|| मुकुंद संगोराम
संगीताच्या दरबारात वाद्यसंगीत हे स्वतंत्र दालनच आहे. त्यातही भारतीय वाद्यांमधील सुषीर तसेच तालवाद्यांनी वाद्यसंगीत अत्यंत समृद्ध केले आहे.  गायकाच्या मनातील भाव अधिक स्पष्ट आणि थेटपणे व्यक्त करण्यासाठी वाद्ये जन्माला आली आणि नंतर त्यांनी स्वत:चा स्वतंत्र संसार थाटला.

संगीताच्या दरबारात कंठसंगीताच्या बरोबरीने पाय रोवून असलेल्या वाद्य संगीताने भारतीय अभिजाततेला किती तरी उंचीवर नेऊ न ठेवले. आजमितीस भारतीय रसिकांमध्ये अतिशय प्रिय असलेल्या सतार, सरोद, वीणा, संतूर, सारंगी या तंतुवाद्यांच्या बरोबरीने बासरी, शहनाई यांसारख्या तोंडाने वाजवण्याच्या सुषिर वाद्यांनी आणि पखवाज, तबला, ढोलकी यांसारख्या तालवाद्यांनीही आपला स्वरसंसार समृद्ध करण्यासाठी अपरिमित कष्ट घेतले. या सगळ्या भारतीय वाद्यांचा इतिहासही प्रदीर्घ. त्यांच्या निर्मितीसाठी मानवापाशी वैज्ञानिक जाणीव निर्माण होणेही क्रमप्राप्तच होते. भारतीय सांस्कृतिक जीवनात संगीत निर्माण करता येऊ शकणारे वाद्य म्हणून माहीत झालेले पहिले वाद्य बासरी. त्यापूर्वीपासून आपल्या सांस्कृतिक विश्वात नारदाची एकतारी अस्तित्वात होती. एकतारीमधून एकाच स्वराचा पुनरुच्चार होत राहतो, याचा अर्थ त्यातून संगीत निर्माण होत नाही. त्यासाठी किमान तीन स्वरांची तरी आवश्यकता. बासरी हे तर संपूर्ण नैसर्गिक वाद्य. त्यामधून गळ्यातून निर्माण होणाऱ्या स्वरांसारखेच स्वर निर्माण होतात. त्यानंतर जन्माला आलेल्या बहुतेक वाद्यांना विज्ञानाचा पाया मिळाला; सौंदर्याला विज्ञानाचे कोंदणच मिळाले जणू. वीणा, सतार, सरोद, संतूर ही वाद्ये निर्माण करण्यासाठी लोखंडाची नाद व्यक्त करता येईल अशी तार करण्याचे तंत्रज्ञानही आवश्यक होते. निसर्गातील उपलब्ध सामग्रीवर चढवलेला हा विज्ञानाचा साज होता.

flowers, plant flowers,
निसर्गलिपी : हिरवा कोपरा
Health Special, Pregnancy , dohale,
Health Special: गरोदरपणा आणि डोहाळे; किती खावे, काय टाळावे?
‘भय’भूती: साहिब हम को डर लागे | Loksatta chaturang Different types of fear infatuation the fear
‘भय’भूती: साहिब हम को डर लागे
How To Avoid White Clothes Getting Stain Of Color Dresses
Video: कपडे धुताना ‘हा’ पांढरा खडा वापरून वाचवा पैसे; बादलीत एका कपड्याचा रंग दुसऱ्याला लागणारच नाही

गळ्यातून बाहेर पडणारा प्रत्येक आवाज किंवा ध्वनी स्वरच असतो असे नाही. त्या इवल्याशा स्वरयंत्रातून नाना प्रकारचे आवाज काढता येतात, हे तर उत्क्रांतीकाळात आधीच लक्षात आलेले असणार. मात्र त्याच स्वरयंत्रातून नादही निर्माण करता येतो, याची जाणीव अधिक महत्त्वाची. गळ्यात असलेल्या स्वरयंत्राची अद्भुत शक्ती ज्या क्षणी मानवाला झाली, तो या विश्वाच्या सांस्कृतिक जाणिवेचा पहिला क्षण असावा. तो नाद मेंदूतील कल्पनांनी नियंत्रित करता येतो, हे समजणे ही त्या जाणिवेची पुढची पायरी. निसर्गात ऐकू येणाऱ्या प्राणिमात्रांच्या आवाजाची नक्कल करता करता या नादाचा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सौंदर्याचा साक्षात्कार होणे, ही मानवी उत्क्रांतीतील सगळ्यात महत्त्वाची घटना. माणूस म्हणून पूर्णत्वाकडे वाटचाल करणारी. या नादांमधून निर्माण होणारे संगीत, ही मेंदूची करामत. नाद व्यक्त करण्यासाठी स्वरयंत्र हे के वळ साधन. मेंदूत तयार होणारे संगीत व्यक्त करण्यासाठी त्या साधनावर संपूर्ण ताबा मिळवण्याच्या धडपडीतून संगीत कलेचा ताजमहाल उभा राहिला. स्वरांची स्थाने नक्की करणे, या एकाच गोष्टीसाठी माणसाला किती काळ घालवावा लागला असेल, याची नोंद नाही. कोणत्याही प्रयोगशाळेविना आणि यंत्राशिवाय षड्ड ते निषाद हे स्वर, त्यांच्या आसपासचे आणखी तीव्र आणि कोमल स्वर आणि त्या स्वरसप्तकाच्या सांदीसापटीत लपेटलेल्या बावीस श्रुती. ही एवढी स्वरस्थाने हे भारतीय संगीताचे मूलद्रव्य. परंतु, संगीत आधी मेंदूत आणि नंतर स्वरयंत्राद्वारे व्यक्त होते. मानवाच्या विकासातील हा टप्पा अधिक महत्त्वाचा आणि कलांच्या दृष्टीने अधिक उपकारकही. मेंदूत निर्माण होणारे सर्जन व्यक्त करण्यासाठी जेव्हा शरीरात जन्मत:च अस्तित्वात असलेल्या स्वरयंत्राच्याही मर्यादा लक्षात येऊ  लागल्या, तेव्हा आणखी काही मार्ग शोधण्यासाठी प्रयत्न करणे भाग पडले असावे. कदाचित त्यातून वाद्यांची निर्मिती झाली असणे शक्य आहे. डोक्यात प्रचंड प्रमाणात निर्माण होणाऱ्या संगीताचे करायचे काय? याचे उत्तर शोधता शोधता जे काही गवसले, त्याला विज्ञानाची प्रगतीही कारणीभूत ठरली. भारतीय संगीतातील प्रत्येक वाद्य म्हणजे माणसाच्या अचाट निरीक्षणशक्तीला, तंत्रज्ञानाने दिलेली साथ होती. स्वरवाद्ये आणि तालवाद्ये या दोन्ही प्रकारांतील वाद्यांमध्ये गेल्या काही शतकांत जे बदल झाले, ते तंत्राच्या विकासामुळे. मात्र त्या वाद्यांमधून व्यक्त होणारे संगीत कलावंतांच्या दिव्य प्रतिभेचेच आविष्कार राहिले, हे विसरता कामा नये.

वादनासाठीचे साधन म्हणजे वाद्य. त्यावर प्रभुत्व मिळवायचे, म्हणजे त्याची भाषा समजावून घ्यायची. प्रत्येकाची भाषा निराळी, त्याचा बाज आणि स्वभावही निराळा आणि त्यातून व्यक्त करता येणाऱ्या संगीताच्या तऱ्हाही अपरिमित. ‘घशा’चा ‘गळा’ तयार करणे, हे मेहनतीचे काम. गळ्यातून येणारा प्रत्येक स्वर त्याच दर्जाचा लागला पाहिजे आणि हवा तेव्हा, हवा तसा गळा फिरवताही आला पाहिजे. हे ऐकायला जेवढे सोपे, त्याहून प्रत्यक्षात आणण्यास किती तरी अवघड. मुळात गळा गायनानुकूल असावा, ही अट एकदा पार केली, की त्यानंतर त्यावर मेहनतीनेच हुक मत मिळवता येते. वाद्य वादनासाठी वाद्यातील स्वरांवर पकड यावी लागते. बोट नेमक्या जागी पडणे, म्हणजेच बोटांना डोळे येणे! वीणा, सतार, सरोद, बासरी यांसारख्या वाद्यांच्या रचनेत तर ते फारच आवश्यक. आपण स्वरांच्या मागे राहून ते नेमके  शोधणे, ही वाद्य वादकासाठीची मूलभूत गोष्ट. ही वाद्ये वाजवताना त्यातील स्वरांच्या जागा दाखवणारे ‘पडदे’ दिसत नाहीत. बासरीला असलेली छिद्रे डोळ्यांच्या कडांनीही सहजपणे स्पष्ट होत नाहीत. या वाद्यांच्या निर्मितीत लाकू ड, लोखंड यांसारखी सगळी नैसर्गिक सामग्रीच वापरली जाते. कंठसंगीतातील स्वर आणि वाद्यातील स्वर यामध्ये तसूचाही फरक न ठेवणारी ही वाद्ये अभिजात संगीताच्या मैफलीतील अविभाज्य भाग बनली. त्यामुळे गायन आणि वादन यातील संगीताचा आविष्कार भारतीयत्वाचाच होता. जे मनात आहे, ते व्यक्त करण्यासाठी गळा पुरेसा पडत नाही, म्हणून कलावंताच्या प्रतिभेला प्रतिसाद देण्यासाठी ही वाद्ये जन्माला आली. त्यामुळे त्यातील संगीत अस्सल देशी असले, तरीही त्यांनी गायनशैलीशी स्पर्धा करण्याच्या भानगडीत न पडता स्वत:चा स्वतंत्र संसार थाटला. त्याचे नवे कल्पनाचित्र रंगवले. त्यासाठी संगीताच्या नवनव्या कल्पनाही शोधल्या. प्रत्येक वाद्याने आपली वादनशैली तयार केली. त्यातून भारतीय संगीताकडे नव्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न केला. संगीत मनात असले, तरी ते जसेच्या तसे व्यक्त होण्यासाठी साधनावर प्रभुत्व हवे. ते वाद्य वादकांनी कमावले आणि भारतीय अभिजात संगीताचे आकाशच विस्तारले.

गायनात निसर्गत: श्वास घेण्याची गरज असते. संगीताच्या परिभाषेतील हा ‘दमसास’ महत्त्वाचा. किती जास्त काळ श्वास रोखून धरत गायन करता येते, याचे हे मोजमाप. श्वास घेतानाचा किंचित क्षण खरे तर संगीत प्रवाही ठेवत असतो. गायनात साथीचे वाद्य उपस्थित झाले असेल, ते कदाचित याच कारणासाठी. श्वास घेण्याच्या क्षणांतही स्वर निनादत राहण्याची आवश्यकता संगीताचा आनंद वाढवत नेणारी असते, याचे हे स्वरभान. कलावंत श्वासाव्यतिरिक्त जी विश्रांती घेतो, ती त्याच्या पुढील क्षणांच्या सांगीतिक सर्जनाच्या वाटचालीसाठी. अशी विश्रांतीही मैफलीत किती स्वरगर्भ असते, याचा अपूर्व अनुभव रसिकांना अनेकदा येतो. तंबोऱ्यावर सातत्याने निनादत राहणारे षड्ज पंचम हे स्वर आणि साथ करणाऱ्या स्वरवाद्यातून कलावंत गात असलेल्या रागाचे अनुरणन यामुळे मैफलीत स्वरसातत्य राहते आणि संगीताचा आनंद प्रवाही राहतो. वाद्यांनाही अशा श्वासाची गरज असते का? बासरी वाजवताना ती असणे स्वाभाविक. मात्र तंतुवाद्यांमध्ये सलग कितीही काळ वादन करीत राहणे अगदीच शक्य. तरीही वाद्यवादनात अशी विश्रांती (प्रेग्नंट पॉज) संगीत श्रवणाची खुमारी अधिक वाढवते. हा थांबा जेवढा कलावंताच्या नवसर्जनासाठी महत्त्वाचा, तेवढाच रसिकांसाठीही महत्त्वाचा. आधी ऐकलेल्या स्वरांना मनात सामावून घेत पुढील नव्या आणि अनपेक्षित स्वरलडींची प्रतीक्षा करण्यासाठी हा क्षणभराचाच (क्षण = डोळ्याची पापणी लवण्याचा काळ) काळ फारच उपयोगी. रसिकांनी कलावंताच्या स्वरप्रवासात सहभागी होण्याची ही खरी तयारी. यासाठीच जाणकार रसिकांसमोर कला सादर करण्याची अपूर्वाई अनुभवण्याची संधी कलावंत शोधत असतात.

भारतीय वाद्यांनी दिलेले योगदान अभिजात संगीताचे दालन कमालीचे समृद्ध करणारे आहे. भारतीय सांस्कृतिक संदर्भात देवीदेवतांच्या हाती शस्त्रांच्या बरोबरीने वाद्येही आहेत. हा संदर्भ जगण्याशी जोडण्याची करामत कलाकार करीत आले आहेत. उत्क्रांत अवस्थेत निसर्गातील साधनसामग्रीच्याच आधारे वाद्ये निर्माण करून संगीताची नवी परिभाषा शोधून काढण्यात मानवाला यश आले. ही भाषा स्वरगंधित करून तिला मैफलीत अग्रभागी बसवणाऱ्या सगळ्या कलावंतांचे त्यासाठी आपण ऋणी राहायला हवे.

 

mukund.sangoram@expressindia.com