देहबुद्धीचं दास्य सोडून उदासीन झाल्याशिवाय देहबुद्धीच्या पसाऱ्यातून, प्रपंचाच्या गुंत्यातून मनानं सुटणं शक्य नाही. देहबुद्धीतून ‘मी’ आणि ‘माझे’ प्रसवले आणि या दोहोंच्या भ्रमयुक्त, मोहयुक्त ओढीतून प्रपंचाची आसक्ती फोफावली आहे. स्थूलातला प्रपंच नेहमीच मर्यादित असतो. सूक्ष्मातला त्याचा पसारा मात्र कित्येक पटींनी मोठा असतो. आपण प्रत्यक्षात लहानशा घरात राहात असू, पण मनात आपण हवेल्या बांधल्या असतात! देह स्थूल आहे, मन सूक्ष्म आहे. भौतिकात मी जे काही प्राप्त करतो, टिकवतो ते दैवाच्या साथीनं देहाच्या आधारावर, देहाच्या जोरावर केलेल्या कर्मातून साधलं असतं. त्याला मर्यादा असते. मनाला मात्र मर्यादा नाही. अमुक मिळावं, अमुक व्हावं, हा पसारा मनात त्यामुळे हजारो पटींनी वाढत असतो. त्यामुळे उदासीन झालं पाहिजे ते मन! मनाला उदासीनता आल्याशिवाय हवेपणाचा मनातला पसारा कमी होणार नाही. ध्येयशिखर गाठता येणार नाही. एखाद्यानं उजव्या-डाव्या खांद्यावर दोन-दोन वजनदार थैल्या घेतल्या आहेत, दोन्ही हातांतही दोन ट्रंका आहेत आणि डोईवरची वळकटी सावरण्याचाही प्रयत्न करीत आहे; तर त्याला  इतक्या ओझ्यासह हिमालयाचं शिखर गाठता येईल का? पायथ्याशी पोहोचेपर्यंतच दमेल तो! आपलं ध्येय उच्च असतं, पण आचरण खुजं असतं. मग कसं साधावं? एकदा सद्गुरूंना विचारलं की, ‘‘गुरुजी ‘मी’ आणि ‘माझे’ कसं नष्ट व्हावं?’’ खिशात दमडी नाही आणि महागडय़ा दुकानात जाऊन जरा चांगल्यातली महागडी कापडं दाखवा, असं म्हणण्यासारखंच आहे हे! सद्गुरूंनी गंभीरपणे विचारलं, ‘‘हा प्रश्न विचारणाऱ्याला खरंच ते नष्ट व्हावेसे वाटतात का?’’ तात्काळ उमगलं, हो, मला खरंच तसं मनापासून वाटत नाही!  उलट ‘मी’ किती श्रेष्ठ प्रश्न विचारला, हे इतरांना वाटून ‘माझं’ कौतुक व्हावं, हाच भाव आहे! तेव्हा ध्येय उंच असेल तर जगण्यातलं खुजेपण सुटायला हवं ना? निदान त्या खुजेपणाची जाणीव तरी व्हायला हवी ना? ते एकदम सुटणार नाही. वाचून, लिहून, ऐकूनही सुटणार नाही. गुरुकृपेनं आणि गुरुबोधानुसार कृती करूनच ते सुटेल! रामकृष्ण परमहंस म्हणत की, गिधाड आकाशात उंच उडते, पण त्याचं लक्ष जमिनीवर मरून पडलेल्या देहावर असतं. तसं, उंच ध्येय ठेवूनही मन सडक्या भौतिकातच रूतून असेल तर काय लाभ? तेव्हा जगणं ध्येयानुकूल, ध्येयसंगत झालं पाहिजे. स्वरूपानंद देहात असतानाच सेवा मंडळाची स्थापना झाली. संस्थेचं काम कसं असावं, हे सांगताना स्वामी जे म्हणाले त्याचा आशय असा की, ‘‘निर्णय करण्यापूर्वी मतभेद होतील, पण निर्णय झाला की एकोप्यानं तो अमलात आणला गेला पाहिजे. जसं अमुक एक गोष्ट करायची, असं तुम्ही ठरवता तेव्हा तुमची सर्व इंद्रियं त्या कृतीत एकवटतात ना? अमुक एके ठिकाणी जाऊन अमुक गोष्ट करायची, असं ठरलं तर पाय जायला नकार देतात, हात नकार देतात, असं होतं का? तसं काम सुरू करण्यापूर्वी मतभेद अवश्य असू द्यावेत, काम सुरू झालं की एकोप्यानं कामच केलं पाहिजे.’’ ध्येयशिखराकडे तशी वाटचाल झाली पाहिजे.