देणगी यादीत झारखंड इत्यादी राज्यांची नावे झळकत असून मुंबईत मुख्य कार्यालय असणाऱ्या या बँकेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री निधीचे नाव देण्याची तसदी कोणी घेतली नाही.
याबाबत दुसरा प्रकारही प्रशासकीय अनास्थेवर प्रकाश टाकणारा आहे. माझा मुलगा परदेशी नोकरी करतो. त्याने व त्याच्या मराठी मित्रांनी तेथील टीव्हीवर दुष्काळाची चित्रफीत पाहिली व आपला हातभार लावायचे ठरविले. त्याने मला दुष्काळग्रस्त जिल्ह्याात कोणत्या संस्था प्रत्यक्ष काम करीत आहेत याची माहिती विचारली. अर्थातच मुंबईत बसून माझ्याकडे ही माहिती नव्हती. दुष्काळग्रस्त जिल्ह्य़ांच्या जिल्हाधिकाऱ्यांना ई-मेल पाठवून मी सदर माहिती विचारली. उत्तर नाहीच. अखेर अमेरिकेतून त्यानेच थेट महाराष्ट्राच्या गावागावातील माहिती मला कळविली आणि स्वत तेथे जाऊन खातरजमा करण्याची विनंती केली.
-शेखर पाठारे.

माध्यमांतून व्यक्तिपूजा नकोच
सचिन तेंडुलकरच्या वाढदिवसानिमित्त ‘लोकसत्ता’ने काढलेल्या पुरवणीबाबत अभिषेक कोरगावकर आणि श्री. वि. आगाशे यांनी जे नापसंतीदर्शक मत व्यक्त केले, ते अतिशय योग्य असेच आहे. केवळ लोकसत्ता नाही तर सगळीच प्रसारमाध्यमं, सचिन हा एकमेव महान क्रिकेटर आहे असा भास निर्माण करत असतात. २४ वष्रे तो खेळतोय, साहजिकच विक्रम होणारच. त्यात एवढे गवगवा करण्यासारखे काय त्याने केले? पण मुळातच हा व्यक्तिपूजक देश असल्यामुळे हे असे होणारच आणि माध्यमेसुद्धा त्याला अपवाद नाहीत.  
तरीही ‘लोकसत्ता’ला विनंती करावीशी वाटते की आता ही व्यक्तिपूजा थांबवा.     
– प्रमोद गोसावी, पनवेल.

आपण ‘अजगर’ का असतो?
‘आजन्म अजागळ’ या अग्रलेखात (२५ एप्रिल) मांडलेले मुद्दे पटले. चीनशी झालेल्या युद्धाला ५० वर्षे झाली, परंतु अजूनही आम्ही चीन व पाकिस्तान म्हटले की नांगी का टाकतो हेच समजत नाही. आमच्या देशाला परराष्ट्र धोरण आहे की नाही असे विचारायची वेळ आलेली आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात आपण नेभळट का ठरतो? भांबावून का जातो?
चीनचे नवीन राज्यकत्रे खूपच आत्मविश्वासाने आपली वाटचाल करत असताना आम्ही मात्र दक्षिण आफ्रिकेतील ब्रिक्स परिषद असो अथवा चीनने केलेली लडाखमधील ताजी घुसखोरी असो, प्रत्येक ठिकाणी आपला गृहपाठ नसल्याचेच जगाला पटवून देतो.  आमच्याकडे उत्तम संरक्षण विश्लेषक आहेत , आंतरराष्ट्रीय सल्लागार आहेत, तरीही आम्ही माती का खातो? या अजगरात चतन्य जेव्हा निर्माण होईल तो सुदिन.
 – शैलेश पुरोहित, मुलुंड