मुकुंद संगोराम
स्वातंत्र्योत्तर काळात वाद्य हे प्रत्येक संगीत मैफिलीचे अभिन्न अंग बनले. वाद्यवादनाच्या शैलीतून निर्माण झालेल्या घराण्यांनाही महत्त्व येऊ लागले….
भारतीय संगीताच्या प्रांगणात वाद्यांचा प्रवेश गायनानंतर झाला, तरी त्यांचा मान मात्र गायनाच्या तुलनेत अधिक बहरला. वाद्यांना शब्दांची आणि त्यातून ध्वनित होणाऱ्या अर्थाची आवश्यकता नसल्याने ते ‘केवल’ संगीत व्यक्त करतात. जगातल्या सगळ्या प्रदेशांत निर्माण झालेल्या संगीत संस्कृतींमध्ये वाद्यांना कदाचित त्यामुळेच महत्त्व प्राप्त झाले असावे. मात्र भारतीय कलांच्या परिघात वाद्यांनी स्पर्धा गायनाशी केली नाही, तर ती स्वत:शीच केली. या वाद्यांवर भारतीय संगीतच वाजवण्यासाठी निर्माण झालेले शैलीवैविध्य हे त्यांचे सहज नजरेत भरणारे वेगळेपण. मग ती वीणा असो की बासरी, सरोद असो की सतार; या वाद्यांनी भारतीय स्वरांचीच आराधना केली. त्यासाठी स्वतंत्र भाषेची निर्मिती केली. ती भाषा रसिकांना समजावी, यासाठी प्रयत्न केले. संगीताचा हा वाद्याविष्कार म्हणूनच मनोहारी झाला. गेल्या शतकभरात तर वाद्यांनी जी प्रचंड कामगिरी केली आहे, तिला तोड नाही. बहुतेक भारतीय स्वरवाद्यांचे वेगळेपण असे, की ती वाजवता येण्यासाठी प्रचंड रियाजाची आवश्यकता असते. काही वाद्यांवर कोणता स्वर कोठे आहे, हे डोळ्यांनी पाहता येत नाही आणि तरीही वादनात स्वरांचा नेमकेपणा येण्यासाठी त्या वाद्यावर जी हुकमत लागते, त्यासाठी वादकाच्या बोटांनाच डोळे यावे लागतात. सतार आणि सरोद ही वाद्ये रसिकाकडे चेहरा करणारी असतात आणि त्यावरील स्वरस्थाने त्याला दिसू शकत नाहीत. वादक मात्र केवळ अंदाजाने स्वरांवर स्वार होतो. हा अंदाज ही त्या कलावंताच्या रियाजाची खूण. मैहर घराण्याचे संस्थापक उस्ताद अल्लाउद्दीन खाँ यांनी या वाद्यांमध्ये अभिजाततेचे बीज पेरले. त्यांचेच पुत्र उस्ताद अली अकबर खाँ, शिष्य पंडित रविशंकर, कन्या अन्नपूर्णादेवी यांनी त्याचा वृक्ष केला. वाद्यवादनातील आलापी, गत, जोड, झाला ही गायनशैलीशी जवळीक साधणारी परंपरा असली, तरी त्यामध्ये त्या वाद्याची विशेषता व्यक्त करण्याचे वेगळेपण आहे. ज्येष्ठ सतारवादक आणि संगीत चिंतक भास्कर चंदावरकर यांचे वाद्यांच्या संदर्भातील पुढील विधान अतिशय महत्त्वाचे आणि मोलाचे. ते म्हणतात, ‘वाद्य हे वदते, तुम्ही सांगाल ते ते बोलते. ज्याला बोलविता येते, त्यालाच वाद्य म्हणायचे. परंतु महत्त्वाचे एक तत्त्व आपण लक्षात घ्यायला पाहिजे, की संगीताचा दर्जा हा वाद्याने ठरत नाही. तो वादकाच्या बुद्धीने आणि प्रतिभेने ठरतो. वाद्याच्या कक्षा, सीमा, क्षमता नेहमी वर्धिष्णू असतात. वाद्यातून असंख्य शक्यता निर्माण होत असतात. वादकाच्या प्रतिभेत त्या सगळ्या शक्यता तशा असतातच असे नाही. त्यामुळे बहुतेक वाद्ये वादकाला पुरून उरतात, हेच खरे. संगीतातून प्रज्ञेचा आविष्कार अनंत काळ सुरू राहतो, तो याचमुळे!’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गायनातील मींड जशी वाद्यांनी स्वीकारली, तशी तंतुवाद्यांमधील घसीट (तारेवर विशिष्ट प्रकारे दाब देऊन ती ओढून त्यातून नेमक्या स्वरापर्यंत पोहोचणे) सुषिर म्हणजे वायुवाद्यात फुंक महत्त्वाची. ती शरीराच्या क्षमतेशी निगडित. स्वरांचा लगाव नेटका होण्यासाठी त्यावर प्रभुत्व आवश्यक. त्यामुळे या वाद्यांच्या वादनात शारीरिक मर्यादा येणेही स्वाभाविक. तारांच्या वाद्यात असे घडत नाही. तारेवर नियंत्रण असेल, तर ते संगीत अधिक काळ विनाथांबा सुरू राहू शकते. असे असले, तरीही प्रत्येक वादक स्वप्रतिभेने वादनात वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतोच. त्या वेगळेपणामुळेच प्रत्येकाचे वादन निरनिराळ्या प्रकारचा आनंद देऊ शकते. पं. रविशंकर, उस्ताद विलायत खाँ, उस्ताद अब्दुल हलीम जाफर खाँ या किंवा आजच्या काळातील उस्ताद शाहीद परवेझ या प्रत्येकाची शैली आणि स्वरांकडे पाहण्याची नजर वेगवेगळी. कुणी गायकी अंगाने तर कुणी तंत अंगाने वादन करतात. स्वरांच्या हिंदोळ्यावर, नाजूक कलाकुसर करीत समेवर अलगद येण्याची या प्रत्येकाची तऱ्हा निराळी आणि देखणीही. त्या वाद्यांच्या अनादी अनंत सर्जक शक्यता वाढवत नेण्यासाठी सगळे कलाकार आपली सारी प्रतिभा पणाला लावत आले आणि त्यामुळेच हे संगीताचे अनोखे दालन समृद्ध झाले. वाद्ये रसिकाच्या मनातले संगीत प्रत्यक्ष साकारू शकतात आणि त्यामुळे रसिकाला एका अनोख्या उन्मनी अवस्थेचा अनुभव येतो. त्याला स्वरांचे पुंज हे जसे कारण, तसेच लयदार वादन हेही महत्त्वाचे कारण. वाद्य संगीतात लयीला मिळालेले असाधारण महत्त्व त्याचे गायनापेक्षा असणारे वेगळेपण दाखवते. उत्तम वाद्यवादनात तालवाद्याची तेवढीच भरदार संगत अतिशय महत्त्वाची. एरवी केवळ साथसंगत करण्यासाठी आणि संगीताला तालाच्या बंधनात आणून एका आकृतिबंधात बांधून टाकण्याची कामगिरी करणारी तालवाद्ये स्वरवाद्यांच्या मैफिलीत तोडीस तोड होत गेली. गायनात तबला हे वाद्य केवळ लयीचे दर्शन घडवण्यासाठी आणि गायनाला अधिक उठाव देण्यासाठी उपयोगात येते. वाद्यसंगीतात मात्र या वाद्याचा बडेजाव अधिक. त्या वाद्यातून व्यक्त होणाऱ्या प्रत्येक स्वरलडीला उजळून टाकण्यासाठी तबलजीही तेवढाच सर्जनशील हवा. या कारणाने भारतीय वाद्यसंगीताच्या क्षेत्रात अनेक प्रतिभावान तबलानवाज निर्माण झाले. त्यांनाही तेवढाच मानसन्मानही मिळू लागला. लयक्रीडा देखणी होण्यासाठी तबला आणि वाद्य यांच्यात एक सुमेळ हवा. त्यासाठी त्या दोन वादकांचा एकमेकांशी संवाद हवा. तो एकमेकावर कुरघोडी करणारा असून चालणार नाही. असे वाद्यवादक आणि असे तबलजी यांच्या जोड्या हे वाद्यसंगीतातील आणखी एक वैशिष्ट्य. पंडित रविशंकर यांच्या बरोबर सतत तबलासाथ करणारे उस्ताद अल्लारखा यांची स्वरसमज तर अचाट म्हणावी अशी (ते स्वत: संगीतकार होते. ४०-५०च्या दशकात ए. आर. कुरेशी या नावाने त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांना संगीतही दिले.).

भारतीय संगीत सातासमुद्रापार जाण्यास ब्रिटिशांच्या राजवटीत फारसा पुढाकार घेतला गेला नाही. स्वाभाविकच ते. रविशंकर आणि अली अकबर खाँ यांच्यासारख्या प्रतिभावंत कलावंतांनी साठच्या दशकात पाश्चात्त्य संगीताच्या दरबारात पहिले दमदार पाऊल ठेवले. पाश्चात्त्यांना भारतीय संगीताची गोडी लावून ते संगीत तेथे प्रस्थापित करणाऱ्या या कलावंताने खऱ्या अर्थाने वैश्विकतेचा पाया रचला. आज अनेक भारतीय कलावंत परदेशात जातात, तेव्हा त्यांना तिथे मिळणारी दाद ही या कलावंतांच्या तेथील पायाभूत कामामुळे मिळते, हे लक्षात घेतले पाहिजे (उस्ताद अली अकबर खाँ यांनी १९५६ मध्ये कोलकात्यात अली अकबर कॉलेज ऑफ म्युझिकची स्थापना केली. पण परदेशातील वाढत्या लोकप्रियतेमुळे कॅलिफोर्नियामध्ये आणि नंतर स्वित्झर्लंडमध्येही त्यांनी ही संस्था स्थापन केली.). जगाच्या नकाशावर भारतीय संगीताची ही पहिलीवहिली सुवर्णमोहोर उमटल्याने, या ‘मेलडी’च्या संगीताकडे अधिक आवडीने पाहणाऱ्या रसिकांच्या संख्येत भरच पडली. भारतीय संगीताची ही स्वरलयीची परंपरा जगविख्यात झाली आणि आज तिचे वटवृक्षात रूपांतर झालेले दिसते. भारतीय स्वातंत्र्यानंतरच्या काळात वाद्य हे प्रत्येक संगीत मैफिलीचे अभिन्न अंग बनले. सतार, सरोद, संतूर, बासरी, वीणा या भारतीय वाद्यांचे मैफिलीतील अस्तित्व नजरेत भरू लागले. वाद्यवादनाच्या शैलीतून निर्माण झालेल्या घराण्यांनाही महत्त्व येऊ लागले. या प्रत्येक वाद्याने संगीत समृद्ध तर केलेच, परंतु आपली परंपरा सततच्या नावीन्याने ताजीतवानी ठेवली. सतारीतून दिसणारा नाजूक अवखळपणा आणि भावोत्कट रसरशीतपणा, सरोदची घनगंभीरता, बासरीचा गोडवा, वीणेतील अभिजातता रसिकांना नवचैतन्य प्राप्त करून देणारी ठरते.

लयदार वादनाच्या निमित्ताने तबला आणि वाद्य यांची जुगलबंदी हे अलीकडच्या काळातील एक आकर्षण बनू लागले आहे. त्याने संगीताचे काही भले होतेच असे नाही. खरेतर एकमेकांना पूरक ठरणाऱ्या अशा जुगलबंदीचा अतिरेक ही आज संगीतासाठी मोठी समस्या झाली आहे. तबलजीने आपल्या कलेचे प्रदर्शन करायचे आणि वाद्यवादकाने फक्त लहरा धरायचा, यामुळे तबलजीला संधी मिळते हे खरे परंतु सवाल-जबाब यासारख्या प्रकारात त्यातील मजेचा भाग हळूहळू कमी होत चालला असून रसिकांच्या टाळ्या मिळवण्याचा नाद वाढू लागला आहे. असे गायनकलेत घडत नाही. ते घडूही नये. वाद्यातील संगीताची खुमारी वाढवत नेता नेता, त्यातील मजा कमी होता कामा नये, याची काळजी वादकांनीच घ्यायला हवी.

mukund.sangoram@expressindia.com

 

मराठीतील सर्व स्वरावकाश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Instrumental in the post independence period integral to music concerts musical style akp
First published on: 18-09-2021 at 00:10 IST