scorecardresearch

अग्रलेख : तरिही वसंत फुलतो..

शालिवाहन संवत्सराच्या या पहिल्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा होणारा गुढीपाडव्याचा हा सण दोन वर्षांच्या खंडानंतर पुन्हा एकदा आपले जगणे सुकर होण्याची आशा दाखवतो आहे.

अग्रलेख : तरिही वसंत फुलतो..

वसंत ऋतूमधील तप्त झळांमध्येही शीतलतेचा झरा शोधण्याचे आपले प्रयत्न आयुष्यातील नावीन्याच्या ध्यासाचा अविभाज्य भाग असतात.

शालिवाहन संवत्सराच्या या पहिल्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा होणारा गुढीपाडव्याचा हा सण दोन वर्षांच्या खंडानंतर पुन्हा एकदा आपले जगणे सुकर होण्याची आशा दाखवतो आहे.

ग्रीष्मानं तापलेल्या पृथ्वीला नवसर्जनाची चाहूल लागणारा ऋतू वसंत. त्याच ऋतुकाळात येणाऱ्या नववर्षांच्या स्वागतालाही सप्तरंगांच्या इंद्रधनुष्याची झालर लाभलेली. त्या तेजाळ सूर्याच्या धाकात राहूनही येणाऱ्या वर्षांची ओढ कमी तर होतच नाही, उलट त्याकडे ओढाळ मनाने डोळे लागलेले. गेली दोन वर्षे नववर्षांचे स्वागत करावे की नाही, अशा मानसिकतेत गेली. करोनाच्या पहिल्या लाटेत शुष्क झालेली मने उभारी घेण्याच्याही मन:स्थितीत नव्हती. दुसरी लाटही त्या कराल काळाची भयाण जाणीव करून देणारी ठरली. त्या दोनही वर्षांत तमाच्या अंधारात नवी पालवीही कोमेजून गेलेली आणि आता, यंदा मात्र ‘तमाच्या तळाशी दिवे लागले’ अशी अवस्था झालेली. शंकर रामाणींच्या कवितेत ही सारी अवस्था अशी नेमकी टिपलेली..

उभ्या रोमरोमांतुनी चैत्रवाटा,

कुणी देहयात्रेत या गुंतले,

आरक्त त्याच्या कृपेच्या कडा अन्

उषासूक्त ओठांत ओथंबले

नववर्षांच्या स्वागताला आसुसलेल्या मराठी मनांना आजच्या गुढीपाडव्याला नवोन्मेषी कल्पनांचा बहर न येता तरच नवल. ३१ डिसेंबरच्या रात्री कितीही धुंद होऊन, सरत्या वर्षांला निरोप देत नव्या वर्षांचे मनसुबे रचत असलो, तरी आपल्या मनाच्या कोपऱ्यात चैत्राचा प्रारंभ रुंजी घालतच असतो. चैत्राला आपल्या भारतीय संस्कृतीत असलेले महत्त्व निसर्गसान्निध्याचे. चैत्रपालवीची ही ओढ जशी नैसर्गिक तशीच उमेद वाढवणारी. जगण्याच्या प्रत्येक पायरीवर क्वचित सापडणाऱ्या आनंदाच्या मोत्यांची माळ करून दु:खाला दूर करण्याची मानवाची प्रवृत्तीही त्यामुळेच उभारी देणारी.

सण साजरे करणे हा याच कल्पनेचा आविष्कार. प्रत्येकामध्ये असलेल्या प्रतिभेला साद घालणारा निसर्ग जेवढा आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनत जातो, तेवढे आपण त्यामध्ये गुंतत जातो. गुढीपाडव्याला गुढी उभारून आनंद साजरा करण्याच्या रिवाजाच्याही पलीकडे नेणारा हा आनंद जगण्याची ऊर्मी वाढवणारा आणि म्हणूनच निसर्गचक्राशी घट्ट विणलेला. नव्या वर्षांला सामोरे जाताना ही अशी झपूर्झा अवस्था होते आणि त्यामुळेच कवी केशवसुतांनाही त्याचे वर्णन करताना सुचणारे, ‘हर्ष खेद ते मावळले, हास्य निमाले, अश्रू पळाले, कण्टकशल्ये बोथटली, मखमालीची लव उठली’.. असे शब्द असे सहज हृदयापर्यंत जाऊन पोहोचतात. यापुढील काळ तिमिरातून तेजाकडे नेणारा असेल, असा विश्वास मनी बाळगत आपल्या जगण्याला नवे अर्थ देण्याचा प्रयत्न सुरू करण्याचा हा नववर्षांचा पहिला दिवस. सारा आसमंत कमालीच्या काळजीने व्यापलेला असताना आणि जगण्याची क्षणभंगुरता क्षणोक्षणी उभी ठाकलेली असताना हा दिवस पुन्हा एकदा निरभ्र आकाश घेऊन येतो आणि नव्या पालवीची, सर्जनाच्या उत्कट आणि अभिजात आविष्काराची वाट पाहत जिवंत राहण्याला अर्थाची अनेकपदरी झुंबरे झुलू लागतात. माणसाच्या मनाचा थांग त्यामुळेच विस्तीर्ण होतो, नवचैतन्याचा बहरही फुलू लागतो.

युद्धाची झळ थेट पोहोचत नसली, तरी संहाराच्या या वेदनांनी समस्त मानवजातीला वेढून तर टाकलेलेच आहे. नव्या कोंबाची वाट पाहत असलेल्या प्रत्येकाच्या अस्तित्वालाच वेढून टाकणारे हे सारे भय शक्य तेवढय़ा लवकर दूर व्हावे आणि पुन्हा एकदा उत्फुल्ल होऊन जगण्याची ऊर्मी यावी, हीच तर आजच्या दिवसाची आशा. करोना काळात जिवलगांचा झालेला मृत्यू जिव्हारी लागलेला आणि जगण्यावरचा विश्वासच संपत चाललेला. अशाही परिस्थितीत आपण जगण्याचे बळ गोळा केले. त्या वेदनेला दूर सारण्याचा मनोमन प्रयत्न करत नव्याने पुन्हा आयुष्य सावरायचे ठरवले. आजचा गुढीपाडवा हा त्या अर्थाने या प्रयत्नाचा पहिला दिवस. नव्या वर्षांच्या पहिल्या दिवसाचे स्वागत खरेतर मनातल्या मनांत करायला हवे. वसंत ऋतूमधील तप्त झळांमध्येही शीतलतेचा झरा शोधण्याचे आपले प्रयत्न आयुष्यातील नावीन्याच्या ध्यासाचा अविभाज्य भाग असतात. सतत नवे काही करण्याचा नाद ही माणसाच्या सर्जनाची खरीखुरी खूण. पृथ्वीवरल्या अन्य प्राण्यांमध्ये जिवंत राहण्याची धडपड आणि माणसाच्या मनात नावीन्याची ओढ. हा फरक निसर्गाने उलगडून दाखवला खरा, पण आपण तो सर्वार्थाने आकळून मात्र घेतला नाही. भावना आणि वेदनांच्या कल्लोळात ही नावीन्याची ओढ कमी होता कामा नये. जिवंत राहणे आणि समृद्ध जगणे यातला फरक लक्षात घेत घेत, प्रत्येक नव्या आव्हानाला तोंड देत, आपण सगळय़ांनी नववर्षांला कवेत घ्यायला हवे. वसंतातल्या काहिलीतही नवे बीज शोधायला हवे. कवी सुधीर मोघे यांच्या प्रतिभेला नेमकी हीच साद येते आणि त्याचीच कविता होते..

ऋतू कोवळा अखेरी तळत्या उन्हात जळतो

तरिही फिरून बीज रुजते पुन्हा नव्याने

तरिही फिरून श्वास रचती सुरेल गाणे

तरिही फिरून अंत.. उगमाकडेच वळतो

तरिही वसंत फुलतो..

वसंताच्या आगमनातच हे नवसर्जनाचे बीज सापडते. वृक्ष निष्पर्ण होताना होणारी पाचोळय़ाची सळसळ आणि त्याच ग्रीष्मानंतर येणारे थंडगार शिंतोडे, त्यातून कोंबाला येणारी पालवी आणि त्यानंतर निसर्गाच्या नवनिर्मितीचा सुरू होणारा अद्भुतरम्य खेळाचे हे चक्रच तर माणसाच्या जीवनातले कोडे. ते सोडवता सोडवता नवेपणाचा येणारा हव्यास हाच तर त्याचा ध्यास. गुढीपाडव्याचे स्वागत करताना प्रत्येकाच्या मनांत भविष्यातील आनंदी क्षणांचे काहूर असते. त्यामुळेच तर हा सण जगण्याला नवा अर्थ प्राप्त करून देणारा. कवितेतला शब्द असो, की नि:शब्द शांततेतील अर्थगर्भता. ते सर्जनाचंच गाणे असते. निसर्गाच्या या भावोत्कट उत्सवाचीच तर आपण सारे वाट पाहत असतो. त्यासाठी रसिक होण्याची आपली तयारी असते. म्हणूनच ते आपल्या सर्वाचे सुखनिधान होते. नव्या वर्षांत प्रवेश करताना, भूत आणि वर्तमान विसरता यायला हवा. त्यासाठी काळवंडलेपणातून बाहेर पडता यायला हवे. भविष्यातील विलोभनीय सुंदरतेला साद घालता यायला हवी. तिला प्रतिसाद मिळेल, यावर विश्वासही ठेवायला हवा. मनाने उभारी धरली, तर जगण्यातल्या सौंदर्याची अपूर्वाई सहज ध्यानी येते. प्रश्न आहे तो आपल्या कृतीचा.

शालिवाहन संवत्सराच्या या पहिल्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा होणारा गुढीपाडव्याचा हा सण दोन वर्षांच्या खंडानंतर पुन्हा एकदा आपले जगणे सुकर होण्याची आशा दाखवतो आहे. दु:ख, क्लेश, वेदना, भयंकराची भीती, जिव्हारी लागणारी ठसठस संपून जाईल आणि लसलसणारे अंकुर आभाळाची नवलाई समजावून देईल, अशी अपेक्षा करायला हवी. जगण्याचे सार्थक व्हावे अशी आंतरिक तळमळ असायला हवी. काळोखातून प्रकाशकिरणांच्या प्रभावळीकडे जाताना मन स्वच्छ हवं, त्यासाठी मनातली किल्मिषे आणि जळमटे साफ करायला हवीत. सतत ताणाखाली असलेल्या प्रत्येकाच्या आयुष्यात जिवंतपणालाही संपन्नतेचे अस्तर लाभावे, हीच तर कामना या आनंदसणाच्या दिवशी करायला हवी. बा. सी. मर्ढेकरांना हे व्यक्त करण्यासाठी जे सुचते, ती आपल्या सगळय़ांच्या जगण्याची ओवी असते.

भंगु दे काठिण्य माझे

आम्लं जाऊ दे मनीचे

येऊ दे वाणीत माझ्या

सूर तुझ्या आवडीचे

मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-04-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या