स्वामी स्वरूपानंद संपादित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील ८०, ८१ आणि ८२ या ओव्यांत सलोकता, समीपता आणि सरूपता मुक्तीची स्थिती वर्णन केली आहे, हे आपण पाहिलं. ८३व्या ओवीत सायुज्यता मुक्तीची स्थिती सांगितली आहे. ही ओवी अशी : ‘‘तूं मन बुद्धि साचेंसी। जरी माझिया स्वरूपीं अर्पिसी। तरी मातें चि गा पावसी। हे माझी भाक।।’’ (ज्ञानेश्वरी अध्याय ८, ओवी ७९). हे मन आणि बुद्धी तू माझ्या ठायी पूर्ण अर्पण केलीस की तू मलाच प्राप्त करून घेशील, माझाच होशील, मीच होशील, ही माझी आण आहे, हे माझं वचन आहे, असं भगवंत स्पष्ट सांगत आहेत. ही सायुज्यतेची स्थिती आहे. सायुज्य हा शब्द युज् धातूपासून बनला आहे. युज् म्हणजे अभिन्नत्वानं जोडलं जाणं. तेव्हा ही पूर्ण ऐक्यतेची स्थिती आहे. या ऐक्यतेच्या आड काय येतं हो? तर मन आणि बुद्धीच! श्रीसद्गुरूंशी ऐक्य साधायचं म्हणजे काय? ते भावनिक ऐक्य हवं, वैचारिक ऐक्य हवं, निर्णयात्मक ऐक्य हवं. त्यांची भावना आणि माझी भावना यात जेव्हा अंतराय उरत नाही, त्यात जेव्हा एकवाक्यता येते तेव्हाच भावनिक ऐक्य उत्पन्न होतं. त्यांचा विचार आणि माझा विचार, त्यांचा निर्णय आणि माझा निर्णय, यात जेव्हा अंतराय उरत नाही, त्यात जेव्हा एकवाक्यता येते तेव्हाच वैचारिक व निर्णयात्मक ऐक्य उत्पन्न होतं.  जिथे भावना भिन्न आहे, विचार भिन्न आहे, निर्णय भिन्न आहे, तिथे ऐक्यता कुठली? एकरूपता, समरसता, अभिन्नता, अभेद्यता, एकमयता कुठली? आणि आपल्या जीवनात या दोन गोष्टींना सर्वाधिक महत्त्व आहे, या दोन गोष्टींचाच जीवनावर प्रभाव आहे. भावना आणि विचार! भावना ही मनातून उत्पन्न होते, मनाला व्यापून टाकते आणि मनाची प्रेरक शक्ती बनते. विचार हा बुद्धीतून उत्पन्न होतो, तो बुद्धीला व्यापून टाकतो आणि बुद्धीची निर्णयासाठीची प्रेरकशक्ती बनतो. माणूस हा भावनाशील आणि विचारशील प्राणी आहे. आपल्या समस्त जगद्व्यवहाराचं गाडं म्हणूनच तर या दोन चाकांवर चालतं. म्हणूनच तर जीवनातील प्रत्येक कृती आपण ‘मनाला वाटलं म्हणून’, ‘मनाला पटलं म्हणून’, ‘बुद्धीला पटलं म्हणून’च करतो. जी कृती टाळतो ती ‘माझ्या मनाला काही पटत नाही’ किंवा ‘माझ्या बुद्धीला पटत नाही’, या नावाखालीच टाळतो. त्यातही गंमत अशी की या ओवीत ज्या क्रमानं ‘मन’ आणि ‘बुद्धी’ ही शब्दयोजना आली आहे, त्याच क्रमानुसार त्यांना प्राधान्य दिलं जातं. म्हणजेच मन हे बुद्धीपेक्षा प्रभावी ठरतं! बुद्धी मनामागे फरपटत जाते! आपल्याला वाटतं की आपण बुद्धीपूर्वक वागतो, प्रत्यक्षात आपण मनानुसारच वागत असतो. बुद्धीला आपण मनाच्या वकिलीसाठी राबवत असतो. मनाची ढाल म्हणून वापरतो. त्यामुळेच तर बुद्धीला कळतं, पण मनाला वळत नाही! म्हणून आपण अनेकदा करू नये ते करतो, वागू नये तसं वागतो, बोलू नये तसं बोलतो आणि मग ‘डॅमेज कंट्रोल’साठी ‘हानी नियंत्रणा’साठी बुद्धीला वकीलपत्र देतो! ‘मला खरं तर असं म्हणायचं नव्हतं’, ‘मी तसं वागलो, पण माझा हेतू तो नव्हता’, अशी सुरुवात करीत बुद्धी मग युक्तिवाद करू लागते!