शंकरपटावरील प्यादी

जलिकट्ट, शंकरपट या नावांनी होणाऱ्या वृषभशर्यती जनरंजनापेक्षा पैशाचाच खेळ ठरत असताना त्यांवर बंदी घातली गेली, हे बरे झाले.

जलिकट्ट, शंकरपट या नावांनी होणाऱ्या वृषभशर्यती जनरंजनापेक्षा पैशाचाच खेळ ठरत असताना त्यांवर बंदी घातली गेली, हे बरे झाले. प्राणिहत्या ते अश्वशर्यती असे सर्वत्र क्रौर्य असताना आमच्यावरच बंदी का, असल्या युक्तिवादांच्या ढाली मोडून ही सकारात्मक सुरुवात झाली आहे..
बैलांना बोलता येत असते, तर त्यांनी नक्कीच सर्वोच्च न्यायालय जिंदाबाद वगरे घोषणा देऊन आपला आनंद साजरा केला असता. बैलांमध्येही तशी वर्गव्यवस्था असते. काही ओझ्याचे असतात, काही गाडय़ाचे. तसे वर्षभर हे गाडय़ाचे बैल रिकामेच असतात. तशात त्यांना गावातील पुढारी, श्रीमंत शेतकरी यांचा सहवास जास्त मिळतो. त्यामुळे कदाचित त्यांनी, येथून पुढे दर बुधवार वृषभवार म्हणून साजरा करावा, अशी जोरदार मागणी करून काही काळ धुरळा उडवून दिला असता. कारण याच दिवशी सर्वोच्च न्यायालयाने बैलगाड्या शर्यतींवरील बंदीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. कदाचित या बैलांच्या सुरात सूर मिसळून, पोळ्याच्या दिवशी न्यायदेवतेलाही पुरणपोळीचा नैवेद्य द्यावा, अशी जोडमागणीही एखाद्या गोमातेने केली असती. पण हे बिचारे मुके प्राणी. हंबरण्यापलीकडे ते काय बोलणार? तसे स्वरयंत्र सगळ्यांनाच असते. पण म्हणून सगळेच खुलेपणाने बोलू शकत नाहीत. प्रसंगी माणसांचेही वृषभ होतात, तेथे बैलांचे काय? तशात आता बैलगाडा शर्यतीवरील बंदीमुळे चिडलेल्या धनदांडग्या शेतकऱ्यांचा आणि त्यांच्या पाठीराख्या पुढाऱ्यांचा आवाज हळूहळू वाढतच जाणार आहे. शिवसेनेचे खासदार रा. रा. शिवाजीराव आढळराव यांच्या दृष्टीने तर हा निर्णयच मोठा अन्यायकारक आणि सर्वसामान्य कास्तकारांच्या भावना दुखावणारा. त्यामुळे ते त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करणार आहेत. तरी बरे, पवित्र गोमातेच्या पुत्रांच्या शर्यतीवर बंदी घालण्याचा हा निर्णय धर्मविरोधी असल्याचे अजून तरी त्यांनी म्हटले नाही. या शर्यती प्रामुख्याने यात्रा-जत्रांमध्येच होतात. त्यामुळे तसे म्हणणेही कुणास जड जाणार नाही. इकडे शेतकऱ्यांचे अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. विदर्भ-मराठवाडय़ात गारपीट, अवकाळी पाऊस अशा संकटांमुळे असंख्य शेतकऱ्यांच्या आयुष्याचा शंकरपट उधळून गेला आहे. पण रा. रा. आढळराव आदी पुढाऱ्यांच्या भावनाशील काळजाला काळजी आहे, ती बैलगाडा मालकांच्या डोळ्यांतील अश्रूंची.
बैलगाडा शर्यत हा मुळात लोकखेळ. त्यामुळे त्याचे कूळ आणि मूळ शोधता सापडणार नाही. इसवी सनपूर्व बावीसशे ते दोन हजार या कालखंडातला एक काश्याचा रथ अहमदनगर जिल्ह्य़ातल्या दायमाबाद येथे सापडला आहे. त्या लहान मुलांच्या खेळण्यातल्या रथाला बैलांची जोडी जोडलेली आहे. म्हणजे किमान तेव्हापासून बैलगाडी वा गाडा हा कृषिसंस्कृतीचा एक भाग होता. त्यातून कधी तरी मनोरंजनार्थ बैलगाडय़ांच्या शर्यती सुरू झाल्या असतील. हे सगळ्याच समाजांत घडलेले आहे. कुठे घोडय़ांच्या, कुठे उंटांच्या तर कुठे कुत्र्यांच्या शर्यती. आजच्या आधुनिक समाजात तर घरोघरी उंदरांच्या शर्यतीही सुरू असतात. शर्यती आणि स्पर्धा यात तसे काही गर नाही. अयोग्य आहे ते त्यातील क्रौर्य. गावोगावी वसंत सरता सरता यात्रा-जत्रांचा हंगाम सुरू होतो. शेतीच्या कामातून शेतकरी जरा निवांत झालेला असतो. वावरांनाही सूर्य पिऊन घ्यायचा असतो. अशा काळात गावोगावी देवाच्या, पिराच्या यात्रा-जत्रा भरू लागतात. तेथे तमाशे, भारुडे, कीर्तनाचे फड रंगू लागतात. कुठे कुठे शंकरपट भरतात. ही सगळी जनरंजनाची लोकसाधने. इसवी सनाच्या एकविसाव्या शतकातही मनरंजनासाठी हीच साधने पुरत असतील, तर ते मन किती पुढारले हा सवाल आहेच. पण वास्तव तेच आहे. ते केवळ रंजनाच्या, हौसेच्या पातळीवर असते, तर त्यास आक्षेप घेण्याचेही कारण नव्हते. परंतु बैलगाडी शर्यत म्हणा, शंकरपट म्हणा की तामिळनाडूतल्या जलिकट्ट या नावाने प्रसिद्ध असलेल्या बैलांच्या झुंजी आणि शर्यती म्हणा, त्यांचे केव्हाच बाजारीकरण झाले आहे. लाखोंची पारितोषिके, त्यांचे प्रायोजक, जमा करण्यात येणारी वर्गणी, शर्यतीच्या आयोजनामागील राजकारणाचा कधी छुपा, कधी दृश्य असणारा पदर यातून शर्यतींचे बाळबोध स्वरूप कधीच हरवले आहे आणि उरला आहे तो केवळ अर्थ आणि राजकारणाचा खेळ. गाडय़ांच्या शर्यतींमध्ये जे बैल पळविले जातात, ते घेणे, त्यांना पोसणे हे सामान्य शेतकऱ्याचे काम नाही. सामान्य शेतकरी त्यात पडतही नाही. मुळात शेतीच्या कामासाठी बैल पाळणे हीसुद्धा आज अनेकांच्या आवाक्यातली गोष्ट राहिलेली नाही. त्याऐवजी त्यांना भाडय़ाने ट्रॅक्टर आणणे परवडते. तेव्हा ती बागायतदार, ‘गुंठामंत्री’, ग्रामपुढारी यांचीच क्रीडा. त्यात बळी जातात ती मात्र मुकी जनावरे. चाबूक आणि आसुडाचे फटके हे तर बैलांच्या पाटय़ावरच पुजलेले. पण या शर्यतींमध्ये त्यांच्या पुठ्ठय़ांना अणुकुचीदार पराण्या टोचणे, खिळे लावलेल्या काठय़ांनी त्यांना बदडणे असे जे क्रूर प्रकार सर्रास केले जातात, ते बघणे हीसुद्धा एक शिक्षा म्हणावी. काही गावांमध्ये बैलगाडय़ांच्या पुढय़ात घोडे पळविले जातात. म्हणजे त्या वेगाने बैलांनी पळावे. मुळात बैल हा काही वेगाने पळणारा प्राणी नाही. त्याला शर्यतीत धावायला लावणे ही त्याच्या प्रकृतीविरोधातलीच गोष्ट. वर पुन्हा शर्यत संपल्यानंतर त्याला थांबविण्यासाठी करकचून कासरा ओढला जातो. हा कासरा बैलाच्या नाकातील वेसणीला बांधलेला असतो. त्यात त्याला किती वेदना होत असतील, याची कुणाला पर्वाच नाही. वर्षभर ज्यांना पोटच्या पोराहून अधिक जपायचे, बदाम-खारकांचा खुराक लावायचा, त्यांना शर्यतीच्या दिवशी दारू पाजून पळवायचे, हा गाढवपणा म्हटले तर गाढवांच्या भावना दुखावतील.
सर्वोच्च न्यायालयाने या शर्यतींवरील बंदी कायम केली ती याच क्रौर्याच्या मुद्दय़ावर. असे क्रौर्य प्राणिहत्येत नसते काय? अन्य शर्यतींत नसते काय? असते. तपशिलात फरक असेल, पण असते. राज्यातील अश्वशर्यतींत घोडय़ांना चाबकाने मारले जातेच. अर्थात तेथेही कुशनचा चाबूक वापरावा, संपूर्ण शर्यतीत त्याचा तीन वेळाच वापर करावा, असे नियम उच्च न्यायालयाने घालून दिले आहेत. अर्थात त्यांचे पालन किती होते हा प्रश्नच आहे. पण त्या शर्यतींमध्ये घोडय़ांचा छळ होतच नाही, असे कसे म्हणणार? मारहाण तर नेहमीचीच, परंतु शर्यतीच्या अश्वांना उत्तेजक औषधे पाजणे, त्यांच्यात अनसíगक शारीर बदल घडवून आणणे अशा अनेक गोष्टी केल्या जातात. दोन महिन्यांपूर्वीच न्यूयॉर्क टाइम्सने एक वृत्त प्रकाशित करून अश्वशर्यतीतील घोडय़ांच्या छळावर प्रकाश टाकला होता. परंतु बहुधा तो ‘महा-लक्ष्मी’चा शिवाय नागरी संस्कृतीतील खेळ असल्याने त्याबाबत मोठय़ा आवाजात बोलण्याची कोणाची प्राज्ञा नसावी. पण अश्वशर्यतींवर बंदी नाही म्हणून बैलगाडा शर्यतींनाही परवानगी द्यावी, या युक्तिवादात काही अर्थ नाही. बैलांना शेतकामासाठी, ओझी वाहण्यासाठी जुंपले जाते. तेही क्रूरच. मग आता त्यावरही बंदी घालणार काय, या कांगाव्यातही अर्थ नाही. चूक तेही आहे आणि चूक हेही आहे. उपाय बैलांचे श्रम, कष्ट कमी करता येतील, अशी साधने शोधणे आणि वापरणे हा आहे.  
येथे मूळ प्रश्न क्रौर्याचा आहे, तसाच तो निवडीच्या अधिकाराचा आहे. मुष्टियुद्धात क्रौर्य असते. पण सहभागी होणारास निवडीचा अधिकार असतो. प्राण्यांच्या शर्यतीत तो नसतो. ज्या शर्यतीत वा स्पध्रेत सहभागी होणारांना निवडीचा अधिकार नसतो, ती बंदी घालण्याच्याच लायकीची समजली पाहिजे. आणि हे तत्त्व केवळ प्राण्यांच्या शर्यतीलाच लागू नाही, हेही समजून घेतले पाहिजे. शंकरपट केवळ वृषभांचाच नसतो. तो जाणता-अजाणता आपल्या सर्वाच्या आयुष्यातही असतो. दहावी-बारावीच्या मुलांचे – हल्ली खरे तर कोणत्याही इयत्तेतील मुलांचे पालक आणि बैलगाडा शर्यतीतील बैलांचे मालक यांत तसा फरक काय असतो? नसतोच. हे बैलांना दूध, सरकी, कडबा, पेंड, हिरवा लुसलुशीत घास असा खुराक देतात. ते मुलांना भिजवलेले बदाम देतात. पळविणे दोन्हीकडे असते. तेव्हा, शर्यत वा स्पर्धा बैलांची असो वा ‘उंदरां’ची, प्रश्न सहभागी होणाऱ्याच्या इच्छेचा असला पाहिजे. नुसतेच गाडय़ाचे बैल तयार करण्यात काय अर्थ आहे?

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Supreme court bans bullock cart races

ताज्या बातम्या