शिवसेनेत निष्ठेला आणि शिस्तीला सर्वाधिक महत्त्व आहे. बाळासाहेबांचा आणि पक्षप्रमुखांचा आदेश सैनिकांना नेहमीच शिरसावंद्य असतो आणि लाखो शिवसैनिकांप्रमाणेच माझी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर निष्ठा आहे असे सांगत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी माफीनामा देऊन पक्षाबाहेरचा आपला मार्ग बंद करून घेतला, त्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील अनेकांना उद्देशून एक आदेशवजा सूचना केली होती. ज्यांना आपले नेतृत्व मान्य नाही, त्यांनी खुशाल पक्ष सोडून द्यावा, असे उद्धव ठाकरे यांनी खडसावले आणि सलगपणे सर्वाधिक काळ खासदारकी भूषविलेले शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील शिलेदार मोहन रावले हे या घडामोडींनतर पक्षातून बाहेर पडलेले पहिले शिवसैनिक ठरले. रावले हे बाळासाहेबांचे कट्टरपंथीय समर्थक होते. तरीही, मनोहर जोशींच्या मानापमान नाटय़ानंतर सेनेतील वातावरण तापलेले असताना त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. रावले यांना ‘चाणक्यनीती’च्या राजकारणात रस नव्हता. केवळ बाळासाहेबांच्या कृपेमुळे आणि मतदारसंघातील ‘शिवसेना स्टाइल’ दबदब्यामुळे लोकसभेच्या उमेदवारीची माळ त्यांच्या गळ्यात  पडली होती आणि मतदारसंघातील ‘नामचीन’ राजकारणाला पुरून उरणारा उमेदवार हाती लागल्याचे समाधान शिवसेनेला मिळाले होते. लोकसभेत पंतप्रधानांवरील विश्वासदर्शक ठराव हाणून पाडण्यासाठी विरोधकांची जेव्हा एकाएका मताची मोर्चेबांधणी सुरू होती, तेव्हाच रावले यांना ‘दहिवडय़ाची बाधा’ झाली आणि पंतप्रधानांचा विजय सोपा झाला, ही कहाणी देशाच्या संसदीय इतिहासात अजरामर झाली आहे. कुप्रसिद्ध अरुण गवळीच्या अटकेच्या विरोधात भर रस्त्यावर उपोषण करणारा खासदार अशीही त्यांची ओळख झाली होती. आता लोकसभेसाठी शिवसेनेकडून उमेदवारीची शक्यता मावळताच ‘कृष्णकुंज’ गाठून राज ठाकरे यांच्याशी गप्पा मारण्यासाठी रावले यांना नेमका हाच मुहूर्त मिळावा, यावर विश्वास ठेवणे हे ‘राजकीय भाबडेपण’ ठरेल. पण या भेटीनंतरही रावले यांचा बाळासाहेब आणि उद्धव निष्ठेचा जप सुरूच होता. कदाचित, राज-रावले भेटीची चर्चा सुरू असतानाच मनोहरपंतांच्या माफीनाम्यातील ‘शिवसेनेत निष्ठेला महत्त्व आहे’ या दाव्याचा आधार त्यांनी घेतला असावा. पण केवळ निष्ठेचा ‘उच्चार’ करून न थांबता, ती कृतीतून दाखविण्याची संधीच त्यांनी साधली. बाळासाहेबांनी बोट वर करताच तो आदेश समजून, मागचापुढचा विचारही न करता रस्त्यावर उतरणाऱ्यांच्या कट्टर निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये रावले हे अग्रणी सैनिक होते. रक्तात भिनलेली ती निष्ठा आता त्यांची सवय होऊन गेली असावी. मनोहर जोशींनी माफीनामा दिला, त्याच दिवशी उद्धव ठाकरेंनी दिलेला आदेश रावले यांनी निष्ठेने पाळला. आपले नेतृत्व मान्य नाही त्यांनी खुशाल पक्ष सोडून द्यावा, या ‘आदेशा’चे निष्ठेच्या जुन्या सवयीने पालन करण्यासाठी रावले सरसावले, पण शिवसेनेने त्यांना ती संधीही दिलीच नाही. पक्षप्रमुखांचा आदेश पाळणे, एवढेच जाणणाऱ्या रावले यांची तशी तयारी सुरू असतानाच, शिवसेनेनेच त्यांची हकालपट्टी केली. त्यांची ही निष्ठा आता कुणाच्या चरणी दाखल होणार, हे निवडणुकीच्या मैदानातून स्पष्ट होईल.