scorecardresearch

मोठेपणाच्या पाऊलखुणा

चांगलं पुस्तक वाचून अस्वस्थता येतेच. इस्रायल या मुंबईपेक्षाही छोटय़ा असलेल्या देशाचं मोठेपण सांगणारं हे पुस्तक वाचून आपल्या देशाविषयीची अस्वस्थता दाटून येते आणि इस्रायल इतका पुढे कसा आणि का पोचला, याने स्तिमित होतो.

चांगलं पुस्तक वाचून अस्वस्थता येतेच. इस्रायल या मुंबईपेक्षाही छोटय़ा असलेल्या देशाचं मोठेपण सांगणारं हे पुस्तक वाचून आपल्या देशाविषयीची अस्वस्थता दाटून येते आणि इस्रायल इतका पुढे कसा आणि का पोचला, याने स्तिमित होतो.
देशाचं मोठेपण कशाकशावर ठरतं? त्यासाठी किमान घटक काय लागतात? भौगोलिक आकार? लोकसंख्या? लष्करी ताकद? सक्षम अर्थव्यवस्था? की हे सर्वच? यातले काही घटक असले आणि काही नसले तर एखादा देश मोठा होऊ शकत नाही का? आणि समजा यातले बरेचसे नसले आणि तरीही तो देश मोठय़ा देशांत गणला जात असेल तर ते कशामुळे?
कल्पनाशक्ती, प्रतिभा यांच्या साहय़ानं जगाला सतत काही ना काही नवनवीन देत राहण्याची क्षमता, हे त्याचं उत्तर असेल का?
तो देश इस्रायल असेल तर या प्रश्नाचं उत्तर नक्कीच होकारार्थी असू शकतं. भारताच्या तुलनेत मुंबईइतकाही नसलेला, एका दिवसात या टोकापासून त्या टोकापर्यंत संपवून टाकता येईल असा हा देश जगातल्या बडय़ा देशांत, दखल घेतली जावी अशा सत्तांत कसा गणला जातो?
‘स्टार्ट अप नेशन’ या पुस्तकात या प्रश्नाचं उत्तर सहज सापडतं. ‘स्टार्ट अप नेशन : द स्टोरी ऑफ इस्रायल्स इकॉनॉमिक मिरॅकल’ असं या पुस्तकाचं पूर्ण नाव. डॅन सेनर आणि सॉल सिंगर यांनी ते लिहिलेलं आहे. यातले सेनर हे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयात ज्येष्ठ अधिकारी आहेत. इराकमध्येही त्यांनी काम केलंय. म्हणजे अमेरिकेनं इराकच्या सद्दाम हुसेन याचा पाडाव केल्यानंतर इराकमध्ये स्थानिकांच्या साहय़ानं जे सरकार स्थापन केलं त्याचे ते प्रवक्ते होते. आणि दुसरे सिंगर हे ‘जेरूसलेम पोस्ट’ या इस्रायलमधल्या प्रभावशाली दैनिकाच्या संपादकीय पानाचे संपादक होते. पत्रकार म्हणून ते विख्यात आहेतच. या दोघांनी मिळून शंभरपेक्षाही अधिकांच्या मुलाखती घेतल्या. विषय हाच, की इस्रायलमध्ये नक्की असं काय आहे? आणि असं काही असेल तर कशामुळे ते तयार झालं असेल? त्या पाहणीचा निष्कर्ष म्हणजे हे पुस्तक. गेल्या महिन्यात इस्रायलमध्ये जायचं नक्की झालं तेव्हा या देशाच्या मुंबई दूतावासातला एक मित्र म्हणाला, जाणारच आहेस तिकडे तर हे वाचून जा. वास्तविक ती काही इस्रायलची माझी पहिलीच भेट नव्हती. तो देश म्हणजे नक्की काय, हे माहीत होतंच. पाहिलेलंही होतं. पण जे पाहिलं होतं, पुन्हा याही वेळी नव्यानं अनुभवलं त्याचा अर्थ लावण्यासाठी या पुस्तकाची नक्कीच मदत झाली. देश म्हणून नक्की कोणत्या प्रेरणा त्या मातीत असतात यासाठी हे पुस्तक नक्कीच उपयुक्त आहे. इस्रायल म्हणजे केवळ नुसता क्रूरकडवा राष्ट्रवाद इतकीच जर समज असेल तर त्यांनीही हे पुस्तक वाचायला हवं.
पुस्तकाला अध्यक्ष शिमॉन पेरेस यांची प्रस्तावना आहे. त्यांनी पारंपरिक पद्धतीनं त्याकडे पाहिलंय. म्हणजे इस्रायल या देशाचा जन्म कसा झाला, त्या देशानं कसं परिस्थितीला तोंड दिलं वगैरे. पण त्यातला एक मुद्दा नोंद घ्यावा असा. तो म्हणजे जेव्हा या देशाची निर्मिती झाली तेव्हा जगभरातनं यहुदीधर्मीय या प्रदेशाच्या, आपल्या मायदेशाच्या ओढीनं तिकडे आले. त्यात जसे सर्वसामान्य होते तसेच डॉक्टर, प्राध्यापक, शास्त्रज्ञ, कलाकार असेही बरेच होते. वैराण प्रदेश. हाती साधनसंपत्तीही काही नाही. अशा वेळी एरवी बुद्धिजीवी म्हणवून वावरणाऱ्यांनी कंबर कसली आणि थेट मातीत हात घालून ते सर्व कामाला लागले. हे काम मी कसं करू.. वगैरे शिष्टपणा कोणीही केला नाही. या सगळ्यांच्या बरोबरीने पंतप्रधान बेन गुरियन हेदेखील होते आणि सगळ्यांनी एकत्र घाम गाळला. ‘‘आपल्यात आता जे आहेत, ते आताच्या गरजा भागवण्यासाठी आवश्यक क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत. ते हवेच आहेत. पण त्याहीपेक्षा हवेत ते उद्याच्या गरजा लक्षात घेऊन त्यानुसार जगण्याच्या त्या त्या कलांत वाकबगार होणारे,’’ ही गुरियन यांची दृष्टी होती. योगायोग असा की आपणही त्याच सुमारास.. म्हणजे १९४७ साली स्वतंत्र झालो.. एक वर्षांनं इस्रायल जन्माला आला. आपले पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचंही हेच मत होतं. उद्याचं पाहणारे तज्ज्ञ हवेत.
आता प्रश्न असा की या घडीला आपण कुठे आहोत आणि हा वीतभर लांबीरुंदीचा देश कुठे आहे?
या पुस्तकात अमेरिकेच्या भांडवली बाजारात नोंदल्या गेलेल्या कंपन्यांचा असा सहज उल्लेख आहे. ही चाचणी महत्त्वाची. म्हणजे कंपनीची किती पुण्याई आहे हे जोखायचं असेल तर ती अमेरिकेच्या न्यूयॉर्क वा नॅसडॅक भांडवली बाजारावर कंपनी नोंदवायची. आपल्याकडची पहिली कंपनी तिथे नोंदली गेली ती इन्फोसिस. कधी? तर १९९९ साली. म्हणजे अगदी तशी अलीकडचीच घटना ती. पण त्यानंतर तिथे किती कंपन्या नोंदल्या गेल्यात, याचा काही आपल्याला अंदाज? फक्त ९.. आणि त्यातली एक म्हणजे खड्डय़ात गेलेली सत्यम. म्हणजे तशा आठच. आता इस्रायलसंदर्भात ही संख्या किती आहे? तर ९९. आणि तिथे पहिली इस्रायली कंपनी कधी नोंदली गेली? १९८० साली. आणि तिथपासून आतापर्यंत तब्बल २५० कंपन्यांनी नॅसडॅकच्या भांडवली बाजारातून निधी उभा केलाय. त्यातल्या ९९ वगळता बाकीच्या सर्व बडय़ा कंपन्यांनी विकत घेतल्या वा त्यात त्या विलीन झाल्या. २०१२ साली खुद्द अमेरिकी व चिनी कंपन्या वगळता जगाच्या बाजारात सर्वात जास्त भांडवलनिर्मिती केली ती इस्रायली कंपन्यांनी. हे तसं आपल्याला आपली जागा दाखवून देणारंच की..
हे का आणि कसं जमतं त्या मंडळींना?
या पुस्तकाच्या लेखकद्वयीचा निष्कर्ष असा की इस्रायली उद्यमशीलता वाढण्याची दोन कारणं. एक म्हणजे सक्तीचं लष्करी शिक्षण.
त्यानं काय होतं?
तर लेखकांचं म्हणणं असं की या लष्करी शिक्षणामुळे तरुणपणीच मोठय़ा प्रमाणावर स्वावलंबन येतं, स्वत:वरचा विश्वास वाढतो आणि इतक्या लहान वयात इतकं सहन करायला लागल्यामुळे वा पाहावं लागल्यामुळे व्यवसायाचा धोका जराही वाटत नाही. मुद्दा नक्कीच विचार करण्यासारखा आहे.
परत त्या देशाची लष्करी व्यवस्था आपल्यासारखी नाही. म्हणजे आपल्याकडे लष्करी अधिकारी हाताखालच्यांना अगदी घरची भांडी घासायलाही लावतात. तसं तिथं नाही. शिस्तीच्या नावाखाली उगाच वाटेल तो आचरटपणा नाही. नाही म्हणजे किती नाही? तर आपल्याकडे जसं वरिष्ठ अधिकाऱ्यांना कनिष्ठांमधला चांगला कोण हे ठरवता येतं तसंच तिकडे इस्रायलमध्ये चांगला साहेब कोण हे सैनिकांना निवडायचं असतं. त्यामुळे परस्परांवर नियंत्रण ठेवणारी अशी व्यवस्था त्या देशानं तयार केली आहे. हे छानच. त्यामुळे हाताखालच्यांशी चांगलं वागायची जबाबदारी अधिकाऱ्यांवरही येऊन पडते. या लेखकांचं निरीक्षण असं की गेल्या कित्येक वर्षांत जी काही नवनवीन उत्पादनं, संशोधन इस्रायलमध्ये घडलंय ते या लष्करी कारकिर्दीनंतर.
दुसरं कारणही आपल्यासाठी तितकंच धक्कादायक.
ते म्हणजे स्थलांतर. इस्रायलच्या नागरिकांतली प्रत्येकी दुसरी व्यक्ती ही स्वत: स्थलांतरित आहे किंवा स्थलांतरिताच्या पोटी तरी जन्माला आलेली आहे. लेखकांचं म्हणणं असं की स्थलांतरित हे अधिक पोटतिडकीनं काम करतात. त्यांना स्वत:ला सिद्ध करायचं असतं. त्यामुळे त्यांना अधिक झटावं लागतं. इस्रायलमधल्या संशोधनात या स्थलांतरितांनी जन्माला घातलेल्या कंपन्या प्राधान्याने आहेत.
हे पुस्तक या दोन गृहीतकांभोवती फिरतं. या दोन्हींच्या समर्थनार्थ अनेक दाखले, उदाहरणं पुरेशा प्रमाणात आहेत. किंबहुना या उदाहरणांमुळे पुस्तक अत्यंत वाचनीय झालं आहे. यातली कित्येक उदाहरणं ही अनेक वाचकांच्या माहितीतलीही असतील. पण त्याची इस्रायली मुळं माहिती असतीलच असं नाही. म्हणजे गुगलची शोधप्रक्रिया प्रणाली विकसित करण्यात इस्रायली मुलांचा मोठा वाटा होता हे आपल्याला माहीत नसतं आणि याचाही अंदाज नसतो की इंटरनेटद्वारे पैशाची देवाणघेवाण करणारी संगणकीय आज्ञाप्रणाली जन्माला घातली ती अशाच एका इस्रायली तरुणानं.
काही हिब्रू शब्द वगैरे वापरून लेखकांनी पुस्तकाची वाचनीयता नक्कीच वाढवलीय यात शंका नाही.
पण अडचण ही की पुस्तक वाचून फारच त्रास होतो. आपण कुठेच कसे नाही, नवीन काही कसं घडत नाही.. आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आपण कसे फक्त संगणकप्रशिक्षित कारकूनच जन्माला घालतो.. हे शल्य नाही म्हटलं तरी दाटून येतं हे पुस्तक वाचल्यावर. आणि मग ते महासत्तापद की काय त्याचं आता काय होणार.. हा प्रश्न अस्वस्थ करतो.
तूर्त तरी आपण वाट पाहायची.. या मोठेपणाच्या पाऊलखुणा आपल्या वाळूत कधी उमटतील त्याची..

मराठीतील सर्व बुक-अप! ( Bookup ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Start up nation the story of israels economic miracle

ताज्या बातम्या