महाभारतात पांडवांनी अवघ्या १८ दिवसांत कौरवांच्या ११ अक्षौहिणी सैन्याचा पराभव केला. याचे सारे श्रेय श्रीकृष्णाला जाते. कृष्णाने पांडवांचा कैवारच घेतला नसता, तर युद्धात कौरव विजयी झाले असते एवढे युद्धकौशल्य त्यांच्याकडे होते. कौरवसम्राट दुर्योधन याच्या बाजूने युद्ध करणाऱ्या मगधाच्या राजाने पांडवांचा नि:पात करता येऊ शकेल अशी योजना आखली होती. ती यशस्वी ठरली असती, तर युद्धाची चक्रे उलटी फिरली असती, मात्र ही योजना यशस्वी झालीच नाही. काय होती ती योजना, कोण होता मगधचा राजा, योजना यशस्वी न झाल्याने महाभारतातील एक संपूर्ण पर्वच कसे गायब झाले, त्याचा छडा लागला का, त्याचा वर्तमानकाळाशी संबंध काय, याची उत्तरे ‘द महाभारत सिक्रेट’ या कादंबरीत मिळतात.
महाभारतातील १८ दिवसांचे युद्ध, त्यात वापरली गेलेली शस्त्रे, ब्रह्मास्त्रांचा वापर, इतर संहारक अस्त्रे, विमाने ही अनेकांसाठी औत्सुक्याचा, कुतूहलाचा आणि संशोधनाचाही विषय आहे. त्यामुळेच याबाबत आजही संशोधन सुरू आहे. महाभारतातील अनेक चक्रावून टाकणाऱ्या घटनांमुळेच याकडे अधिकाधिक जण आकर्षति होतात. ख्रिस्तोफर डॉयल हेही त्यापैकीच एक. महाभारत हा त्यांच्या अभ्यासाचा विषय. यातूनच या पुस्तकाची निर्मिती झाली.  वाचकाला अखेरच्या पानापर्यंत खिळवून ठेवत कथानकाला अचानक कलाटणी देण्याची यशस्वी धाटणी याही पुस्तकात आढळते, मात्र तरीही त्यातील रोमांचकता, आजच्या काळातील त्याची सुसंगती, आंतरराष्ट्रीय पटलावरील घडामोडी, देशांतर्गत राजकारण, गुप्त संदेशांची उकल, गुप्तचर संस्था, वैज्ञानिक दृष्टिकोन या सगळ्या सगळ्याची व्यवस्थित गुंफण करत, कुठेही ती सैल वाटणार नाही याची पुरेपूर काळजी डॉयल यांनी घेतली आहे. त्यासाठी सखोल संशोधन, ऐतिहासिक संदर्भ, वैज्ञानिक दृष्टिकोन, या बाबी लेखकाने उत्तमरीत्या जुळवल्या आहेत. कादंबरी असली तरी एका निश्चित, ठाम आणि ‘असे नक्कीच असू शकते’ हा विचार करायला भाग पाडू शकेल अशा टप्प्यावर वाचकाला आणून सोडण्यात लेखक यशस्वी ठरला आहे.
महाभारत १८ पर्वामध्ये विभागले गेले आहे, हे सर्वश्रुत आणि सर्वज्ञात आहे, मात्र यात एका पर्वाचा उल्लेख नाही. हे पर्वच हेतुत: महाभारतातून गायब केले गेलेले आहे. ‘विमान पर्व’ असे या पर्वाचे नाव असून एक अख्खे पर्व जगापासून दडवून ठेवण्यात आल्याचे सम्राट अशोकाला समजते. संपूर्ण जगाचा नाश करू शकेल अशी संहारक अस्त्रांची माहिती या पर्वात आहे. सम्राट अशोकाचा विश्वासू सेनापती सुरासेन याला या रहस्याचा शोध लागतो, मात्र हे पर्व जगासमोर आले, तर हाहाकार होईल आणि जगाचा विनाश होईल. त्यामुळे हे रहस्य रहस्यच राहू द्यावे, असा निर्णय सम्राट अशोक घेतो आणि त्याच्या विश्वासू नऊ सरदारांना (द नाइन) गोपनीयतेची शपथ देऊन हे रहस्य पृथ्वीच्या पोटात दडवून ठेवण्याची अवघड कामगिरी त्यांच्यावर सोपवतो.
तब्बल दोन हजार ३०० वर्षांपूर्वीचे हे रहस्य दडवून ठेवताना त्याच्या खाणाखुणा जपून ठेवण्याच्या उद्देशाने एक दगडी डिस्क (फ्लॉपीसारखी) तयार केली जाते व रहस्योद्घाटन करण्यासाठीचे सर्व संकेत त्यावर कोरून ठेवले जातात. गुप्त संदेश उकलण्याची सर्व उत्तरे दडवून त्याचे भाग केले जातात व ते दडवून ठेवण्यासाठी सर्वाची रवानगी होते.
महाभारतकालीन हे रहस्य पुढच्या पिढय़ांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारीही याच नऊ सरदारांवर सोपवलेली असते. ते त्यांच्या विश्वासातील लोकांपर्यंत हे रहस्य सोपवून इहलोकीची यात्रा संपवतात. अशी ही साखळी आजच्या युगातील निवृत्त अणुशास्त्रज्ञ विक्रमसिंग यांच्यापर्यंत येऊन पोहोचलेली असते. मात्र या रहस्याचा सुगावा लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेला लागतो. हे गुपित प्राप्त करून त्यातील संहारक अस्त्रांचे तंत्रज्ञान मिळवण्याची तोयबाची योजना असते. विक्रमसिंगकडे या रहस्याची चावी असल्याचा सुगावा लागताच त्यांचा जीवघेणा पाठलाग सुरू होतो. त्यात विक्रमसिंगचा मृत्यू होतो, मात्र मृत्यूपूर्वी गोपनीयतेचा हा वारसा त्याचा अमेरिकास्थित पुतण्या विजय याच्याकडे सोपवतात. त्याला सांकेतिक भाषेतील पाच मेल विक्रमसिंग पाठवतात. या पाचही मेलचा उलगडा करण्यासाठी विजय भारतात येतो. त्याला या कामात त्याचा अमेरिकन मित्र कॉलिन, बालपणीची मत्रीण राधा, मगधी व एकूणच सांकेतिक भाषांचे उत्तम ज्ञान असलेले राधाचे वडील डॉ. शुक्ला आदी मंडळी मदत करतात.
दरम्यान, तोयबाचा हस्तक फारूख विक्रमसिंगनंतर विजयच्या मागावर लागून त्याच्याकडून गुपित मिळवण्याचा प्रयत्न करतो. अखेरीस कोडे उलगडते, विमान पर्वाचा रहस्यभेद होतो, फारूखच्या हाती ही माहिती लागते का, तोयबाचा इरादा सफल होतो का.. याची उत्तरे आपल्याला पुस्तकात मिळतात.
फिक्शन असले तरी त्यातील अनेक संदर्भ विचार करायला लावणारे आहेत. विशेषत: विमान पर्वाबाबत बाळगण्यात आलेली कमालीची गोपनीयता. त्यासाठी घेतल्या गेलेल्या आणाभाका, मगध देशाच्या राजाने नेमकी कोणती अस्त्रे तयार केली होती, त्यांची रचना कशी होती, ती हाती लागली तर खरेच का जगाचा नाश होऊ शकतो, त्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरण्यात आले होते, याची साद्यंत माहिती लेखक देतो.
महाभारताचा उल्लेख आणि त्यातील संहारक अस्त्रांचा वापर याचे गणित उत्तमरीत्या लेखकाने जुळवले आहेत. विजय हा या कादंबरीचा खरा नायक असला तरी विमान पर्वाभोवतीच कादंबरी फिरत राहील याची पुरेपूर काळजी लेखकाने घेतली आहे. विजय, राधा, कॉलिन व डॉ. शुक्ला यांना मदत करण्यासाठी आलेला ग्रेग व्हाइट हाच कुख्यात आंतरराष्ट्रीय मारेकरी मर्फी असावा, याचा अंदाज खूप आधीच बांधता येतो. त्यामुळे ग्रेग व्हाइटचा खरा चेहरा समोर येतो त्या वेळी फार काही आश्चर्य वाटत नाही. उलटपक्षी जुन्या, सांकेतिक भाषा वाचण्यात पटाईत असलेल्या ग्रेग व्हाइटला कोणताच संदेश नीटसा का वाचता येत नाही, याची पुसटशी शंकाही विजय आणि कंपनीला का येत नाही, याचेच आश्चर्य वाटते. या काही त्रुटी असल्या तरी विमान पर्वाचे रहस्य उलगडल्यानंतर त्याची शास्त्रीय माहिती, वैज्ञानिक दृष्टिकोन याची लेखकाने वास्तव माहिती दिली आहे.

द महाभारत सिक्रेट : ख्रिस्तोफर डॉयल
ओम बुक्स इंटरनॅशनल, नवी दिल्ली,
पाने : ३८२, किंमत : २९५ रुपये.

A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
Rajyog Lakshmi Narayan Rajyoga
मे महिन्यात निर्माण होईल लक्ष्मी नारायण राजयोग! या तीन राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ, मिळेल बक्कळ पैसा
Ulta-Chashma
उलटा चष्मा: लोक‘शाही’ लग्न