स्वामी स्वरूपानंद यांनी संकलित केलेल्या पुढील ओव्या, त्यांचा ज्ञानेश्वरीतील क्रम, प्रचलित अर्थ आणि विशेषार्थ विवरण आपल्या याच चिंतनाच्या १४५व्या भागांत आपण वाचलं आहेच. तरी पुनरुक्तीचा दोष पत्करून एकेका ओवीचं विवरण करताना या क्रमानुसार ही माहिती परत वाचू. पुढील ओवी अशी  :
देखें प्राप्तार्थ जाहले। जे निष्कामता पावले। तयांही कर्तव्य असे उरलें। लोकांलागीं।। ३१।। (अध्याय ३ / ओवी १५५).
प्रचलितार्थ : पाहा, मिळवावयाचे ते ज्यांनी मिळविले व म्हणून निरिच्छ झाले, त्यांनादेखील लोकांना वळण लावण्याकरिता कर्म करणे प्राप्त आहे.
विशेषार्थ विवरण: या ओवीशी आपल्यासारख्या सर्वसामान्य साधकांचा तसा संबंध नाही, असं आपल्याला वाटेल. कारण ती निष्काम स्थिती आपल्याला प्राप्त झालेली नाही, असं आपण सहजपणे मानतो. मग साधकासाठी ही ओवी काय सांगते? सद्गुरूची प्राप्ती ही अध्यात्म मार्गावरली सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. हा सद्गुरू खरा पाहिजे, हे तर अध्याहृतच आहे. एकदा हा समर्थ आधार प्राप्त झाला की मनातली काळजी, चिंता, खळबळ, अस्वस्थता ओसरत असल्याचा अनुभव येऊ लागतो. मग साधनेतही शिथिलता येण्याचा धोका असतोच. ‘आपण कुणी तरी झालो’ असा भ्रमही मनात येऊ शकतो. पण तरी साधक काही जगाच्या पकडीतून सुटला नसतो. उलट कर्तव्यपूर्तीबाबतची त्याची जबाबदारी फार वाढली असते. समजा मी या अध्यात्मा-बिध्यात्माच्या मार्गाला लागलोच नाही आणि कौटुंबिक कर्तव्यातही कुचराई किंवा दिरंगाई केली, तरी कोणी लगेच आक्रमकपणे मला जाब विचारणार नाही. या मार्गात आल्यावर अशी दिरंगाई वा कुचराई होण्याची कुणाच्या मनात शंकाही येऊ दे, लगेच सगळे या मार्गावरच खापर फोडायला सुरुवात करतील. ‘आता काय देव-देव करायला लागलाय, मग घराचं वाटोळ व्हायला काय वेळ’, असा सूरही लगेच लावला जाईल. तेव्हा पहिल्या पायरीवर जेमतेम पाऊल टाकत असलेल्या आपल्यासारख्या साधकाला ही ओवी काय सांगते? की बाबारे निष्कामता ही आंतरिक स्थिती असली पाहिजे. दाखविण्याची, बोलण्याची किंवा चर्चेची नव्हे! आपल्याला वाटतं की आता आपल्याला मोह नाही, आसक्ती नाही, काळजी नाही. प्रत्यक्षात तशी आंतरिक स्थिती आहे का, याची खातरजमा न करता आपण त्याची प्रसिद्धीच करू लागतो. तेव्हा माउली सांगतात, निष्कामता, अनासक्ती, अनाग्रह ही आंतरिक स्थिती असली पाहिजे. बाहेरून प्रपंचात वावरत असलेल्या, समाजात वावरत असलेल्या देहाच्या द्वारे सर्व कर्तव्यं मी पार पाडलीच पाहिजेत. कारण ती कर्तव्यं माझ्याच प्रारब्धकर्माचं फळ म्हणून माझ्या वाटय़ाला आली आहेत. ती टाळून मी प्रारब्ध टाळू शकणार नाही. आज ना उद्या ती र्कम पुन्हा माझ्यासमोर उभी ठाकतीलच. त्यामुळे कर्मरत तर राहिलं पाहिजेच, एवढंच नाही तर प्रत्येक कर्तव्यकर्म नेटकेपणानं पार पाडण्याचाही प्रयत्न केला पाहिजे.