स्वामी म्हणे संत दावितील खूण। घ्यावी ओळखून ज्याची त्यानें! आता सद्गुरू देहात असतानाच खूण देतील, असं नव्हे. फरक इतकाच की काही वेळा ती खूण ज्याची त्याला ओळखणं थोडं अधिक कठीण जाईल. एका साधकाचा अनुभव ऐका. ते तरुणपणी उमदे आणि देखणे होते. लग्न झालेलं, तरी एका तरुणीकडे आकर्षित झाले. तिचंही प्रेम असावं, पण यांच्या बाजूनं मात्र केवळ शारीरिक ओढ होती. एकदा एकांतात भेटायचं दोघांनी ठरवलं. हे निघाले आणि रस्त्यावरून जाताना एका पुस्तकाच्या दुकानाकडे सहज लक्ष गेलं. दुकानाच्या दर्शनी भागात काचेच्या कपाटात अनेक पुस्तकं होती. त्यात ते ज्या सत्पुरुषाला फार मानत त्यांच्या पुस्तकाकडे यांचं लक्ष गेलं. पुस्तकाचं शीर्षक होतं, ‘व्हेअर आर यू गोइंग?’ पुस्तकावरील त्या सत्पुरुषाचं छायाचित्र पाहताना जणू ते आपल्यालाच हा प्रश्न विचारत आहेत, असं त्या साधकाला वाटलं. अरे, तू कुठे निघाला आहेस? जिथं जात आहेस ते योग्य आहे का? या प्रश्नानं त्यांचं अंतर्मन जणू चिरलं गेलं आणि चुकीच्या दिशेनं पडत असलेली पावलंही थबकली! तेव्हा सद्गुरू देहात असोत की नसोत, ते मला सदोदित सावध करीत असतात. साधकाला जागं करणारे आणि साधनपथावर अग्रेसर होण्याची प्रेरणा देणारे अनेकानेक अभंग स्वामी स्वरूपानंद यांच्या ‘संजीवनी गाथे’तही आहेत. त्याही या खुणाच आहेत! आता इथवर जी ओवी आपण पाहात आहोत तिच्या ‘मग अपेक्षित जें आपुलें। तेही सांगती पुसिलें।’ या पूर्वार्धाचा बराचसा विचार झाला. नुसतं ‘ज्ञान’ ऐकून ‘अज्ञान’ नष्ट होतं का, या प्रश्नाच्या अनुषंगानं ‘जेणे अंत:करण बोधलें। संकल्पा न ये।।’ या उत्तरार्धालाही आपण स्पर्श केला. थोडा या उत्तरार्धाबाबतच अधिक विचार करू. सद्गुरूंचा प्रत्यक्ष देहानं असो की आंतरिक, पण सहवास लाभला की आपलं चुकतं कुठे, आपण नकळत गुंततो कुठे, अडकतो कुठे, हे समजू लागतं. जगाचं खरं बाह्य़ रूप उमगू लागतं. माझ्याच इच्छा, अपेक्षा, वासनांच्या भिंगातून मी जगाकडे आजवर पाहात आलो. या जगात माझ्यासकट प्रत्येक जणच स्वार्थकेंद्रित असल्यानं प्रत्येकाची ‘मी’च सुखी व्हावं, ‘मी’च श्रेष्ठ व्हावं, ‘मी’च निश्चिंतं व्हावं, सर्व काही माझ्याच मनाजोगतं व्हावं, हीच इच्छा असते ना? त्या इच्छेतला फोलपणा समजू लागतो. सद्गुरूंचे शब्दही त्या जोडीला सावध करीत असतात, आधार देत असतात. ‘संजीवनी गाथे’त (अभंग १९०) स्वामी म्हणतात – ‘‘जों जों धरी जीव प्रपंचाची आस। तों तों त्याचा फांस दृढावतो।। १।। जों जों राहे जीव प्रपंची उदास। तों तों त्याचा फांस ढिला होय।। २।। कां गा जासी वृथा प्रपंची गुंतून। पाहें विचारून सारासार।। ३।। स्वामी म्हणे देहीं उदास राहून। करीं सोडवण तुझी तूं चि।। ४।।’’ आता आधीच म्हटलं गाथेतला प्रत्येक अभंग खूणच आहे. जो प्रपंचाच्या झळांनी बेजार आणि असहाय आहे, त्यालाच ही खूण कळेल आणि पटेल! पण हा अभंग प्रपंच सोडायला सांगत नाही. कारण यातले प्रपंच, वृथा, उदास हे शब्द शब्दापलीकडचंही बरंच काही सांगतात! ती खूण पाहू.