इथे रुजलेला भारतीय राष्ट्रवाद ही ‘सनातनी हिंदू’ म्हणवणाऱ्या राष्ट्रसंताची देणगी…

‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’चे महासंचालक रवींद्र माधव साठे यांच्या ‘हिंदी राष्ट्रवादाचा पराभव कशामुळे?’ या लेखाचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केलेला हा प्रतिवाद…

इथे रुजलेला भारतीय राष्ट्रवाद ही ‘सनातनी हिंदू’ म्हणवणाऱ्या राष्ट्रसंताची देणगी…
( संग्रहित छायचित्र )

सचिन सावंत

बुद्धिभेद, जड संस्कृताळलेली भाषा, अतार्किक आणि सोयिस्कर मांडणी करून मूळ हेतू लपवण्याच्या कुटिलनीतीचा वापर रा. स्व. संघाकडून स्थापनेपासूनच होत आला आहे. दिनांक पाच ऑगस्टला रवींद्र साठे यांच्या ‘राष्ट्रभाव’ या सदरात प्रकाशित झालेल्या ‘हिंदी राष्ट्रवादाचा पराभव कशामुळे?’ या याच पठडीतील लेखाचे नाव खरे तर ‘हिंदू राष्ट्रवादाचा पराभव कशामुळे?’ असे असले पाहिजे होते. ते का याचा आढावा घेऊ.

स्वातंत्र्यपूर्व काळात ‘राष्ट्रवादाच्या संदर्भातील हिंदी राष्ट्रवाद, हिंदू राष्ट्रवाद आणि द्विराष्ट्रवाद असे तीन विचार प्रवाह पुढे आले’ असे लेखक म्हणतात. त्यातील द्विराष्ट्रवादाचे मुस्लिम मूलतत्त्ववाद्यांप्रमाणे सावरकरांसारखे अनेक हिंदू राष्ट्रवादीही समर्थक असल्याने या विचारप्रवाहाबद्दल पुरेसे विवेचन साठे करत नाहीत. पण काँग्रेसने स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सनदशीर पद्धतीने लढा दिला. यात सर्व जाती-धर्मांचा समावेश व्हावा म्हणून हिंदी राष्ट्रवादाची कल्पना जन्मास आणली असे म्हणून स्वातंत्र्यलढ्यातील मूल्यांतून भारतीय राष्ट्रवादाचा जन्म झाला व हिंदू राष्ट्रवाद्यांचे या लढ्यात फारसे योगदान नव्हते हे लेखक मान्य करतात हे नसे थोडके! साठे यांनी ‘भारतीय राष्ट्रवाद’ हा शब्द वापरण्याऐवजी फारसा प्रचलित नसलेला ‘हिंदी राष्ट्रवाद’ हा शब्द वापरला आहे. तसेही ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ असे म्हणणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनांना अहिंदू हे सर्व अराष्ट्रीय वाटतात म्हणून ‘भारतीय’ हा शब्द त्यांनी घेतला नव्हता. गोळवलकरांच्या ‘विचारधना’त याची सम्यक कारणे आली आहेतच. असो!

भारतीय राष्ट्रवादाचा पराभव भारताचे १९४७ साली विभाजन झाले तेव्हाच झाला, असे लेखक म्हणतात. परंतु फाळणीसाठी कारणीभूत असलेल्या द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांतामागे हिंदू राष्ट्रवादी आणि मुस्लिम मूलतत्त्ववादी दोन्ही संघटना होत्या हे सांगायचे विसरतात. असे असतानाही विभाजन पूर्व भारतात असलेल्या मुस्लिम लोकसंख्येच्या एक तृतीयांश लोकसंख्येने भारतातच राहण्याचा निर्णय घेतला, हा हिंदू राष्ट्रवाद्यांचा पराभव नव्हे काय?

विभाजनानंतरही या देशात काँग्रेस विचारधारेची सरकारे अनेक वर्षे राहिली आहेत. गेली आठ वर्षे मोदींच्या नेतृत्वाखाली देशात सरकार आहे म्हणून भारतीय राष्ट्रवादाचा पराभव झाला असे वाटत असेल तर आजही ४० टक्क्यांच्या पलीकडे मते भाजपला घेता आलेली नाहीत आणि निवडणुकांमध्ये ‘सबका साथ सबका विकास’ हे भाजपला म्हणावे लागते, हे लक्षात घ्यावे.

काँग्रेसच्या विचारातील भारतीय राष्ट्रवाद ‘तर्कशुद्ध व स्वयंसिद्ध नव्हता’ असे लेखक म्हणतात. मग गेली ९७ वर्षे संघाला आपला विचार जनतेला का पटवून देता आला नाही? आजही देशातील विरोधी पक्षांची सरकारे पाडण्यासाठी अलोकशाही पध्दतीचा वापर का करावासा वाटतो? स्वतःचा विचार तर्कशुद्ध असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघटना देशात धार्मिक अशांतता पसरवावी याकरिता स्थापनेपासून कार्यरत का आहेत? या प्रश्नांची उत्तरे लेखकाला द्यावी लागतील.

‘हिंदू राष्ट्रवादा’तील वैचारिक विरोधाभास

हिंदू राष्ट्रवादाच्या पराभवाचे खरे कारण हेच आहे की आजवर हिंदुत्ववादी नेत्यांना हिंदुत्वाची व्याख्या देखील नीटपणे करता आलेली नाही आणि त्यातही हिंदुत्ववादी संघटनांमध्ये विरोधाभास व अंतर्विरोध मोठ्या प्रमाणात राहिलेला आहे. याचकरता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला गोळवलकरांचे विचार दडवून इतर नेत्यांना पुढे करावे लागते. याही लेखात रवींद्र साठे यांनी सावरकरांसहित टिळक, स्वामी विवेकानंदांचा उल्लेख करताना गोळवळकरांचा उल्लेख मात्र टाळला आहे.

हिंदुत्ववादी नेत्यांच्या विचारातील विरोधाभास सांगायचा झाला तर सावरकरांपासून सुरुवात करावी लागेल. १८५७ चे स्वातंत्र्यसमर या पुस्तकाच्या प्रस्तावनेत सावरकरांनी मुस्लिमांबद्दल द्वेष ठेवणे हे मूर्खपणाचे म्हटले होते. ६ जुलै १९२० ला ब्रिटिश सरकारला लिहिलेल्या पत्रात सावरकर विश्वकुटुंबाची व्याख्या करतात आणि अशा संयुक्त राष्ट्र कुटुंबासाठी सहकार्य करीन असे आश्वासन देतात. नंतर मात्र हेच सावरकर विश्वकुटुंबाची संकल्पना विसरून ‘पितृभू आणि पुण्यभू’च्या आधारे आपल्या हिंदुत्वाच्या केलेल्या व्याख्येतून मुस्लिम आणि ख्रिश्चनांना वेगळे काढतात. परंतु देशातील नास्तिकांचे काय होणार हे मात्र सांगत नसल्याने सावरकर स्वतःही हिंदुत्वाच्या व्याख्येत बसतात का हा प्रश्न उपस्थित होतो. सावरकर ‘हिंदुत्व म्हणजे हिंदू धर्म नव्हे आणि हिंदू धर्म म्हणजे वैदिक धर्म नव्हे’ असे म्हणतात. हिंदू धर्म म्हणताना सावरकरांना या देशातील पुण्यभू असणारे वैदिक, बौद्ध, जैन व शीख हे सर्व अभिप्रेत होते. पण हेच सावरकर पुढे बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धर्म स्वीकारला त्यावेळी त्यांना ‘धर्मद्रोही’ म्हणतात, हा विरोधाभास नव्हे काय?

पंतप्रधान मोदींनी नुकतेच अशोक स्तंभाच्या राष्ट्रीय चिन्हाचे उद्घाटन करताना वैदिक पद्धतीने केलेली पूजा सावरकरांच्या ‘हिंदू धर्म म्हणजे वैदिक धर्म नव्हे’ या मताशी फारकत नाही का? असो!

पुढे हेच सावरकर आपल्या राष्ट्रवादाच्या कल्पनेत, ‘या देशात मुस्लिम राष्ट्राचे वेगळे अस्तित्व आहे’ असे मान्य करतात. त्याचवेळी एक व्यक्ती एक मत या तत्त्वाचा पुरस्कारही करतात. आपल्या हिंदू राष्ट्रवादाच्या परिभाषेत ‘अल्पसंख्याकांच्या धार्मिक व शैक्षणिक अधिकाराचे संरक्षण करू’ असे आश्वासनही देतात. (हिंदू महासभा अधिवेशन अध्यक्षीय भाषण – १९३९ ) याबाबत लेखक अनभिज्ञ आहेत का?

देशातील दुसरे हिंदू राष्ट्रवादी नेते एम.एस. गोळवलकर यांनी सावरकरांची हिंदुत्वाची व्याख्या स्वीकारली होती. परंतु सावरकरांचे गाईबद्दलचे मत, विज्ञानवादी दृष्टिकोन आणि उपयुक्तता वादाच्या सिद्धांतावर वाईट भाषेत टीका केलेली आहे. भाई परमानंद या हिंदू राष्ट्रवादी नेत्याच्या हिंदू साम्यवादी संघटनेवर टीका करताना ‘कोणी मनुष्य एक तर हिंदू असेल किंवा साम्यवादी असेल’ असे गोळवलकर म्हणतात. चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे गोळवलकरांनी केलेले समर्थन तसेच सावरकरांच्या पोथ्यापुराणांबद्दलच्या मतांचा अव्हेर हिंदू राष्ट्रवादींच्या मतांतील विरोधाभास दर्शवत नाही का?

हिंदू राष्ट्रवादात जाती धर्म भेद गोळवलकर स्वतः चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे समर्थन करून मान्य करत नाहीत का? जातीभेद हे वर्ण व्यवस्थेचे विकृत स्वरूप आहे असे गोळवलकर म्हणतात. पण ही व्यवस्था संपवण्याची दीक्षा मात्र ते संघाच्या कार्यकर्त्यांना देत नाहीत. जातीभेद सांभाळून समरस व्हा असे म्हणतात. त्यामुळे ‘समता’ या शब्दाच्या संघाला असलेल्या ॲलर्जीबाबत साठे यांनी प्रकाश टाकावा.

भारताची तुलना इतर राष्ट्रांशी करणे योग्य नाही. भारत हे कधीही एक राष्ट्र नव्हते. येथील प्रत्येक जातीचा, प्रत्येक संस्कृतीचा वेगळा इतिहास आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या परिभाषेत या सर्व विविधतेला एक इतिहास व एका संस्कृतीच्या अभिमानाच्या धाग्यात बांधण्याचा प्रयत्न थकल्यानंतर सावरकर शेवटी ‘आम्हाला वाटते म्हणून ते तसे आहे’ असे अतार्किक विधान करतात.

गांधीजींचा ‘भारतीय राष्ट्रवाद’…

भारतीय (हिंदी) राष्ट्रवादात हिंदू ,मुसलमान, ख्रिश्चन इत्यादी भेदांचे स्थान खचितच नव्हते. कारण हा राष्ट्रवाद गांधीजींच्या विचारातून आला होता. गांधींचा विचार संघाच्या किंवा हिंदू राष्ट्रवादींच्या विचाराप्रमाणे मुस्लिम मुलतत्ववाद्यांच्या विचाराची प्रतिक्रिया म्हणून जन्माला आलेला नव्हता. तर तो विचार स्वत:ला ‘सनातनी हिंदू’ म्हणवणाऱ्या एका राष्ट्रसंतांचा होता. ज्या स्वामी विवेकानंदांच्या १२ नोव्हेंबर १८९७ च्या लाहोरमधील भाषणाचा उल्लेख करून विवेकानंदांच्या मुखात आपले बोल टाकण्याचा प्रयत्न साठे करतात, त्या भाषणातच भारतातील अद्वैतवादाचा जगाला लाभ कसा होईल हे सांगताना भारताला ‘तथागत गौतम बुद्धांचे हृदय आणि श्रीकृष्णाच्या गीता ज्ञानाची आवश्यकता आहे’ असेदेखील स्वामी म्हणतात. गांधीजींच्या मनात हे दोन्ही होते. खरा हिंदू कसा असावा हे गांधी आपल्या आचरणातून सांगत होते. हिंदू राष्ट्रवाद्यांप्रमाणे मुस्लिम मूलतत्त्ववाद्यांकडे बोट दाखवून हिंदूंना कट्टर बनवण्याची दीक्षा त्यांनी दिली नाही.

खऱ्या अर्थाने या देशातील विविधतेचा सन्मान करून एक राष्ट्र म्हणून गुंफण्याचे काम महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसने केले. संविधानाने त्याला आधार दिला. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान स्वीकारताना केलेल्या भाषणात ही राष्ट्र घटना भारताला एक राष्ट्र करण्याच्या प्रयत्नात महत्त्वाची भूमिका बजावेल, असे मत उगीच व्यक्त केले नव्हते.

मुस्लिमांनी हिंदी व्हावे यासाठी मुस्लिम नेतृत्वाकडून कष्ट घेतले गेले नाहीत असे म्हणणाऱ्या साठे यांचा इतिहासाचा अभ्यास हा संघ शाखेच्या शिकवणीपुढे गेलेला नाही असे विनम्रतेने म्हणावे लागते. काँग्रेसच्या नेतृत्वात स्वातंत्र्यसंग्रामात हिंदूंबरोबरच मुस्लिमांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. एम.ए अन्सारी, हकीम अजमल खान, मौलाना अबुल कलाम आझाद, सैफुद्दीन किचलू, असफ अली, अब्बास तय्यबजी ,युसुफ मेहर अली इत्यादी अनेक जणांची नावे घेता येतील. ज्याप्रमाणे हिंदूंना स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेण्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने रोखले त्याचप्रमाणे स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेत असलेल्या अनेक मुसलमानांना मुस्लिम मूलतत्त्ववादी रोखत होते हे विशेष!

विचारांचा विपर्यास

‘लोकमान्य टिळक आणि स्वामी विवेकानंद यांनी मुस्लिम मनोवृत्तीची चिकित्सा केली पण काँग्रेसने केली नाही’ असे मत साठे व्यक्त करतात. पण पुढे ‘टिळकांना हिंदू मुस्लिम ऐक्य अपेक्षित होते,’ असे स्वतःच मान्य करतात. स्वामी विवेकानंद यांच्या मते तर ‘वेदान्तातील उदारमतवादाचा भारतातील इस्लामवर मोठा परिणाम झाला आहे’. आपल्या एका शिष्याला या संदर्भात स्वामी विवेकानंद म्हणाले होते की मुघल सम्राट शहाजहानला परकीय म्हटल्यास त्याच्या कबरीतील मृतदेहाचा देखील थरकाप होईल. आपल्या देशात मुस्लिम शरीर आणि वैदिक मन या दोन आदर्शांचा संगम व्हावा ही स्वामींची एकमेव प्रार्थना असे. ती टिळकांच्या नावावर खपवणे लेखकाचे अज्ञान दर्शवते. मुसलमान राजवटीचे भारतातील योगदान हे की गरिबांची आणि दलितांची स्थिती सुधारली असे विवेकानंद म्हणतात. (स्वामी विवेकानंदांची खरी ओळख – ले. दत्तप्रसाद दाभोळकर, पृष्ठ १४८-१५०)

त्यामुळे या देशातील इतिहास मुस्लिमांचा देखील आहे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष तसेच महान विभूतींच्या वक्तव्याचा विपर्यास हिंदू राष्ट्रवाद्यांनी आपल्या स्वार्थी राजकारणासाठी केला हेच सत्य आहे.

२४ जानेवारी १९४८ च्या पंडित नेहरूंच्या मुस्लिम विद्यार्थ्यांपुढे केलेल्या भाषणाचा साठे यांनी केलेला विपर्यास याच पठडीतील आहे. पंडित नेहरू भारताला बौद्धिक आणि सांस्कृतिक श्रेष्ठत्व मिळवून देणाऱ्या पूर्वजांविषयी व त्या वारसा विषयी अभिमान वाटतो का? हा प्रश्न विचारतात. पुढे ‘हा सांस्कृतिक वारसा हिंदू आणि मुसलमान या दोघांचाही आहे’ असे म्हणतात. याच भाषणात मी हे प्रश्न का विचारतो आहे याचे कारण देताना नेहरू म्हणतात की ‘गेल्या काही वर्षात अनेक शक्ती जनतेचे लक्ष विचलित करण्याचे आणि देशाचा इतिहास विकृत करण्याचा प्रयत्न करत आहेत’. या भाषणानंतर केवळ सहा दिवसांतच गांधीजींची हत्या झाली. त्यामुळे त्यांचा रोख कोणाकडे होता हे सांगण्याची आवश्यकता आहे का?

लेखक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस आहेत.

मराठीतील सर्व विचारमंच ( Sampadkiya ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The indian nationalism rooted here is the gift of the national saint who calls himself sanatani hindu pkd

Next Story
अग्रलेख : अमृतकालीन विष
फोटो गॅलरी