स्वामी स्वरूपानंद संपादित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील पहिल्या ओवीत ॐचं अर्थात ओमकारस्वरूप सद्गुरूंचं नमन आहे आणि ९४व्या ओवीत हे सद्गुरुतत्त्व जिथून प्रकटलं त्या दृश्यजातापलीकडील सत्तेचं सूचन आहे. यापुढील १५ ओव्यांना आपण कालमर्यादेमुळे स्पर्श करू शकलो नाही. या ओव्यांतील विषयांचं सूचन केवळ करतो. ९५व्या ओवीत शरणागतीचं महत्त्व सांगितलं आहे, ९६वी ओवी ‘देव होऊनि देवासी भजावे,’ या रहस्याचं प्रकटन करते, ९७ ते १०१ या ओव्यांत गीतेचं मंत्ररहस्य का सांगितलं गेलं आणि ते कोणाला सांगावं, हे नमूद आहे. १०२ ते १०४ या ओव्यांत या ज्ञानाची महत्ता सांगितली आहे. पांडव हे या ज्ञानाच्या प्रकटनासाठी निमित्त ठरले, हे १०५वी ओवी सांगते, १०६ ते १०८ या ओव्यांत पसायदान मागितलं आहे. ‘नित्यपाठा’तली अखेरची १०९वी ओवी ‘इदं न मम’ या भावनेनं म्हणते की, ‘‘भरोनि सद्भावाची अंजुळी। मियां वोवियाफुलें मोकळीं। अर्पिलीं अंघ्रियुगुलीं। विश्वरूपाच्या।।’’ (ज्ञानेश्वरी अध्याय ११, ओवी ७०८). सद्भावाच्या ओंजळीतली ही ओव्यांची फुलं मी विश्वरूप अशा सद्गुरूंच्या दोन्ही चरणांवर अर्पित करीत आहे! गेले वर्षभर ‘नित्यपाठा’च्या निमित्तानं ज्ञानेश्वरीचं आणि स्वामी स्वरूपानंद यांच्या बोधचरित्राचं आपण चिंतन केलं. स्वामींच्या बोधाबाबत आणि त्याहूनही अधिक, ज्ञानेश्वरीवर बोलण्याचा मला कोणताही अधिकार वा कोणतीही पात्रता नाही. तरीही हे धाडस झालं आहे. असो. आपण सर्व जण काहीबाही आध्यात्मिक साहित्य वाचतो, पारायणंही करतो, जमेल तशी उपासनाही करतो. अशांनीही हे लिखाण वाचलं असेल. काही स्वामिभक्तांनी तसंच अन्य साधनामार्गातील काही साधकांनीही हे लिखाण वाचलं असेल. त्यामुळे या सदराचा समारोप करताना एका मुद्दय़ाला आपण स्पर्श करणार आहोत, की आपण साधना करतो, आध्यात्मिक लेखन-वाचन करतो, चिंतन-मनन करतो. हे सारं आपण का करतो? त्यातून काय मिळवायचं असतं? अगदी नेमकेपणानं विचारायचं तर आपल्याला जीवनात नेमकं काय मिळवायचं आहे आणि जे काही आपण करतो, त्यातून ते मिळवतो का? थोडा विचार केला की जाणवेल, आपल्याला कायमचं सुखीसमाधानी जगणं हवं आहे. जीवनात दु:ख नको, आनंद हवा आहे. चिंता नको, निश्िंचती हवी आहे. ते साधतं का? आपल्या आयुष्याकडे पाहिलं तरी उमगेल की, आयुष्य कधीच कायमचं सुखाचं किंवा कायमचं दु:खाचं नसतं. जगताना चढउतार वेळोवेळी येतातच.  म्हणजे परिस्थिती एकसमान राहातच नाही. परिस्थिती प्रतिकूल झाली की, आपलं मन हेलकावे खातं, मग कल्पनेपलीकडच्या प्रतिकूल स्थितीतही सत्पुरुषांच्या मनाचं समत्व कसं काय ढळत नाही? कोणत्याही परिस्थितीत ते निर्भय, निश्चिंत, निर्लिप्त आणि समचित्त कसे राहू शकतात? ज्या गोष्टींच्या अल्प अनुभवानंही आम्ही खचतो, अशा विपत्ती, वियोग, निर्धनता, व्याधिग्रस्तता या गोष्टींची दीर्घ सोबत लाभूनही संतांचं मन कधीच का खचत नाही? जेव्हा हा प्रश्न पडेल तेव्हा खऱ्या उत्तराचा शोध सुरू होईल, त्यातून खरं ध्येयशिखर दिसेल!