डाॅ. दत्ताजीराव बा. जाधव
यंदाच्या १५ ऑगस्ट रोजी भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी लाखो लोक झटले, हजारो देशप्रेमींनी तुरुंगवास भोगला, शेकडो क्रांतिकारकांनी बलिदान दिले. या सर्व स्वातंत्र्य प्रेमींनी निश्चितच काही स्वप्ने पाहिली असणार… ७५ वर्षांमध्ये त्यातील किती स्वप्ने साकार झाली, त्यांच्या स्वप्नांमधील देश घडला का? या गोष्टींचा आढावा घेणे आवश्यक आहे. हे काम सोपे नाही, पण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या बरोबर एक महिना अगोदर- १५ जुलै २०२२ रोजी – थोर स्वातंत्र्य सेनानी पद्मभूषण डॉ. क्रांतीवीर नागनाथ (अण्णा) रामचंद्र नायकवडी यांची जन्मशताब्दी येते. त्यांना अनुभवण्याची संधी प्रदीर्घकाळ मिळाल्याने त्यांच्या काही स्वप्नांचा या निमित्ताने आढावा घेण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे.




बालवयातच क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याकडून प्रेरणा मिळालेले नागनाथ अण्णा हे सरकारी अधिकाऱ्यांची मग्रुरी, सावकारांची पिळवणूक, धर्मांधांची आणि गाव पुढाऱ्यांची दडपशाही अशा जाचातून जनतेची सुटका करण्याच्या प्रतिसरकारच्या कामात आघाडी घेतात. प्रतिसरकारची चळवळ मोडीत काढण्यासाठी ब्रिटिश सरकार तुरुंगातील अट्टल गुन्हेगारांना शस्त्रे देऊन मोकळे सोडते. पोलीस आणि हे मुक्त गुन्हेगार यांच्यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी प्रतिसरकार मधील कार्यकर्त्यांना शस्त्र उचलणे अपरिहार्य होते. डाकघरे, खजिने लुटून ते शस्त्रे मिळवतात. आपले सैन्यच उभारतात. या सैन्याची आणि इंग्रजी सरकारच्या पोलिसांची ‘लढाई’ वारणेकाठच्या सोनवडे हद्दीतील ओढ्याकाठी होते. अण्णंचे दोन सहकारी मारले जातात. अण्णांच्याही जवळून गोळ्या जातात. धुळ्याच्या खजिन्याच्या लुटीनंतर पाठलाग करणाऱ्या पोलिसांची एक गेळी दगडाला थडकून, दिशा बदलून अण्णांच्या छातीवर लागते, पण तोवर तिचा वेग कमी झालेला असल्याने मार लागला तरी जीव वाचतो. अशा प्रकारचे अग्निदिव्य अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी केले आहे आणि त्याचा परिणाम म्हणून स्वातंत्र्य मिळाले आहे.
पण स्वातंत्र्यानंतरची कथाही तितकीच महत्त्वाची… ती पूर्ण करण्याचा प्रयत्न अण्णांनी केला!
शेतकरी सुखी झाला का?
हयातभर अण्णा विधायक मार्गाने काम करीतच होते. प्रसंगी त्यासाठी मागण्या आणि संघर्षही करत होते. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळाले, मुला-मुलींच्या शिक्षणाची सोय झाली. साखर, दुधाचे पदार्थ अशा पक्क्या मालाच्या निर्मितीतून शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला (देशात सर्वोच्च) दर मिळाला, आवश्यक गोष्टी रास्त किमतीत मिळाल्या… अण्णांचे हे काम म्हणजे विधायक अर्थाने ‘प्रति सरकार’च! याच काळात भारत सरकारच्या कामात जाणवते की, शेतकऱ्यांना लागणाऱ्या आणि इतर वस्तूंचे दर शेकडो पट वाढले पण शेतमालाचे दर फारतर दहा-वीस पट वाढले. शेती किफायतशीर राहिली नाही. परिणामत: लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सहकारी साखरधंदाही अडचणीत आला. तरीही शेतकऱ्यांच्या अडचणींवर सर्वंकष उपाय योजना होताना दिसत नाही. इंग्रजांचे सरकार घालवून स्वातंत्र्य सैनिकांच्या स्वप्नातील सरकार आले, असे म्हणता येत नाही.
सामाजिक न्याय
क्रांतीवीर अण्णांनी त्यांच्या साखर कारखान्यात, शिक्षण संस्थेत तसेच दूधसंघ वगैरे संस्थांमध्ये जगण्याचे काहीही साधन नसलेल्या फासेपारधी, नंदीवाले, माकडवाले, कडकलक्ष्मीचे गाडेवाले, दरवेशी अशा समाजातील गरजूंना अग्रक्रमाने नोकरीत घेतले. कारखाना बंद असेल तेव्हा या माणसांकडून त्यांच्या समाजाचे संघटन, प्रबोधन केले. त्यातील मुली, मुले शिकतील यासाठी खास प्रयत्न केले. त्यांची भटकंती कमी केली. हेही विधायक प्रतिसरकार, कारण ‘सरकार’ म्हणवणारी यंत्रणा आज सरकारी कारखाने वा उपक्रम यांची विक्री करून, खासगीकरणाद्वारे इतर मागास वगैरेंच्या राखीव जागा घालवून या लोकांना सामाजिक न्याय डावलतानाच दिसत आहे.
कोयना धरणातून निर्माण झालेली वीज आधी महाराष्ट्रभर गेल्यानंतर त्या धरणग्रस्त लोकांच्या वसाहतीत वीज पुरवली गेली. ही बातमी वाचल्यावर धरणग्रस्तांवरील अन्याय अण्णांनी समजवून घेतला. त्यांचे संघटन केले. त्यांचे विकसनशील पुनर्वसन करणे सरकारला भाग पाडले. धरणग्रस्तांचा प्रश्न हा त्यांच्या कामाचा महत्त्वाचा भाग बनला.
दुष्काळग्रस्तांचा आणि पाणीवाटपाचा प्रश्न
कृष्णा पाणी तंटा लवादाने कृष्णा नदीचे पाणी लाभार्थी राज्यांना वाटून दिले होते. त्या- त्या राज्यांनी आपआपल्या वाट्याचे पाणी अडवून ३१ मे २००० पर्यंत वापरायचे होते. महाराष्ट्र शासनाचे याकडे दुर्लक्ष होत होते. अण्णांनी ही गोष्ट ध्यानात घेतली आणि सातारा, सांगली, सोलापूर या तीन जिल्ह्यांधील १३ दुष्काळी तालुक्यांमध्ये पाणी संघर्ष चळवळ सुरू केली. या चळवळीच्या रेट्यामुळेच महाराष्ट्रात ‘कृष्णा खोरे विकास मंडळ’ स्थापन होऊ शकले, पण अण्णा तिथेच थांबले नाहीत. बळीराजा धरणातील पाण्यातून केलेल्या प्रयोगांचे निष्कर्ष संपूर्ण कृष्णा खोऱ्याला लावून भटके, दलित वा भूमिहीनांसह सर्वांना शेतीसाठी पाणी दिले पाहिजे असा विचार पुढे आणला गेला. तेव्हा अशक्यप्राय वाटणाऱ्या या गोष्टी आज वैज्ञानिक आधार आणि नागनाथ अण्णांच्या नेतृत्वाखालील लोकांचा रेटा यांमुळे प्रत्यक्षात येत आहेत. अद्यापही काही भागामध्ये पाणी जाऊन पाण्याचे समान वाटप होणे बाकी असले तरी ‘हे सगळे होऊ शकते’ असा आत्मविश्वास आता संबंधित सर्वांना आलेला आहे. स्वातंत्र्य युद्धामध्ये आपल्या प्राणाची आहुती द्यायला अण्णा तयार होते हे स्पष्टच आहे. पण पाण्यासरख्या लोकलढ्यामध्ये शहीद व्हायलाही ते आनंदाने तयार होते, हे त्यांचा सहकारी म्हणून मीही अनुभवले आहे.
जातीयवादाने या देशाचे प्रचंड नुकसान केले आहे याची अण्णांना पक्की जाण होती. त्यामुळे जातीयवादी धर्मांध शक्ती या देश विघातक आहेत याची त्यांना खात्री होती. अण्णांकडे या दोन्हीही गोष्टींना थारा नव्हता.
क्रांतीवीर अण्णांनी अनेक सहकारी संस्था स्थापन केल्या. ते स्वत: त्यापैकी कुणा संस्थेचे पदाधिकारी झाले नाहीत. पण त्या संस्था चांगल्या चालवल्या. सहकारातून ‘हुतात्मा’ नावाचे एक दैनिक काढायचे असा त्यांचा प्रयत्न होता. पण काही कारणाने ते झाले नाही. विविध प्रसारमाध्यमांची सध्याची कामगिरी पहाता अण्णांचा दूरगामी द्रष्टेपणा लक्षात येतो.
अण्णा निर्व्यसनी, पारदर्शी, निग्रही आणि अविरत सावधपणे कार्यरत असे व्यक्तिमत्व. दांडगटांची खैर नसली तरी रंजल्या – गांजल्याचे अनेक अपराध माफ करतील असा स्वभाव. त्यांनी एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या पण हे मी केले असे ते कधीही म्हणाले नाहीत. हे वाळव्याच्या जनतेने केले, कारखान्याने केले असे त्यांचे बोलणे असे. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचे स्मरण करताना, त्यांना अभिवादन करताना नव्या पिढ्यांना त्यांच्या कामातून निश्चित प्रेरणा मिळतील. त्यांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्यासाठी तन, मन, धनाने झटणे हीच आगत्याची गोष्ट ठरेल.
लेखक संख्याशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक आणि पाणी संघर्ष चळवळीचे कार्यकर्ते आहेत.
ईमेल : dbjp1955@gmail.com