लहान मुलींवरील लैंगिक अत्याचारांच्या घटना महाराष्ट्रासह संपूर्ण देशात वाढताना दिसत आहेत, ही गुन्हेगारी वृत्ती आहेच, पण त्याचबरोबर ती समाजाच्या नैतिक, राजकीय आणि प्रशासकीय अध:पतनाची गंभीर लक्षणे आहेत. चार-पाच वर्षांच्या मुलींवरही अत्याचार होत असल्याच्या घटना जेव्हा समोर येतात, तेव्हा सामान्य माणसाच्या मनात संताप तर निर्माण होतोच. पण संपूर्ण व्यवस्थेविषयी असहायता आणि घृणाही निर्माण होते.

एखादा विकृत वृद्ध मनुष्यही अशा अमानुष कृत्याला धजावतो, याचा अर्थ केवळ त्याची वैयक्तिक विकृती नसून त्याच्या मनात कायद्याची भीती उरलेली नाही, समाजाचे नैतिक नियंत्रण ढासळले आहे आणि राजकीय-सामाजिक यंत्रणा निष्प्रभ ठरली आहे. अशा गुन्ह्यांची कारणे केवळ लैंगिक नसतात, तर सत्ता, दडपशाही, हिंसा, स्त्रीदेहाकडे वस्तू म्हणून पाहण्याची मानसिकता, बालकांविषयीची असंवेदनशीलता आणि विकृत पुरुषसत्ताक संस्कार यांचा त्यात मोठा वाटा असतो.

माध्यमांमधून वाढत चाललेले अश्लील हिंसक चित्रण, सोशल मीडियावरील निर्बंधहीन लैंगिक सामग्री, कुटुंबव्यवस्थेतील संवादाचा अभाव आणि मानसिक आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष हे घटकही या विकृतीला खतपाणी घालत आहेत. परंतु या सर्वांपेक्षा धोकादायक गोष्ट म्हणजे गुन्हेगाराच्या मनात निर्माण झालेली ‘आपले काहीही बिघडणार नाही’, ही भावना. जेव्हा राजकीय नेते गुन्हेगारांना आश्रय देतात, पोलीस यंत्रणा दबावाखाली काम करते, आणि न्यायालयीन प्रक्रिया वर्षानुवर्षे लांबतात, तेव्हा समाजात कायद्याचा धाक संपतो.

आज परिस्थिती अशी झाली आहे की, एखाद्या बलात्काराच्या घटनेनंतर समाजात काही दिवस संताप उसळतो, मोर्चे निघतात, सोशल मीडियावर निषेध व्यक्त होतो; पण नंतर सर्व काही पूर्ववत होते. राजकीय पक्ष या घटनांनाही निवडणुकीच्या गणितातून पाहतात. सत्ताधारी विरोधकांवर आरोप करतात आणि विरोधक सत्ताधाऱ्यांना धारेवर धरतात; पण मुलींच्या सुरक्षिततेसाठी दीर्घकालीन सामाजिक व प्रशासकीय उपाययोजना करण्याबाबत गंभीर इच्छाशक्ती फार कमी दिसते. काही वेळा तर आरोपींचे राजकीय संबंध असल्यामुळे तपासावर परिणाम झाल्याचेही दिसते. अशा घटनांमुळे सामान्य नागरिकांच्या मनात राज्य खरोखर कोण चालवत आहे, हा प्रश्न उभा राहतो.

यामधील आणखी एक भयावह पैलू म्हणजे समाजाची वाढती असंवेदनशीलता. सततच्या बातम्यांमुळे लोक हादरतात, पण हळूहळू त्यालाच सरावतात. एखाद्या बालिकेच्या उद्ध्वस्त जीवनाची कहाणी काही दिवसांची हेडलाईन बनते आणि मग विस्मरणात जाते. हा विसर पडणेच व्यवस्थेला सोयीचे असते. कारण लोक सतत प्रश्न विचारू लागले, तर राजकीय आणि प्रशासकीय जबाबदारी ठरवावी लागेल. त्यामुळे भावनिक उद्रेक होतो, पण संघटित सामाजिक दबाव निर्माण होत नाही.

खरे तर मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी केवळ कठोर शिक्षा पुरेशा नाहीत. शिक्षेचा वेग, तपासाची पारदर्शकता, पोलीस दलाचे संवेदनशील प्रशिक्षण, शाळा-कुटुंबांमध्ये लैंगिक शिक्षण, मानसिक आरोग्य सेवा, आणि स्त्रीविषयक समानतावादी संस्कार यांची जोड आवश्यक आहे. परंतु जेव्हा सरकारांचे प्राधान्य धार्मिक ध्रुवीकरण, प्रतिमा निर्माण आणि प्रचार यावर अधिक केंद्रित होते, तेव्हा अशा मूलभूत सामाजिक प्रश्नांकडे दुय्यम नजरेने पाहिले जाते. विकासाच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जातात; पण जर चार वर्षांची मुलगीही सुरक्षित नसेल, तर त्या विकासाच्या दाव्यांना कोणते नैतिक मूल्य उरते?

बलात्कार करून केला जाणारा खून ही घटना हीनपणाची पातळी गाठणारी असते. कोणाही व्यक्तीला तिचे स्वत्व हिरावून घेण्याने होणाऱ्या वेदनांपेक्षाही अशा घटना अधिक तीव्र परिणाम करणाऱ्या ठरतात. ज्या महाराष्ट्रात मुलींना शिक्षणासाठी प्रवृत्त करणारी चळवळ सुरू होते आणि त्याचा देशभर प्रसार होतो, त्याच महाराष्ट्रात मुलींना घराबाहेर पडण्यास भीती वाटावी, अशा घटना सातत्याने घडत असतील, तर हे समाजात असंस्कृतपणा वाढल्याचे लक्षण आहे.

प्रगत म्हणून घ्यायचे, तर समाजातील प्रत्येक घटकाला त्याचा हक्क न्याय्य पद्धतीने मिळण्याची व्यवस्था निर्माण व्हावयास हवी, त्यामध्ये असे हक्क कोणी कोणास देऊन उपकार केल्याची भावनाही असता कामा नये. व्यवस्थेत प्रत्येकाला स्वत:चे स्वातंत्र्य जपायचे असते, तेथे स्वत:शिवाय प्रत्येकाचे स्वातंत्र्य जपण्याची जबाबदारीही आपल्यावरच येते, हे भान सुटू लागले की अशा शक्ती डोके वर काढू लागतात.

म्हणून कोणत्या प्रकारचा पुरुष लिंगपिसाट होऊ शकतो, ह्या प्रश्नामागे गुंतागुंतीची मानसशास्त्रीय, सामाजिक आणि जैविक पार्श्वभूमी दडलेली आहे. सर्वप्रथम एक महत्त्वाची स्पष्टता आवश्यक आहे की ‘लिंगपिसाट’ हा शब्द वैज्ञानिक भाषेत वापरला जात नाही. सामान्य लोकांच्या भाषेत तो असा पुरुष दर्शवतो जो लैंगिक बाबतीत अतिरेकी, असंतुलित किंवा कधी कधी आक्रमक वर्तन करतो. परंतु वैज्ञानिक दृष्टीने या संकल्पनेचे दोन वेगळे भाग केले जातात.

एक म्हणजे अतिलैंगिकता, ज्यात व्यक्तीची लैंगिक इच्छा नियंत्रणाबाहेर जाते, आणि दुसरा म्हणजे लैंगिक आक्रमकता, ज्यात इतरांच्या संमतीशिवाय लैंगिक वर्तन केले जाते. या दोन्ही गोष्टी वेगळ्या असल्या तरी काही वेळा त्या एकमेकांशी संबंधित असू शकतात. म्हणूनच या प्रश्नाचे उत्तर एकाच ठराविक साच्यात मांडणे शक्य नाही; उलट अनेक घटकांचा संगम येथे महत्त्वाचा ठरतो.

मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर आवेगांवर नियंत्रण ठेवण्याची कमी क्षमता हा एक प्रमुख घटक आहे. ज्या व्यक्ती क्षणिक इच्छांना लगेच प्रतिसाद देतात, परिणामांचा विचार कमी करतात, त्यांच्यात अतिलैंगिक वर्तनाची शक्यता जास्त दिसून येते. अशा व्यक्तींसाठी थांबून विचार करणे, ही प्रक्रिया कमी कार्यरत असते. याचबरोबर सतत नवीन, तीव्र आणि उत्तेजक अनुभव शोधण्याची प्रवृत्तीही महत्त्वाची ठरते. अशा व्यक्तींना सामान्य अनुभवांमध्ये समाधान मिळत नाही, त्यामुळे ते अधिक तीव्र लैंगिक अनुभवांच्या मागे लागतात. यामध्ये अश्लीलतेचा अतिरेक, अनेक जोडीदार शोधणे किंवा धोकादायक लैंगिक वर्तन यांचा समावेश होऊ शकतो.

भावनिक अस्थिरता हा आणखी एक महत्त्वाचा पैलू आहे. ज्या व्यक्तींच्या भावनांमध्ये सातत्य नसते, ज्या पटकन चिडतात, निराश होतात किंवा रिकामेपण अनुभवतात, त्या काही वेळा लैंगिक वर्तनाचा वापर भावनिक पलायन म्हणून करतात. म्हणजेच मानसिक ताण, एकटेपणा किंवा अपूर्णतेची भावना कमी करण्यासाठी ते लैंगिकतेचा आधार घेतात. अशा परिस्थितीत लैंगिकता ही नैसर्गिक गरज न राहता एक प्रकारचे व्यसनात्मक साधन बनते. यामुळे त्या व्यक्तीला स्वतःवर नियंत्रण ठेवणे अधिक कठीण होते.

लैंगिक आक्रमकतेच्या बाबतीत व्यक्तिमत्त्वातील काही विशिष्ट दोष निर्णायक ठरतात. उदाहरणार्थ, सहानुभूतीचा अभाव हा सर्वात गंभीर घटक मानला जातो. ज्या व्यक्ती दुसऱ्याच्या भावनांचा विचार करत नाहीत, त्यांच्या वेदना किंवा अस्वस्थता समजून घेत नाहीत, त्यांच्याकडून जबरदस्तीची शक्यता वाढते. याचबरोबर स्वतःला अतिशय महत्त्वाचे समजणे, आणि अपराधीपणाची भावना कमी असणे, हे अवगुणही लैंगिक आक्रमकतेशी संबंधित आढळतात. अशा व्यक्तींना इतरांच्या स्वातंत्र्याचा किंवा अधिकारांचा फारसा विचार नसतो; त्यांच्यासाठी स्वतःची इच्छा हीच अंतिम सत्य असते.

सामाजिक घटक देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. एखादा पुरुष ज्या संस्कृतीत वाढतो, ज्या मूल्यव्यवस्थेत त्याचे समाजीकरण होते, त्याचा त्याच्या लैंगिक वर्तनावर मोठा प्रभाव पडतो. उदाहरणार्थ, स्त्रियांविषयी हीन, मालकीभावी किंवा वस्तू म्हणून पाहण्याची दृष्टी जर लहानपणापासून रुजवली गेली असेल, तर पुढे जाऊन त्या व्यक्तीच्या वर्तनात लैंगिक आक्रमकतेची शक्यता वाढते. पुरुष हा स्वाभाविकपणे प्रभुत्व गाजवणारा असतो किंवा स्त्रीची नकारार्थी प्रतिक्रिया ही खरी इच्छा लपवते, अशा चुकीच्या समजुती समाजात अजूनही काही प्रमाणात आढळतात. या समजुतींना बलात्कारी मानसिकतेची मिथके असे म्हटले जाते, आणि ती लैंगिक गुन्ह्यांना अप्रत्यक्षपणे पोषक ठरतात.

बालपणीचे अनुभव हा आणखी एक निर्णायक घटक आहे. ज्या मुलांनी बालपणी शारीरिक, मानसिक किंवा लैंगिक छळ अनुभवला आहे, त्यांच्यात पुढे जाऊन असंतुलित लैंगिक वर्तनाची शक्यता वाढते, असे अनेक अभ्यास सूचित करतात. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक छळग्रस्त व्यक्ती पुढे गुन्हेगार बनते; परंतु अशा अनुभवांमुळे व्यक्तिमत्त्वाच्या विकासात विकृती निर्माण होऊ शकते.

मद्यपान आणि मादक द्रव्यांचा वापर हा देखील एक महत्त्वाचा घटक आहे. अल्कोहोल किंवा ड्रग्सच्या प्रभावाखाली निर्णयक्षमता कमी होते, नियंत्रण सुटते आणि व्यक्तीचे दडपलेले प्रवृत्ती बाहेर येतात. त्यामुळे अनेक लैंगिक गुन्ह्यांमध्ये मद्यपानाचा सहभाग आढळतो. याशिवाय इंटरनेट आणि डिजिटल माध्यमांमुळे अश्लील व्हिडीओची सहज उपलब्धता वाढली आहे.

सतत आणि अनियंत्रित अश्लील सामग्री पाहिल्याने काही व्यक्तींमध्ये वास्तव आणि कल्पना यातील फरक अस्पष्ट होऊ शकतो. विशेषतः हिंसक किंवा विकृत अश्लीलतेचा अति संपर्क व्यक्तीच्या अपेक्षा आणि वर्तनावर परिणाम करू शकतो. यात हार्मोन्स, विशेषतः टेस्टोस्टेरॉन, याचा काही प्रमाणात प्रभाव असतो. उच्च टेस्टोस्टेरॉन पातळी असलेल्या व्यक्तींमध्ये लैंगिक इच्छा अधिक असू शकते, परंतु हा घटक एकट्याने निर्णायक ठरत नाही. कारण समाजात अनेक उच्च लैंगिक इच्छा असलेल्या व्यक्ती असतात, पण त्या सर्वजण आक्रमक किंवा असंतुलित वर्तन करत नाहीत. यावरून स्पष्ट होते की जैविक घटक हा फक्त एक भाग आहे.

व्यक्तिमत्त्व, संस्कार आणि सामाजिक नियंत्रण हे तितकेच महत्त्वाचे आहेत. जास्त लैंगिक इच्छा असणे हे नैसर्गिक असू शकते, आणि ते चुकीचे नाही. समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा ती इच्छा नियंत्रणाबाहेर जाते किंवा इतरांच्या अधिकारांचे उल्लंघन करते. त्यामुळे इच्छा आणि वर्तन यामध्ये फरक करणे अत्यावश्यक आहे.

एक व्यक्ती आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवून जबाबदारीने वागू शकते, तर दुसरी व्यक्ती तसे करू शकत नाही. म्हणून लिंगपिसाटपणा हा एखाद्या ठराविक प्रकारच्या पुरुषाचा गुणधर्म नसून तो अनेक घटकांच्या परस्परसंवादातून निर्माण होतो. जैविक प्रवृत्ती, मानसशास्त्रीय गुणधर्म, बालपणीचे अनुभव, सामाजिक संस्कार आणि वर्तमान परिस्थिती, या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून असे वर्तन घडते.

हे असे आपल्याकडे वारंवार होते याचे कारण आपल्यासारख्या व्यवस्थाशून्य समाजात कायदा मोडणे हे पुरुषार्थाचे लक्षण मानले जाते. मग तो गावातला टिनपाट पुढारी असो, राष्ट्रीय नेता असो की उद्योगपती. जेवढा मोठा कायदेभंग तेवढी मोठेपणाची प्रभावळ मोठी. खंत ही आहे की अशा व्यवस्थाशून्य समाजात या कायदेतोडय़ांना समाजही नायकत्व देतो. परिणामी नियमाने चालणारे बावळे ठरू लागतात आणि मिळेल ते ओरबाडून घेणे हे न्याय्य मानले जाते. तेव्हा अशा समाजात बलात्कारी वृत्ती वृद्धिंगत झाली नसती तरच नवल.

समाजात कायद्याचा धाक आणि माणुसकीची जाणीव या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे टिकल्या पाहिजेत. अन्यथा लोकशाही केवळ निवडणुकांपुरती उरते आणि सामान्य माणसाच्या आयुष्यात अराजकतेची भावना वाढू लागते. एवंच बालिकांवरील अत्याचार ही केवळ गुन्हेगारांची आकडेवारी नसून ती राज्यव्यवस्थेच्या अपयशाची आणि समाजाच्या नैतिक पराभवाची रक्तरंजित नोंद आहे.

त्यामुळे उपाय शोधताना देखील एकाच स्तरावर काम करून चालणार नाही. त्यासाठी वेगवेगळे स्तर आजमावावे लागतील. यावर सर्वात प्रभावी उपाय म्हणजे योग्य वयात लैंगिक शिक्षण देणे. संमती ही संकल्पना स्पष्टपणे समजावून सांगणे, दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा आदर करणे, आणि लैंगिकतेकडे जबाबदारीने पाहणे, ही मूल्ये लहानपणापासून रुजवली गेली पाहिजेत. याचबरोबर मानसिक आरोग्य सेवांचा विस्तार करणे, व्यसनाधीनतेवर नियंत्रण ठेवणे, आणि स्त्री-पुरुष समानतेची जाणीव वाढवणे हे देखील अत्यंत आवश्यक आहे.

शेवटी, हा प्रश्न केवळ कोण दोषी आहे, इतपतच मर्यादित ठेवणे योग्य नाही, तर हा प्रश्न समाजाच्या आरोग्याशी, शिक्षणाशी आणि मूल्यव्यवस्थेशी जोडलेला आहे. एखाद्या व्यक्तीचे विकृत वर्तन हा केवळ त्याचा वैयक्तिक दोष नसून अनेकदा तो व्यापक सामाजिक संरचनेचा परावर्तित परिणाम असतो. त्यामुळे या समस्येकडे पाहताना भावनिक प्रतिक्रिया देण्याऐवजी वैज्ञानिक, विवेकनिष्ठ आणि मानवी दृष्टीकोनाने विचार करत व्यक्त होणे हीच समाजाच्या प्रगल्भतेची कसोटी आहे.

लेखक समाजचिंतक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन प्रसारक आहेत.

(jetjagdish@gmail.com)