माणसासह अन्य अनेक सजीवांचे मत्स्यकुळाशी मोठय़ा प्रमाणात साम्य आढळते, असे वैज्ञानिक कशाच्या बळावर सांगतात? 

प्रदीप रावत

जमिनीच्या थरांत गढलेली आणि गाडली गेलेली जीवसृष्टीची पोथी मोठी श्रीमंत आहे. त्यात जीवसृष्टीमध्ये घडलेल्या कित्येक पैलूंची गाथा गोवली आहे. सहसा जीव म्हटले की आपल्या डोळय़ासमोर कुणी ना कुणी परिचित प्राणी येतो. त्याला डोळे, कान, पाय, शेपटी असे निरनिराळे अवयव असतात. या अतिपरिचित चित्रामुळे उभयचर जन्माला आले ते या वैशिष्टय़पूर्ण कामे करणाऱ्या अवयवांसहितच अशी आपली भाबडी धारणा असते. उत्क्रांती विज्ञानामध्ये या अवयवांचा उदय (आणि अस्तदेखील) कधी, कसा झाला, त्यांच्यामध्ये काय बदल घडले, या बदलांच्या प्रभावाने पुढच्या काळातील बदलांचे स्वरूप कसे घडत गेले हे महत्त्वाचे पैलू गणले जातात. जीवाश्मांच्या वहीत जलचर पक्षी ते भूचर, त्यामधले काही भूचर पुनश्च जलचर झाले यांसारखी स्थित्यंतरे दिसतात. त्यांचे कालखंड अदमासता येतात. त्याच धर्तीचा अवयवांच्या उदयास्तांचा आणि बदलांबद्दलचादेखील मागोवा नोंदलेला आढळतो.  

पृथ्वीतलावरचे काही भाग हा इतिहास जपण्याचे वरदान लाभल्यागत आहेत. उदा. आक्र्टिक भूभागामध्ये बर्फाच्या उदंड आवरणाखाली गाडल्या गेलेल्या समुद्री जीवाश्मांचे विपुल थर आहेत. असे अन्यत्र सापडणे कठीण. कुठे, कोणते अश्म गवसणार याचा खडकांच्या प्रकाराशी घनिष्ठ संबंध असतो. ग्रीनलंडसारख्या प्रदेशात प्राचीन सागरी जीवांचे अवशेष आणि जीवाश्म विपुल मिळतात. अगदी छोटय़ा मोठय़ा जीवांपासून त्यांच्या अवयवांचे थर राशीने मिळतात. जसजसे वरचे थर बघत जावे तसतसे बदलत्या आणि संख्येने वाढत्या अवयव संख्येचे प्राणी अश्मगत स्थितीमध्ये आढळतात. या थरांचे हे वैशिष्टय़च आहे. इतके की वैज्ञानिक त्यांची वर्णनपर विभागणीदेखील त्याच अनुषंगाने करतात. समजुतीसाठी ढोबळमानाने अवयवानुसार क्रमाचा उलगडता पट सोबतच्या चित्र क्र. १ मध्ये रेखाटला आहे. अगदी तळाशी सर्वात जुनाट थरामध्ये मत्स्य आहे. दोन अक्षांसह (साक्षी) मस्तक एवढेच भरीव अवयव या अवस्थेत आहे. त्यानंतरच्या वरच्या थरात साक्षी मस्तकाखेरीज अन्य म्हणजे पायांसारखे अवयव आहेत (सपाद). त्या वरच्या थरात मस्तक चतुष्पाद छाती आणि केस असा संच दिसतो. नंतरच्या कालखंडात सपाद मस्तिष्क छाती, केस आणि द्विपाद दिसतो. जीवाश्म आणि खडकांचे वय यांची अतूट सांगड आहे. जरा बारकाईने पाहिले तर काय आढळते? साधारणत: ३८० दशलक्ष वर्षांपूर्वी ते ३६५ दशलक्ष वर्षांपूर्वीचा काळ लक्षणीय आहे. या कालखंडातला तुलनेने कमी वयाचा काळ म्हणजे सुमारे ३६० दशलक्ष वर्षांपूर्वीच्या काळात अधिक विविध प्राणी आढळतात. केंब्रिज विद्यापीठातील जेनी क्लॅक आणि सहकाऱ्यांना ग्रीनलँडमध्ये ३६५ द.ल.व.पूर्वीचे उभयचर मिळाले. परंतु ३८५ दशलक्ष वर्षांपूर्वीच्या थरात तसे लाभत नाहीत. फक्त मत्स्यसदृश भासणारे जीव आढळतात. त्यांना शंकूवजा मस्तिष्क आहे, कल्ले आहेत, परंतु मान म्हणावी असा अवयव नाही. अशा जीवाश्मांचा शोध घेत असताना  तिक्तालिक नावाचा मत्स्यसदृश प्राणी आढळला. हा प्राणी जलचर मासा आणि भूचर यामधली संक्रमण अवस्था होती. हा संक्रमणग्रस्त मत्स्यविशेष आहे. कारण त्याच्यामध्ये उद्भवत गेलेले बदल पुढच्या अनेक संक्रमणांची चाहूलच नाही तर पायंडा म्हणावे इतके समरूप आहेत.

वेगवेगळय़ा कालखंडांतले बदलत आणि उत्क्रांत होत गेलेले जीव! त्यांची अशी अवयवगणिक तुलना केली तर काय आढळते? डार्विनच्याच काळामध्ये मानवी सांगाडय़ांचे मोठय़ा बारकाईने अध्ययन केले गेले होते. त्या काळचा मोठा अधिकारी, अग्रगण्य शरीररचनाशास्त्रज्ञ म्हणजे रॉबर्ट ओवेन. त्याने अनेक पशुपक्ष्यांच्या अवयवांचे तुलनात्मक अध्ययन केले होते. त्याच्या निरीक्षणातून उपजलेली लक्षणीय गोष्ट म्हणजे ‘माशांचे कल्ले, चतुष्पाद प्राण्यांचे पाय व पंजे आणि माकडाचे व माणसाचे हात आणि पाय यांच्या रचनेमध्ये विलक्षण साम्य आहे.’ उदा. माणसाचे हात आणि पाय यांची ठेवण पाहा. खांद्यापासून दंडाचे लांबट हाड असते. त्याला लॅटिनमध्ये हुमेरुस म्हणतात. तसेच मांडीचे लांबट हाड (फेमुरुस) असते. या मोठय़ा लांबट हाडाला सांधलेली दोन हाडे असतात. त्यांच्या सांधणीला गोलाकार खोबणी असते आणि हाडाचे गोल चेंडूवजा टोक त्यात फिरते. अशीच थोडय़ाफार बदलाची रचना दंडापुढच्या जोडगोळी हाडांना असते. अशी ठेवण नसती तर आपल्याला हात वळविणे, फिरवणे अशा हालचाली करता आल्या नसत्या. परंतु विशेष लक्षणीय गोष्ट म्हणजे या ठेवणीचा पहिला अवतार झाला तो तिक्तालिक मत्स्यरूपामध्ये! साम्य फक्त इथे थांबत नाही. शरीररचनेच्या अनेक घडणींमध्ये हा वारसा जारी राहिलेला दिसतो. दुसरा अजून एक दुवा बघू. आपल्या शरीरातला सर्वात कठीण कणखर भाग म्हणजे हाडे. त्याचेदेखील भिन्न अवतार आणि प्रकार शरीरात आहेत. हाडांचे महत्त्व सहजी उमगते, पण दात नावाचा त्याचा भाऊबंद सहजी ध्यानात येत नाही. कुणाला सहजी पाच महत्त्वाचे अवयव सांगा म्हटले तर त्यामध्ये दातांचा उल्लेख वा गणना होण्याचा संभव अगदी कमी आढळतो! प्राण्यांमध्ये आढळणारे दात अतोनात महत्त्वाचे आहेत. दात हा अवयव क्वचितच मोलाचा वाटतो. पण प्राण्याचे जगणे आणि अन्नग्रहण दातांवर अवलंबून आहे. अन्न कुरतडणे, तोडणे, चावून बारीक करणे या क्रिया घडल्या नाहीत तर प्राणिसृष्टीवर मोठे संकट येईल. हा अवयव घडण्यासाठी लागणारे हायड्रॉक्सीअपेटाईट नावाचे विशेष प्रकारचे द्रव्य असते. या द्रवावर आधारलेला पुरातन अवयव कोणता? अगदी प्रारंभीच्या जलचरात कवटीवजा आढळणारे जे नाकाड होते तिथे याचा मुळारंभ आढळतो. बरीच वर्षे हे गूढ होते! तो अगदी प्राचीन जीवाश्म म्हणून गणला जाणारा कोनोडोन्टस् या नावाने ओळखला जाणारा प्रकार होता. ख्रिश्चन पँडर या रशियन वैज्ञानिकाला १८३० साली याचा मूळ मत्स्याकार जीवाश्म गवसला. हे कोनोडोन्टस् वनस्पती होते की प्राणी होते की खनिजरूप होते याबद्दल एकवाक्यता नव्हती. बऱ्याच जणांना ते शंखिशपल्याचे उकललेले तुकडे किंवा स्पाँज किंवा मणक्याचे तुकडे भासत होते. अखेरीस एडिनबर्ग विद्यापीठातल्या प्राध्यापकाला दगडात लॅम्प्रे नामक बांडगुळी जीवासारखा दिसणारा खडकाचा कपचा मिळाला. त्यानंतर अनेक लॅम्प्रे सापडले. हे लॅम्प्रे म्हणजे जबडाविहीन प्रकारचे मासे. या जीवांचे अपवादात्मक म्हणावे असे वैशिष्टय़ त्यांच्या तोंडामध्ये कोनोडोन्टस् एखाद्या माळेसारखे असायचे. त्यानंतर जवळपास बरोबरीने ऑस्ट्राकोडर्मस नावाचे मत्स्य सापडले. त्यांचा तोंडाकडचा पुढचा कपाळी भाग कोनोडोन्टस्ने बनला होता. दातांचे हे रहस्य उलगडले आणि मनुष्यासह अनेक प्राण्यांमध्ये आढळणारा आणि माशांपासून वारसा घेतलेला आणखी एक मोलाचा दुवा गवसला. दातांची शरीरात होणारी उपज वाढ आणि घडण लक्षात घेतली तर ही मत्स्यवारशाची यादी आणखी लांबते. दाताची घडण उपजते ती कापडवजा तंतुमय मऊशार पदार्थ ऊर्फ धातूपासून (इंग्रजीत टिश्यू). अशा पदार्थाचे दोन थर एकमेकांजवळ सरकत येतात. त्यांच्या पेशींची सरमिसळ घडते. थरांचा आकार आणि आकारमान बदलते. बाहेरच्या बाजूला लुकणवजा पदार्थ स्रवू लागतो आणि थर होऊन जमा होतो (एनॅमल). जवळपास सर्व दंतवर्गीयांमध्ये ही घडणीची रीत आढळते. पण ही घडणीची ठेवण फक्त दातांपुरती मर्यादित नाही. अशीच ठेवण असणारी घडण अनेक ग्रंथी आणि पिसे यांनाही लागू आहे.

 घडण आणि ठेवणीमधले साम्य, कवटीचे आकार, त्यात वसलेल्या मेंदू आणि अन्य संलग्न भागांची अंतर्गत जोडणी यांच्या रचनादेखील मत्स्य वर्गाच्या मूळ ठेवणीचे मुरडते रूप आहे. ही झाली शारीरिक रचनेमध्ये बदललेली पण वारसा म्हणावा असे साम्य राखणारी वैशिष्टय़े. अधिक आधुनिक आणि प्रगत जनुकरचनेचा विचार केला तरी मनुष्यासह अन्य जीवांचे मत्स्यकुळाशी जवळपास ७० ते ७५ टक्के साम्य आढळते. अवतार परंपरेत मत्स्याला पहिला अवतार मानणाऱ्यांना याची जाण होती का नव्हती कुणास ठाऊक! उत्क्रांती विज्ञानाने आपल्या अनेक अनुमान पद्धतीने हा आपला पूर्वज असावा असा कयास केला आणि क्रमाक्रमाने अनेक पैलूंमध्ये स्वबळाने शाबीत केला हे नक्की! या अर्थाने आपल्या अंतरी अजून एक मत्स्यरूप वावरते आहे!

pradiprawat55@gmail.com