सद्गुरू गणेशनाथ रोज स्नानानंतर हस्तलिखित ज्ञानेश्वरी वाचत. त्यांच्याकडील प्रत अतिशय जीर्ण झाली होती. म्हणून स्वामींनी अत्यंत आत्मीयतेने आणि स्वच्छ, शुद्ध हस्ताक्षरात बोरूच्या टाकाने नऊ हजार ओव्यांची ज्ञानेश्वरी उतरवली आणि वयाच्या पंचविशीत, १९२८मध्ये ती महाराजांना अर्पित केली. ज्ञानेश्वरी उतरवण्याचे हे काम जुलै १९२७ ते १९२८च्या अखेपर्यंत सुरू होतं. याचाच अर्थ महिन्याला एक अध्याय याप्रमाणे १८ महिन्यांत स्वामींनी हे कार्य पूर्ण केलं. वरवर पाहता ही कृती सहजसाधी दिसत असली तरी त्यामागे सद्गुरूंचा निश्चितच गूढ हेतू होता. या कृतीतून महाराजांनी जणू ‘अभंग ज्ञानेश्वरी’चं बीजारोपणच स्वामींच्या अंतरंगात केलं होतं. तसे स्वामी ज्ञानेश्वरमय होतेच, पण श्रीमहाराजांसाठी ओवीन् ओवी लिहून काढताना प्रत्येक ओवीचं सद्गुरूकृपेच्या प्रकाशात किती सखोल चिंतन झालं असेल! १९२९ ते १९३१ या दोन वर्षांत महाराजांच्या सेवेचा योग स्वामींना अनेकदा लाभला. १९३२ हे वर्ष आंदोलन आणि तुरुंगवासातच सरलं. येरवडय़ाच्या तुरुंगात स्वातंत्र्य चळवळीतल्या अनेक धुरीणांशी जसा त्यांचा ऋणानुबंध जडला तितकाच सद्गुरूंशी असलेला आंतरिक बंध अधिक चिवट झाला. तासन्तास ध्यानावस्थेतही सरू लागले. त्या एकांतवासात पूर्णत्वाचाही लाभ झाला. त्याचा प्रत्यय या तुरुंगवासातच स्फुरलेल्या नऊ ओव्यांतून येतो. १९३२मध्ये तुरुंगातून सुटल्यानंतर भावफुलांनी गुंफलेला हा ‘नवरत्नहार’ स्वामींनी आपल्या सद्गुरूंना अर्पण केला (हा नवरत्नहार आणि त्याचा भावार्थ विस्तारभयास्तव इथे देत नाही. इच्छुकांनी तो स्वामींचे सिद्धहस्त व मर्मग्राही चरित्रकार रा. य. परांजपे यांच्या ‘स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्त्वज्ञान’ या ग्रंथात मुळातच वाचावा).  स्वामींच्या अंतरंगात उमललेली नवविधाभक्ती, ज्ञान आणि कर्मयोगाची प्रचीती, तसंच सद्गुरुशरणतेची पूर्णता आणि भावकमलाचं पूर्ण विकसन पाहून गणेशनाथही प्रसन्न झाले. त्यानंतर वर्षभरात म्हणजे १९३३मध्ये गणेशनाथांनी आपलं अवतारकार्य पूर्णत्वास नेलं. इथेच म्हणजे १९३४पासून स्वामींच्या चरित्राचा अखेरचा मोठा टप्पा सुरू होतो. याच उंबरठय़ावर गृहस्थाश्रमाचा योग आणि वियोग आहे. विकार आणि विचार यांचं साक्षित्वानं अवलोकन आहे. तसंच भीती आणि भक्ती या दोहोंतल्या भक्तीचा पूर्ण स्वीकार आहे. ‘‘जी प्रभू आपला म्हणितला। तेणें संसार मोक्षमय जाला। देखें उन्मेष उदैजला। नित्य नवा।। तुटला विषयांचा लाग। निमाला जन्म-मरणाचा भाग। फिटला जीवदशा पांग। सामरस्यें।। देही अहंता नुरली। वृत्ती स्वरूपीं विराली। द्वैताद्वैत गिळोनि ठेली। अखंडत्वें।। सरली कर्माकर्म – विवंचना। कीं आपैसी साध्य -साधना। उरे करोनि अकर्तेपणा। ठाईंचा चि।। बोलीं अबोलता जहालो। सहजसुखें सुखावलो। धन्य धन्य देवा पावलों। परम सिद्धी।। स्वरूपीं विश्व-रूप देखिलें। विश्व-रूपी स्वरूप सामावलें। स्वरूपा विश्वरूपा आगळें। नित्य तत्त्व।।’’  या ‘नवरत्नहारा’तील ओव्यांचा अर्थ स्वामींच्या जगण्यात पूर्णपणे याच टप्प्यात प्रत्यक्ष दृश्यमान झाला.