गुरुकृपेनं अंतरंगात निर्माण होणाऱ्या ज्ञानशक्तीचं  सामथ्र्य असं अद्भुत आहे की अंतरंगातून ते ज्ञान प्रत्यक्ष अनुभवात उतरू लागेल, असं भगवंत सांगतात. स्वामी स्वरूपानंद संपादित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील ५५वी ओवी हेच सांगते. ही ओवी, तिचा ज्ञानेश्वरीतील क्रम, प्रचलितार्थ आणि विवरण आता पाहू. ही ओवी अशी :
मोटकें गुरुमुखें उदैजत दिसे। हृदयीं स्वयंभचि असे। प्रत्यक्ष फावों लागे तैसें। आपैसयाचि।। ५५।। (अ. ९ / ४९).
प्रचलितार्थ :  गुरुमुखातून ते ज्ञान अंमळसे उगवताना दिसते, पण ते हृदयात मूळचे सिद्धच असते. तसे ते आपोआप प्रत्यक्ष अनुभवाला येऊ लागते.
विशेषार्थ  विवरण :  जीव हा परमात्म्याचा अंश आहे. परमात्मा हा ज्ञानस्वरूप आणि आनंदस्वरूप आहे. त्यामुळे जिवातही ते ज्ञान आहेच, मात्र  त्याच्या वासनायुक्त अंत:करणावर जन्मोजन्मी देहबुद्धीचा वज्रलेप लागल्याने मुळातच असलेले हे ज्ञान झाकले गेले आहे. उलट अज्ञानाच्या प्रभावातून जीव श्रेयसऐवजी प्रेयससाठी भरकटत राहिल्याने आनंदस्वरूप परमात्म्याचा अंश असलेला जीव हा ‘दु:ख’ भोगत आहे. जोवर आत्मज्ञान जागं होणार नाही, तोवर अज्ञान मावळणार नाही. जोवर अज्ञान मावळणार नाही तोवर जगणं खऱ्या अर्थानं आनंदाचं होणार नाही. जेव्हा साधक सद्गुरूंच्या सेवेत रत होतो, अर्थात तन, मन आणि जीव लावून त्यांच्या बोधानुरूप जगायचा प्रयत्न करू लागतो तेव्हाच सद्गुरू त्याला खऱ्या आनंदाचा मार्ग दाखवतात. अर्थात अज्ञानाच्या मार्गापासून त्याला परावृत्त करू लागतात. त्याच्या जगण्यातील अज्ञान त्याला कसं जाचत आहे, ते दाखवतात. साईबाबांनी सांगितल्यानुसार ‘उपदेक्ष्यंति ते अज्ञानं’ ते हेच! जीव सद्गुरू बोधानुरूप प्रयत्न न करता त्याच्या आवडीनुसार अनंत मार्गानी कित्येक काळासाठी कितीही का कष्ट करेना, त्याच्या अंतरंगातील आत्मज्ञान जागं होणं अशक्य आहे. स्वामी स्वरूपानंदही सांगतात, ‘‘गुरुकृपेविण नाहीं आत्म-ज्ञान। वाउगी तो शीण साधनांचा।।’’ (संजीवनी गाथा, अभंग क्र. ६५). आता ही गुरूंची कृपा कधी होईल? तर तो प्रसन्न होईल तेव्हा! आता सद्गुरू प्रसन्न कधी आणि कशानं होतील? याच  ६५व्या अभंगाच्या अखेरच्या चरणात स्वामी सांगतात, ‘‘गुरू-सेवेविण जावों नेदीं क्षण। तेणें तो प्रसन्न स्वामी म्हणे।।’’ गुरूच्या सेवेशिवाय साधकाचा एकही क्षण सरत नाही, तेव्हाच सद्गुरू प्रसन्न होतो. आता ही ‘सेवा’ म्हणजे काय हो? तर सद्गुरूच्या सांगण्यानुसार वागणं हीच त्याची खरी सेवा आहे. स्वामींनी अमलानंदांनाही तेच सांगितलं होतं, हे आपण मागे पाहिलंच आहे. ‘सेवा’ या शब्दात आणखी एक छटा आहे ती सेवनाची! मुखानं अन्नाचा घास घेणं, हे केवळ सेवन नव्हे. कानानं सद्गुरूचा बोध ऐकणं हे कानांद्वारे होणारं यथार्थ सेवन आहे. डोळ्यानं सद्गुरूंचं रूप, अक्षररूप पाहणं, वाचणं हे डोळ्यांद्वारे होणारं यथार्थ सेवन आहे. सद्गुरूबोधाचं मनन हे मनाचं, सद्गुरूबोधाचं चिंतन हे चित्ताचं सेवन आहे!