scorecardresearch

अग्रलेख : चक्रधर व्हावे लागेल..

राजकारण हा अहोरात्र सुरू असलेला खेळ आहे. त्यात हातावर हात ठेवून नुसते बसून राहणारे नामशेष होतात.

अग्रलेख : चक्रधर व्हावे लागेल..

इतके फटके खाल्ल्यानंतरही सोनिया गांधींच्याच हाती पक्षाची सूत्रे राहणार, हा त्या पक्षाचा प्रश्न! पण पक्षप्रमुखांनी जे करायला हवे ते काँग्रेस नेतृत्व करताना दिसत नाही..

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी वा त्यांची अपत्ये राहुल- प्रियांका यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले नाहीत ते बरे झाले. पाच राज्यांतील दारुण पराभवानंतर पक्ष कार्यकारिणीच्या विशेष बैठकीत हे तिघे राजीनामे देणार असल्याचे वृत्त प्रसारित झाले होते. काँग्रेसच्या वतीने त्याचा तातडीने इन्कार केला गेला आणि या बैठकीत हे तिघे आपापल्या पदांवरून पायउतार होत नसल्याचे स्पष्ट झाले. यातील सोनिया आणि प्रियांका या काही पदांवर आहेत. पण राहुल गांधी यांचे तसे नाही. त्यांच्याकडे कसलेच पद नाही. त्यामुळे ते कोणत्या पदावरून पायउतार होणार होते याबाबत जरा गोंधळच होता. पण तो आणखी वाढला नाही. हे बरे झाले असे अशासाठी म्हणायचे कारण हे सर्व खरोखरच पदत्याग करते तर देशभरातील उरल्या-सुरल्या काँग्रेसजनांकडून अश्रूंचे पाट वाहू लागले असते आणि या सर्व मंडळींकडून साश्रू वगैरे नयनांनी सोनियांच्या नावे ‘आम्हास सोडून जाऊ नका’ असा टाहो फोडला गेला असता. हे नाटय़ टळले. याचा अर्थ या काँग्रेसजनांस सोनिया यांच्याविषयी अतीव प्रेम आहे, असे नाही. तरीही या सर्वाकडून सोनिया यांस थांबवण्याचा आग्रह केला जातो.

याचे कारण दुसरे नेतृत्व विकसित झाले नाही, हे आहे. जे होते त्यांचे इंदिरा गांधी यांच्यापासून पुढे खच्चीकरण केले गेले आणि तरीही जे टिकून होते ते सोनिया यांच्या दुर्लक्षामुळे आणि म्हणून राहुल गांधी यांच्या अनास्थेमुळे पक्षत्याग करते झाले. हिंमत बिस्व सर्मा, ज्योतिरादित्य शिंदे, जितिन प्रसाद आदी नेत्यांची अत्यंत आश्वासक फळी काँग्रेसमध्ये होती. सत्ता गेल्यावरही होती. तथापि यांच्या हाताला काही काम नाही आणि सत्ता नसल्याने दाम दुरापास्त अशा अवस्थेत निराश होत हे सर्व भाजपची भगवी उपरणी आनंदाने मिरवू लागले. याचा अर्थ या सर्वास भाजपचे भरते आले असाही अजिबात नाही. पण निष्क्रिय होत गेलेल्या काँग्रेसमध्ये ऐन उमेदीचा काळ वाया घालवण्यापेक्षा काही तरी कर्तृत्व दाखवण्याची संधी असलेल्या भाजपत जाणे त्यांनी पत्करले. तसे होणे नैसर्गिक. उद्या सचिन पायलटही त्याच वाटेने निघाल्यास आश्चर्य नाही. राजकारण हा अहोरात्र सुरू असलेला खेळ आहे. त्यात हातावर हात ठेवून नुसते बसून राहणारे नामशेष होतात. विरोधी कक्षांत बसावे लागले तरी हरकत नाही. पण राजकीय कुंड धगधगते ठेवण्यासाठी काही ना काही करत राहाणे आवश्यक असते. काँग्रेसने हे सर्व सोडले. स्वपक्षाची सत्ता असताना सामाजिक प्रश्नांवर भूमिका घेत स्वत:च्याच पक्षाचे विधेयक फाडणारे राहुल गांधी सत्ता गेल्यावर मात्र शांत होत गेले. म्हणजे जेव्हा राजकारणात सळसळ आवश्यक तेव्हाच त्यांचे निखारे विझले. अशा वेळी इतके सर्व सोडून गेले हे आश्चर्य नाही.

त्या वेळी खरे तर सोनिया यांनी सक्रिय होत पक्षाची सूत्रे स्वत:हाती घेणे गरजेचे होते. आपल्या सुपुत्राच्या दुर्लक्षामुळे एकापेक्षा एक नेते सोडून जात असतील तर त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करणे आणि पक्षात आपण अजून सक्रिय आहोत हे दाखवून देणे हे सोनिया गांधी यांचे कर्तव्य होते. ते त्यांनी पार पाडले नाही. प्रकृती अस्वास्थ्य हे कदाचित यामागील कारण असेल. ते असेलही. पण त्यांनी तसे न केल्याने पक्ष नेतृत्वहीन, दिशाहीन आणि म्हणून कृतीहीन दिसू लागला. कोण कुठला बारा पक्षांचे नाही तरी दोन-तीन पक्षांचे पाणी प्यायलेला नवज्योतसिंग सिद्धू वा अन्य राज्यातील अन्य कोणी असा सोम्यागोम्या! अशांनी या अंदाधुंदीचा फायदा उठवत कुडमुडे राजकारण सुरू केले आणि नेतृत्वशून्य काँग्रेस त्यामागे वाहत गेला. यातून उभे राहिलेले चित्र असे होते : सोनिया वा राहुल वा प्रियांका यांना पक्षाचे काहीही बरेवाईट झाले तरी फिकीर नाही. तेव्हा प्रश्न आहे तो आपला असे अनेकांस वाटू लागले आणि ते पक्ष सोडून जाऊ लागले. इतके फटके खाल्ल्यानंतर सोनिया गांधी यांच्या हाती पक्षाची सूत्रे राहणार असतील तर तो त्या पक्षाचा प्रश्न आहे हे खरे. इतरांनी त्या पक्षास कोणाकडे नेतृत्व द्यावे वगैरे सल्ला देण्याचे कारण नाही. तरी तो दिला जातो याचे कारण राजकारण्यांनी, त्यातही पक्षप्रमुखांनी काय करायला हवे ते काँग्रेस नेतृत्व करताना दिसत नाही, म्हणून. समोर दिवसाचे २४ तास आणि वर्षांचे सर्व दिवस पूर्णवेळ राजकारण करणारे, त्यासाठी कष्ट घेणारे भाजप नेतृत्व असताना काँग्रेस नेतृत्वाची निष्क्रियता ठसठशीतपणे अधोरेखित होत गेली. त्यातूनच ‘पण समोर आहेच कोण’ हे कथाबीज रोवले गेले आणि नंतर ते वास्तवात आले.

हे झाले संघटनात्मक पातळीवरील वस्तुस्थितीचे विवेचन. त्याचा उत्तरार्ध वैचारिक गोंधळाचाही आहे. काँग्रेसचे अल्पसंख्याक लांगूलचालन हे भाजपच्या प्रसारामागील महत्त्वाचे कारण आहे हे नाकारता येणारे नाही. बरे या लांगूलचालनातून अल्पसंख्याकांच्या हाती काही भरीव पडले असते तरीही ते त्यांच्यासाठी बरे झाले असते. पण तेही नाही. म्हणजे नुसतेच चुचकारणे. प्रत्यक्षात त्यांच्या पदरात काहीच फारसे नाही. याचा नेमका फायदा भाजपने उचलला. म्हणून काँग्रेसच्या काळात अल्पसंख्याकवादाच्या दिशेने गेलेला आपला राजकीय लंबक आता बहुसंख्याकवादाकडे झुकलेला दिसतो. अल्पसंख्याकवादाने आपल्या हाती काहीही पडले नाही हे त्या वर्गास जसे कळले तसेच मशीद पाडणे आदी आनंदाव्यतिरिक्त आपल्याही हाती काही भरीव नाही, हे बहुसंख्याकास कळेलच कळेल. वाढती महागाई, बेरोजगारी, निवृत्तांसाठी आटते उत्पन्न आदी मुद्दे हा भावनेचा बहर ओसरला की टोचू लागतील.

या टोच प्रक्रियेची गती सत्ताधीशांस सक्षम पर्याय उभा ठाकल्यास वाढते. पंजाबात ‘आम आदमी पक्षा’चे यश किंवा महाराष्ट्रात काँग्रेसची पोकळी भरून काढण्याचा दीर्घाक रचणारी राष्ट्रवादी काँग्रेस ही याची ताजी उदाहरणे. पण काँग्रेसचे हे असे झाले कारण एके काळी नेतृत्वक्षम नेत्यांची फळीच्या फळी पदरी असलेला काँग्रेस उत्तरोत्तर निश्चेष्ट होत गेला. त्या पक्षात जीव ओतणे हे सोनिया गांधी यांस प्रथम करावे लागेल. पक्ष, नेतृत्व आणि त्याची यंत्रणा तेजतर्रार असेल तर विचारधारा हा मुद्दा आपल्याकडे निर्णायक ठरत नाही. हे वास्तव कटू असले तरी दुर्दैवाने खरे आहे. म्हणजे भाजपशी स्पर्धा करण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी सोवळे-जानवे मिरवत तीर्थाटने करण्याची गरज नाही. जी आपली विचारधारा आहे ती प्रामाणिकपणे राबवणे आणि ती राबवणाऱ्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची फळी लोकांसमोर उभी राहाणे महत्त्वाचे. हे एका रात्रीत अर्थातच होणारे नाही. पण तसे करायचे असेल तर त्याची सुरुवात तातडीने करायला हवी. त्या प्रयत्नांचा भाग म्हणून सोनिया गांधी यांनी नुसते नामधारी नेतृत्व करू नये. इतिहासातील मोठेपणा सोडत अन्य सर्व बिगर-भाजप आणि बिगर-काँग्रेस पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू करावा. तसे करण्यात राहुल-प्रियांका यांची आडकाठी असेल तर त्यांना यात दूर ठेवावे. आपल्या देशात नेता हा नेता ‘वाटावा’ही लागतो, हे सोनियांस एव्हाना लक्षात आले असेल. चारचाकी मोटार चालवायची तर ‘चक्रधर’ व्हावे लागते. मागील रांगेत बसून मोटार चालवता येत नाही. तिथे बसायचे असेल तर मग निदान आराम करावा आणि चालक नेईल तिकडे जावे. मोटार सुरू आहे आणि चक्रधर नाही ही अवस्था कपाळमोक्षाची हमी देणारी. काँग्रेस तेच अनुभवत आहे.

मराठीतील सर्व विचारमंच ( Sampadkiya ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-03-2022 at 02:52 IST