१८१. परीघ अन् केंद्रबिंदू

स्वामी म्हणाले ना? सर्व काही मनासारखं होईल, तेव्हा जे घडत आहे ते मनाविरुद्ध नाहीच, ही जी सुशीलाबाई देसाई यांची आत्मतृप्त अवस्था होती तीच स्वामी स्वरूपानंद संपादित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील ४०, ४१ आणि ४२ या ओव्यांत सांगितली आहे.

स्वामी म्हणाले ना? सर्व काही मनासारखं होईल, तेव्हा जे घडत आहे ते मनाविरुद्ध नाहीच, ही जी सुशीलाबाई देसाई यांची आत्मतृप्त अवस्था होती तीच स्वामी स्वरूपानंद संपादित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील ४०, ४१ आणि ४२ या ओव्यांत सांगितली आहे. या ओव्या, त्यांचा प्रचलित अर्थ आणि विशेषार्थ विवरण पुढीलप्रमाणे :
देखें अखंडित प्रसन्नता। आथी जेथ चित्ता। तेथ रिगणें नाहीं समस्तां। संसारदु:खां।। ४०।।
(अ. २ / ३३८)
जैसा अमृताचा निर्झरु। प्रसवे जयाचा जठरु। तया क्षुधेतृषेचा अडदरु। कंहींचि नाहीं।। ४१।। (अ. २ / ३३९)
तैसें हृदय प्रसन्न होये। तरी दु:ख कैचें कें आहे। तेथ आपैसी बुद्धि राहे। परमात्मरूपीं।। ४२।। (अ. २ / ३४०).
विशेषार्थ विवरण: पाहा, जेथे चित्ताला निरंतर प्रसन्नता असते तेथे कोणत्याही संसार दु:खाचा प्रवेश होत नाही (४०). ज्याप्रमाणे अमृताचा झरा ज्याच्या पोटातच उत्पन्न होतो, त्याला तहानभुकेची भीती कधी नसते (४१). त्याप्रमाणे अंत:करण प्रसन्न झाले तर मग दु:ख कसले आणि कोठले? त्यावेळी परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी बुद्धी सहजच स्थिर होते (४२).
प्रचलितार्थ :  श्रीगोंदवलेकर महाराज म्हणत की, ‘दु:खाची जाणीव नसली तर मग दु:ख असलं म्हणून कुठे बिघडलं?’ गाढ झोपेत असताना घरात चोरी झाली, पण जाणीवच नसल्यानं चोरीचं दु:खही नव्हतं, जाग आली आणि चोरी झाल्याचं कळल्यावर दु:खानं मन भरून गेलं! सर्वसामान्य माणसाची ही स्थिती असते. योग्याची कशी असते? रमण महर्षिच्या कुटीत एके रात्री चोर शिरले. त्यांचे शिष्य त्यांना मारायला धावले तर रमणांनी अडवले. म्हणाले, ‘‘चोरांना चोरांचं काम करू द्या, आपण साधू आहोत, आपण साधूचं काम करू!’’ ज्याचं चित्त निरंतर प्रसन्नच असतं त्याच्या अंतरंगात संसारदु:ख प्रवेश करीत नाही.  संसारच कसा दु:खानं ओथंबून आहे, हे दाखवताना माउली म्हणतात, ‘‘जिये लोकीचा चंद्र क्षयरोगी। जेथ उदयो होय अस्तालागीं। दु:ख होऊनी सुखाची आंगी। सळित जगातें।।’’ (अ.९/५०२).  या मृत्युलोकातला चंद्र घटतच जातो, अस्ताला जाण्यासाठीच सूर्य उगवतो, दु:ख सुखाचा पोशाख करून जगाला छळत आहे! या संसारात काय दु:ख एकाच प्रकारचं का आहे? हानीचं दु:ख, वियोगाचं दु:ख, दुराव्याचं दु:ख, अपमानाचं दु:ख, उपेक्षेचं दु:ख, अपेक्षाभंगाचं दु:ख, अपयशाचं दु:ख, प्रतिकूलतेचं दु:ख, निंदेचं दु:ख अशी कितीतरी प्रकारची दु:खं वाटय़ाला येतात. भीती, चिंता, काळजी यांनीही मन पोखरत असतं. त्यातही मरणाची भीती, पैशाची चिंता आणि आपली माणसं गमावण्याची काळजी मुख्य असते. संसारदु:खाचा परीघ असा व्यापक असतो. मग ज्याच्या चित्तात संसारदु:खच प्रवेश करीत नाही इतकी प्रसन्नता भक्तामध्ये का असते? संसाराचा परीघ जरी द्वैतानं आणि द्वंद्वानं व्यापला असला तरी त्याचा केंद्रबिंदू केवळ सद्गुरूबोध असतो, हेच याचं कारण आहे!  

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Swaroop chintan circle and center

ताज्या बातम्या