scorecardresearch

हा अभ्यास सांगतो, जास्त कमावत्या काही स्त्रियांना पतीकडून होते मारहाण…

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातील आकडेवारीचे सूक्ष्म पातळीवर विश्लेषण केल्यावर अभ्यासकांनी हा निष्कर्ष काढला आहे.

This study says that some women who earn more are beaten by their husbands...
हा अभ्यास सांगतो, जास्त कमावत्या काही स्त्रियांना पतीकडून होते मारहाण…

गौरव धामीजा, पुनर्जीत रॉयचौधरी

पत्नीचे उत्पन्न किंवा कमाई पतीच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण वाढते की कमी होते याबाबत आतापर्यंत ठोस अभ्यास झाला नव्हता. किंबहुना अत्यंत महत्त्वाचा असलेला हा विषय अनेक वर्षे झाकोळलेलाच राहिला होता. त्यामुळेच आम्ही कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण आणि पतीपत्नीच्या आर्थिक स्तराचा अभ्यास केला. यात अनुलोम विवाहांपेक्षा (पतीचा आर्थिक – सामाजिक स्तर पत्नीपेक्षा उच्च असणाऱ्या) अनुलोम पद्धतीस छेद देणाऱ्या (पत्नीची कमाई वा आर्थिक स्तर पतीच्या बरोबरीने किंवा सरस असणाऱ्या) विवाहांमध्ये कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण १४ टक्क्यांनी अधिक असल्याचे पुढे आले आहे.

अनुलोम विवाहास छेद देणाऱ्या म्हणजे वर उल्लेखल्याप्रमाणे पत्नीची कमाई अधिक असणाऱ्या विवाहांमध्ये, पती कुटुंबातील आपला अधिकार प्रस्थापित करण्यासाठी हिंसेचा हत्यार म्हणून वापर करीत असल्याचे या अभ्यासातून दिसून आले. जागतिक आरोग्य संस्थेच्या २०१३च्या अहवालानुसार विकसित आणि विकसनशील दोन्ही प्रकारच्या देशांमध्ये दर तीन स्त्रियांपैकी एकीला कौटुंबिक हिंसाचाराचा सामना करावा लागत आहे. कौटुंबिक हिंसा होणाऱ्या स्त्रियांना शारीरिक इजा, मानसिक वैफल्य, ताणातून निर्माण होणारी असंबद्धता यांसारख्या अनेक प्रश्नांचा सामना करावा लागत असल्याचे अनेक अभ्यासकांनी सिद्ध केले आहे (कॉम्बबेल २००२, कोकर २००२, अॅकर्सन आणि सुब्रमनियन २००८) कौटुंबिक हिंसाचाराची अर्थकारणाला मोजावी लागणारी किंमतही तेवढीच मोठी आहे. पीडितांच्या वेदना, वैद्यकीय उपचाराचा खर्च, उत्पादकतेचे नुकसान आणि न्यायालयीन खर्च एवढी ती वाढत जाते. फेरॉन आणि हेफ्लर (२०१४) यांच्या मतानुसार पार्टनरकडून होणाऱ्या हिंसाचाराची किंमत जगाच्या सकल उत्पन्नाच्या ५.२ टक्के आहे. ते म्हणतात, ही किंमत युद्ध, दहशतवाद, विस्थापन आणि आर्थिक नुकसान यांसारख्या आपत्तींमुळे मोजाव्या लागणाऱ्या किमतीच्याही २५ टक्क्यांनी अधिक आहे.

अनुलोम विवाह पद्धती ही पुरुषसत्ताक समाजाचे अपत्य आहे. त्यात पत्नीचा सामाजिक-आर्थिक स्तर पतीच्या सामाजिक -आर्थिक स्तरापेक्षा निम्न असतो. मात्र जेव्हा पत्नीचा आर्थिक स्तर पतीच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षा वरचढ होतो तेव्हा अनुलोम पद्धतीस छेद दिला जातो. लिंगभावाबद्दल पुरुषसत्ताक पद्धतीतील पारंपरिक धारणा, रूढी आणि दृष्टिकोन मागे पडतात. ‘पुरुष हाच कुटुंबाचा कर्ता करविता आहे’ किंवा ‘पुरुषाने त्याच्या पत्नीपेक्षा अधिक कमवले पाहिजे’ ही गृहीतके लटपटीत होतात. परिणामी, नात्यांमध्ये निर्माण होणाऱ्या ताणतणावाचा स्फोट कौटुंबिक हिंसाचारात होतो.

त्याशिवाय, अनुलोम पद्धतीस छेद दिलेल्या नात्यांमध्ये कौटुंबिक हिंसेचा वापर हत्यार म्हणूनही केला जातो. पत्नीकडून पैसे उकळण्यासाठी किंवा श्रमकौशल्याच्या बाजारातील तिचे मूल्य कमी करण्यासाठीही हे हत्यार वापरले जाते. महिलांचा आर्थिक स्तर वाढल्यास श्रमाच्या बाजारपेठेतील त्यांचा वाटा वाढतो. त्यामुळेच पतीपेक्षा अधिक उत्पन्न कमवणाऱ्या म्हणजे अनुलोम विवाहास छेद देणाऱ्या महिलांना अधिक कौटुंबिक हिंसाचाराचा सामना करावा लागतो.

आतापर्यंतच्या अभ्यासांमध्ये याच्या विपरीत निष्कर्ष मांडण्यात आले होते. १९९१ मध्ये थाउचेन आणि १९९६ मध्या फार्मर आणि थायफेन्थलर यांच्या मांडणीत नेमके विरुद्ध निष्कर्ष नोंदवण्यात आले होते. त्यांच्या मते अनुलोम पद्धतीस छेद देणाऱ्या विवाहांमध्ये कौटुंबिक हिंसाचार कमी होत असल्याचे त्यांचे मत होते. पतीकडून होणाऱ्या हिंसाचाराचा मोबदला महिलांना मिळत असल्याचे गृहीतक त्यात धरण्यात आले होते. स्त्रियांचा आर्थिक स्तर वाढल्यावर त्या हिंसेची तिला मोजावी लागणारी किंमतही वाढत जाईल या भीतीपोटी पती अधिक कमवणाऱ्या पत्नी विरोधात हिंसाचार कमी करतात असे त्यात मानण्यात आले होते. त्यामुळे अनुलोम पद्धतीस छेद दिल्यास म्हणजे पत्नीचे उत्पन्न, कमाई किंवा आर्थिक स्तर पतीच्या बरोबरीने किंवा अधिक झाल्यास नात्यातील हिंसाचार वाढतो की कमी होतो याबाबतच्या अंदाजांमध्ये संदिग्धता होती.

यासाठी आम्ही सन २०१५-१६च्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातील आकडेवारीचे सूक्ष्म पातळीवर विश्लेषण केले. सदर अहवालात कौटुंबिक हिंसाचार, आरोग्य, शिक्षण, श्रम शक्तीतील मानके यांचा अत्यंत सविस्तर तपशील नोंदविलेला असतो. यात स्त्रियांवर होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचाराची चार प्रकारांत विभागणी करण्यात आली आहे. साधारण शारीरिक हिंसा, गंभीर शारीरिक हिंसा, लैंगिक हिंसा आणि भावनिक हिंसा. त्यासोबत त्यांच्या शैक्षणिक- आर्थिक स्तराचा परस्परसंबंध जोखून आम्ही उपलब्ध माहितीचे सखोल विश्लेषण केले. कोणत्याही समाजात एखाद्या कुटुंबातील विवाह अनुलोम (पतीचा स्तर पत्नीपेक्षा उच्च) आहे की प्रतिलोम (पत्नीचा स्तर पतीपेक्षा उच्च) ही माहिती सहजासहजी उपलब्ध होत नाही. त्याचप्रमाणे सासर-माहेरच्या कुटुंबांवरील पुरुषसत्ताकतेच्या पगड्याची तीव्रता, स्त्रीच्या आरोग्याची स्थिती, तिची अव्यक्त क्षमता इत्यादी अदृष्य धागे असू शकतात. तरीही, पत्नीची कमाई किंवा उत्पन्न पतीच्या बरोबरीने किंवा सरस होणे अनलोम विवाहास छेद देणे ठरते, जे कौटुंबिक हिंसाचारामागील महत्त्वाचे पण अदृष्य कारण असल्याचे सिद्ध होते. विवाह संस्थेतील अनुलोम पद्धतीस देण्यात आलेला छेद आणि कौटुंबिक हिंसाचार याचा परस्परसंबंध अभ्यासण्यासाठी आम्ही पारंपरिक संशोधनाच्या पद्धतीपेक्षा (नॉन पँरामेटिक पार्शल आयडेंटिफिकेशन अप्रोच) अन्य पद्धतीचा अनुसार केला.

त्यातून पुढे आलेले निष्कर्ष…

अनुलोम पद्धतीस छेद देणाऱ्या (पतीच्या बरोबरीने किंवा त्याच्यापेक्षा अधिक कमाई असलेल्या) स्त्रियांवर अधिक कौटुंबिक हिंसाचार होतो.

अनुलोम विवाह पद्धतीत असलेल्या (पतीपेक्षा कमी आर्थिक स्तर) स्त्रियांच्या तुलनेत यांच्यावर होणाऱ्या किमान एका प्रकारच्या कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण १४ टक्क्यांनी अधिक आहे.

अनुलोम विवाह पद्धतीतील स्त्रिया, वरचढ कमाई असणाऱ्या (अनुलोमास छेद देणाऱ्या) स्त्रियांच्या तुलनेत पुरुषसत्ताक समाजातील पारंपरिक भूमिका, धारणा व रूढी परंपरा यांचे पालन करीत असल्याचे पुरावे यास पूरक आहेत.

अनुलोम मोडलेेल्या विवाहांमधील पती आपल्या पत्नींवर घरात हुकूमत गाजवण्यासाठी तसेच बाहेर श्रमकौशल्याच्या बाजारपेठेत तिला नामोहरम करण्यासाठी हिंसेचे हत्यार वापरतात.

कौटुंबिक हिंसाचार थांबवण्यासाठी किंवा समानतेच्या धोरणाने स्त्रियांना सक्षम करण्यासाठी करण्यात आलेले कायदे आणि नियम यांचा प्रत्यक्षात विपरीत परिणाम होत असल्याचे यातून दिसूून आले.

त्या धोरणांमुळे अधिक कमवणाऱ्या स्त्रियांची हतबलताच अधिक वाढल्याचे दिसून आले. याचा अर्थ, समानतेवर आधारलेले कायदे व धोरणे बाद करावेत असे आम्ही अजिबात म्हणत नाही, परंतु त्यांचा खऱ्या अर्थाने कौटुंबिक हिंसा थांबवण्यासाठी, त्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी, स्त्रियांना सामाजिक-कायदेशीर बंधनांमधून मुक्त होण्यासाठी उपयोग व्हावा अशाप्रकारे त्यांची काटेकोर आखणी व प्रभावी अंमल होणे गरजेचे आहे.

(गौरव धामीजा हे हैद्राबाद आयआयटी येथे साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत, तर पुनर्जीत रॉयचौधरी हे शीव नादार विद्यापीठात साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )

सौजन्य : आयडीयाज फॉर इंडिया वेबपोर्टलवरील संशोधन लेखाचा स्वैर अनुवाद

मराठीतील सर्व विचारमंच ( Sampadkiya ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: This study says that some women who earn more are beaten by their husbands asj

ताज्या बातम्या