|| मुकुंद संगोराम

परंपरा पाळूनही उत्स्फूर्ततेला वाव आणि त्यातून येणारी ‘रसिकसापेक्षता’ हे भारतीय अभिजात संगीताचे वैशिष्टय़. त्यामुळेच तर तबकडी ते पेनड्राइव्ह आणि आता वायफायमुळे हवे तेव्हा ‘डाउनलोड’ या तंत्र-प्रवासातही मैफलीची आस कायम राहते! प्रत्येकाचा कान निराळा तरीही संगीत व समाज यांचे नाते टिकते.. त्या अभेद्य नात्याचा वेध घेणारे नवे पाक्षिक सदर..

मैफल सुरू होत आहे. तंबोरे जुळलेले आहेत. तबलजीने तबला आणि डग्ग्यावर थोडी पावडर फवारली आहे. हार्मोनियम वादकाने आधीपासूनच सूर धरला आहे. समोर बसलेले रसिक आसुसलेले आहेत.. हे चित्र गेली अनेक दशके भारतातील अनेक ठिकाणी होणाऱ्या संगीत कार्यक्रमांत पाहायला मिळत आले आहे. अशा वेळी जे घडते ते अन्य कलांमध्ये सहसा घडत नाही. बहुधा नाहीच. कारण मैफलीत गायन किंवा वादन सादर करणाऱ्या कलावंताने रसिकांसमोर बसून आपली सारी प्रतिभा पणाला लावण्यासाठी जिवाचे रान केलेले असते. सकाळ-संध्याकाळ, रात्र-उत्तररात्र अशा दिवसाच्या सगळ्या प्रहरांत कलावंताचा ध्यास असतो तो कला सादरीकरणाच्या तयारीचा. असा किती रियाज केला याला संगीतात महत्त्वही असते. पूर्वीच्या काळी रियाज मोजण्यासाठी मेणबत्तीचा आधार असे. चार-सहा-आठ मेणबत्त्यांचा रियाज करणाऱ्या कलावंताने आपल्या गळ्यावर संस्कार रुळवण्यासाठी केलेला हा खटाटोप. तो अतिशयच महत्त्वाचा आणि आवश्यकही. अशासाठी की, मेंदूत तयार होणारे संगीत गळ्यातल्या स्वरयंत्रातून किंवा वाद्यातून अपेक्षेप्रमाणे बाहेर पडते आहे की नाही, याची ती चाचपणी असते. शक्यतांची तपासणीही असते. एवढे सगळे करून कलावंत मैफलीत येऊन स्वरमंचावर स्थानापन्न होतो. काय आणि कसे सादर करायचे आहे, याची तयारी मनोमन तरी पूर्ण झालेली असते अन् तरीही ऐन मैफलीत काही वेगळेच, अनपेक्षित असे घडून जाते.

गेले वर्षभर या सगळ्या अपूर्वाईला आपण मुकलो आहोत. सार्वजनिक ठिकाणी समूहाला एकत्र येण्यास असलेल्या र्निबधांमुळे हे घडले. या सगळ्याचा सर्वात जास्त परिणाम झाला असेल, तर तो कला क्षेत्रावर. एका अर्थाने हातावरचे पोट असणाऱ्या अन्य अनेक क्षेत्रांप्रमाणे कला क्षेत्र अगतिकतेच्या भोवऱ्यात सापडले. काहीच घडणे शक्य नसल्याच्या भययुक्त जाणिवेने कलावंतांची कलावंत म्हणून जगण्याची ऊर्मी विझू लागली आणि हे सारे कधी संपणार आहे की नाही, या कल्पनेने हादरून व्हायला झाले. रियाज सुरू राहिला तरी आस असते ती प्रत्यक्ष कला सादर करण्याची. त्या सादरीकरणात येणाऱ्या अनपेक्षित अनुभूतीची. जागतिक संकटांच्या काळात होणारी सार्वत्रिक पडझड माणसाला नवी नाही. त्यातून सावरत पुन्हा नव्याने जगणे सुरू करण्याची ही पहिली वेळ नाही. तरीही कलांना या परिस्थितीतून बाहेर पडायला लागणारा वेळ अधिक असेल, कारण माणसाच्या जगण्याच्या प्राधान्यक्रमात कलांचा क्रमांक बराच खालचा असतो. जगलो तर पाहिजे, ही मूलभूत प्रेरणा. जिवंत राहून जगणे समृद्ध करण्याची असोशी मानवाचे माणूसपण सिद्ध करणारी असते. गेल्या काही महिन्यांत तीही नाहीशी होते आहे की काय, अशी शंका येण्यासारखे हे वातावरण.
अन्य कलांच्या तुलनेत भारतीय अभिजात संगीताचे वेगळेपण हेच की ते रसिकसापेक्ष असते. कलेच्या अंगणात कलावंताएवढाच रसिक हाही अविभाज्य घटक. तोच अनुपस्थित असेल, तर कलेच्या उत्स्फूर्ततेला लगाम बसणार. चित्रकला, वास्तुकला, चित्रपट, लेखन यांसारख्या अन्य कलांच्या क्षेत्रात कलेच्या सादरीकरणाची पूर्णता येईपर्यंत आस्वादक अनुपस्थित असतो. म्हणजे त्याची गरजही नसते. कलानिर्मितीच्या प्रत्यक्ष प्रक्रियेत त्याचा सहभाग कदाचित कलावंतासाठी त्रासदायकही ठरणारा असू शकतो. शिवाय या कलांच्या निर्मितीचा कालावधी कलावंतही ठरवू शकत नाही. या कलांच्या घडणीच्या काळात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याने रसिक म्हणून काही मोलाचा अनुभव मिळण्याची शक्यताही बहुतेक वेळा धूसरच. त्यामुळे या कलांमध्ये कलाकृती पूर्णत्वाला गेल्याची खात्री पटल्याशिवाय कलावंत ती रसिकांसमोर ठेवण्यास उत्सुक असत नाही. याच्या नेमके उलटे भारतीय अभिजात संगीतात घडते. कार्यक्रमात उपस्थित असलेले श्रोते कलाकृती निर्मितीच्या प्रक्रियेत अप्रत्यक्षपणे सहभागी होत असतात. आपण जे काही स्वरशिल्प घडवतो आहोत, त्यास कलावंताला त्याच क्षणी प्रतिसाद मिळत असतो. तसा तो मिळणे कलाकृतीच्या घडणीसाठी आवश्यकही असते. त्यामुळे अनेकदा कलावंताला उत्स्फूर्त क्षणांच्या अपूर्वाईचा आनंद मिळतो. सादरीकरणातील पुढील टप्प्यावर तो कलाकारासाठी अतिशय महत्त्वाचा असतो.

गेले वर्षभर कलावंत याच क्षणांच्या प्रतीक्षेत आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने असे काही क्षण गोळा करता येतात का, याची चाचपणी सुरू झाली आहे. आभासी मैफल आयोजित करून कला पोहोचवण्याचा हा प्रयत्न किती सफल होत आहे, याबद्दल कलावंत आणि रसिक या दोघांच्याही मनात साशंकता आहे. एके ठिकाणी सादर होत असलेल्या कलेचा आस्वाद दुसऱ्या ठिकाणी बसून घेता येतो का, या प्रश्नाचे उत्तर गेल्या शतकाच्या आरंभी आलेल्या ध्वनिमुद्रणाच्या तंत्रज्ञानाने देण्याचा प्रयत्न निश्चितच केला. श्रोत्यांशिवाय केवळ एका बंद खोलीत होणारे ध्वनिमुद्रण ही एकदाच घडणारी आणि दीर्घ काळ टिकणारी मैफल. कलावंतांसाठी ते फारच मोठे आव्हान होते. समोर ऐकायलाच कोणी नाही आणि तरीही आपण जणू मैफलीतच गात आहोत, असे समजून आपल्या कलाविष्काराचा परमोच्च बिंदू सिद्ध करण्याचे हे आव्हान त्या काळातील अनेक दिग्गज कलावंतांनी नाकारले. प्रत्येकच ध्वनिमुद्रणात असे घडले आहे, असे नाही. बंद खोलीत कलावंताने केवळ साथीदारांच्या सहवासात आपली कला सादर करायची, हेही अभिजात संगीतातील कलावंतांसाठी आव्हानच. ते अनेक दिग्गजांनी लीलया पेलले. किराणा घराण्याचे अध्वर्यू उस्ताद अब्दुल करीम खाँ यांची ‘जमुना के तीर’ ही भैरवीची ध्वनिमुद्रिका ही याची साक्ष. इतक्या दशकांनंतरही ती ऐकताना अप्रतिम सांगीतिक अनुभवाला आपण पुन:पुन्हा सामोरे जात राहतो.

तरीही ध्वनिमुद्रणात वेळेचे बंधन असते. तंत्राचे भान असते. ती एकदाच घडणारी आणि चिरकाल टिकणारी घटना असते. त्यामुळे रसिकांच्या साक्षीने रियाजातही न घडलेले असे कलावंतालाही अकल्पित काही घडून जाते. रसोत्कर्षांची कारंजी उडतात आणि हे सारे समोरच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचते आहे, या समाधानाने आणखी काही नवे उत्स्फूर्त सर्जन घडते आहे, असा अनुभव भारतीय अभिजात संगीतातील श्रोत्यांना अनेकदा येतो. असा अनुभव गेल्या काही महिन्यांत संगणकीय अवकाशात झडलेल्या किती मैफलींमध्ये आला, या प्रश्नाचे उत्तर ज्याचे त्याने शोधायचे आहे. मुळात कोणत्याही कलेचा रसास्वाद ही एक अतिशय गंभीर आणि पूर्वनियोजित गोष्ट असते. चित्रपटगृहात किंवा नाटय़गृहात प्रवेश करण्याच्या किती तरी आधीपासून आपण एका नव्या अनुभवाला सामोरे जाणार असल्याची हुरहुर निर्माण होत असते. काय घडेल याचा जराही अंदाज नाही, पण घडावे अशी इच्छा तर आहे, अशा मन:स्थितीत रसिक सभागृहात प्रवेश करतो आणि कलाकृतीच्या सादरीकरणात शक्य तेवढा लीन होतो. अभिजात संगीतासाठी कलावंत आणि श्रोते या दोघांनी मिळून हे घडवायचे असते. त्यासाठी श्रोताही जाणता हवा आणि कलावंतालाही त्याची जाण हवी. संगीतातून मिळणाऱ्या आनंदाची ही अनुभूती प्रत्यक्ष सादरीकरणात अधिक खुलते, ती यामुळे. प्रत्यक्ष मैफलींचे ध्वनिमुद्रण नंतरच्या काळात ऐकले, तरीही त्या मैफलीत काय घडले असेल, याचा अंदाज सहज लागू शकतो.

तंत्रज्ञानाचा उपयोग अशा प्रत्यक्ष सर्जनासाठी किती आणि कसा होऊ शकतो, याचा विचार आता सगळ्यांनाच करावा लागणार आहे. न दिसणाऱ्या श्रोत्यांसाठी सादर होणारी मैफल हा रियाज नसेल, याची काळजी घेतानाच; त्यामध्ये श्रोत्यांविना उत्स्फूर्तता कशी निर्माण करता येईल, की येणारच नाही- याचा धांडोळा आता घ्यावा लागेल. नाटक जसे नाटय़गृहातच पाहायचे असते, तसे संगीतही सगळ्यांच्या बरोबर (आणि तरीही एकटय़ाने) ऐकायचे असते, ही संकल्पना जुनी असली

तरी अजूनही गैरलागू ठरलेली नाही, हे मान्य करायला हवे.

नव्याच पद्धतीने स्वरानुभव घ्यावा लागणार असेल, तर त्यासाठी कलावंत आणि श्रोता यांना आपली मानसिकता बदलावी लागेल. भारतीय अभिजात संगीत या सगळ्यापेक्षा वेगळेपणाने निर्माण होणार असेल, तर ते संग्रहालयात जपून ठेवण्यापेक्षा त्याची अभिजातता अधिक कशी वृद्धिंगत होईल, याचाच विचार करायला हवा.

mukund.sangoram@expressindia.com