गात पुढे मज जाणे..

सत्तरच्या दशकातील या उलथापालथी कमी वाटाव्यात, इतक्या वेगाने ऐंशीचे दशक संगीताच्या क्षेत्रात महत्त्वाचे ठरले.

जॅक मुलिन (उतारवयात)

मुकुंद संगोराम mukund.sangoram@expressindia.com

ध्वनिमुद्रणाचे प्रगत तंत्र, रेडिओचा प्रसार आणि ट्रान्झिस्टरचे आगमन, ‘टेपरेकॉर्डर’ची चुणूक.. तरीही संगीत संमेलनांची पूर्वीसारखीच रेलचेल! अशा काळात अनेकांनी ‘माझे जीवन गाणे’ हा साक्षात्कार निभावला नसता तरच नवल..

एकीकडे भारतीय चित्रपट रंगीत होत होता, त्यातील संगीतही रंगीत होत-होत ‘कृष्णधवल’मधून बाहेर पडत होते. चित्रपटातील गीते कोटय़वधी भारतीयांच्या कानामनात आणि ओठांवर घोळत होती, दुसरीकडे संगीत नाटक कात टाकून नवे रूप लेवून सज्ज झाले होते. तिसरीकडे ग़जल हा भावगीतालाही वरचढ ठरेल असा संगीत प्रकार भारतीय संगीताच्या दुनियेत आपले स्थान भक्कम करत होता, तर चौथीकडे अभिजात संगीतातही नवनव्या प्रयोगांच्या रचनेला उधाण येत होते. संगीतातील अभिजाततेला नवी झळाळी देण्यासाठी प्रकांड बुद्धिमत्ता असणारे अनेक कलावंत लोकानुनय न करताही त्यांच्या अभिरुचीत बदल घडवण्याच्या प्रयत्नात होते. सत्तरच्या दशकातील या उलथापालथी कमी वाटाव्यात, इतक्या वेगाने ऐंशीचे दशक संगीताच्या क्षेत्रात महत्त्वाचे ठरले.

शेख मुजीबुर रेहमान यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेश मुक्तिसेनेला मदत करण्यासाठी भारतीय सैन्य युद्धात उतरले आणि परिणामी बांगलादेशाची निर्मिती झाली. या युद्धाचे पडसाद भारतातील सगळ्याच क्षेत्रावर ऐंशीच्या दशकात लाटांसारखे पसरत राहिले. उन्मादी म्हणता येईल, अशा त्या वातावरणात कलांसाठीचे वातावरण अधिकच पोषक होत गेले. २३ डिसेंबर १९७० रोजी मुंबईत पहिला प्रयोग सादर झाला तो वि. वा. शिरवाडकर यांच्या ‘नटसम्राट’ या नाटकाचा. या नाटकामुळे लोकप्रियतेचे उच्चांक निर्माण होत असतानाच १९७२ मध्ये रंगमंचावर आलेले विजय तेंडुलकर यांचे ‘घाशीराम कोतवाल’ आणि ‘सखाराम बाईंडर’ ही नाटके, चित्रपटांच्या दुनियेत बासु चटर्जी यांचा ७० मध्येच प्रदर्शित झालेला ‘सारा आकाश’, त्यानंतर आलेले जब्बार पटेल यांचे ‘सामना’, ‘सिंहासन’ हे चित्रपट, शाम बेनेगल यांचा ‘अंकुर’, अमोल पालेकर यांचा ‘रजनीगंधा’, अमिताभ बच्चन यांचा ‘जंजीर’ अशा अनेक अंगाने कलांच्या क्षेत्रात अक्षरश: उलथापालथ होत होती.

याची कारणे अनेक. संगीताची रुची बदलण्यास आणि वाढण्यास तंत्रज्ञानाने वेगाने हातभार लावला, तो याच दशकात. त्याचा वेग लक्षात येण्यापूर्वीच तंत्राने संगीत विश्वाला व्यापूनही टाकले. बहुतेक हिंदी चित्रपटात एखादे पात्र वाटावे, अशी जागा पटकावणाऱ्या पियानो या वाद्याप्रमाणे घराघरात मोक्याची जागा रेडिओ या उपकरणाने व्यापली होती आणि भारतातील अनेक घरांमधील बहुतेक व्यवहार या रेडिओच्या घडय़ाळावर अवलंबून राहू लागले होते. त्यामुळे बातम्या, शेतकऱ्यांसाठीचे कार्यक्रम, गृहिणींसाठीचे दुपारचे कार्यक्रम यांचे वेळापत्रक मुंबईच्या लोकलच्या वेळापत्रकाप्रमाणे मेंदूचा बराच भाग व्यापून टाकणारे होऊ  लागले. रस्त्यांवरून फिरताना घराघरांत वाजणाऱ्या रेडिओमधील कार्यक्रमांवरून कुणालाही किती वाजले आहेत, हे लक्षात येण्याएवढे स्थान या उपकरणाने सगळ्यांच्या दैनंदिन व्यवहारात निर्माण केले. याच उपकरणाने संगीताच्या दुनियेला स्वरांचे पंख बहाल के ले. रोजची सकाळच उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांच्या सनईने व्हायची आणि मग दिवसभर भक्तिगीते, भावगीतांची आपली आवड, नाटय़गीते, अभिजात संगीताचे कार्यक्रम अशा भरगच्च स्वरयात्रेशी सगळे जगणेच लगडून जायचे.

याच काळात ट्रान्झिस्टर या सहज आणि सुलभ उपकरणाने संगीत श्रवणाची व्यवस्थाच बदलून टाकली. घराघरात लक्ष वेधून घेणारा रेडिओ आता ट्रान्झिस्टरमुळे सहजपणे दिवसभराचा सोबती झाला. कुठेही बरोबर नेता येणाऱ्या, सहज हाताळता येणाऱ्या या उपकरणाने सगळेच संगीत प्रत्येकाच्या आवाक्यात आले. या उपकरणाचा शोध पन्नासच्या दशकातला. पण त्याचा भारतात वेगाने प्रसार व्हायला काही वर्षे जावीच लागली. ध्वनिमुद्रिकेची कालक्षमता दोन मिनिटांवरून वीस मिनिटांपर्यंत पोहोचत असतानाच कित्येक तासांचे ध्वनिमुद्रण करता येणाऱ्या टेपरेकॉर्डर या यंत्राने संगीत साठवणीला चांगलीच मदत करायला सुरुवात केली होती. परंतु हे यंत्र सहजसुलभ आणि तंत्रसुलभ नव्हते. कुणालाही सहज हाताळता येणारेही नव्हते. पण त्या काळात त्या ‘स्पूल रेकॉर्डर’मुळे किती तरी कलावंतांची संगीत कला साठवता येऊ  शकली. हे तंत्रज्ञानही खूप आधीचे. १९४७ या एकाच वर्षांत ट्रान्झिस्टर रेडिओ आणि स्पूल रेकॉर्डर या उपकरणांची बाजारपेठ निर्माण होऊ  लागली होती (जॅक मुलिन या अमेरिकेच्या सेनादलातील ऑडिओ इंजिनीअरने हॉलीवूडच्या एमजीएम स्टुडिओला या रेकॉर्डरचे प्रात्यक्षिक दाखवले होते. चित्रपटाच्या क्षेत्रातील ती एक मोठीच क्रांती! बिंग कॉस्बी या गृहस्थाला या तंत्रज्ञानात भविष्याची चाहूल दिसली आणि त्याने तेव्हा ५० हजार अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक करून ‘अ‍ॅम्पेक्स’ या उत्पादक कंपनीची स्थापनाही केली.). हे तंत्रज्ञान भारतात यायला फारसा वेळ लागला नाही. चित्रपटाच्या उद्योगात त्याने मोलाची भर घातली आणि त्यामुळेच संवाद, संगीत स्वतंत्रपणे ध्वनिमुद्रित करण्याची शक्यता निर्माण झाली.

अभिजात संगीताच्या कार्यक्रमांची रेलचेल अनुभवलेल्या या दशकात भारतीय अभिजात संगीत सर्वागाने विकसित होत होते. संगीताचे छोटे कार्यक्रम, मोठय़ा संगीत सभा, अभिजनांच्या घरी होणारे कार्यक्रम अशा अनेक पातळ्यांवर संगीत फु लत होते. अगदी विवाह समारंभातही अभिजात संगीताच्या कार्यक्रमांना महत्त्वाचे स्थान असे. त्यात प्रतिष्ठा तर मानली जात होतीच, परंतु अभिजनवर्गात सामावले जाण्यासाठीचा तो राजमान्य मार्गही होता. विशेष म्हणजे सगळ्याच संगीत प्रकारांसाठी श्रोते आतुर असत. उत्तम श्रोते घडवण्याच्या कलावंतांच्या कामगिरीला याच काळात प्रतिसाद मिळू लागला होता. ‘कलावंत’ म्हणून जगण्याची, त्याला प्रतिष्ठा मिळण्याची आणि त्यातून नवसर्जनाची ओढ वाढवणारा हा काळ.

मोठय़ा प्रमाणात मिळणारी दाद ही कलावंतासाठी प्राणवायूसमान असते. ती मिळवण्यासाठी प्रतिभेचे वरदान हवे, तशी मेहनतही हवी. मागील दशकात रियाजाला जे अतिरेकी महत्त्व सगळ्याच कलावंतांनी दिले, त्यातील अघोरीपणा सोडून देत कलावंत आपल्या कलेत नवनवे रंग भरण्याचा प्रयत्न करत होते (मेणबत्ती हे रियाजम् मोजण्याचे त्या काळातील साधन. कोण किती मेणबत्त्या जळेपर्यंत रियाजम् करतो, याच्या रसभरित चर्चा तेव्हा रंगत असत. ‘कितने मोमबत्तीका रियाज’ हा तेव्हाचा परवलीचा शब्दप्रयोग!). गळ्यावर हुकमत मिळवण्यासाठी जो रियाजम् करायचा, त्यात स्वप्रतिभेलाही महत्त्व मिळू लागल्याने संगीत शिकण्याची ऊर्मी वाढणे ही अगदीच स्वाभाविक घटना. अनेक कलावंतांच्या दारात शिकण्याची इच्छा घेऊन उभे ठाकलेल्या युवकांना आयुष्यात फक्त संगीत करायचे असे वाटणे, हे त्या काळाचे भाग्य. तहानभूक हरपून कला सादर करण्यासाठी सारे आयुष्य पणाला लावणाऱ्या कलावंतांसाठी संगीत हा व्यवसाय नव्हता. ती जगण्याची पद्धत होती. रसिकांकडून मिळणारी दाद कलावंत म्हणून झिंग येण्यास पुरेशी असणारा हा काळ.

त्यामुळेच देशात आणि परदेशातही भारतीय अभिजात संगीताबद्दल गोडी वाढत असताना, त्याचा पुरेपूर उपयोग करून घेत उस्ताद अमीर खाँ, पंडित भीमसेन जोशी, पं. कुमार गंधर्व, पं. मल्लिकार्जुन मन्सूर, पं. रविशंकर, उ. अली अकबर खाँ, उ. विलायत खाँ, उ. बिस्मिल्ला खाँ, किशोरी आमोणकर, बालमुरलीकृष्णन, लालगुडी जयरामन, उ. अल्लारखाँ, पं. किशन महाराज, पं. राम नारायण यांच्यासारख्या अनेक कलावंतांनी अभिजात संगीताकडे पाहण्याची वेगळी नजर रसिकांमध्ये निर्माण केली. त्यासाठी भारतभर होणाऱ्या संगीत महोत्सवांचे योगदान फारच मोलाचे. पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सव असो, की दिल्लीतील तानसेन महोत्सव. कोलकात्यातील डोवरलेन महोत्सव असो, की चेन्नईचा मद्रास म्युझिक सीझन. ग्वाल्हेरचा तानसेन समारोह असो, की पूर्वापार (१८७५) सुरू असलेला पंजाबमधील जालंधर येथील हरवल्लभ संगीत संमेलन. संगीत अधिक व्यापक होण्यासाठी, रसिकांची आवड अधिक सौंदर्यपूर्ण करण्यासाठी, विविध संगीत शैलींचा विकास होण्यासाठी या महोत्सवांनी फार महत्त्वाची कामगिरी केली. उत्तम संगीत ऐकण्यासाठी आतुर असलेल्या कानांना सतत काही तरी नवे, सौंदर्यपूर्ण आणि अभिजात ऐकवण्याची कलावंतांमधील गुणवत्तेची स्पर्धा या दशकात निर्माण झाली. संगीत प्रसाराचे आव्हान पेलण्यास तंत्रज्ञानाचा विकास समर्थ असल्याने ते अधिक महत्त्वाचे नसून कलात्मक संगीताच्या अभिव्यक्तीची ओढ अधिक वाटणाऱ्या या कलावंतांनी त्यानंतरच्या काळातील संगीताचा सारा अवकाश आपल्या स्वरांनी अक्षरश: भारून टाकला. कलावंतांची बिदागी म्हणजे मानधन हे तेव्हाचे आयोजकांपुढील मोठे आव्हान. तिकिटाच्या उत्पन्नावरच अवलंबून असणारी ही संगीताची दुनिया व्यावसायिकतेच्या कठोर कसोटीला अजूनही सामोरी जायचीच होती. त्यामुळे मिळेल त्यात समाधान मानून कलात्मकतेलाच प्राधान्य देणाऱ्या या सगळ्या कलावंतांचे संगीतावरील ऋण न फिटण्यासारखे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Impact of technology on indian music indian musical instruments zws

ताज्या बातम्या