मुकुंद संगोराम mukund.sangoram@expressindia.com

मैफिलीत कंठय़संगीताला मध्यवर्ती स्थान देण्याची परंपरा मागे पडू शकली, ती वादकांनी मैफिलीसाठी आपापल्या वाद्यांची परिभाषा निर्माण केल्यामुळे. तंतुवाद्ये, सुषिरवाद्ये आणि तालवाद्येही यात मागे नव्हती..

कसे कोण जाणे, परंतु भारतीय समाजात मंगलप्रसंगी वाद्य वाजवण्याची परंपरा सुरू झाली आणि रुजली. सनई-चौघडा हे आपल्या समाजात आनंदाच्या प्रसंगी वाजवायचे वाद्य म्हणून ओळखले जाऊ  लागले, ते त्यामुळेच. मंगलप्रसंगी वळचणीला राहून इतरांच्या आनंदात भर घालणारे सनई-शहनाई हे वाद्य मैफिलीच्या मध्यभागी विराजमान झाले आणि त्याला रागसंगीताच्या अभिजाततेचा साज मिळाला. याचे श्रेय उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांनाच द्यायला हवे. संगीत म्हणून सर्व कसोटय़ा पार करणारे हे वाद्य लोकप्रिय झाले आणि त्याने भारतीय संगीतातील सुषिर वाद्यांसाठी मानाचे पान तयार केले. सनई हे वाद्य अभिजात संगीताच्या मैफिलीत मध्यभागी विराजमान होणे, ही अतिशय महत्त्वाची गोष्ट होती. याचे कारण या वाद्यावर राग संगीत वाजवण्यासाठी आवश्यक असणारे तंत्र विकसित करणे आवश्यक होते. बिस्मिल्ला खाँ बनारसला असताना काशी विश्वेश्वराच्या मंदिरात संगीतसाधना करीत असत. (त्याबद्दल त्याकाळी त्यांना कोणी फटकारले नव्हते!) सनई, बासरी यांसारख्या वाद्यांसाठी फुंक महत्त्वाची. श्वासावर कमालीचे नियंत्रण असल्याशिवाय छातीतून येणारी हवा योग्य प्रमाणात वाद्यातून स्वराला वाट करून देऊ  शकणारच नाही. त्यामुळे खाँसाहेबांच्या अनेकानेक ध्वनिमुद्रिकांमधून किंवा प्रत्यक्ष कार्यक्रमांतून ते कधीही बेसूर झाले नाहीत, की त्यांची शहनाई कधी चिरकली नाही. बासरी हे तर भारतीय सांस्कृतिक जगतातील एक असे वाद्य, की त्याला देवत्वही प्राप्त झालेले. परंतु या वाद्यावर अभिजात संगीत सादर करणे, ही फारच अवघड आणि कौशल्याची बाब. इतिहासातील कोणताही संदर्भ नसताना, पन्नालाल घोष यांनी या वाद्याची नवी भाषा तयार केली. त्याचे शैलीत रूपांतर केले आणि एवढेच करून ते थांबले नाहीत, तर त्या वाद्याला मैफिलीत विराजमानही केले. आजचे बिनीचे कलावंत हरिप्रसाद चौरसिया यांनी तालीम घेतली अन्नपूर्णादेवी यांच्याकडून. त्या ज्येष्ठ सतारवादक. मैहर घराण्याचे संस्थापक आणि सरोदवादक अल्लाउद्दीन खाँ यांच्या त्या कन्या. हरिप्रसादजींनी त्यांच्याकडे संगीताची तालीम घेतली. वादनाची शैली स्वत:च विकसित केली. हे कार्य थोर वाटावे असे. विशेष म्हणजे या वाद्याला मिळत असलेल्या लोकप्रियतेमुळे बासरीवादन शिकण्यासाठी अनेक युवक पुढे येत आहेत. (कृष्णाची बासरी किती स्वरांची होती, याचा थेट संदर्भ महाभारतात नाही. महाभारताचे ज्येष्ठ अभ्यासक म. अ. मेहेंदळे यांच्या मते ती बासरी तीन स्वरांची असण्याची शक्यता. संगीत निर्मितीसाठी किमान तीन स्वर हवेत, या सिद्धान्ताला ही मिळालेली अभ्यासाची जोड.)

गायनाच्या शैलीशी मिळत्याजुळत्या सारंगीने आपोआपच संगीताच्या मैफिलीत स्थान पटकावले. सारंगी म्हणजे कलावंताचा आरसाच. गायनाच्या बरोबरीने संगत करताना, सारंगी स्वरयंत्राशी तादात्म्य पावली. भारतात ब्रिटिशांच्या आगमनानंतर आलेल्या हार्मोनिअम या वाद्याच्या वाढत्या उपयोगितेमुळे हळूहळू हे अस्सल देशी वाद्य मागे पडू लागले. सारंगीची रचना हे तंत्रज्ञानाचे एक कुशल रूप. तारांना ताण देऊन त्यावर घर्षणाने नाद निर्माण करता येण्याची क्षमता बाळगणारे हे वाद्य, भारतातील कितीतरी मैफिलींमध्ये गायक कलावंताच्या शेजारी दिसत असे. त्यातील स्वर तारेचा ताण कमी-जास्त करून पक्का करावा लागत असल्याने, गायकाच्या गळ्यातील स्वरांशी तो तंतोतंत जुळू शकतो. सारंगी प्रत्यक्ष गाते आहे, असाच भास व्हावा, इतके प्रभुत्व मिळवणारे अनेक कलावंत भारतात मोठय़ा प्रमाणात तयार झाले. बालगंधर्वाचे सारंगीये उस्ताद कादरबक्ष हे संगतकार म्हणून अतिशय नावाजले गेले. परंतु त्यांनी अतिशय कष्टसाध्य असणाऱ्या अशा वाद्यावर प्रभुत्व मिळवून त्याला स्वतंत्र आविष्काराचा मान मिळवून दिला. नंतरच्या काळात मैफिलीत गायक कलावंतांना साथ करणारे हे वाद्य पं. रामनारायण, उस्ताद सुलतान खाँ यांच्यासारख्या कलावंतांमुळे मैफिलीत मध्यभागीही विराजमान झाले. नंतरच्या काळात या वाद्याचे महत्त्व न समजल्यामुळे किंवा त्या उंचीचे वादकच निर्माण न झाल्यामुळे किंवा त्याची जागाच अन्य वाद्याने घेतल्यामुळे, सारंगी हे वाद्य हळूहळू संगीताच्या दरबारातून लोप पावू लागले.

सिंधु संस्कृतीमधील शिक्क्यांवरील एक चिन्ह सुमेरियन पद्धतीच्या उभ्या वक्राकार तंतुवाद्यासारखे दिसते. फिलाडेल्फिया विद्यापीठाच्या वस्तुसंग्रहालयात इसपू २८००च्या सुमारासचे एका सुमेरियन शिक्क्यावर असेच वक्राकार तंतुवाद्य आहे. त्यातील तारा कशापासून बनवल्या जात, याचा तपशील उपलब्ध नाही. मात्र तंतुवाद्याचा हा आविष्कार मानवाच्या उत्क्रांतीच्या काळात त्याच्या भावभावना व्यक्त करण्यासाठी नक्कीच मदत करणारा ठरला असेल. तंतुवाद्यात भारतीय संस्कृतीने कित्येक शतके संशोधन केले. सतार, सरोद, संतूर यांसारख्या वाद्यांनी आजही हिंदुस्तानी संगीत ऐकणाऱ्या प्रत्येकाला सतत नवीन असे संगीत ऐकवण्यात कोणतीही कसूर ठेवलेली नाही. संतूर हे तर अतिशय नाजूक वाद्य. आजचे आघाडीचे कलावंत पं. शिवकु मार शर्मा यांनी या वाद्यावर अनेक संस्कार करून त्याला अभिजाततेचा दर्जा मिळवून दिला. बासरी आणि सनईप्रमाणे त्यांनाही या वाद्याची नवी परिभाषा निर्माण करावी लागली. पं. सतीश व्यास, ताकाहिरो अराई यांच्यासारखे त्यांचे शिष्य या वादनाला आजही पुढे नेताना दिसतात.

भारतीय अभिजात संगीताच्या मैफिलीत हमखास उपस्थिती लावणारे हार्मोनिअम हे वाद्य अगदी अलीकडचे, म्हणजे विसाव्या शतकाच्या आरंभी भारतात आलेले! त्यावर प्रभुत्व मिळवून मैफिलीत खात्रीशीर रंग भरण्याची हातोटी असणाऱ्या अगदी मोजक्या हार्मोनिअमवादकांमध्ये गोविंदराव टेंबे, गोविंदराव पटवर्धन, अप्पा जळगावकर, मनोहर चिमोटे, विद्याधर ओक यांच्यासारख्या अनेकोत्तम कलावंतांनी या पाश्चात्त्य वाद्याला भारतीय अभिजात संगीतात महत्त्वाचे स्थान मिळवून दिले, यात शंकाच नाही. मैफिलीत हमखास दाद मिळण्यासाठी गायक कलावंतांना तालवाद्य आणि स्वरवाद्याची संगत करणारे अतिशय प्रतिभावान साथीदार हवे असतात. साथसंगतीमुळे गायनात आणि वादनात नवे रंग भरले जातात आणि त्या संगीताची श्रवणयुक्तता अधिकच वाढते. श्रोता म्हणून ज्या काही अपेक्षा असतात, त्या पुऱ्या करण्यासाठी मुख्य कलावंत आणि त्याला त्याच्या आविष्कारात मोलाची साथ देणारे संगतकार यांचे महत्त्व खूप मोठे असते, हे नाकारता येणार नाही. संगतकारही उंचीचेच असतील, तर ते गायनातील मोकळ्या जागा भरून काढत असताना, कलावंताला काही सुचवतात, नवे मार्ग सांगतात, त्याला सर्वार्थाने प्रोत्साहन देतात. त्यामुळेच कलावंत आणि संगतकार यांच्यामध्ये एक सुमेळ आवश्यक असतो. त्या सर्वाचे एकमेकांशी असलेले सांगीतिक संबंध सौहार्दपूर्ण असतील, तर संगीताच्या निर्मितीला बहर येतो, असे अनेक कलावंत सांगतात. तेच संगतकार हवे, असा कलावंताचा आग्रह त्यासाठी असतो. त्यामुळेच कलावंत आणि संगतकार यांच्या जोडय़ा जमतात.

स्वर आणि लय ही भारतीय संगीतातील दोन मूलभूत तत्त्वे. आधी गायन आणि नंतर तालवाद्य हे उत्क्रांतीमधील सूत्र असले, तरीही गायनात मुळातच असलेल्या लय या तत्त्वाला तालाने एका अतिशय सुंदर अशा मखरात नेऊन ठेवले. त्यामुळे संगीत कलेला एक प्रकारचे लयीचे दृश्य स्वरूप प्राप्त झाले. निसर्गात आणि प्रत्येक श्वासोच्छवासात लय भरून राहिलेली असते, हे खरे. परंतु तालाने, त्याला स्पष्टता दिली. लयताल विचार हे भारतीय संगीतातील एक अतिशय मूलभूत आणि महत्त्वाचे दालन आहे. गणित हा लयीचा आत्मा. मात्र त्यातून व्यक्त होणारे संगीतच असते. स्वरपूर्ण संगीताला विशिष्ट लयीच्या तालांमध्ये गुंफून त्याची अर्थगर्भता श्रीमंत करण्याचे काम तालवाद्यांनी केले. तालामुळे अमूर्त संगीताला मांडणीची चौकट मिळाली. ती त्या संगीताला अर्थ देणारी ठरली. तालातील मात्रामात्रांचा अभ्यास आणि त्यातील कलात्मकता शोधणाऱ्या भारतातील अनेक तबलावादकांनी जे महान कार्य केले आहे, ते अतुलनीय म्हणावे लागेल. तालातील मात्रा काळाचे मापन करते. मात्रांची वेगवेगळी आवर्तने ताल सिद्ध करतात. उस्ताद तिरखवाँ, उस्ताद अल्लारखाँ, पं. किशन महाराज, पं. सामताप्रसाद, आजच्या काळातील उस्ताद झाकीर हुसेन, पं. सुरेश तळवलकर,पं. विजय घाटे यांच्यासारख्यांनी तालवाद्यांचा मूलभूत अभ्यास करून त्यातील सौंदर्याच्या खाणाखुणा शोधण्याचे संशोधन कार्य केले. त्यामुळेच तालवाद्य हे संगीताच्या परिपूर्णतेसाठी अतिशय महत्त्वाचे ठरले. संगीताच्या दरबारात ‘संगत’ म्हणून दाखल झालेल्या सगळ्या वाद्यांना वादकांनी स्वतंत्र चेहरा दिला, नवी ओळख दिली आणि संगीतच समृद्ध केले.