जिजामाता उद्यानातून दिल्लीत गेलेला शिवा असो, नाही तर जोतिबाच्या डोंगरावरून कर्नाटकातील पुनर्वसन केंद्रात रवानगी झालेला सुंदर असो, अशा प्राण्यांच्या कपाळावर जन्मत:च उमटलेला गजाआडच्या शिक्षेचा ठपका, माणुसकीनेही आपल्या कपाळावर तितक्याच ठळकपणे मिरवावा इतका दिमाखदार नाही. तरीही तो पुसण्याच्या मानसिकतेपासून माणसं मैलोगणती दूरच आहेत.
खरं तर, ती नेहमीसारखीच एक बातमी होती. एखाद्या वर्तमानपत्रात, आतल्या पानाच्या एखाद्या रकान्यात जागा मिळावी एवढंच तिचं महत्त्व उरलं होतं. बातमीला अशी एखाद्या कोपऱ्यातील, तळाची जागा मिळाली, की तिचं बातमीमूल्य कमी होत गेलं असं मानलं जातं. म्हणजे, त्याचं बातमीमूल्य अस्तित्वात असतानाच, ते घडलं. सिमेंटच्या जंगलाने वेढलेल्या मुंबईच्या मध्यावरील जेमतेम हिरवा पट्टा उरलेल्या जिजामाता उद्यानात वयाच्या ३४व्या वर्षांपर्यंत एकाकी आयुष्य जगणारा एक मूक गेंडा अखेर सक्तीच्या ब्रह्मचर्यावस्थेतच मरण पावला. वयाच्या पाचव्या वर्षी मुंबईच्या सिमेंटी जंगलातील जिजामाता उद्यान नावाच्या एका हिरव्या कोपऱ्यात शिवा नावाचा हा एकशिंगी गेंडा पाहुणा होऊन आला, आणि मुंबईच्या प्राणीवेडय़ा प्रेक्षकांच्या प्रेमाने इथलाच होऊन राहिला. खरं म्हणजे, या गेंडय़ाचं आगमन झालं तेव्हापासून या शहरी गजबजाटात, त्याचा ‘वनवास’ सुरू झाला होता. नागरीकरणामुळे शहरं आणि जंगलं यांच्यातील भौगोलिक सीमारेषा पुसल्या जात असल्या तरी माणसं आणि वन्यजीव यांच्यातील भावनिक अंतर मात्र वाढतच चाललेलं आहे. कदाचित त्यामुळेच, जंगली प्राण्यांची भाषा समजून घेण्याइतकी माणुसकीदेखील माणसाकडे उरलेली नसावी. त्याचाच चटका शिवाच्या आयुष्याला बसला असावा. जंगलातलं स्वैर, स्वतंत्र जगणं कळायच्या आतच माणसांच्या प्राणीवेडापोटी पिंजऱ्याआड होण्याचं नशीब सोबत घेऊनच जन्माला आलेल्या या गेंडय़ाने, आपलं सारं आयुष्य बहुधा कढत-कुढतच काढलं असावं. जंगलात मुक्तपणे जगणाऱ्या गेंडय़ाचं सरासरी आयुर्मान तीस वर्षांचं असतं, असं म्हणतात. जंगलातल्या मुक्त वातावरणातील स्वातंत्र्याचं वारं पीत आपलं आयुष्य उपभोगण्याचं नशीब शिवाच्या वाटय़ाला मात्र आलंच नव्हतं. मुंबईच्या जिजामाता उद्यानातलं त्याचं एकाकीपणही, तसं, उशिराच, म्हणजे, गेंडय़ांच्या जगण्याच्या सरासरी वयाची मर्यादा ओलांडल्यावरच माणसांच्या लक्षात आलं, आणि पैलतीर समोर ठाकलेला असताना त्याच्यासाठी जोडीदारीण शोधण्याच्या हालचाली सुरू झाल्या.  या सक्तीच्या ब्रह्मचर्यातून त्याची सुटका व्हावी, त्याच्या एकाकी आयुष्यात त्याला जोडीदारीण मिळावी आणि या जगात असा जन्म घेतलेले आपणच एकमेव नाही या जाणिवेने त्याचं आयुष्य थोडंफार फुलावं यासाठी काही प्राणिमित्र संघटना पुढे सरसावल्या. त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्यानंतर शिवासाठी जोडीदार शोधण्याची जाग माणसाला आली. पण कदाचित, तोवर त्याच्या जगण्यातील आनंद संपूनही गेला होता. तरीही त्याचं ब्रह्मचर्य संपविण्याच्या अट्टहासापायी, उतारवयाला लागलेल्या शिवाला अखेर दिल्लीच्या प्राणिसंग्रहालयात हलविण्यात आलं, आणि मुंबईकर शिवा दिल्लीकर झाला. दोन जोडीदारिणींचा सहवासही त्याला विरंगुळा देऊ शकला नाही, आणि तो शिवा तेथे रमलाच नाही. अखेर एकाकीपणे कुढत जगणाऱ्या या गेंडय़ाला कर्करोगाने ग्रासलं आणि त्यातच अखेरचा श्वास घेऊन त्याने आपलं एकाकी आयुष्य संपविलं.
ही कहाणी शिवा नावाच्या एकटय़ा गेंडय़ाची असली, तरी प्राणिसंग्रहालयांमध्ये किंवा माणसाच्या हौसेमौजेखातर पिंजऱ्याआड आयुष्य जगणाऱ्या प्रत्येक जंगली प्राण्याच्या वाटय़ाला कमी-अधिक प्रमाणात असेच भोग येत असतात. भौतिक प्रगतीच्या खाणाखुणा सगळीकडे उमटत असतानादेखील, काही समजुतींच्या पगडय़ाचे बळी ठरणारी गेंडय़ाची जमात जंगलातूनदेखील नष्ट होऊ लागलेली आहे. केवळ कोणत्या तरी अवैज्ञानिक समजुतीपायी गेंडय़ाच्या कपाळावरचं शिंगाचं वैभव हेच त्याच्या मृत्यूचं कारण होऊ लागलं आहे. या समजुतीची शिकार झालेला हा प्राणी जंगलातूनही नामशेष होण्याची वेळ आली आहे. त्याच्या शिंगांनी माणसाला शक्ती मिळते की नाही, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पण त्याची शिकार करणाऱ्या माणसांना त्याच्या कातडीचं बळ मात्र प्राप्त होऊ लागलं आहे. निबर कातडीच्या या प्राण्याला आतून मात्र, मनाचा एखादा कोपरा असू शकतो, त्यामध्ये संवेदना असू शकतात, हे ओळखण्याएवढी मानसिकताच माणसाने जपली नाही. शिवाच्या मृत्यूच्या बातमीनंतर जिजामाता उद्यानात त्याची देखभाल करणाऱ्या दोन-चार कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांच्या कडा त्याच्या आठवणींनी ओलावल्या. माणुसकीचे दोन थेंब कुठे तरी ओघळले. हे त्या बातमीचं मूल्य.. कारण शिवाने त्याच्या हयातीत आणि उद्यानातील वास्तव्यात आपल्या मनाच्या कोपऱ्यात त्यांच्याविषयीचा ओलावा जपला होता.
जंगलातील जगणं नशिबात नसल्याने अपरिहार्यपणे माणसाच्या दावणीला बांधून घेण्याची वेळ आलेला जंगली प्राणी अखेर पारतंत्र्यापुढे हतबल होतो, आणि नाइलाजानं जखडलेलं आयुष्यही स्वीकारतो आणि आपल्या भावना समजून घेणाऱ्या कुणाशी तरी नातं जोडतो. कोल्हापूरशेजारच्या जोतिबा देवस्थानात वारणानगरच्या कोरे यांनी भेटीदाखल दिलेल्या सुंदर नावाच्या हत्तीलाही असेच हाल सोसावे लागले. अखेर न्यायालयाने हस्तक्षेप केल्यानंतर त्याची रवानगी कर्नाटकातील हत्ती पुनर्वसन केंद्रात करण्यात आली, तेव्हा सक्तीच्या हकालपट्टीपूर्वी त्यानं माहुताला घातलेली गळामिठी त्याच्या याच भावनांचं प्रतिरूप होती. जिजामाता उद्यानातून दिल्लीत गेलेला शिवा असो, नाही तर जोतिबाच्या डोंगरावरून कर्नाटकातील पुनर्वसन केंद्रात रवानगी झालेला सुंदर असो, अशा प्राण्यांच्या कपाळावर जन्मत:च उमटलेला गजाआडच्या शिक्षेचा ठपका, माणुसकीनेही आपल्या कपाळावर तितक्याच ठळकपणे मिरवावा इतका दिमाखदार नाही. तरीही तो पुसण्याच्या मानसिकतेपासून माणसं मैलोगणती दूरच आहेत. अलीकडच्या जगातील वन्यजीवांच हे दुर्दैव आहे. मुळात, जंगलांवर अतिक्रमणं करून प्राण्यांच्या हक्कांपासून त्यांना वंचित ठेवण्याचा जंगलीपणा अलीकडे फोफावत चालला आहे. प्रचंड जंगलतोडींमुळे वनक्षेत्रांचा ऱ्हास होऊ लागला आहे, आणि त्यामुळे वन्यजीव आणि माणसांमधील संघर्ष उग्र होत आहे. हा माणसाचाच अगोचरपणा दडविण्यासाठी प्राण्यांवर दया केल्याच्या आविर्भावात त्यांच्यासाठी अभयारण्यं उभारण्याचा दुटप्पीपणा करून गेंडय़ाच्या कातडीचं प्रदर्शनही केलं जात आहे. मध्यंतरी वाघ वाचविण्याची एक मोहीम सुरू केल्याचा गाजावाजाही झालाय. वाघाची शिकार करणाऱ्यास दिसताक्षणी गोळी घालण्याचे आदेशही मंत्र्यांनी दिले. पण शिकारी सापडलेच नाहीत. वाघांची कलेवरं मात्र अधूनमधून सापडतच राहिली, आणि जंगलातील जगणंही सोपं नाही, या जाणिवांनी वन्यप्राण्यांचं जगही धास्तावलेलंच राहिलं. एका जंगलात समूहाने राहणारी श्वापदं अन्यत्र रमू शकत नाहीत. जंगल संपलं की जगणं संपलं, अशा भावनेनं ते हताश होत असतील.. अशा परिस्थितीत, कदाचित, माणसाला शरण जाणं एवढंच वास्तव त्यांनीही स्वीकारलं असावं. पारतंत्र्यातलं का होईना, गजाआडचं, पिंजऱ्यातलं आयुष्य जंगलातल्या जगण्यापेक्षा सुरक्षित असावं, असंही कदाचित या प्राण्यांना वाटत असावं. पण, प्राणिसंग्रहालयांच्या जाळीदार पिंजऱ्याआड वाढविलेल्या प्राण्यांच्या आयुष्याला जंगलातील नैसर्गिक जगण्याची सर नाही. वाढतं शहरीकरण, महामार्गावरील वाहतुकीमुळे होणाऱ्या अपघातांतील जंगली प्राण्यांचे मृत्यू, वन्यजीवनाचा एकांतवास हरवल्यामुळे त्यांच्या प्रजननात होणारी घट या साऱ्या गोष्टी केवळ समस्याच अधोरेखित करत आहेत. अशा वेळी, कुणा एका शिवा गेंडय़ाने, एकाकी आयुष्य जगून सक्तीच्या ब्रह्मचर्यातच अखेरचा श्वास घेतला, ही घटना माणसाच्या हृदयाला पाझर फुटणारी ठरेल का हा प्रश्न कायम राहणार आहे. नाही तर, असे अनेक गेंडे कातडी मागे ठेवूनच आपलं जीवन संपवत राहतील, आणि ती पांघरून माणसं जगतच राहतील..