स्वामी स्वरूपानंद यांच्या आठवणींवरील ‘सद्गुरू स्वामी स्वरूपानंद स्मृति सौरभ’ (स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ प्रकाशन, पावस / १९७५) या ग्रंथात म. दा. भट लिहितात की, ‘‘बाबालाल पठाण हे एक मुसलमान धर्मी स्वामीभक्त मल्हारपेठ जिल्हा सातारा येथे असत. १९६२पासून ते पावस मुक्कामी परमपूज्य स्वामींकडे येत असत. हे मुसलमान गृहस्थ आणि पावसला स्वामींकडे इतक्या भक्तिभावाने येतात म्हणून मला प्रथमपासूनच मोठे कुतूहल वाटत असे.. स्वामींना त्यांनी हस्तलिखित ज्ञानेश्वरी स्वहस्ते लिहून अर्पण केली आहे. या स्वामी भक्ताने ज्ञानेश्वरी, दासबोध, एकनाथी भागवत इत्यादी पारमार्थिक ग्रंथ वाचले आहेत. त्याची माहिती स्वत: पठाण यांच्याकडूनच मला समजली होती.. एकदा असाच देसायांच्या ओटीवर बसलो होतो. शेजारी पठाणदेखील परमपूज्य स्वामीजींचे दर्शन वगैरे आटोपून मजजवळ बसला होता. पठाण मला म्हणाला, ‘नित्यपाठातील एका ओळीचा अर्थ मला माझ्या दृष्टीने सांगता का?’ मी म्हणालो, ‘मी काही ज्ञानी नाही. त्यातून ओटीवर तर मुळीच नको.’ परंतु माझं हे म्हणणं ऐकूनसुद्धा पठाणाने ओवी उच्चारली होती. मला अर्थ विचारला होता, ती ओवी अशी- ‘स्वधर्म जो बापा। तो नित्ययज्ञ जाण पां। म्हणौनि वर्तता तेथ पापा। संचारू नाहीं।।’ पठाण परधर्मी गृहस्थ आणि अर्थ विचारतो वरील ओवीचा. मला म्हणतो, ‘‘माझा धर्म काय? या ओवीचा अर्थ माझ्या दृष्टीने मी कसा लावू?’’ प्रश्न मोठा मार्मिक होता. मी जरा बिचकलो. म्हटलं, ‘‘मला त्या दृष्टीने तुला अर्थ सांगता येत नाही. डॉ. मिराशींना विचार.’’ आमचं हे बोलणं संपलं होतं. खोलीत ते परमपूज्य स्वामींना समजलं होतं. आतून डॉ. मिराशी बाहेर आले. पठाणला म्हणाले, ‘‘स्वामी सांगत आहेत, सकळ धर्मामध्ये धर्म। स्वरूपी राहणें हा स्वधर्म।। स्वत:च्या निजरूपात राहणे, स्वस्वरूपी राहणे हाच आता तुमचा स्वधर्म. मग वरचा धर्म काही का असेना!’’ स्वामींनी दिलेले उत्तर ऐकून पठाण आनंदित झाला. मला पण मोठा आनंद झाला. त्या उत्तराला तोड नव्हती.’’ (पृ. १६३). स्वामींनी दिलेलं उत्तर हे सर्वासाठीच आहे. आपल्या स्वरूपाचं भान जागं ठेवणं हाच खरा स्वधर्म आहे. बाकीचं आपलं सगळं जगणं कसं असतं? गीतेत एक श्लोक आहे, सर्वधर्मान् परित्यज्ज मामेकं शरणं व्रज. श्रीगुरूजींना त्यावर विचारलं की, ‘‘सगळ्या धर्माचा त्याग कर, असं भगवंत सांगतात. त्या काळी इतर धर्मही होते काय?’’ श्रीगुरुजी म्हणाले, ‘‘इथे सर्वधर्मान् म्हणजे मनाचे सर्व धर्म सोडून मला शरण ये, असं प्रभूंना सांगायचं आहे.’’ तेव्हा आपलं जगणं हे स्वधर्मानुसार नसतं तर मनोधर्मानुसार व्यतीत होत असतं. आपल्या स्वरूपाचं भान जागं ठेवून त्यानुसार आपण जगत नाही तर मनाच्या ओढींनुसार आपण जगत असतो. जो असा स्वस्वरूपाचं भान ठेवून जगत असेल त्याची स्वत:ची अशी कोणती इच्छा उरणार? त्याची इच्छा कधीच संकुचित असणार नाही. ती व्यापक असेल, परमात्मकेंद्रित असेल आणि म्हणूनच ती पूर्ण होईल. म्हणून माउली सांगतात, ‘‘तयापरी पार्था। स्वधर्मे राहाटता। सकळकामपूर्णता। सहजें होय।।’’
संग्रहित लेख, दिनांक 6th Mar 2014 रोजी प्रकाशित
४६. स्वधर्म
स्वामी स्वरूपानंद यांच्या आठवणींवरील ‘सद्गुरू स्वामी स्वरूपानंद स्मृति सौरभ’ (स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ प्रकाशन, पावस / १९७५) या ग्रंथात म. दा. भट लिहितात की
First published on: 06-03-2014 at 03:19 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swarup chintan self religion