सद्गुरूंच्या बोधाप्रमाणे आचरण, त्यांच्या इच्छेनुसार माझी आंतरिक जडणघडण होणं, ही त्यांची खरी सेवा आहे. ते ज्या स्थितीत ठेवतील त्या स्थितीत राहून त्यांच्या बोधानुरूप जगणं, हा खरा प्रणिपात आहे, हे आपण पाहिलं. आता अशी सद्गुरूमय स्थिती होणं सोपं नाहीच, पण जो त्यासाठी प्रामाणिकपणे, अंत:करणपूर्वक अर्थात मन, चित्त, बुद्धी व ‘अहं’ जाणिवेला त्या अभ्यासात वळवण्याचं ‘तप’ करू लागतो, ती या खऱ्या सेवेची, खऱ्या प्रणिपाताची थोडी सुरुवात म्हणता येईल. आता अशी स्थिती ज्याच्या अंत:करणात उमलू लागेल, त्याला प्रश्न तरी काय पडेल हो? त्याच्या मनात अपेक्षा तरी कसली उरेल? माउलींनी पसायदानात काय मागितलं? ‘खळांची व्यंकटी सांडो। तयां सत्कर्मी रती वाढो। भूतां परस्परें पडो। मैत्र जीवांचे।’ दुष्टांचा दुष्टावा संपो, त्यांना सत्कर्मात गोडी वाटो आणि सर्व भूतमात्रांमध्ये सख्य निर्माण होवो. पुढे काय म्हणाले? ‘दुरितांचे तिमिर जावो। विश्व स्वधर्म सूर्ये पाहो।’ अज्ञानाचा अंध:कार मिटो आणि सूर्य उगवताच लख्ख प्रकाश पडून रस्ता उजळावा, त्याप्रमाणे ‘मी काय आचरण केलं पाहिजे,’ याचं ज्ञान प्रत्येकात उत्पन्न होऊन त्या साध्यासाठीचा साधनमार्ग प्रकाशित होवो. इतकं झाल्यावर काय म्हणतात? ‘जो जे वांछील तो ते लाहो।’ ज्याला जे हवं ते प्राप्त होवो! अहो, आता दुष्टांचा दुष्टावा संपला, अज्ञान संपलं, साधनमार्गावर योग्य वाटचाल सुरू झाली, तर कोणती वांछा म्हणजे इच्छा मनात उरणार? ‘भजिजो आदिपुरुषी। अखंडित।’ हीच ना? ‘मी’ आणि ‘तू’ हे द्वैत झालं, तर ‘मी’ नाहीच, फक्त ‘तूच’ हे अद्वैत आहे! या अद्वैत स्थितीची अखंड प्राप्ती राहावी, हीच एकमेव इच्छा असणार ना? असं कोणतं अज्ञान शिल्लक आहे, ज्या योगे ‘केवळ तूच’ ही अभेद स्थिती अंत:करणात दृढ नाही, ते अज्ञान दूर कसं करावं, हाच एकमेव प्रश्न असणार ना? आणि हाच तो खरा प्रश्न आहे हो! आमचे सगळे प्रश्न अशाश्वताशी घुटमळत असतात. जे कोणत्याही क्षणी लोपणारं आहे, याबाबतची सारी तळमळ, सारे प्रश्न हे ठिसूळच असतात. जे शाश्वत आहे त्याचं भान कसं यावं, हाच खरा प्रश्न आहे. हाच प्रश्न सद्गुरूरत साधकाच्या अंत:करणात उत्पन्न होतो. ‘तद् विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया। उपदेक्ष्यंति ते ज्ञानं ज्ञानिस्तत्त्वदर्शिन:।।’ या श्लोकाचंच प्रतिबिंब स्वामी स्वरूपानंद यांच्या अभंगांमध्येही आहे. ‘संजीवनी गाथे’त (अभंग १७८) स्वामी सांगतात : संतांसी सद्भावें करोनी प्रणिपात। कांही आत्म-हित विचारावें।। १।। काय ती विरक्ति कैसी आत्म-स्थिति। ज्ञानाची प्रचीति कैसी होय।। २।। कैसी हरि-भक्ति कैसी शरणागति। नामाची महती कैसी काय।। ३।। स्वामी म्हणे संत दावितील खूण। घ्यावी ओळखून ज्याची त्यानें।। ४।। सद्गुरूंची खरी सेवा (त्यांच्या बोधानुरूप आचरण) आणि खरा प्रणिपात (ते ज्या स्थितीत ठेवतील तिचा स्वीकार) सुरू होतो तेव्हा प्रपंचाचा प्रश्नच मनात येत नाही. प्रश्न एकमेव उरतो तो आत्महिताचा! ते साधण्यासाठी आवश्यक ती विरक्ती, ज्ञान, भक्ती, उपासना कशी साधेल, हाच तो खरा प्रश्न!