माणसाचं पूर्ण जगणं भगवद्समर्पित, भगवंतकेंद्रित झालं पाहिजे, हीच संतांची शिकवण होती. आता आपलं जगणं कसं आहे? ते कर्ममयच आहे. आपल्या आयुष्यातला एकही क्षण कर्माशिवाय जात नाही. मग ते कर्म कर्मेद्रियांच्या योगानं पार पाडलं जाणारं शारीरिक कर्म असो, कल्पना करणं, इच्छा जोपासणं या पद्धतीचं मानसिक पातळीवरील कर्म असो वा विचार करणं, निर्णय घेणं या पद्धतीचं बौद्धिक पातळीवरील कर्म असो. तर जीवनातला प्रत्येक क्षण कोणत्या ना कोणत्या कर्मातच सरत आहे. त्यामुळे जर प्रत्येक कर्म भगवंतसमर्पित झालं, भगवंताच्या चिंतनात झालं तर मग आपोआप सर्व जगणंच भगवंतमय होईलच ना? त्यामुळे कर्म भगवंत समर्पित वृत्तीनं निरासक्त भावानं करण्यावर एवढा भर आहे. आयुष्यात एकसमान स्थिती कधीही राहत नाही. यश आणि अपयश, लाभ आणि हानी अशा समस्त द्वैताचा स्वीकार करावाच लागतो. त्यामुळे एखादं कार्य आपण सुरू केलं तर ते पूर्णत्वाला जाईलच, त्यात यश येईलच, असं नाही. आपल्यालाही ही गोष्ट माहीत असतेच, पण तरीही यश-अपयशाबाबत आपण अगदी हळवे असतो.  हाती घेतलेल्या कार्यात यश आलंच पाहिजे, हा आपला स्वाभाविक भाव असतो. प्रत्यक्षात एखादं कर्म पूर्णत्वास जाणं, त्यात यश येणं यात आपल्या प्रयत्नांइतकाच परिस्थितीच्या अनुकूलतेचाही वाटा मोठा असतो. त्यामुळे एखाद्या कार्यातलं यश केवळ प्रयत्नांमुळे नसतं. पुन्हा लक्षात घ्या, इथे प्रयत्नांना हीन लेखण्याचा कणमात्र उद्देश नाही. पण वस्तुस्थिती एवढीच आहे की प्रयत्न जितके अनिवार्य असतात तसेच यशासाठी इतरही अनेक बाबी अनिवार्य असतात. आपण मात्र यश आलं की हुरळून जातो आणि अपयश आलं तर खचून जातो. थोडक्यात दोन्ही वेळा आपल्या मनाची समतोल वृत्ती उरत नाही. ती साधण्याचा अभ्यास या तीन ओव्यांत सांगितला आहे. एखादं काम पूर्णत्वास गेलं तरी आनंदून मनाचा तोल बिघडू देऊ नकोस किंवा एखादं काम अपूर्ण राहिलं तरी निराशेनं खचून मनाचा तोल बिघडू देऊ नकोस. उलट प्रत्येक कर्म भगवद्इच्छेनं आलं आहे, ते कर्तव्यभावनेनं त्याच्याच चिंतनात यथायोग्य करण्याचाच अभ्यास वाढव, असंच माउलींना सांगायचं आहे. याचा अर्थ कर्म आळस वा अनमानापायी जाणीवपूर्वक अपूर्ण राखायचं नाही. तसं होऊ नये म्हणून तर प्रत्येक कर्म हे भगवंतसमर्पित भावनेनं करायला सांगितलं आहे! भगवंताला आपण वाईट वस्तू देऊ का? नाही. आपण चांगल्यातलं चांगलंच अर्पण करायचा प्रयत्न करू. मग अपूर्ण कर्मदेखील त्यालाच समर्पित कसं करता येईल? तर ते भावनेनं साधेल. कर्म करताना भाव भगवंताचाच असला तर ते अपुरं कर्मही तो गोड मानून घेतो. बापानंच स्वयंपाक रांधला, ताट भरलं आणि त्या ताटातून चिमुकला घास उचलून मूल बापाला भरवू पाहात आहे, तर बापाला किती आनंद होतो! अगदी त्याचप्रमाणे कर्मक्षमता भगवंतानंच दिली, कर्म पूर्णत्वास नेण्यासाठीची साधनंही त्यानंच पुरवली आहेत. मग ते कर्म त्याच्याच चिंतनात झालं तर त्यायोगे देहबुद्धीचा मला विसर पडू लागल्याचा त्याला किती आनंद होईल!