scorecardresearch

स्वरावकाश : संगीत परंपरेतील आधुनिकता

आजपासून बरोबर १०० वर्षांपूर्वी म्हणजे डिसेंबर १९२१ मध्ये हिराबाई बडोदेकर यांना सार्वजनिक मैफलीत गायन सादर करण्याची संधी मिळाली.

हिराबाई बडोदेकर

आजपासून बरोबर १०० वर्षांपूर्वी म्हणजे डिसेंबर १९२१ मध्ये हिराबाई बडोदेकर यांना सार्वजनिक मैफलीत गायन सादर करण्याची संधी मिळाली. त्याआधी स्त्रियांनी अशा पद्धतीने गाणे प्रशस्त मानले जात नसे. परंपरा मोडून काढत नव्या वाऱ्याला अवकाश मिळवून देण्याचे प्रत्येक क्षेत्रातील असे धाडसच जगाला जगवते…

अपरंपरेत नवनिर्माण समाविष्ट असते, नाही तर परंपरा पुढे चालू राहात नाही. हे नव्याने काही शोधत राहणे हेच प्रत्येक कलावंताचे उद्दिष्ट असते. असायला हवे. पृथ्वीवर ठिकठिकाणी वसलेल्या अनेक मानवी समूहांमध्ये हे सतत घडत आले. भारतीय भूमीवर गेल्या हजार-दोन हजार वर्षांत संगीत या कलेच्या परंपरा सतत बदलत राहिल्या. काळानुरूप, कलावंतांमध्ये असलेल्या नवनिर्माणाच्या अनेक कल्पनांमधून, त्या नवकल्पनांना मिळणाऱ्या कमी-अधिक प्रतिसादातून हे घडत राहिले. मानवी समूहांमध्ये मूलभूत प्रेरणा म्हणून एकमेकांवर दबाव आणण्याचे प्रकार सतत होत आले आहेत. अजूनही. त्याचा परिणाम कलांच्या व्यवहारातही होतो. कलांचा संबंध केवळ आणि केवळ मेंदूशी असतो. त्यातही निर्मितीच्या क्षणीच विनाश पावणारी संगीत ही कला आपले अस्तित्व टिकवण्यासाठी सातत्याने धडपड करीत राहिलेली. क्षणोक्षणी पडे, उठे परिबळे, उडे बापडी अशी ही अवस्था. ही अस्वस्थता संगीतासाठी फार उपयोगी ठरणारी. येथील समूहाने तयार केलेल्या कला, त्यांचे नियम, त्यातील सौंदर्यखुणा यामध्ये परकीयांचे आक्रमण होईपर्यंत फार मोठा परिणाम करणारे बदल फारच सावकाश होत राहिले. त्यानंतरच्या काळातील बदल धाकाने, अधिकाराच्या अहंकाराने आणि त्यामुळे वेगाने होत गेले. भारतीय समूहांमध्ये मूलत: असलेल्या प्रेरणांमध्ये आक्रमणाला थोपवणे शक्य नसेल, तर त्याला आपलेसे करण्याची प्रवृत्ती आहे. मुसलमानी आक्रमणानंतर संगीतात ते घडून आले. ५०० वर्षांपूर्वी वास्को द गामाने भारतीय भूमीवर पाऊल टाकल्यानंतरच्या काळात येथे राहणाऱ्या मानवी समूहांमध्ये झालेले बदल वेगळ्या पद्धतीचे होते. त्यात तंत्राचा, तंत्रज्ञानाचा भाग व्यापक होता. येथील माणसांचा, कलावंतांचा त्यामुळे पृथ्वीच्या अन्य भागांत राहणाऱ्या समूहांशी अनेक पातळ्यांवर संबंध येत गेला. जगण्याच्या सगळ्या पातळ्यांवर त्यामुळे एक परिवर्तन सुरू झाले.

आधुनिकतेचे मूल्य प्रस्थापित होण्यासाठी ही पार्श्वभूमी होती. येथील माणसांनी हजारो वर्षे गायलेले संगीत या नव्या मूल्यांनी बदलत गेले. तो वेग कल्पनेच्या पलीकडचा होता. संगीतासारख्या कलांमध्ये होणारे जे बदल खूप सावकाश होत होते, ते आधुनिकतेच्या काळात वेगाने झाले. त्याने संगीताच्या मूलभूत संकल्पनांनाही छेद दिला. समूह संगीतामध्ये संगीत निर्मितीचा अधिकारही समूहाचा असतो. त्याविरुद्ध बंड करून तो अधिकार दूर सारण्यासाठी एकाने निर्मितीचा अधिकार फक्त स्वत:कडे घेणे ही गोष्ट खूप महत्त्वाची होती. त्यामुळे एकल संगीताला प्रोत्साहन मिळत गेले. देशी म्हणजे समूह संगीत आणि मार्गी म्हणजे एकल संगीत अशी एक विभागणी होत गेली. त्यातून कुरघोडी करण्याच्या आदिम प्रेरणांमधून देशी संगीत कमअस्सल आणि मार्गी संगीत हे अधिक अभिजात, असे समजले जाऊ लागले. एकल संगीतात स्वयंप्रेरणेने कलानिर्मिती करता येत असल्याने परंपरेकडे स्वतंत्रपणे पाहण्याची मोकळीक होती. परंपरेतच असलेल्या बदलांचा शोध घेण्याची मुभाही होती. ही मुभा कलावंताला आपापल्या क्षमतेप्रमाणे संगीतात बदल घडवण्यासाठी कारणीभूतही ठरत होती. ख्याल गायनातील घराणे ही संकल्पना येण्याआधीच्या ध्रुपद गायकीत ‘बानी’ होत्या. बानी म्हणजे घराणेच. या बानी म्हणजे संगीत आविष्काराच्या पद्धती. त्यातून घराणे ही संकल्पना येण्यास बराच काळ जावा लागला. एकोणिसाव्या शतकाच्या संधिप्रकाशात घराण्यांचे अस्तित्व अधिक ठळकपणे दिसू लागले. आता अवघ्या एका शतकाच्या अंतरात घराणे ही कल्पना मोडीत काढार्वी ंकवा कसे, अशी चर्चा सुरू होऊन कृतीलाही प्रारंभ झाला.

संगीताचार्य विष्णू नारायण भातखंडे यांच्या १९३७ मध्ये प्रकाशित झालेल्या एका ग्रंथात असा उल्लेख आहे की, आजकाल गायक गायला लागला की, समोरचे प्रेक्षक घड्याळाकडे बघतात. ही तेव्हाची परिस्थिती. आजची स्थिती काय आहे, हे वेगळे सांगायला नको. संगीत ऐकण्यासाठी आवश्यक असणारी स्वस्थचित्तता नाही आणि त्यामुळे त्यातील कमालीच्या अतिसुंदर कलाकुसरीकडे निगुतीने बघण्याएवढी सवड नाही. गेल्या शतकभरात होत गेलेल्या अतिवेगवान नागरीकरणाचा हा थेट परिणाम. ग्रामीण संस्कृतीतील शांत, स्वस्थ असे वातावरण नागर संस्कृतीने गिळून टाकले. चाकांच्या वेगावर जगण्याने ताल धरावा, अशा अवस्थेत मन अधिक चपळ होत गेले. हे चपळ मन ‘नावरे आवरिता’ असे. त्याला सगळे काही आत्ता आणि क्षणार्धात साकार झालेले हवेसे झालेले. त्याचा परिणाम संगीताच्या श्रवणावर होणे अगदीच स्वाभाविक. त्याहून अधिक परिणाम संगीत निर्माण करणाऱ्या आणि ते सादर करणाऱ्या कलावंतांवर जबरदस्त झाला. भारतीय संगीतात निर्मिती आणि सादरीकरण एकाच कलावंताच्या अधिकारातील बाब. पाश्चात्त्य संगीताप्रमाणे संगीत लिहून ठेवणारा वेगळा आणि सादर करणारे कितीही जण असे नाही. शिवाय भारतीय संगीताच्या निर्मितीप्रक्रियेत ते ऐकणाऱ्याचा सहभाग अतिशयच मोलाचा. हा ऐकणारा स्वस्थ नसतानाही, त्याला पकडून ठेवण्याचे अतिरेकी वाटावे असे आव्हान आधुनिकतेने कलावंतांसमोर उभे केले.

स्वातंत्र्यानंतर, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, या कल्पनेला महत्त्व आले. भारत ही एकच संकल्पना आहे आणि येथील सारे काही या एकाच संकल्पनेशी बांधून ठेवलेले आहे, अशा विचारातून झालेले अनेक पातळ्यांवरील गोंधळ आज साडेसात दशकांनंतर आपण पाहात आहोत. जवाहरलाल नेहरूंनी ‘विविधता में एकता’ हा मंत्र दिला खरा, मात्र त्यातून कलांच्या सपाटीकरणालाच प्राधान्य मिळत गेले. नव्या तंत्रज्ञानाने त्यात अधिक मोलाचा वाटा उचलला. हा गोंधळ कलावंत आणि आस्वादक या दोन्ही स्तरांवर अनेक नवी आव्हाने निर्माण करत राहिला. दाक्षिणात्य संगीतात, तीन मिनिटांत राग सादर करणाऱ्या वीणा धन्नमल आणि किमान दोन तास राग आळवणारे टायगर वरदाचारी यांची उदाहरणे दिली जातात. या दोन्ही कलावंतांच्या श्रोत्यांना त्यांचे महत्त्व समजत होते. तीनच मिनिटांत सगळा राग समजल्याची भावना एकीकडे आणि दोन तासांनंतरही अजून बरेच काही सांगण्यासारखे शिल्लक असावे, अशी समजूत दुसरीकडे असा हा संघर्ष होता. आधुनिकतेने संगीतात अन्य प्रवाह मिसळण्याची गती वाढली आणि त्याचा पोहोचही प्रचंड झाला. त्याचवेळी लोकप्रिय होत असलेल्या कोणत्याही प्रकाराचा अनुनयही वाढला. काय आवडते आहे, याचा शोध घेत, जे आवडते, तेच पुन्हा पुन्हा सादर करणे अधिक सोपे आणि श्रेयस्कर, असे कलावंतांनाच वाटू लागले. नवोन्मेषाची झाडे फुलणे साहजिकच लांबत गेले. कलावंत म्हणून लोकप्रिय झालेल्यांनाच, नवे प्रयोग करणे शक्य होऊ लागले. ते प्रयोग रसिकांच्या गळी उतरवण्याची ती प्राथमिक अट झाली. त्यामुळे सरधोपट मार्गाने संगीत करण्याकडे कल वाढू लागला. ऊर्मीने नवे काही करावे, रसिकांच्या आवडण्याची पर्वाही करू नये, आपल्या कलेच्या मस्तीत जगावे, जो ऐकेल तो माझा ही संगीताच्या निर्मितीच्या मुळाशी असलेली कलंदर वृत्ती संगीताच्या क्षेत्रातून हळूहळू हद्दपार होत गेली.

पोशाखी म्हणजे वरवरचे बदल हे आधुनिकतेचे लक्षण नव्हेच. जगण्याच्या मूलभूत प्रेरणांकडे नव्याने पाहण्याची शक्ती, त्या प्रेरणांमागील परंपरा समजून घेत, त्यात बदल करण्याची इच्छा आणि क्षमता, झालेले बदल रुजवण्यासाठी आवश्यक असलेले प्रयत्न, माणूस म्हणून या पृथ्वीवर जन्माला येतानाच घेऊन आलेल्या जगण्याच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठीची धडपड, ही आधुनिकतेची मूल्यव्यवस्था कलांनीही स्वीकारली. उच्च-नीच, जात-पात, धार्मिक अस्मिता, स्त्री-पुरुष भेद या गोष्टींना आधुनिकतेच्या मूल्यव्यवस्थेत थारा नव्हता. भारतीय संदर्भात येथील समाजधुरिणांनी केलेल्या चळवळी, आंदोलने याचा परिणाम होत गेलाच. उत्तर भारतीय संगीताने आपला कर्मठपणा सोडून या नव्या मूल्यांना प्राधान्य दिले. त्यामुळे हिराबाई बडोदेकर यांना १९२१च्या डिसेंबर महिन्यात सार्वजनिक मैफिलीत गायन करण्याची संधी मिळाली. या घटनेला आता १०० वर्षे होत आहेत. स्त्री म्हणून नाकारला गेलेला अधिकार मिळवणाऱ्या हिराबाईंचे आणि ते मूल्य जोपासण्यासाठी समूहाविरुद्ध लढण्याची इच्छा असणारे विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्यासारखे संगीताचार्य आणि त्यांच्या या प्रयत्नांना समाजप्रथेविरुद्ध जाऊन मदत करणाऱ्या हिराबाईंच्या मातोश्री ताराबाई माने यांनी आधुनिकतेचा हा प्रवाह अधिक प्रशस्त केला, हे मान्य करायला हवे.

mukund.sangoram@expressindia.com

मराठीतील सर्व स्वरावकाश ( Swaravkash ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loksatta swaravkash article hirabai barodekar abn

ताज्या बातम्या